मोहन धारियांचे राजकारण काँग्रेसमध्ये सुरू झाले, इंदिरा गांधी यांनी त्यांना मंत्रिपद दिले.. म्हणजे स्वत:ची आणि कार्यकर्त्यांची सोय पाहत मोठे होण्याचा मार्ग धारियांपुढे खुला झाला होता; परंतु तसे झाले नाही. अन्यायाविरोधाची चीड हा त्यांच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिला. सत्ताकारणापासून दूर जाऊन ‘वनराई’ उभारणाऱ्या धारियांना जवळून पाहणाऱ्या सहकाऱ्याची ही आदरांजली..
ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सनिक, विचारवंत, वनराईचे संस्थापक, माजी केंद्रीय मंत्री, भारताच्या नियोजन मंडळाचे माजी उपाध्यक्ष व आयुष्यभर माणसांवर अप्रतिम प्रेम करणारे ज्येष्ठ नेते असे मोहन धारिया यांचे वर्णन करता येईल. विद्यार्थिदशेतच त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली. पोलिसांनी त्यांना अटक केली, परंतु वय कमी असल्यामुळे सोडून दिले. ही पाश्र्वभूमी मोहन धारिया यांच्या कार्याला लाभली होती. प्रत्येक कामात स्वत:ला झोकून देणे व त्यासाठी अपार कष्ट उपसणे हा त्यांचा स्वभाव आयुष्यभर कायम राहिला. आयुष्यभर तत्त्वांशी एकनिष्ठ राहणारा व त्यासाठी भूमिका घेऊन जगणारा नेता म्हणूनही त्यांचा उल्लेख करता येईल. छत्रपती शिवाजीमहाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, जयप्रकाश नारायण, यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल त्यांना नितांत आदर होता.
या पाश्र्वभूमीवर १९६४ साली ते राज्यसभेचे सभासद झाले व राष्ट्रीय नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली. काँग्रेस पक्षाची धोरणे प्रत्यक्षात कृतीत यावीत म्हणून त्यांनी कोणाची तमा न बाळगता राजकीय भूमिका घेतली. इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण, राजेमहाराजांचे तनखे रद्द करणे यांसारखे क्रांतिकारी निर्णय घेतले असताना त्याची अंमलबजावणी करण्यासाठी व राजकारणातील अपप्रवृत्ती दूर सारण्यासाठी चंद्रशेखर, मोहन धारिया, रामधन, कृष्णकांत आदी खासदारांनी आग्रह धरला व साऱ्या देशात कथनी आणि करणीमध्ये अंतर राहू नये यासाठी देशभर भ्रमंती केली. पुढे काँग्रेसमधील या गटाला तरुण तुर्क म्हणून देशभरात मान्यता मिळाली व देशातील तरुण आकर्षति झाले. माझ्यासारखे अनेक तरुण कार्यकत्रे युवक काँग्रेसमध्ये कार्य करीत असताना या तरुण तुर्काकडे आकर्षति झाले. तो कालखंड काँग्रेसच्या इतिहासात वेगळे वळण घेणारा म्हणून आपल्याला सांगता येईल. नक्षलवादी चळवळ सुरू झाली होती. देशातील सुशिक्षित तरुण त्याकडे आकर्षति झाले होते. काँग्रेसमध्ये माझ्यासारख्या अनेक तरुण कार्यकर्त्यांना गांधी, विनोबांवर प्रचंड श्रद्धा असूनही मार्क्स आकर्षति करीत होता. काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाविषयी आमच्या मनात रोष होता. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर मोहन धारिया व राज्य पातळीवर शरद पवार यांचे नेतृत्व आम्हाला काँग्रेसमध्ये देशाच्या भवितव्याचे स्वप्न देत होते. धारिया व शरद पवार यांनी त्या काळात युवकांना काँग्रेस पक्षात येण्यासाठी व पुरोगामी विचार प्रगल्भ करण्यासाठी महत्त्वाची भूमिका वठवली आहे.
केंद्रीय मंत्री, राजबंदी!
१९७१ साली मोहन धारिया प्रचंड मतांनी लोकसभेवर निवडून गेले. इंदिरा गांधी यांनी त्यांना उपमंत्रिपद दिले, पण स्वाभिमानी धारियांनी शपथविधीस जाण्यास नकार दिला. पुढे इंदिराजींनी त्यांना नियोजन खात्याचा स्वतंत्र कारभार देऊन राज्यमंत्रिपद दिले. या खात्यात त्यांनी जे काम केले त्याची नोंद सर्वाना घ्यावी लागली. प्रशासनावर पकड व संघटनकौशल्य धारियांनी सिद्ध केले. १९७४ साली जयप्रकाश नारायण यांनी देशात भ्रष्टाचारविरोधी आंदोलन सुरू केले. त्यामुळे इंदिराजी व जयप्रकाश यांच्यात मतभेद निर्माण झाले. हे मतभेद देशाच्या व काँग्रेस पक्षाच्या देखील हिताचे नाहीत, अशी भूमिका धारियांनी घेतली व इंदिराजींनी जयप्रकाश नारायण यांच्याशी संवाद साधावा असा आग्रह धरला. इंदिराजींच्या स्वभावाला हे न पटणारे होते. २५ जून १९७५ साली इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली आणि त्याला धारियांनी विरोध केला. त्यामुळे त्यांची अटक करण्याचे आदेश काढण्यात आले. काही दिवस भूमिगत राहून धारियांनी आणीबाणीविरोधात जनजागृतीचे काम केले. पुढे त्यांना अटक झाली व जवळजवळ १७ महिने नाशिकच्या तुरुंगात ठेवण्यात आले. केंद्रीय मंत्र्याला राजकीय भूमिकेसाठी कारावास व्हावा, ही स्वतंत्र भारतातील अद्भुत घटना घडली.
१९७७ साली जनता पक्षाच्या तिकिटावर धारिया पुन्हा प्रचंड बहुमताने निवडून आले. केंद्रात जनता पक्षाच्या राजवटीत ते वाणिज्यमंत्री झाले. या दरम्यान त्यांनी घेतलेले निर्णय देशाच्या किती हिताचे होते यावर संशोधन करता येईल. या खात्याचे पी. सी. अलेक्झांडर हे सचिव होते. पुढे अलेक्झांडर महाराष्ट्राचे राज्यपाल असताना त्यांच्याशी झालेल्या भेटीत मला त्यांनी धारियांच्या कर्तृत्वाचा आलेख वाचून दाखवला व असा प्रामाणिक व देशहिताचा विचार करणारा नेता मी पाहिला नाही असे सांगितले. त्या क्षणी त्यांचे डोळे पाणावले होते व मी मंत्रमुग्ध झालो होतो. त्या कालखंडात खाद्यतेलाचा प्रश्न अतिशय डबघाईला आलेला होता. त्यावर धारियांनी जो मार्ग काढला, त्यामुळे हा प्रश्न जाणवला नाही व त्या अनुषंगाने वितरण व्यवस्थादेखील अतिशय मजबूत केली. १९८० साली जनता पक्षाचे सरकार कोसळले व देशात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत धारियांचादेखील बारामती मतदारसंघातून पराभव झाला.
‘वनराई’कडे..
१९८० ते २०१३ हा मोहन धारिया यांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा टप्पा मी स्वत: मानतो. राजकारणात उच्च स्थानावर राहिलेल्या व्यक्ती राजकारणातून निवृत्त झाल्यावर किती अस्वस्थ होतात याची अनेक उदाहरणे आपणास माहीत असतील. राज्यसभेचे सदस्य असताना दिल्लीच्या काही ज्येष्ठ पत्रकारांनी त्या वेळी असे मत व्यक्त केले होते, की ज्या वेळी धारिया राज्यसभेमध्ये बोलतात त्या वेळी राज्यसभेचे मजबूत खांब गळून पडतील की काय, असा घणाघाती प्रहार ते त्यांच्या सरकारवर करीत असतात. हे सर्व करीत असताना विरोधी पक्षाचा अजिबात फायदा होत नाही, तर काँग्रेस पक्षाचीच प्रतिमा अधिक उंचावलेली दिसते. अशा व्यक्तीला राजकारणातील एकांतवास किती असहय़ वाटला असता याची कल्पनादेखील अंगावर शहारा निर्माण करते. धारियांच्या अभ्यासू प्रवृत्तीमुळे त्यांनी यावर मात केली. अनेक वर्षांपासून त्यांच्या डोक्यात वनश्रीच्या संदर्भात जो विचार होता त्याला मूर्त रूप देण्याचे त्यांनी ठरवले. यातूनच ‘वनराई’ संस्थेची निर्मिती झाली. महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांत त्यांनी स्वत: भेटी दिल्या व त्या ठिकाणी पर्यावरणरक्षण, वृक्षारोपण, जलसंधारण, सर्वागीण ग्रामविकास, यासंबंधातील परिसंवाद आयोजित केले. या क्षेत्रातील तज्ज्ञांना व कार्यकर्त्यांना एकत्रित केले व हा प्रश्न या देशासाठी किती महत्त्वाचा आहे हे समजावून सांगितले. त्या काळात अनेकांनी त्यांची चेष्टा करण्याचा प्रयत्न केला, काहींनी नाके मुरडली, तर ज्यांना धारियांची जिद्द व चिकाटी माहीत होती त्यांनी मौन रागात जाणे पसंत केले. पुढे या कामाला राष्ट्रीय पातळीवर व राज्य पातळीवर किती महत्त्व प्राप्त झाले हे आपण पाहत आहोत. चंद्रशेखर पंतप्रधान असताना नियोजन मंडळाचे उपाध्यक्षपद त्यांनी स्वीकारले व यानिमित्ताने ‘वनराई’ची ध्येयधोरणे देशातील विविध राज्यांत विस्तारित करण्याची त्यांना संधी मिळाली. प्रत्येक राज्याने पडीक जमीन विकसित करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना सर्व मुख्यमंत्र्यांना दिल्या. त्या आधी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी धारिया यांना आपल्या राज्यात बोलावून मंत्री व सचिव यांच्या संयुक्त बठका घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले होतेच.
काही राज्यांत मीदेखील धारियांच्या सोबत होतो. या देशातील अध्रे क्षेत्रफळ पडीक अथवा खराब अवस्थेमध्ये आहे व या देशातील लोकसंख्येच्या तुलनेत निम्मे तरुण बेकार आहेत. याची सांगड घातल्यास हा देश सुजलाम् सुफलाम् होऊ शकेल, अशी त्यांची श्रद्धा होती.
‘जिंदा दिल ही जिंदगी का नाम है, मुर्दा दिल क्या खाक जीते है?’ या उक्तीप्रमाणे धारियाजी जीवन जगले. आयुष्यातील सर्व यश त्यांनी नम्रतेने स्वीकारले व अपयशाची कधी तमा बाळगली नाही. अपयशदेखील अतिशय धाडसाने त्यांनी पचविले. अन्यायाविरोधाची चीड हा त्यांचा स्थायिभाव होता आणि या वयातही अशा प्रश्नांच्या बाबतीत ते आक्रमक व्हायचे. जंजिरा संस्थान मुक्त करण्यासाठी त्यांनी घेतलेली भूमिका असो किंवा तात्त्विक राजकारणासाठी केलेले राजकारण असो अथवा देशाच्या व जगाच्या हिताचा त्यांनी केलेला पाठपुरावा असो, या सर्वातून मोहन धारिया यांचे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व दिसून येते. ‘पॉलिटिक्स फॉर कमिटमेंट’ (बांधीलकी मानणारे राजकारण) आणि ‘पॉलिटिक्स फॉर कव्हीनियन्स’ (सोय पाहणारे राजकारण) यांतून त्यांनी कमिटमेंटचा मार्ग नेहमीच स्वीकारला व त्यासाठी त्यांनी किंमत चुकवली. त्यांच्या जाण्याने केवळ धारिया कुटुंबच नाही तर माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांची कुटुंबे आज पोरकी झाली आहेत्ां. त्यांनी आयुष्यात अनेक सामान्य माणसांना मदत केली व ती करताना भविष्यातील कोणताही स्वार्थी दृष्टिकोन डोळय़ांसमोर ठेवला नाही. त्यांना मी माझी श्रद्धांजली अर्पण करतो.
* लेखक हे सामाजिक कार्यकर्ते तसेच ‘वनराई’चे विश्वस्त आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा