आपला विषय सुरू करण्याआधी एका शंकेचं निराकरण केलं पाहिजे. एका साधकाच्या मनात शंका आली की संसारात शाश्वत सुख नसलं तरी सुख नसतं, असं कसं म्हणावं? त्यासाठी आपल्याच चिंतनातली वाक्यं नीट वाचा, त्यात कुठेही प्रपंचात सुख नसतंच, असं म्हटलेलं नाही. तर ‘केवळ प्रपंचातच सुख आहे’ या कल्पनेला भ्रामक म्हटलेलं आहे. म्हणजे प्रपंचात केवळ सुखच आहे, ही कल्पना भ्रामक आहे त्याचप्रमाणे केवळ प्रपंचातच सुख आहे, ही कल्पनाही भ्रामक आहे. प्रपंचातल्या ज्या गोष्टी आपल्याला सुखाच्या वाटतात त्यापलीकडेही फार मोठं सुख असू शकतं. त्यासाठी प्रपंचात राहूनच प्रपंचाच्या आसक्तीपलीकडे जावं लागतं. अध्यात्म वगैरेही सोडून द्या. साध्या माणसालाही प्रपंचातल्या आसक्तीपलीकडे जाण्याची गरज कोठल्या ना कोठल्या वळणावर वाटतेच. जो या आसक्तीपलीकडे जाऊ शकत नाही, त्याला प्रपंचातलं सुखही निर्भेळपणे भोगता येत नाही. या आसक्तीपलीकडे जाता आलं नाही, तर काय होतं? प्रपंचातल्या ज्या गोष्टी वा व्यक्ती आपल्याला सुखाचं कारण वाटतात त्यात आपण गुंतून जातो, त्यांच्याकडून आपण अपेक्षा बाळगू लागतो आणि वाढवू लागतो आणि त्या नेहमीच सुखकारकच असतील, असेही मानू लागतो. त्यातून मग अपेक्षाभंगाचं दु:खंच वाटय़ाला येतं. प्रपंचात सुखाभासाचेही क्षण अनेक असतात. ते कायमचे टिकवण्याची धडपड मात्र दु:खदायक असते. जे मला सुखाचं वाटतं तेच घडावं, तेच टिकावं, ही धडपड म्हणजेच ‘प्रपंच माझ्या मनाजोगता व्हावा’, ही इच्छा. तीसुद्धा भ्रामकच असते. आपण पत्त्याचा खेळ खेळतो, त्यात आनंद नसतो का? असतो. प्रत्यक्षात खेळातल्या पत्त्यांतले फार थोडे पत्ते आपल्या हातात येतात. जे हातात येतात त्याच पत्त्यांनी खेळावं लागतं. आपली प्रत्येक खेळी ही जिंकण्यासाठीच असते. तरीही त्या खेळातली हार-जीत दोन्ही आपण सहजतेनं स्वीकारतो आणि प्रत्येक डाव आपल्याला आनंदाचा वाटतो. प्रपंचात मात्र आपण हार-जीत अगदी जिव्हारी लावून घेतो. प्रपंचात आपल्याला जीतच हवी असते.  हातातले बरे-वाईट पत्ते, हा खेळाचाच एक अपरिहार्य भाग असतो, हे आपण मानतो. प्रपंचात मात्र सर्व काही आपल्याचकडे असावे, आपलेच असावे, आपल्याच मनासारखे असावे, हा आपला आग्रह असतो. बरं, असं वाटण्यातही काही गैर नाही. पण त्यासाठीचे प्रयत्न करतानाच आपण त्या प्रयत्नांच्या मर्यादाही लक्षात ठेवायला हव्यात. प्रपंचाचं खरं स्वरूपही लक्षात ठेवायला हवं. प्रपंच हा नित्य अपूर्ण आहे. कितीही केला तरी तो पुरा होत नाही. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर प्रापंचिकाला आपला प्रपंच आता पूर्ण झाला, असं वाटत नाही. त्यात अपूर्णता स्वाभाविकपणे उरतेच. तेव्हा प्रपंचातले सुखाचे क्षणही जरूर भोगावेत पण त्यात मनानं अडकू नये. ही गरज आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर प्रत्येकालाच जाणवते. त्यावरचा उपाय मात्र समजत नाही. तो उपायच श्री गोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘ज्या भगवंताजवळ आनंद राहतो त्याचे होऊन राहिले तरच अखंड आनंदी होता येईल.’’

Story img Loader