आजवर वैविध्याच्या बळावर जीवसृष्टीची आगेकूच चालली आहे. पण मानवाने जी कृत्रिम वस्तुसृष्टी निर्माण केली आहे तिच्या स्वतंत्र चालीतून जैववैविध्याचा प्रचंड विध्वंस होण्याची शक्यता आहे.
जीवसृष्टीने सजवलेल्या अवनीवरचे पश्चिम घाटासारखे काही भूभाग विशेष वैविध्यसंपन्न आहेत. त्यांपैकी निलगिरीवरील एका विस्तृत पट्टय़ात अजूनही नसíगक वनराजी खूप टिकून आहे, झऱ्यांत, नद्यांत निर्मल पाणी वाहते आहे. अशा भागाला बायोस्फिअर रिझव्र्ह म्हणून सांभाळण्याचे प्रयत्न चालू आहेत. काही वर्षांपूर्वी याच्या सफलतेची पडताळणी करण्याचे काम माझ्यावर सोपवण्यात आले होते. निलगिरीवरच्या जीवसृष्टीचा एक महत्त्वाचा ठेवा आहे तिथल्या कडय़ांवरून कोसळणाऱ्या ओढय़ांची खासियत असलेल्या मत्स्यजाती. यांची काय स्थिती आहे हे समजावून घेणे हा माझ्या अभ्यासाचा महत्त्वाचा भाग होता. मी मुद्दाम भारतातले अग्रगण्य मत्स्यविशारद समजले जाणाऱ्या जयरामनना भेटलो, विचारले, हा अभ्यास कसा करायचा? ते म्हणाले, यावर गेल्या पन्नास वर्षांत काहीही शास्त्रीय संशोधन झालेले नाही, पण त्या भागात काळिअप्पन नावाचा एक जाणकार मच्छीमार आहे, तो मोयार नदीवर गेली चार दशके मासेमारी करतो आहे. त्याला पकड, त्याच्याशी बोल. मी म्हटले, झकास! मी काळिअप्पनला हुडकले, त्याच्याबरोबर दिवसभर मासे पकडले, चांदण्यात ताज्या माशांचा समाचार घेत नदीकाठच्या वाळवंटावर रात्रभर मुक्काम केला. त्याने माशांची तमिळ नावे सांगितली, नदीतल्या वेगवेगळ्या अधिवासांचा, मत्स्यजातींचा चाळीस वर्षांचा इतिहास सांगितला, त्यांच्यातल्या बदलांमागची कारणपरंपरा समजावून सांगितली. मी सगळी टिपणे घेऊन जयरामनना दाखवली. ते म्हणाले, सगळे बरोबर असावे असा माझा अंदाज आहे. मी एकाच गोष्टीची भर घालू शकतो, मत्स्यजातींच्या स्थानिक नावांना शास्त्रीय नावांची जोड देण्याची. काळिअप्पन ज्या ज्या मत्स्यजाती ओळखतो, त्याच आधुनिक विज्ञान ओळखते!
मानवाने आपल्या ज्ञानसंकलनाच्या बळावर साऱ्या जीवसृष्टीवर कुरघोडी केली आहे. अगदी आदिकालापासून काळिअप्पनप्रमाणेच मानव सतत वेगवेगळ्या जीवकुळी, जीवजाती ओळखणे, त्यांना नावे देणे, त्यांच्या चालीरीती समजावून घेणे यासाठी झटत राहिला आहे. अशा जाती-जातींतील, कुळा-कुळांतील सीमारेषा अनेकदा अस्पष्ट असतात. कारण अखेर जगातले सारे जीवजंतू एकाच आदिमायेची संतती आहेत. वरवर खूप फरक दिसत असला तरी डीएनए, अमिनो आम्ले, शर्करा अशा रेणूंच्या पातळीवर साऱ्या सजीवांच्या जडण-घडणीत एकात्मता आहे. आपण आपल्या सोयीसाठी यांना वेगवेगळ्या वंशांत, वर्गात, कुळींत, प्रजातींत, जातींत विभागतो. पण हे कितपत वास्तवाला धरून आहे? का या वेगवेगळ्या कुळींच्या, जातींच्या संकल्पना, त्यांच्यातल्या सीमारेषा कृत्रिम आहेत?
जीवशास्त्रात हा तात्त्विक वाद खूपच रंगला आहे. अठराव्या शतकात जीवसृष्टीच्या आधुनिक शास्त्रीय वर्गीकरणाचा पाया भरणाऱ्या ईश्वरनिष्ठ लिनेयसच्या मते हे सगळे भेदाभेद दगडावरच्या पक्क्या रेघा आहेत, कारण त्या देवाच्या मनातल्या कल्पनांचा आविष्कार आहेत. निसर्गात वेगवेगळ्या जीवजातींतल्या सीमारेषा कधी कधी धूसर भासतात, एकेका जीवजातीच्या अंतर्गतही वैविध्य दिसते हे खरे, पण लिनेयसच्या मते ती भ्रामक विकृती आहे. डार्वनिचा समकालीन व अखेपर्यंत उत्क्रान्तिवादाला कट्टर विरोध करीत राहिलेला ख्यातनाम प्राणिशास्त्रज्ञ लुई अॅगसिझ याच मतप्रणालीचा समर्थक होता. तो लिनेयसच्या पुढे जाऊन गोरे, काळे, पिवळे मानव या तीन वेगवेगळ्या जीवजाती आहेत, अशी मांडणी करीत होता. उलट लिनेयसनंतर एका शतकाने उत्क्रान्तितत्त्वाचा पाया भरणाऱ्या चार्ल्स डार्वनिने अगदी वेगळे प्रतिपादन केले. त्याच्या मते वैविध्य हीच सर्व जीवजातींची प्रकृती आहे, हाच उत्क्रान्तीचा आधार आहे. डार्वनिवादानुसार वंश, वर्ग, कुळी, प्रजाती यांच्यात केलेले फरक केवळ सोयीपुरते आहेत, मात्र जीवजाती-जातींतील सीमारेषांना वास्तवातही थोडाबहुत अर्थ आहे. हा अर्थ काय असावा? जीवसृष्टीच्या उत्क्रान्तियात्रेत वैविध्यनिर्मितीला आगळे महत्त्व आहे, आणि या वैविध्यनिर्मितीचा वेग वाढवण्यात नर-मादींच्या सहकाराने लैंगिक पुनरुत्पादनाचे योगदान महत्त्वाचे आहे. पण असा सहकार काही एका मर्यादेत शक्य असतो. जर नर व मादी त्या मर्यादेहून अधिक वेगळे असले तर त्यांच्यात आनुवंशिकतेचा आधार असलेल्या जनुकांची देवाण-घेवाण शक्य होणार नाही, प्रजननात ते सहकार करू शकणार नाहीत. आधुनिक शास्त्राच्या व्याख्येप्रमाणे ज्यांच्यात प्रजननात असा सहकार शक्य आहे तो गट म्हणजे एक विवक्षित जीवजाती, त्याच्या मर्यादेबाहेर वेगवेगळ्या जीवजाती.
पण अखेर जीवजातींमधल्या सीमारेषाही लवचीक आहेत. याचे एक छान उदाहरण आहे वर्तुळजाती. कॅलिफोíनयात सॅलामांडर या बेडकांच्या शेपटीवाल्या सोयऱ्यांच्या एन्साटिना प्रजातीच्या सात जाती एका वर्तुळाकार क्षेत्रात पसरल्या आहेत. त्यांच्यातल्या पहिली-दुसरीत, दुसरी-तिसरीत, तिसरी-चौथीत, चौथी-पाचवीत, पाचवी-सहावीत, सहावी-सातवीत थोडय़ा थोडय़ा प्रमाणात आंतरजातीय संकर घडून येतो. पण वर्तुळ पुरे होऊन जिथे पहिली आणि सातवी भेटतात, तिथे बिलकूल आंतरजातीय संकर होत नाही. वनस्पतींत तर जाती-जातींतील सीमारेषांना ओलांडून भरपूर प्रमाणात आंतरजातीय संकर होतात. अनेकदा संकरानंतर त्यांच्या जनुकांचा संच दुप्पट वाढून त्यातून नव्या जीवजाती निर्माण होतात. सुमारे दहा टक्के वनस्पतिजाती अशा रीतीने आंतरजातीय संकरातून निर्माण झालेल्या आहेत.
आज जीवजातींतल्या मर्यादा हा मोठा जिव्हाळ्याचा विषय बनला आहे, कारण आपल्या सतत प्रगतिशील ज्ञानसंकलनाच्या बळावर मानवाने केवळ जवळ जवळच्या नाही, तर अगदी विभिन्न जीवजातींतले जनुकसंच एकत्र आणण्याचे तंत्र विकसित केले आहे. यातून बनली आहेत एक खास प्रकारची सजीव आयुधे, अगदी नव्या धाटणीचे, बॅक्टेरियांतले विषोत्पादक जनुक धारण करणारे बीटी कपाशीसारखे जीएम वाण. उत्क्रान्तीच्या अभ्यासकांच्या दृष्टीने यांचे काय भवितव्य आहे हे समजावून घेणे हे एक महत्त्वाचे आव्हान आहे. या संदर्भात अनेक प्रश्न पुढे येतात : जीएम पिके मोकाट फैलावू शकतील का? पुंकेसरांद्वारे जीएम् पिकांचे बाहेरून घुसवलेले जनुक इतर नसíगक जातींत शिरू शकतात का? अशी निर्माण झालेली संकरित प्रजा खेचरांसारखी वंध्य नसल्यास, त्यांच्या संततीतून नव्या जाती निर्माण होत राहतील का? यांतील काही आक्रमक बनून तणे पसरतील का? आज या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे उपलब्ध आहेत. अमेरिकेत मोहरी अथवा राईचे वेगवेगळी प्रतिरोध शक्ती असणारे दोन जीएम् वाण लागवडीत आहेत. सध्या हे दोघेही उपटसुंभ वाण मोकाट पसरताहेत, अन् वर या दोन जीएम् वाणांत संकर होऊन एक नवीनच अधिकच तीव्र प्रतिरोध शक्ती असलेली जात बनली आहे. जीएम् मक्यातून मेक्सिकोमधल्या रानमक्यांच्या प्रजातींत अनेक जनुके घुसली आहेत. तांदूळ, ज्वारी, मोहरी, गाजर, मुळा, बीट, भोपळा, द्राक्षे, स्ट्रॉबेरी, अक्रोड अशा अनेक लागवडीतील जातींचा वन्य भाईबंदांशी आंतरजातीय संकर झाल्याचा पुरावा आहे. सूर्यफुलांच्या रानफुलांशी झालेल्या आंतरजातीय संकरातून उपजलेल्या हेलिअॅन्थस अॅनोमॅलससारख्या नवनिर्मित जाती आक्रमक तणे बनून माजत आहेत. अशा घडामोडींतून केव्हा ना केव्हा साऱ्या नसíगक वनस्पतींवर कुरघोडी करणारी राक्षसी तणे उपजणे अनिवार्य आहे. आपल्या हाताबाहेर जाऊन मानवनिर्मित कृत्रिम वस्तूंचे हे जीएम विश्व जीवसृष्टीत जीवघेणी उलथापालथ घडवून आणण्याच्या दिशेने आगेकूच करते आहे.
-लेखक ज्येष्ठ परिसर्ग-अभ्यासक आहेत.
उदंड माततील उपटसुंभ
आजवर वैविध्याच्या बळावर जीवसृष्टीची आगेकूच चालली आहे. पण मानवाने जी कृत्रिम वस्तुसृष्टी निर्माण केली आहे तिच्या स्वतंत्र चालीतून जैववैविध्याचा प्रचंड विध्वंस होण्याची शक्यता आहे.
First published on: 21-11-2014 at 12:53 IST
मराठीतील सर्व उत्क्रांतियात्रा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Artificial intervention in ecology harmful for nature