गावागावांत, शहराशहरांत अनेक तरुणी न केलेल्या गुन्ह्य़ाचे प्रायश्चित्त भोगत जिवंत राहतात. केवळ पुल्लिंगी नाही म्हणून वासनेच्या यातनाघरांत फेकल्या गेलेल्या या तरुणी पाहिल्यावर एका अर्थाने त्यांच्या तुलनेत अरुणा सुखी वाटावी, अशी ही परिस्थिती. या चार दशकांत समाज कोणत्या दिशेने बदलला? त्याकडे पाहिले तर पुढील प्रश्न पडतील..  

प्रश्न अरुणा शानबाग यांचे निधन झाले म्हणजे काय, हा आहेच. पण त्याहीपेक्षा अधिक १९७३ साली झालेल्या या अरुणा अत्याचारानंतर आपल्याकडे नक्की काय बदलले हादेखील आहे. सत्तरीच्या दशकानंतर २०१५ पर्यंत जग बरेच बदलले असे म्हणतात. पण अरुणा शानबाग यांचा मृत्यू हा या काळात भारतात काय बदलले नाही, हे दाखवतो. अरुणा शानबाग यांच्यावर बलात्कार झाला त्या वर्षी आजच्या तुलनेत जगणे बरेच सरळ आणि सोपे होते. इंटरनेटचा जन्म व्हायचा होता. सोव्हिएत फौजा अफगाणिस्तानात घुसण्यास सहा वष्रे होती. इंदिरा गांधींचे पंतप्रधानपद सुरक्षित होते. नुकत्याच झालेल्या बांगलादेश युद्धातील विजयाने श्रीमती गांधींच्या डोक्यावर दुर्गापदाचा मुकुट चढवला गेला होता. केशवानंद भारती खटला आणि नंतरच्या न्यायालयीन लढय़ांमुळे या मुकुटास अद्याप तडा गेला नव्हता. राज्यकर्त्यांसाठी जनता जेवढी खाऊनपिऊन सुखी असणे आवश्यक असते तेवढी होती. हा सुखी वर्ग नुकत्याच प्रकाशित झालेल्या बॉबी सिनेमामुळे घामाघूम होत होता. त्यावर जणू उतारा म्हणून अमिताभ बच्चन यांचा जंजीरदेखील तब्बल आठ महिने गर्दी खेचत होता. याच अमिताभशी लोकप्रियतेत स्पर्धा करणारा सचिन रमेश तेंडुलकर नुकताच कोठे जन्मला होता. तेव्हा चंगळवाद म्हणजे काय हे माहीत होण्याआधीचा तो काळ. सर्वसाधारण मध्यमवर्गासदेखील रेशनवरून धान्य आणण्यात त्या वेळी कमीपणा वाटत नसे तो हा काळ. दादा कोंडके यांचा नुकताच प्रदíशत झालेला आंधळा मारतो डोळा ही वाह्य़ातपणाची कमाल मानली जात होती तो हा काळ. डॉक्टर या जमातीविषयी अत्यंत आदर व्यक्त केला जात असे तो हा काळ. आपला पती डॉक्टर वा इंजिनीअर असावा असे प्रत्येक मध्यमवर्गीय तरुणीस वाटत असे तो काळही हाच. आणि असेच, डॉक्टरसह सुखाच्या संसाराचे स्वप्न रंगवणाऱ्या अरुणा शानबाग यांच्यावर अमानुष बलात्कार झाला तोही हाच काळ. अरुणा शानबाग या राजे एडवर्ड यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या केईएम रुग्णालयात परिचारक होत्या. डॉक्टरच्या खालोखाल आदर मिळवणारा पेशा त्यांचा. परंतु त्याच रुग्णालयात साफसफाईची कामे करणाऱ्या कोणा सोहनलाल वाल्मीकी नामक इसमास या वैद्यकविश्वातील पावित्र्याचा गंधही नव्हता. एका रात्री या वाल्मीकीचे वाल्यात रूपांतर झाले आणि वासनांध अवस्थेत त्याने अरुणावर बलात्कार केला. आपले हे कुकर्म अरुणाने बिनबोभाट सहन करावे, आरडाओरड करू नये यासाठी या वाल्मीकीने अरुणाला कुत्र्यांस बांधतात त्या साखळीने बांधले. जे झाले ते इतके अमानुष होते की विवाहाचे स्वप्न पाहणाऱ्या अरुणावर केवळ मानसिकच नव्हे तर शारीरिकदेखील आघात झाला. वासनांध वाल्मीकीच्या कृत्यामुळे अरुणाच्या मेंदूस मार लागला आणि त्या क्षणापासून एका रसरशीत आयुष्याचे रूपांतर कोणतीही भावभावना, संवेदना, जाणिवा नसलेल्या एका पालापाचोळ्याच्या जुडीत झाले. या मानवी पालापाचोळ्याची ही शुष्क जुडी केवळ श्वास घेत होती म्हणून ती जिवंत होती, असे म्हणायचे. ती जिवंत होती तिच्या सहकर्मचाऱ्यांसाठी. पण तिच्या लेखी जग असे नव्हतेच. जगाने तिला निरोप दिला नव्हता. पण तिने कधीच जगाचा निरोप घेतला होता. प्रश्न इतकाच होता, निरोपासाठी हाती दिला जाणारा हात कधी सुटणार हा. त्याचे उत्तर सोमवारी मिळाले. अरुणा शानबाग यांचे अधिकृत निधन झाले.
परंतु मुद्दा असा की या काळात आपल
्याकडे काय बदलले? बदल झाला तो इंदिरा गांधी यांचे निधन, बॉबी साकारणाऱ्या डिम्पलचे पिकत जाणे, वयाच्या सत्तरीतही कायम असलेली अमिताभची आसक्ती आणि सचिनची निवृत्ती, इतकाच? हे तर सर्व नसíगकच. त्यात समाज म्हणून आपण काय केले? दिल्लीत याहीपेक्षा भयानक अवस्थेत एका तरुणीवर बलात्कार होऊ दिला यास बदल म्हणावे काय? अरुणावर बलात्कार करणाऱ्याने कुत्र्याची साखळी वापरली. दिल्लीत तरुणीवर बलात्कार करणाऱ्याने पहारीचा वापर केला, हादेखील बदलच का? पण ती दिल्लीतील तरुणी अरुणापेक्षा एका अर्थाने भाग्यवान. तिच्यावर अशी ४२ वर्षांच्या काळ्या पाण्याची वेळ आली नाही. ती लगेचच मेली हादेखील सकारात्मक बदल मानायला काय हरकत आहे? तिच्या मरणानंतरही तिच्या मरणास कारणीभूत असणाऱ्यांना तरुण म्हणावे की अज्ञ बालके हा आपल्याला पडलेला प्रश्न हाच सामाजिक बदल अधोरेखित करतो. वास्तविक बलात्कार हा पूर्ण वाढलेल्या शारीर जाणिवांचा घृणास्पद आविष्कार. शरीराचे आणि त्यातील वासनांचे हे असे उकिरडय़ासारखे वाढणे म्हणजे बाल्यावस्था संपल्याचे लक्षण. परंतु तरीही असे कृत्य करणाऱ्यास तरुण मानण्याइतका आपला कायदा प्रौढ होऊ शकला नाही, हे बदलत्या समाजाचे लक्षण मानावे काय? तसे नसेल तर गावोगावच्या जिवंत अरुणांच्या वाढत्या कथा काय दर्शवतात? अरुणा पालापाचोळ्यासारखी का असेना ४२ वष्रे डोळ्यांपुढे राहाते. दिल्लीतील ती अभागी तरुणी काही आठवडय़ांपुरती का असेना समाजपुरुष किती हतवीर्य आहे हे दाखवत प्राण सोडते. पण गावागावात, शहराशहरात अनेक तरुणी न केलेल्या गुन्ह्य़ाचे प्रायश्चित्त भोगत जिवंत राहतात, यासदेखील आपल्या समाजातील बदल मानायचे काय? केवळ पुल्लिंगी नाही म्हणून वासनेच्या यातनाघरांत फेकल्या गेलेल्या या तरुणी पाहिल्यावर एका अर्थाने त्यांच्या तुलनेत अरुणा सुखी वाटावी, अशी ही परिस्थिती. याचे कारण निदान अरुणास बलात्कार कसा टाळावा असा सल्ला देणारे कोणी बुवा-बापू सहन करावे लागले नाहीत.
बलात्कार घडला त्या वेळच्या तिच्या वस्त्रप्रावरणांची चर्चा करणारे कोणी भगवे वस्त्रांकित साधू वा साध्वी यांची बिनडोक बडबड अरुणास सहन करावी लागली नाही. सातच्या आत घरात न गेल्यामुळे अरुणास बलात्कारास सामोरे जावे लागले असे ऐकून घेण्याची वेळ तिच्यावर आली नाही. खरेच ती नशीबवान. आताच्या तरुणींना वासनांधांच्या दोन पायांमधील नियंत्रणशून्य अवयवास जसे तोंड द्यावे लागते तसेच समाजातील अनेकांच्या दोन कानांमधील दडलेल्या मेंदूच्या विवेकहीनतेस देखील सामोरे जावे लागते. अरुणावरील बलात्कारानंतर समाजात बदल झाला आहे असे म्हटले जाते तो बदल बहुधा हाच. अरुणास विवाहाची स्वप्ने पडत होती. तीदेखील व्यर्थच. कारण विवाहानंतर देखील भारतीय नारीवर साक्षात पतीकडूनच होणारे असे अत्याचार सहन करण्याची वेळ येऊ शकते, हे अरुणास ठाऊक नसावे. आणि असे अत्याचार झाले तरी भारतीय विवाहितेस पतीकडून होणाऱ्या बलात्काराची तक्रार करण्याची सोय नाही, असे खुद्द सरकारच म्हणते हेदेखील अरुणास माहीत नसणार. भारतीय सांस्कृतिकतेत पतीकडून बलात्कार ही संकल्पनाच नाही म्हणे. सरकारच म्हणते म्हणजे ते खरे मानायला हवे. अरुणावरील अत्याचारास चार दशके उलटल्यानंतर समाजात काय काय झाले त्याचे हे वर्णन.
तेव्हा आपण सर्व अरुणा शानबाग यांचे ऋणी राहायला हवे. आपल्या सामाजिक प्रगतीची जाणीव तर त्यांनी आपल्या मरणाने आपल्याला करून दिलीच, पण त्याच बरोबरीने कोमात नक्की कोण आहे हेदेखील दाखवून दिले.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात
youth stabbed in head, Thane, Thane crime news,
ठाणे : वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यात चाकूने भोसकले
tempo hit on Satara road, Woman died Satara road,
सातारा रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू, दाम्पत्य जखमी; अपघातानंतर टेम्पोचालक पसार