सज्जनांच्या संगाचा, सत्संगाचा जिवावर अमीट ठसा उमटल्याशिवाय रहात नाही. आता हा जो सत्संग असतो तो तीन प्रकारचा असतो. प्रत्यक्ष सहवास हा एक सत्संग, सद्ग्रंथांचं वाचन-मनन हा दुसरा सत्संग आणि नामस्मरण हा तिसरा सत्संग.
हा प्रत्येक सत्संग चित्तावर खोलवर संस्कार करतोच. ‘पूर्ण-अपूर्ण’ या सदरात आपण प्रत्यक्ष सहवासातून होणाऱ्या संस्कारांचे अनेक दाखले पाहिले आहेत. सद्ग्रंथांचं वाचन हेदेखील आरशाप्रमाणे आपल्या मनोधारणेचा दर्जा दाखवत असतं. नवनाथांची पोथी वाचताना असा अनुभव आला. त्या पोथीत असं वर्णन आहे की एका माणसाच्या घरी मूल जन्मतच मरत असे. त्या माणसाची पत्नी पुन्हा गर्भवती होती आणि कोणत्याही क्षणी ती बाळंत होण्याची शक्यता होती. अशा घरी नाथ ‘अलख निरंजन’चा पुकारा करीत भिक्षेसाठी आले. त्यांना पाहताच तो माणूस आनंदून त्यांना म्हणाला, महाराज, आज या घरीच राहून मला उपकृत करा. तुमच्या सेवेची संधी द्या. नाथही म्हणतात, ठीक आहे. आज मी येथेच थांबेन. तो माणूस आनंदाने मोहरून म्हणाला, आज कोणत्या जन्मीचं पुण्यकर्म फळाला आलं माहीत नाही. माझ्यासारखा भाग्यवान कुणीच नाही. आज तुमच्या सेवेची संधी मिळाल्यानं माझ्या जन्माचं सार्थक झालं.. हे वाचत असताना आपल्या मनातही पडसाद उमटत असतात आणि ते आपल्या मनोधारणेनुसार असतात. मलाही वाचताना वाटू लागलं, काय धूर्त माणूस आहे हा. नाथ घरात असले आणि पुत्रजन्म झाला की त्यांच्याकडे त्याच्या जगण्याची भीक मागता येईल. म्हणून हा सारा भक्तीचा दिखावा! मनात असा विचार आला खरा आणि त्यानंतर पोथी वाचता वाचता डोळे भरून येऊ लागले.. मला वाटलं तसंच झालं. अध्र्या रात्री ती स्त्री बाळंत झाली आणि मूल दगावलं. अर्धी रात्र होईपर्यंत त्या गृहस्थानं नाथांच्या सेवेतच प्रत्येक क्षण व्यतीत केला. त्यांची चरणसेवा केली. जन्माला येऊन काय साधायचं, हे त्यांच्या तोंडून ऐकण्यातही वेळ किती आणि कसा गेला, त्याला कळलंही नाही. अखेर नाथांना विश्रांतीची गरज आहे, हे जाणून अनिच्छेनेच तो तेथून उठला आणि हलकेच खोलीबाहेर आला. आपल्या पत्नीच्या खोलीत आला तोवर ती बाळंत झाली होती आणि मूल मेलं होतं. त्या दुखानं पत्नी रडू लागली तर तो दबक्या आवाजात पण कठोरपणे तिला समजावू लागला, हे काही आपलं जन्मतच मेलेलं पहिलं मूल नाही. आपलं प्रत्येकच मूल असं गेलं आहे. मूल काय परत होईल न होईल, पण आपल्या घरी नाथमहाराज आले आहेत, तशी संधी पुन्हा यायची नाही. ते विश्रांती घेत असताना ही रडण्याची अवदसा तुला कुठून आठवली? आपल्या जीवनात आहेच काय की ज्याचा आनंद मानावा की दुखं मानावं. जन्मापासून मरण मागेच लागलं आहे. मरणाचा शोक कशाला?.. हे वाचताना त्या शब्दांनी किती संस्कार केले ते शब्दांत सांगता येणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा