जसे आपण या जगात वावरत आहोत तसेच या जगात पशुपक्षीही वावरत आहेत. त्यांच्या आणि आपल्या कितीतरी गोष्टी समसमान आहेत. तरीही श्रीगोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आपण मागेच पाहिलं होतं की, माणूस हा पशुपक्ष्यांपेक्षाही पराधीन आहे! आपल्या प्रपंचचर्चेच्या दृष्टीनेही या वाक्याकडे वेगळ्या अंगानं पाहू. त्यासाठी आपल्याकडे आणि या पशुपक्ष्यांच्या जगण्याकडे थोडं लक्ष देऊ. या निरीक्षणातून एक फरक आपल्याला दिसेल. वरकरणी तो चांगला वाटेल आणि खोलवर विचार केला तर त्यातच पराधीनतेचा सापळा कसा लपला आहे, ते जाणवेल! आपल्याला भूक लागते, आपण पोट भरतो. पशु-पक्ष्यांनाही भूक लागते, तेदेखील पोट भरतात. आपल्याला निवाऱ्याची गरज असते, आपण घर बांधतो. पशु-पक्ष्यांनाही निवाऱ्याची गरज असते, त्यासाठी ते घरटी बांधतात किंवा झाडांवर, झाडांच्या ढोलीत, बिळांमध्ये, पर्वतांतील गुंफांमध्ये निवारा शोधतात. आपल्याला भीती असते, सर्वात मोठी भीती मृत्यूची असते. त्यामुळे क्षणोक्षणी आपण अत्यंत सहजपणे स्वतचं संरक्षण करीत असतो. पशुपक्ष्यांनाही मरणभय आहे. स्वसंरक्षण तेदेखील करीतच असतात. आपल्यात कामवासना सर्वाधिक प्रबल आहे. तिच्या पूर्तीसाठी आपण मैथुनरत होतो. पशुपक्षीही मैथुनरत होतात. म्हणजेच भूक, भय, मैथुन आदि आदिम प्रेरणा माणसासह सर्व जीवसृष्टीत आहेत. मग आपल्यात आणि त्यांच्यात वेगळेपण काय आहे? फरक काय आहे? तर तो फरक एवढाच आहे की आपल्याला ‘ज्ञान’ आहे! आता वरकरणी ज्ञान असणं ही चांगली गोष्ट वाटते ना? पण त्या तथाकथित ज्ञानातूनच पराधीनता कशी आली आहे, हे पाहिलं तर त्या पराधीनतेचे सापळेही उमगतील. या ज्ञानाच्याच जोरावर पशुपक्ष्यांपेक्षा माणसाचं मन आणि बुद्धी विकसित आहे. त्या आधारे स्मरण, कल्पना, विचार यांचीही जोड माणसाला लाभली आहे. स्मरणाच्या आधारे माणूस पूर्वीच्या परिणामांचा विचार करून भावी कृतीबद्दल निर्णय घेऊ शकतो. कल्पनेच्या जोरावरच सुरुवात करून माणसानं किती उत्तुंग भराऱ्या मारल्या आहेत. तेव्हा माणसाला ज्ञानाची देणगी आहे. पशु-पक्ष्यांमध्येही ज्ञान आहे पण ते सीमित आहे. स्वरक्षण आणि स्वपोषण यासाठी जेवढय़ा ज्ञानाची गरज आहे, तेवढं ज्ञान त्यांना आहे. माणसात त्या ज्ञानाच्या जोरावर सतत बाह्य़विकास सुरू आहे. त्यामुळे माणसाप्रमाणेच पशुपक्षीही घरटय़ात राहातात, पण माणसाप्रमाणे घर सजविण्याचं, अनेकानेक वस्तूंनी ते भरण्याचं ज्ञान त्यांना नाही. माणसाप्रमाणेच पशुपक्षीही पोट भरतात पण माणसाप्रमाणे पाककलेचा शोध लावून त्यांनी जिभेचे चोचले पुरविलेले नाहीत. माणसाप्रमाणेच पशुपक्षीही मैथुन करतात. पण माणसाप्रमाणे वासनातृप्तीला आणि वासनेला उत्तेजन देणारी साधनं तसेच वासनापूर्ती तर हवी पण प्रजनन नको, यासाठीचे उपाय त्यांनी शोधलेले नाहीत. तेव्हा माणूस हा सर्व जीवसृष्टीसारखा प्रपंच करीत असला तरी त्याच्या प्रपंचाचा विस्तार सदोदित सुरू आहे. बाहेरून दिसायला तो विस्तारित असला तरी आतून संकुचितच आहे.