आध्यात्मिक आणि भौतिक एक नाही. कदापि नाही. ते एकच असते तर दोन शब्द वापरातच का येते? असं असलं तरी एक गोष्ट खरी की जन्मापासून मृत्यूपर्यंत या क्रमानं अनंत जन्म जीव भौतिकाच्याच आधारावर जगत आहे. त्यामुळे आध्यात्मिक ध्येय खुणावू लागलं तरी भौतिक सुटता सुटत नाही. पण अशा स्थितीतही साधनेचा प्रामाणिक प्रयत्न सुरू केला तर भौतिक सुटलं नाही तरी त्याचं वास्तविक भ्रामक स्वरूप हळुहळू जाणवू लागतं. कुत्रा हाड चघळतो त्या हाडात रक्त नसतं. त्याच्याच हिरडय़ा हाडानं सोलवटतात आणि त्यातून आपलंच रक्त चाखत, त्या रक्ताचीच चटक लागून कुत्रं हाड चघळत असतं. भौतिकातल्या प्रत्येक ‘सुखा’साठी जिवाला असंच रक्त आटवावं लागतं. जीव आयुष्यभर जी मेहनत करतो, धडपड करतो, तगमग करतो त्या तुलनेत त्याला ‘सुख’ कमीच मिळतं. उलट प्रयत्न ‘मी’पणाने झाल्यामुळे त्यातूनही जीव अनिश्चितता, अस्थिरता, अस्वस्थताच भोगतो. मग प्रयत्न कर्तव्य मानून पूर्ण क्षमतेने करतानाच मन परमात्म्याकडे वळवता आलं तर जगण्यातलं कितीतरी दुख मुळातच कमी होईल! मग प्रयत्नांनी गडगंज संपत्ती येवो की गरजेपुरता पैसा मिळो; चित्त त्यात न अडकता केवळ खरं सुखच समाधानाने भोगता येईल.  आता काहीजणांना वाटेल की ही निष्क्रियतेची शिकवण आहे का? यावर या सदरात तसच ‘पूर्ण-अपूर्ण’मध्ये बराच ऊहापोह झाल्याने त्याची पुनरुक्ती करीत नाही. केवळ एक गोष्ट लक्षात घ्या, भौतिकाचा, प्रपंचाचा बाह्य़ त्याग इथे अपेक्षित नाही तर आंतरिक त्याग अपेक्षित आहे. आपल्या आयुष्यातील घडामोडी या प्रारब्धानुरुप घडत असल्याने त्यांचा त्याग होऊ शकत नाही आणि त्याची जरुरीही नाही. त्यात आपलं जे मन चिकटलं आहे, ते तिथे चिकटू द्यायंचं नाही, त्याग मनातून करायचा आहे, शरीरानं नव्हे. कारण शरीरानं त्याग केला पण मन जर त्यातच गुंतून असेल तर त्या त्यागाला काहीच अर्थ नाही. उलट मनातून त्याग झाला असेल आणि शरीर त्यातच असेल तर काही बिघडत नाही! प्रपंचात शरीराने सर्व कर्तव्य अचूकतेनं करतानाच मन भगवंताकडे वळवणं इथे अभिप्रेत आहे. ज्याच्या अंतरंगात भगवंतासाठी शुद्ध ओढ उत्पन्न होते त्याचं भौतिकासकट सारं काही तो सांभाळतोच हो! ‘योगक्षेमं वहाम्यहम्’ असं त्याचं वचनच आहे. ज्यांना याबाबत भरोसा वाटत नाही आणि भौतिकाची चिंता वाटते त्यांनी अगदी खुलेपणाने आणि खुशाल भौतिकासाठी प्रयत्न करावेत. पण भौतिकाला आध्यात्मिक मुलामा देण्याचे आणि त्यालाच ‘मुक्ती’चा राजमार्ग ठरवण्याचं ढोंग करू नये. पण भौतिकाची ओढ असलेले पंडित कसलं ऐकतात! म्हणूनच कबीर त्यांना फटकारतात- पढिम् पढिम् पण्डित करू चतुराई। निज मुकुति मोहि कहो समुझाई।।१।। आपण कबीरांचे दोहे पाहिले, भजनं पाहिली, ही रमैनी आहे.

Story img Loader