जीवन म्हणजे एक स्वप्न आहे. त्यात सद्गुरुचा अनुग्रह हा खरा दृष्टांत आहे. हाच स्वप्नदृष्टांत! गाढ झोपी गेलेल्याला हातानं गदगदा हलवून जागं करावं लागतं ना? तसा अनुग्रह म्हणजे झोपी गेलेल्याला जागं करणारा स्पर्श आहे! बोलण्याच्या ओघात त्या साधकानं अनुग्रहाला ‘नुसता अनुग्रह’ म्हंटलं आणि स्वप्नदृष्टांत म्हणजे मोठी गोष्ट असल्याचंच मानलं, त्याला महाराजांनी दिलेलं हे उत्तर होतं. आता काहीजणांना वाटेल की, स्वप्नात सद्गुरूंचं दर्शन होणं महत्त्वाचं नाही का? तर ते आहेच. आपण ठरवून त्यांना स्वप्नात आणू शकत नाही. म्हणूनच अशा स्वप्नांना दृष्टांतच म्हणतात. पण ‘स्वप्ना’पुरतं त्यांना पाहून आनंद मानण्यापेक्षा दररोजच्या जगण्यात त्यांना पाहाणं, त्यांच्या बोधानुरूप जगणं अधिक चांगलं नाही का? मग ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’चा प्रत्यय येईलच. तर साधकाला ते मायेच्या सुखात वा भ्रामक स्वप्नात जगू देत नाहीत. मग ते काय करतात? ‘निसि दिन सतसंगत मे राचै, सबद में सुरत समावै।’ प्रत्येक क्षणी ते मला सत्संगात ठेवतात. आपण मागेच सत्संग किती प्रकारचा असतो, हे पाहिलं होतं. त्यात नामस्मरण अर्थात उपासना हाच सर्वात मोठा सत्संग आहे, असंही आपण पाहिलं होतं. इतर सर्व संग कालमर्यादेपायी ओसरतात पण नामाचा संग टिकवणं आपल्या हातात असतं. त्यामुळेच ‘सबद’ अर्थात नामाच्या सत्संगात सद्गुरू मला ठेवतात. ‘सबद’ म्हणजे नाम आणि ‘सुरत’ म्हणजे त्यांचं स्मरण, त्यात रत होणं. ज्याची अशी स्थिती होते, जो अशा सत्संगात मग्न होतो, त्याची गत काय? कबीरजी म्हणतात, ‘‘कहै कबीर ता को भय नाहीं, निर्भय पद परसावै।।’’ कबीरजी म्हणतात, त्याला कोणतच भय उरत नाही. समस्त भवभय नष्ट होतं. त्याला श्रीसद्गुरु निर्भयपदी बसवतात. एकदा श्रीसद्गुरुंना विचारलं, ‘‘मनातली भीती कमी कशी होईल?’’ आपल्या विचारण्यातही कसा संकुचितपणा असतो पाहा. भीती नष्ट कशी होईल, हे नाही विचारलं. कमी कशी होईल, हे विचारलं! श्रीमहाराज म्हणाले, ‘‘जितका भार माझ्यावर टाकशील तितक्या प्रमाणात निर्भयता येईल. संपूर्ण भार टाकलास तर पूर्ण निर्भयता येईल!’’ आपलं कसं होतं? आपण भार टाकतो न टाकतो तोच त्यांचीच परीक्षाही सुरू करतो. ‘महाराज तुम्हाला किती वेळा प्रार्थना केली तरी माझं अमुक काम होत नाही. आता तरी कृपा करा!’ एका वयोवृद्ध साधकाच्या आध्यात्मिक अनुभवांचं पुस्तक उत्सुकतेनं वाचू लागलो आणि निराश झालो. ‘मला अमकी भाजी फार आवडते पण आमच्या भागात ती मिळत नव्हती. अचानक दुसऱ्याच दिवशी कधी नव्हे ते एक लांबचे नातेवाईक आले. येताना तीच भाजी घेऊन आले. मी मनोमन महाराजांना हात जोडले. महाराज भक्तांच्या छोटय़ा इच्छाही पूर्ण करतात.’’ यांना ‘आध्यात्मिक अनुभव’ कसं म्हणावं? बरं महाराज आपल्या अशा छोटय़ा इच्छा पूर्ण करतात पण त्यांच्या एकमेव इच्छेकडे आपण लक्ष देतो का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा