कबीरांचं भजन आपण पाहात आहोत, साधो सो सतगुरु मोहिं भावै! सद्गुरू मला जी उपासना देतात त्यात ते स्वत: रममाण असतात. भौतिकाच्या ओढीतून मला बाहेर काढतात आणि त्यांच्या चित्तातही भौतिकाचा सूक्ष्मसा तरंगदेखील नसतो. कबीरजी म्हणतात, ‘‘मेले जाय न महंत कहावै, पूजा भेंट न लावै।’’ स्वतला महंत म्हणवून घेत ते जत्रा भरवत नाहीत. स्वतचं स्तोम माजवत नाहीत की उदोउदो करीत नाहीत. भौतिकासाठी कणमात्रही हपापत नाहीत. हे सद्गुरू काय करतात? कबीरजी म्हणतात, ‘‘परदा दूरि करै आँखिन का, निज दरसन दिखलावै।’’ माझ्या डोळ्यावरचा मायेचा पडदा दूर करून ते आपल्या निजस्वरूपाचं दर्शन घडवितात. काय आहे त्यांचं निजरूप? ‘अनंतकोटीब्रह्माण्डनायक’ या शब्दांतूनही ते किंचितही व्यक्त होत नाही! काय आहे त्यांचं निजस्वरूप? ‘‘जा के दरसन साहिब दरसै, अनहद सबद सुनावै’’ त्यांच्या रूपात परमात्माच दिसू लागतो. त्यांचा बोध सदैव मनात गुंजत राहातो. तात्यासाहेब केतकर श्रीमहाराजांचा अनुग्रह घेऊन खोलीबाहेर आले तेव्हा ब्रह्मानंदबुवांनी त्यांना विचारलं, ‘श्रींनी काय सांगितलं?’ तात्यासाहेब म्हणाले, नाम घ्यायला सांगितलं आणि श्रीरामाची मानसपूजा करायला सांगितली. बुवा म्हणाले, ‘म्हणजे महाराजांचीच मानसपूजा करीत जा!’ अर्थात परमात्मा आणि सद्गुरू वेगळे नाहीतच. परमात्म्याचं नाम आणि सद्गुरु वेगळे नाहीतच. ‘नामात मी आहेच’, असं श्रीमहाराज म्हणायचे तेव्हा त्याचा अर्थ नीट कळायचा नाही. एकदा नाम घेता घेता जाणवलं, मुखातून नाम तर प्रभूरामाचं सुरू आहे पण स्मरण महाराजांचंच होत आहे! डोळ्यापुढे श्रीमहाराजांचंच रुप येत आहे. जा के दरसन साहिब दरसै! आता उपासनेत जी स्थिती सद्गुरू साधकाला प्रदान करतात ती व्यवहारातही टिकवण्याचं बळ देतात. ‘‘माया के सुख, दुख करि जानै, संग न सुपन चलावै’’ मायेचं सुख हे अंतत: दुखरूपच असतं, हे जाणून ते जिवाला स्वप्नात जगू देत नाहीत! श्रीमराजांचे एक साधक होते. नोकरीत त्यांना रात्रपाळी असे. रात्रपाळीत गप्पा सुरू असताना त्यांचे सहकारी म्हणाले, यांना तर श्रीमहाराजांचा स्वप्नदृष्टांत झाला आहे. या साधकाने लगेच सांगितलं, ‘मला काही स्वप्नदृष्टांत वगैरे झालेला नाही. मी नुसता समाधीवर अनुग्रह घेतला आहे.’ दुसऱ्या दिवशी सकाळी ते गाढ झोपेत होते आणि एक स्वप्न पडू लागलं. महाराज काही लोकांशी बोलत होते. हे कोपऱ्यातच होते. तोच स्वप्न तुटलं. हे जागे झाले. मनात हळहळले. पुन्हा झोपी गेले. आता एकदा स्वप्न तुटलं की झोपल्यावर ते पुन्हा पडू लागेल, असं अशक्यच. पण त्या सकाळी दोनदा झोप भंगली आणि तरी स्वप्न कायम राहीलं! तिसऱ्या स्वप्नात श्रीमहाराजांनी एकदम यांच्याकडे रोखून पाहिलं आणि म्हणाले, ‘‘हे जीवन म्हणजे एक स्वप्न आहे. त्यात सद्गुरुचा अनुग्रह हा खरा दृष्टांत आहे. हाच स्वप्नदृष्टांत!’’ सगळा वेदांत आहे हो यात! जीवन मिथ्या आहे आणि सत्यस्वरूप सद्गुरूचा अनुग्रह हाच खरा दृष्टांत आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा