कबीरदासजींचं जे भजन आपण पाहात आहोत त्यातील पहिल्या दोन कडव्यांत त्यांनी योग, ध्यान साधत असताना होणारी ज्योतिदर्शने आणि अनाहद नाद याचेच अप्रूप वाटून त्यात अडकलेल्या साधकांना एक धक्का दिला आहे. बाबा रे जे घडत आहे ते या शरीरातच आहे आणि ते शरीर असतानाच खरं आत्मज्ञान न साधता त्या दर्शन-नादातच अडकलास आणि शरीर नष्ट झालं तर मग ती दर्शनं आणि तो नाद, यांचा काय उपयोग? आता तिसऱ्या कडव्यात अधिकच कठोरपणे कबीरजी सांगतात-
मेरुदंडपर डालि दुलेची, जोगिन तारी लाया।
सोई सुमेर पर खाक उडमनी, कच्चा जोग कमाया।।३।।
योगमार्गाने मेरुदंडाच्या योगे ज्योती आणि नाद यांचे ध्यान साधले जाते. शरीर नष्ट झाल्यावर सुमेरु पर्वतासारख्या मानल्या जाणाऱ्या मेरुदंडावर मातीच पडते. जळून शरीरासकट त्याचीही राख होऊन जाते. खरे आत्मज्ञान न साधता दृश्याभासात गुंतून तू कच्चा योगच साधलास.
इंगला बिनसे पिंगला बिनसे, बिनसे सुखमनि नाड़ी।
जब उन्मुनि की तारी टूटे, तब कहँ रही तुम्हारी।। ४।।
इडापिंगला सुषुम्ना या सर्व नाडय़ा खरं तर नाशवानच आहेत. नासाग्री दृष्टी स्थिर करून तू उन्मनी मुद्रा साधल्यास पण जेव्हा मुद्रेचं ध्यान भंग पावतं तेव्हा अर्थात ध्यानावस्थेतून बाहेर आल्यानंतर तुझी मनोवृत्ती कुठे असते, याचा जरा शोध घे. या इथे ‘तब कहँ रहनी तुम्हारी’ अर्थात, ध्यानावस्थेतून बाहेर आल्यानंतर तुझी मनोवृत्ती कुठे असते, हा सवाल प्रत्येक साधकानं स्वतला विचारावा, असा आहे. साधनेत उच्च मनोभूमिकेवर आरूढ असताना साधना संपल्यानंतर दुनियेबरोबरच्या व्यवहारात वावरताना आपली घसरण होते का, हा प्रश्न प्रत्येकानं स्वतला विचारावा. रामकृष्ण परमहंस अशा साधकाला गिधाडाची उपमा देतात. ते म्हणतात, गिधाड उंच आकाशात घिरटय़ा मारत असतं खरं पण त्याची नजर असते ती जमिनीवरील सडक्या प्रेताकडे! तसं साधनेत उंचच उंच झेपावणाऱ्याची नजर जर दुनियादारीच्या लाभातच गुंतली असेल तर त्या साधनेला काय अर्थ? खरं ध्यान जगाचंच, खरं स्मरण जगाचंच, खरा योग जगाशीच! कबीरजी म्हणून पुढे सांगतात-
अद्वैत वैराग कठिन है भाई, अटके मुनिवर जोगी।
अक्षर लौं की गम्म बतावै, सो है मुक्ति बिरोगी।। ५।।
मनाच्या सर्व मान्यतांचा त्याग करून आणि सर्व संकल्पांचा त्याग करून आपल्या असंग शुद्ध चेतन स्वरूपात स्थित होणे हेच अद्वैत वैराग्य आहे. अर्थात सर्व दृश्य जगापासून विरक्त होऊन आत्ममग्न होऊन जाणे हीच उच्चतम स्थिती आहे. हे भाई, मायेत अडकलेल्या मनासाठी ही कठीणच गोष्ट आहे. मोठमोठे ऋषीमुनीसुद्धा या मायेत अडकून पडले तिथे आपली काय कथा?

Story img Loader