जगाशी होणाऱ्या व्यवहारावर मर्यादा आणि धनयौवनाचा गर्व सोडून आंतरिक समतेचा अभ्यास जसजसा वाढत जाईल तसतशी परमात्म्याची आस वाढत जाईल. त्याचवेळी कबीरजी आणखी दोन महत्त्वाच्या सूचना देतात. त्यातली एक सूचना काय करू नये हे सांगणारी आहे आणि दुसरी काय करावं, हे सांगणारी आहे. ते म्हणतात, ‘सुन्न महल में दियना बारि ले, आसा से मत डोल रे।’ काय करू नकोस? तर, जगाच्या आशेवर डोलू नकोस आणि काय कर? तर, ‘सुन्न महाला’त प्रेमाचा दीप लाव! आता पहिल्या सूचनेचा प्रथम विचार करू. आपण जगाशी व्यवहार कमी करू, धनयौवनाचा गर्वही करणार नाही पण तरी आशेचा तंतू काही मनातून तुटणं एवढं सोपं नाही. भौतिकाचा त्याग एकवेळ साधेल पण त्यानंतर दुनियेनं आपल्याला त्यागी, विरागी, विरक्त म्हणावं, एवढी तरी आशा मनात हळूच शिरकाव करील. आशा से मत डोल रे! माणूस डोलतो केव्हा? जेव्हा तो तन्मय होतो, देहभान विसरून एखाद्या गोष्टीत विशेषत: नाद वा लयीत समरस होतो तेव्हा. आपलं डोलणं कसं आहे? दुनियारूपी गारुडी पुंगी वाजवत आहे आणि भौतिकाची ती धून ऐकत ऐकत आपण आशेने डोलत आहोत. आयुष्यभर हे डोलणं थांबतच नाही. शंकराचार्यानीही म्हटलंय ना? हातात काठी धरून घरभर चालावं लागावं इतकं शरीर थकलं तरी आशेचा पिंड काही सुटत नाही. ‘तदपि न मुञ्चति आशापिण्डम्’. तर हे डोलणं थांबवून काय करावं, असं कबीरजी सांगतात? ते सांगतात, ‘सुन्न महल में दियना बारिले.’ दियना बारिले म्हणजे दिवा लाव. कुणे दिवा उजळू द्यायचा आहे? तर ‘सुन्न महाला’त! ‘सुन्न’ म्हणजे शून्य. जाणिवेपलीकडचा, मनापलीकडचा प्रांत. शून्य म्हणजे अभाव. हा अभाव  भौतिकाच्या ओढीचा आहे. भौतिकाचा नाही. घरदार सोडून देणं म्हणजे अभाव नव्हे तर माझ्या भावभावना ज्या भौतिकात जखडून आहेत त्या तिथून मुक्त होणं हा खरा अभाव आहे. आता हा जो अभाव आहे, हे जे शून्य आहे त्याकडे कबीरदासजी एखाद्या पोकळीप्रमाणे पाहात नाहीत. त्या शून्याचा महाल त्यांना अभिप्रेत आहे!  म्हणजेच भौतिकाच्या ओढीचा अभाव आहे पण त्याचजागी परमात्मप्रेमाच्या भावाचा जणू वैभवशाली प्रासाद साकारला आहे. हा दीनवाणा, दैन्यवाणा परमार्थ नाही तो आत्मिक संपन्नतेचा परमोच्चबिंदू आहे. त्या शून्य महालात दिवा तेवत ठेवायचा आहे तो आहे प्रेमाचा, ऐक्याचा. भगवंताशी प्रेम हेच सर्वोच्च ज्ञान आहे. लहान मुलावर प्रेम कसं करावं, याचं पुस्तकी ज्ञान मातेला असून उपयोगाचं नाही. मुलासाठी काळीज तुटतं ते पुस्तक वाचून नव्हे. ते आंतूनच उफाळून येतं. स्वाभाविकपणे. अशा स्वाभाविक प्रेमाचा हा दिवा आहे. गोकुळातल्या गोपगोपींना भगवंताचं ‘ज्ञान’ कुठे होतं? त्याचा जप त्यांनी सिद्ध वगैरे कुठे केला होता? कान्हा माझा आहे, एवढी एकच भावना त्यांचं जगणं व्यापून होती. त्यापुढे सर्व ज्ञान तोकडं होतं.

Story img Loader