जगाशी जो व्यवहार आहे तो आवश्यक तितका करणे म्हणजे जगात आपण शरीराने वावरणे पण मनात जगाला शिरू न देणे. मनावर जगाला ताबा मिळवू न देणे. जगातल्या कोणत्या गोष्टीचा आपल्यावर प्रभाव पडतो? अर्थात संपत्ती व शक्तीचा. जगानं आपल्याला मानावं म्हणून आपण संपत्ती आणि शक्तीच्या हव्यासात अडकतो. म्हणून कबीरदासजी म्हणतात, ‘धन जोबन का गरब न कीजै, झूठा पँचरंग चोल रे।’ आता इथे एक सूक्ष्म गोष्ट लक्षात घ्या. इथे धन आणि यौवन अर्थात संपत्ती आणि शक्तीक्षमतांच्या विकसित स्थितीला विरोध नाही तर त्याविषयी गर्व बाळगायला विरोध आहे! पैसा वाईट नाही पण पैशाचा प्रभाव वाईट आहे. श्रीमंती ही सांपत्तिक स्थितीचे मोजमाप नव्हे. खरी श्रीमंती ही आंतरिक संपन्नतेची असते. सांपत्तिकदृष्टय़ा श्रीमंत असलेला प्रत्यक्षात गरीबापेक्षा लाचार असू शकतो आणि सांपत्तिकदृष्टय़ा गरीब असलेला श्रीमंतापेक्षा दिलदार असू शकतो. श्रीमंत असण्यात किंवा श्रीमंत होण्याचे प्रयत्न करण्यात गैर काहीच नाही. संपन्नता ही जिवाची जन्मजात आस आहे. स्वामी विवेकानंदांनीही विलासी माणसाच्या विलासामुळे काही गरीबांना रोजगारही मिळत असतो, असे विधान केले होते. पाश्चात्यांची भौतिक संपन्नता आणि पौर्वात्यांची आध्यात्मिक संपन्नता यांचा संयोग साधण्याचे स्वामीजींचे स्वप्न होते. तर सांपत्तिक स्थिती चांगली व्हावी, याचा प्रयत्न गैर नाही पण तिलाच सर्वस्व मानून तिच्या हव्यासात अडकणे हा मानवी जन्माच्या मूळ हेतूचा अवमान आहे. तीच गोष्ट ‘यौवन’ अर्थात शक्तीक्षमतांच्या पूर्ण विकासाची. शक्तीसंपन्न होणं चांगलं आहे पण शक्तीमागे बुद्धीही हवी. तारुण्यात शरीराच्या शक्तीक्षमता स्वाभाविकपणे सर्वोच्च स्थितीत विकसित असतात. पण त्यामुळेच बेफिकीरीही येते. तारुण्याच्या नशेत माणूस वाहावत जातो आणि हाती असलेल्या काळाचा व पैशाचा अपव्यय सहज करू लागतो. त्याचा अहं याच काळात झळाळू लागतो. एका गुरुबंधूचा पुतण्या लहान असताना ते दोघं अध्यात्माबद्दल बोलत होते. चर्चा इतकी गंभीर आणि सखोल होत गेली की तो अचानक म्हणाला, ‘काका मला भीती वाटते की आज जे मी तुझ्याशी बोलत आहे तसं मी जसजसा मोठा होत जाईन तसं स्वतशी तरी बोलू शकेन का?’ त्यानं विचारलं, असं का वाटतं तुला? तो म्हणाला, ‘कारण माणूस जसजसा मोठा होत जातो ना तसतसा त्याचा अहंकार वाढत जातो आणि त्याची समज कमी होत जाते!’ एका लहान मुलाच्या तोंडून किती मोठं सत्य ऐकायला मिळालं! तर माणूस सधन होतो आणि तरुण असतो तेव्हा त्याचा अहंकार पूर्ण विकसित होत असतो आणि समज कमी होत असते. गर्व आहे म्हणजे समज नाहीच. कबीरजी म्हणतात, अरे हा सर्व पंचरंगी खेळ आहे. पंचमहाभूतांच्याच आधारावर तू आणि ही सृष्टी निर्माण झाली. अखेरीस ती त्यातच मिळणार. जे दिसते आहे ते आज ना उद्या नष्ट होणारच आहे मग गर्व कशाचा बाळगायचा?
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक २५८. धनयौवन
जगाशी जो व्यवहार आहे तो आवश्यक तितका करणे म्हणजे जगात आपण शरीराने वावरणे पण मनात जगाला शिरू न देणे. मनावर जगाला ताबा मिळवू न देणे. जगातल्या कोणत्या गोष्टीचा आपल्यावर प्रभाव पडतो? अर्थात संपत्ती व शक्तीचा. जगानं आपल्याला मानावं म्हणून आपण संपत्ती आणि शक्तीच्या हव्यासात अडकतो.
First published on: 24-11-2012 at 04:19 IST
मराठीतील सर्व अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arupache rup satya margadarshak