कबीरजी या रमैनीत म्हणतात, चारि वेद ब्रम्है निज ठाना। मुकुति का मर्म उनहुँ नहिं जाना।।३।। दान पुन्य उन्ह बहुत बखाना। अपने मरन की खबरि न जाना।।४।। चारही वेद स्थापणाऱ्या ब्रह्माजींनाही मुक्तीचं मर्म माहीत नव्हतं. दान आणि पुण्याची महती त्यांनी बरीच गायली पण मृत्यूनंतर लाभदायक ठरणाऱ्या दान आणि पुण्याची महती गाणाऱ्या ब्रह्माजींनाही त्यांच्या मृत्यूची खबर नव्हती. अर्थात मृत्यूचं रहस्यही ते जाणत नव्हते. आता हे सारं सांगण्याचं दुसरं तात्पर्य असं की साक्षात ही दुनिया ज्यानं निर्माण केली त्या ब्रह्माजींना म्हणजेच या सृष्टीच्या निर्मात्यालाही मुक्तीचा मार्ग मात्र माहीत नाही! तो सद्गुरुंनाच केवळ माहीत आहे. सद्गुरु शिष्याला नाम देतात आणि ते नाम हे त्याचं ध्येय बनतं. त्या नामाच्या आधारानंच तो मुक्त होतो. कबीरजी म्हणतात, ‘एक नाम है अगम गंभीरा। तहवाँ अस्थिर दास कबीरा।। ५।। ’ नाम हे अगम आणि गंभीर आहे. मन आणि बुद्धीच्या पलीकडे आणि म्हणूनच गहन आणि अपार आहे. तिथे जेव्हा साधक स्थिर होतो तेव्हाच मुक्तीचा मार्ग खुला होतो. आता इथे आणखी एक सूक्ष्म गोष्ट ध्यानात घ्या. नाम म्हणजे गुरुप्रदत्त परमात्म्याचा नाममंत्रही आहेच पण एखादा योगमार्गी म्हणेल, मला नाम दिलेलं नाही. तर त्याला दोन गोष्टी आहेत. एकतर ओमकाराचं उच्चारण आहेच. ते नामच आहे. दुसरी गोष्ट दीक्षानाम म्हणूनही एक गोष्ट असते. सदगुरु शिष्याला दीक्षा देताना एखादं नामही देतात. जसं कुणी निश्चलदास असतो, कुणी अखंडानंद असतो, कुणी परमानंद असतो. दीक्षानाम हे एक स्थिती दर्शवते. दीक्षानाम घेणाऱ्या साधकाची दीक्षेच्या क्षणी ती स्थिती नसते पण ते नाम त्या स्थितिचं ध्येय सांगते. चराचरात जे निश्चल तत्त्व आहे त्या तत्त्वाचा तू दास आहेस, या नश्वर दुनियेत जो अखंड आहे त्याचा आनंद प्राप्त करणारा तू आहेस अशी ध्येयमाळ दीक्षानामाच्या रूपानं सद्गुरू गळ्यात घालतात. त्यानुसार जीवन घडविण्याचा प्रयत्नही जो करतो तो तोवर अस्थिर दुनियेचा अस्थिर दास असलेला साधक स्थिर एकतत्त्वाचा स्थिर दास होतो! तर सद्गुरू एक नाममंत्र देतात आणि तो गहन असतो, अपार असतो. तो मन आणि बुद्धीच्या पलीकडे असतो. अहो नाम हे मन आणि बुद्धीच्या पलीकडे आहे आणि म्हणूनच तर नामस्मरणाबाबत मन आणि बुद्धी कितीतरी अडथळे आणत राहाते! मनाला आणि बुद्धीला नामाची गोडी प्रथम नसतेच. मनाला बुद्धीच्या साह्य़ाने कल्पनांमध्ये, विचारामध्ये दंग राहायला आवडते. एकच एक नाम, शाब्दिक पुनरावृत्तीसारखं नाम हे त्या खेळात मोडता घालू लागते. कल्पनाविलासाच्या आणि विचारविलासाच्या आड ते नाम येऊ लागते. त्यामुळे नामाबद्दल मन आणि बुद्धीच कितीतरी शंका, प्रश्न निर्माण करतात. तरीही जो नामाला चिकटून राहील तोच आंतरिक अस्थिर स्थितीवर मात करू शकेल.
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २७५. स्थिर दास
कबीरजी या रमैनीत म्हणतात, चारि वेद ब्रम्है निज ठाना। मुकुति का मर्म उनहुँ नहिं जाना।।३।। दान पुन्य उन्ह बहुत बखाना। अपने मरन की खबरि न जाना।।४।। चारही वेद स्थापणाऱ्या ब्रह्माजींनाही मुक्तीचं मर्म माहीत नव्हतं.
First published on: 14-12-2012 at 04:32 IST
मराठीतील सर्व अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arupache rup satya margadarshak