उपासना, साधना करायची ती चित्ताला परमात्मचिंतनाची सवय जडावी यासाठी, मनाला परमात्ममननाची सवय जडावी यासाठी, बुद्धीला परमात्मबोधाची सवय जडावी यासाठी.. जोवर साधना ही जगण्याचा सहजभाग होत नाही तोवर संशय आहे, तर्क आहे, भयदेखील आहे. कबीरजींनीच एका दोह्य़ात सांगितलं आहे,
संसय करौ न मैं डरौ,
सब दुख दिये निवार।
सहज सुन्न में घर किया,
पाया नाम अधार।।
प्रभुनामाचा आधार लाभल्याने चित्तातील भौतिकाचा खेळ शून्यवत झाला आहे. भौतिकाच्या ओढीचा अभाव असलेल्या ‘सुन्न’ घरात माझा सहजनिवास झाला आहे. आता मला संशय नाही की कसली भीतीही नाही. त्यामुळे भवदुखाचंच निवारण झालं आहे. साधना आणि जगणं इतकं एकरूप होऊन जावं की जगणं हीच साधना बनावी. असं जेव्हा साधेल तेव्हा अंतरंगात भगवंताशी सततचं ऐक्य साधेल. कबीरजी म्हणतात, ‘‘जोग जुगत से रंग महल में, पिय पाये अनमोल रे। कहै कबीर अनंद भयो है, बाजत अनहद ढोल रे।’’ रंगमहल म्हणजे अंतरंग. तिथे परमात्मरूपी प्रियकर भेटेल पण कसा? तर ‘जोग जुगत से’. इथे पटकन आठवण होते ती योगयुक्त या शब्दाचीच. भगवंताशी आंतरिक योग साधून आणि त्या योगानेच युक्त होऊन जगात वावरणाऱ्या साधकाचं वर्णन भगवंतानंही गीतेत केलं आहे. तेव्हा भौतिकाची ओढ खुंटेल आणि ‘सुन्न महाला’त भगवत्प्रेमाचा दीप तेवू लागेल तेव्हा योगयुक्त झालेल्या अंतरंगरूपी रंगमहालात परमात्मरूपी प्रियकराशी ऐक्य साधेल. या ऐक्यानं काय साधेल? तर आनंदानं अंतकरण भरून जाईल आणि अनाहद नादाची लय जगण्यात उमलेल. हे ऐक्य आहे ते एक करून टाकणारं आहे. ‘मी’(साधक) आणि ‘तू’(परमात्मा) हे द्वैत झालं. अद्वैत म्हणजे मी आणि तू एकत्र येणं नव्हे तर सारं काही तूच मी नव्हेच, हे अद्वैत झालं. कबीरजी एका दोह्य़ात सांगतात-
मैं लागा उस एक से,
एक भया सब माहिं।
सब मेरा मैं सबन का,
तहाँ दूसरा नाहिं।।
त्या एकाचा छंद जिवाला जडला आणि मग सारं काही एकच होऊन गेलं. अवघं चराचर त्या एकाचंच आहे, हे उमगलं. ‘मी’ आणि ‘माझं’ जे काही होतं ते सारं काही त्या सर्वव्यापी एकाचंच झालं. दुसरं कुणी उरलंच नाही. आता हे होणं सोपं नाही. आपल्याला तर हा सारा शाब्दिक डोलाराही वाटू शकतो. पण असे एकरसात निमग्न सत्पुरुष पूर्वीही होऊन गेले आहेत आणि पुढेही होत राहातील. तेव्हा ते अशक्य नाही. उलट आपल्या साधनेचं तेच ध्येय असलं पाहिजे. पण हे सारं होईल केव्हा? तर ‘मी’पणाचं, भौतिकाच्या ओढीचं ‘घूँघट’ दूर सरेल तेव्हा. पण हे ‘घूँघट’ एवढंच आहे का? दोनेक भागांआधीच या ‘घूँघट’चा व्यापक अर्थ पाहू, असं मी म्हंटलं होतं. त्या व्यापक अर्थाकडे आता वळू.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा