भगवंताच्या आड येणारा भौतिकाचा घूँघट एकवेळ बाजूला होईल पण खरा व्यापक असा जो घूँघट आहे तो दूर करता येणं फार कठीण. काय आहे हा घूँघट? हा घूँघट आहे उपासनेच्या अवडंबराचा, सिद्धीचा आणि प्रसिद्धी अर्थात लोकेषणेचा! भौतिक घूँघट त्यापुढे फिका पडेल इतका हा घूँघट भरदार आहे. माणूस भगवंताच्या मार्गावर जेव्हा पहिलं पाऊल टाकतो तेव्हा तो कोण असतो? तो या मार्गावर का येतो? जेव्हा या मार्गावर माणूस पहिलं पाऊल टाकतो तेव्हा तो कुणीच नसतो. तो या मार्गावर येतो ते केवळ भगवंताच्या प्राप्तीच्या कळकळीने. इथे सकाम व्रतवैकल्ये करणारे अभिप्रेत नाहीत, हे लक्षात घ्या. सकाम भक्ती भले चुकीची असेल पण निदान ती करणाऱ्याचा दृष्टीकोन तरी स्पष्ट असतो. त्याला भौतिकातलं काहीतरी हवं असतं आणि म्हणून तेवढय़ासाठी तो काहीतरी व्रतवैकल्य, उपासतापास करत असतो. आपण भगवंताची उपासना का करत आहोत, याबाबत त्याच्या मनात किंचितही गोंधळ नसतो. तर त्या सकाम भक्तीत न अडकता, जो या मार्गावर खरंखुरं पहिलं पाऊल टाकतो तेव्हा त्याच्या अंतरंगात भगवत्प्राप्तीच्या खऱ्या ओढीचा एक तंतू असतोच असतो. या मार्गावर कोण कसा येतो, हे सांगता येत नाही. कुणी आयुष्यातील आघातानंतर येतात. आघाताने त्यांना जगाचं किंवा भवतालच्या माणसांचं खरं रूप कळतं आणि जगात खरं समाधान नाही, खरं समाधान भगवंताकडूनच मिळू शकतं, या भावनेनं काहीजण येतात. काहींचं आयुष्य आनंदात सरत असतं. कशाची काही कमतरता नसते. पण सारं काही असूनही काहीतरी हरवल्याची जाणीव त्यांना अस्वस्थ करीत असते. जे सारं काही आहे त्यातला बेगडीपणा, नश्वरता, अशाश्वतता त्यांना उमगू लागते. त्यातूनच ते या मार्गाकडे वळतात. या मार्गावर आलेल्यांच्या मनात स्वतबद्दल कोणतीही फसवी प्रतिमा नसते. उलट आपण हीनदीन आहोत, हे त्यांना पदोपदी उमगत असतं. त्या जाणिवेसहच ते साधनमार्गावर चालत असतात. साधनेचे सर्वच मार्ग आपापल्या जागी चांगलेच आहेत. समजा अशी एक जागा आहे जिथे पोहोचल्यावर भरभरून पैसाअडका मिळणार आहे. मग त्या जागी कुणी चालत जाईल, कुणी आगगाडीने जाईल, कुणी विमानाने जाईल, कुणी वाहनाने जाईल.. त्या ठिकाणी ज्या साधनांद्वारे पोहोचता येत असेल ती सर्वच साधने आपापल्यापरीने महत्त्वाचीच आहेत. पण गोंधळ असा होतो की या साधनांतच लहानमोठेपणा शोधला जातो. खरा मार्ग अमकाच, असं जो-तो अट्टहासाने सांगू लागतो. मग साध्य राहातं दूर आणि साधनाचाच पुरस्कार सुरू होतो. खरं पाहता प्रत्येक साधनात मन, बुद्धी आणि शरीर यांचाच तर सहभाग असतो. मनातीत, बुद्धीतीत आणि देहातीत जाणिवेच्या प्रांतात जाण्यासाठीच तर साधना आहे. पण साधनेच्या अहंकाराने माणूस आधीच कुंठीत असलेल्या मन, बुद्धी आणि देहात अडकून अधिकच संकुचित झाला तर त्यापेक्षा विटंबना दुसरी कोणती?
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २६२. खरा घूँघट
भगवंताच्या आड येणारा भौतिकाचा घूँघट एकवेळ बाजूला होईल पण खरा व्यापक असा जो घूँघट आहे तो दूर करता येणं फार कठीण. काय आहे हा घूँघट? हा घूँघट आहे उपासनेच्या अवडंबराचा, सिद्धीचा आणि प्रसिद्धी अर्थात लोकेषणेचा! भौतिक घूँघट त्यापुढे फिका पडेल इतका हा घूँघट भरदार आहे. माणूस भगवंताच्या मार्गावर जेव्हा पहिलं पाऊल टाकतो तेव्हा तो कोण असतो?
First published on: 29-11-2012 at 12:18 IST
मराठीतील सर्व अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arupache rup satya margadarshak262 real veil