आज जीवनातील ताणतणावांत आध्यात्मिक विचार मनाला बरेचदा शांतीचा अनुभव देतात. आपली जिथे श्रद्धा आहे अशा स्थानी नतमस्तक होतानाही आपल्याला काही प्रमाणात निश्चिंतीचा अनुभव येतो. पण त्याचबरोबर या क्षेत्रातही स्वार्थ, संकुचित वृत्ती, किर्तीचा मोह अशा गोष्टींमध्येही वाढ होत आहे. जो तो आपला झेंडा गाडून आपलंच मत खरं, आपलाच मार्ग खरा असा डांगोरा पिटत असतो. त्यामुळे आपण भांबावून जातो आणि अशा परिस्थितीत सत्याचा साक्षात्कार आपल्याला होणं कठीण आहे, असं मानतो. एक गोष्ट खरी की सत्य शाश्वत आहे, त्याकडे जाण्याचा मार्गही शाश्वतच आहे आणि जो सत्यस्वरूप आहे तोच त्या मार्गावरून मला चालवू शकतो. आज असा सत्यस्वरूप सद्गुरू मला लाभला नसेल तरीही साईबाबा, शंकराचार्य, कबीर अशा सत्यमार्गदर्शकांच्या बोधानुरुप चालण्याचा मी प्रयत्न करू लागलो तर आज अरूप ज्या रूपात आहे असा सत्यस्वरूप मार्गदर्शक स्वतच माझ्याकडे येईल. त्याच्या वर्तनातच सत्याचा असा लखलखता स्पर्श असेल की त्याची वेगळी ओळख मला पटावी लागणार नाही. तोवर मी जे सत्यमार्गदर्शक होऊन गेले त्यांच्याच बोधाचा आधार घेतला पाहिजे. नाहीतर जत्रेत फसण्याचाच संभव फार. त्यासाठी जो अभ्यास आहे त्याचं भरपूर मार्गदर्शन संतसत्पुरुषांनी करून ठेवलं आहे. आपण त्यातलं थोडंथोडं वाचावं आणि आचरणात आणण्याचा प्रयत्न करीत राहावं. जे वाचलं ते आचरणात आणता येतं का, याचाही आढावा मनात घेत राहावं. त्यातूनच अनुभवांची प्राप्ती होत जाईल. श्रीरामकृष्ण परमहंस म्हणत की, संसारी माणसानं अधेमधे निर्जन जागी राहून साधना केली पाहिजे. आता निर्जन जागा कुठे शोधावी? निर्जन म्हणजे जिथे माणसांचा सहवास कमी असेल आणि त्यांच्याविषयीचे विचारही मनात येण्यास कमी वाव असेल असे ठिकाण. आता आपण आजारी असलो आणि कामावरून दोन-तीन दिवस सुटी घेतली तरीही लोकांचा सहवास कितीतरी कमी होतो. आपल्याला कामानिमित्त बाहेरगावी जावे लागले तरी अनोळखी प्रांतात असल्याने लोकांच्या सहवास आणि संवादावर मर्यादा येतात. अशी संधी मिळाली तर तिचा आपण उपयोग करतो का? दिवसभरातही कितीतरी वेळ आपला असाच जातो. नोकरीनिमित्त जो प्रवास होतो, त्यातही कितीतरी वेळ मिळतो. त्या वेळात नामासारखी उपासना सहजशक्य असते. कार्यालयातही काही आपण क्षणोक्षणी कामात मग्न असतोच असं नाही. दिवसभरात अधेमधे उसंत मिळते तो क्षण आपण भगवंताच्या स्मरणाकडे वळविला तरी संत सांगतात की नामाच्या राशी पडतील! रामकृष्ण म्हणतात की लोणी काढून घेतलं आणि नंतर ते पाण्यात टाकलं तरी पाण्यात विरघळत नाही तर तरंगतं. तसंच संसारातून मन आधी काढून घेतलं आणि मग साधक संसारात कितीही वावरला तरी त्यात तो बुडत नाही, त्यातून तरंगत भगवंताच्याच विचारात क्षणोक्षणी राहातो.
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २८७. नवनीत
आज जीवनातील ताणतणावांत आध्यात्मिक विचार मनाला बरेचदा शांतीचा अनुभव देतात. आपली जिथे श्रद्धा आहे अशा स्थानी नतमस्तक होतानाही आपल्याला काही प्रमाणात निश्चिंतीचा अनुभव येतो. पण त्याचबरोबर या क्षेत्रातही स्वार्थ, संकुचित वृत्ती, किर्तीचा मोह अशा गोष्टींमध्येही वाढ होत आहे.
First published on: 28-12-2012 at 04:06 IST
मराठीतील सर्व अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arupache rup satyamargadarshak 287 navneet