धारणा, ध्यान आणि समाधी ही अष्टांग योगातील अंतरंग साधनेची तीन अंगे आहेत. ज्यांना हा अष्टांगयोग अत्यंत विस्ताराने जाणून घ्यायचा आहे त्यांनी कृष्णाजी केशव कोल्हटकर यांचा ‘भारतीय मानसशास्त्र अर्थात पातंजल योगदर्शन’ हा ग्रंथ व विशेषत: त्यातील साधनपाद आणि विभूतीपाद ही प्रकरणे अवश्य वाचावीत. तर धारणा, ध्यान आणि समाधीची व्याख्या काय? ‘देशबन्धश्चित्तस्य धारणा’ अर्थात चित्ताला एकदेशी, एका दशेत, एका स्थानावर बांधून टाकल्यागत स्थिर करणे म्हणजे धारणा. ज्या स्थानावर, विषयावर साधकाला स्थिर व्हायचं आहे तो परमात्माच आहे. शाश्वत आहे. तेव्हा धारणा म्हणजे जो शाश्वत असा परमात्मा त्याची धारणा. ‘तत्र प्रत्ययैकतानता धानम्’ म्हणजे ही धारणा क्षणभर टिकणारी असता कामा नये. परमात्मभावनेची धारणा क्षणोक्षणी टिकणे, परमात्मप्रत्ययाची एकतानता होणे म्हणजे ध्यान. ‘तदेवार्थमात्रनिर्भासं स्वरूपशून्यमिव समाधि:’ अर्थात ध्येय अशा, भाव्य अशा परमात्म्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही अर्थ भासमान न होता केवळ तो भाव्य परमात्माच भासमान होणे. चित्त भाव्य परमात्म्याशी इतके तन्मय होणे की परमात्म्याचे मी ध्यान ‘करीत’ आहे, अशी सूक्ष्मदेखील जाणीव न होणे. मग तर ध्येय परमात्मा, त्या परमात्म्याचे ध्यान आणि ध्याता साधक जणू एकजीव होऊन जाणे हीच समाधी! तर असा बहिरंग आणि अंतरंग साधनेचा भव्य नकाशा ‘‘प्राणायामं प्रत्याहारं नित्यानित्यविवेकविचारम्। जाप्यसमेत समाधिविधानं..’’ इथपर्यंत शंकराचार्य मांडतात. तो पाहूनच आपण गांगरून जातो आणि मग प्रश्न असा उत्पन्न होतो की, हे आपल्याला साधणं शक्य तरी आहे का? भगवंतानं गीतेत सांगितलं आहेच की अभ्यासानं काहीच अशक्य नाही तेव्हा तो अभ्यास जरुर करता येईल पण तो अभ्यास तरी कसा करावा? कोणत्या आधारावर करावा? त्याची सुरुवात कुठे होते? संतांच्या ग्रंथातून, योग-कर्म-ज्ञान आदि मार्गानी वाटचाल करणाऱ्या सत्पुरुषांकडून किंवा त्यांच्या ग्रंथातून आपण ही माहिती जाणण्याचा प्रयत्न करू लागतो. आपल्याला जो आवडतो तो मार्ग स्वीकारून आपल्याला जमेल तशी वाटचालही करण्याचा प्रयत्न करतो. तरी तेवढय़ानं असा अष्टांगयोग साधला जाईल, याची किंचितही खात्री नसते! मग हे साधेल तरी का आणि साधावं कसं? शंकराचार्य याच श्लोकाच्या शेवटी ते कसं साधेल, हे ‘महद्अवधानम्’ या एका शब्दात सांगतात! ते म्हणतात, ‘‘प्राणायामं प्रत्याहारं नित्यानित्यविवेकविचारम्। जाप्यसमेत समाधिविधानं कुर्ववधानं महद्अवधानम्।।’’ महद्अवधानम्! कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर साक्षात् भगवंताच्या मुखाने अर्जुनानेही खूप ज्ञान ऐकलं. योग, कर्म, ज्ञान मार्ग जाणले. तरी शेवटी नेमकं करावं काय, हा प्रश्न त्याच्याही मनात आलाच. म्हणूनच गीतेच्या अखेरच्या अध्यायात भगवंतांनी हे ‘महद्अवधानम्’च सांगितलं.
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २२६. महद्
धारणा, ध्यान आणि समाधी ही अष्टांग योगातील अंतरंग साधनेची तीन अंगे आहेत. ज्यांना हा अष्टांगयोग अत्यंत विस्ताराने जाणून घ्यायचा आहे त्यांनी कृष्णाजी केशव कोल्हटकर यांचा ‘भारतीय मानसशास्त्र अर्थात पातंजल योगदर्शन’ हा ग्रंथ व विशेषत: त्यातील साधनपाद आणि विभूतीपाद ही प्रकरणे अवश्य वाचावीत.
आणखी वाचा
First published on: 16-10-2012 at 07:03 IST
मराठीतील सर्व अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arupache rup satyamargadarshak