दिल्ली विधानसभेत ‘आप’ने मिळवलेल्या अभूतपूर्व विजयाबद्दल त्या पक्षाचे मनपूर्वक अभिनंदन. परंतु नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी दिल्लीच्या रामलीला मदानावर, समारंभपूर्वक होणार आहे असे समजते.
राष्ट्रपती, राज्यपाल वा नायब राज्यपाल यांनी अनुक्रमे पंतप्रधान, केंद्रीय मंत्री वा मुख्यमंत्री व राज्याच्या मंत्र्यांना शपथ देणे हा तांत्रिक पण अत्यंत महत्त्वाचा घटनात्मक उपचार आहे. हा शपथविधी कोठे करावा असा उल्लेख घटनेत नसला तरी तो अनुक्रमे राष्ट्रपती भवनात व राजभवनात साधेपणाने करण्याची प्रथा-परंपरा व संकेत आहे. असे शपथविधी सोहळे राजभवनाबाहेर अन्य प्रांतांतही व अन्य पक्षाच्या मुख्यमंत्र्यांचेही झाले आहेत. त्यामुळे ‘आप’च्या समारंभालाच केवळ दूषण देता येणार नाही.
विजयी पक्षाला स्वतच्या तिजोरीतले आपल्या नवीन सरकारचे स्वागत दणक्यात करावेसे वाटणे वा विजयी सभा घ्याव्याशा वाटणे हे स्वाभाविक आहे व समजण्यासारखे आहे. हा खर्च तो पक्ष स्वतच्या तिजोरीतून करत असेल तर कोणाची हरकत असण्याचे काहीच कारण नाही. परंतु वास्तवात होत आहे ते असे की अशा घटनात्मक उपचाराचेही रूपांतर सरकारी तिजोरीतील पसे वारेमापरीत्या खर्च करून निवडून आलेल्या पण अद्याप कायदेशीररीत्या सत्ताधारी न झालेल्या राजकीय पक्षाच्या शक्तिप्रदर्शनात होत आहे.
जुन्या प्रथापरंपरांना छेद देणारा व चाकोरीबाहेरचा विचार करणारा शासनाचा नवीन प्रयोग आपण राबवू असे वचन देऊन सत्तेवर आलेल्या आप पक्षाने हे बदलावयास हवे. रामलीलावरच्या समारंभाचा सर्व खर्च आपच्या तिजोरीतून करून इतर राजकीय पक्षांपुढे त्याने चांगले अनुकरणीय उदाहरण घालून द्यावे. आपण बोलतो तेच करतो हे दाखवून द्यावयाची आपची ही चांगली सुरुवात ठरेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा