विविध देशांमधील खेळाडूंनी जात, धर्म, वर्ण आदी भेद बाजूला सारून एकत्र येत आपले कौशल्य दाखवावे हेच ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यामागचे मुख्य ध्येय मानले जाते. मात्र मूठभर संघटक आपल्या आर्थिक सत्तेच्या बळावर स्वत:ला येईल त्याप्रमाणे एकाधिकारशाही करीत ऑलिम्पिकमध्ये सत्ता गाजवू पाहत आहेत. कुस्ती हा पारंपरिक क्रीडा प्रकार २०२०च्या ऑलिम्पिकपासून बंद करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने घेतला आहे. प्रत्येक ऑलिम्पिकपूर्वी या स्पर्धेत कोणते क्रीडा प्रकार घ्यावयाचे याबाबत ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारिणीत निर्णय घेतला जातो आणि त्यानंतर ऑलिम्पिक समितीच्या सर्वसाधारण सभेत त्याला मान्यता दिली जाते. २०२०च्या ऑलिम्पिककरिता २६ क्रीडाप्रकारांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये मॉडर्न पेन्टॅथलॉन व तायक्वांदो या खेळांनी कुस्तीला धोबीपछाड दिली. गेल्या काही वर्षांमध्ये तायक्वांदो, ज्युदो आदी मार्शल आर्ट्सच्या लोकप्रियतेमध्ये कुस्तीला थोडीशी झळ पोहोचली आहे, मात्र त्याची सायकलिंग, वेटलिफ्टिंगची तुलना करता कुस्तीची लोकप्रियता अद्यापही टिकून आहे. बहुतांश वेळा कुस्तीपटू हे आर्थिकदृष्टय़ा बेताची परिस्थिती असलेल्या घरातूनच घडतात. अनेक परदेशी मल्लही त्याला अपवाद नाहीत. त्यामुळेच कुस्ती हा गरिबांचा क्रीडाप्रकार आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. साहजिकच कुस्ती स्पर्धाकरिता आणि मल्लांकरिता प्रायोजक मिळणे हेच आव्हानात्मक असते. हे लक्षात घेता आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती संघटकांनाही कोणी ‘गॉडफादर’ नाही. मॉडर्न पेन्टॅथलॉन हा खेळ ऑलिम्पिकचे जनक असलेल्या बॅरन डी क्युबर्टिन यांच्याच आग्रहास्तव सुरू करण्यात आला होता. स्पर्धेच्या जनकाचाच हा खेळ असल्यामुळे त्यास कोणाची धक्का देण्याची हिंमत होईल काय? तायक्वांदो या खेळात युरोपियन देशांमधील अनेक मोठय़ा संघटकांची लॉबी आहे. या दोन खेळांच्या तुलनेत कुस्ती संघटकांना मोठा वाली नाही आणि आपला खेळ ऑलिम्पिक स्थापनेपासून असल्यामुळे आपल्याला कोणी धक्का देणार नाही अशा भ्रमात हे संघटक राहिले आणि त्यांनी स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला. एखादा क्रीडा प्रकार स्पर्धेतून वगळताना विविध निकष पाहिले जातात. एखादा खेळ वगळताना उत्तेजकाची प्रकरणे या खेळात किती पाहावयास मिळतात याचाही विचार केला जातो. कुस्तीच्या तुलनेत वेटलिफ्टिंग व सायकलिंग या क्रीडा प्रकारात उत्तेजक सेवनाच्या आरोपाखाली बंदी घातलेल्या खेळाडूंची प्रकरणे मोठय़ा प्रमाणावर आढळतात. कुस्तीला वगळताना उत्तेजकाचा निकष लावला गेला असेल तर कुस्तीपूर्वी वेटलिफ्टिंगवर बंदी घालण्याची आवश्यकता होती. मात्र तसे झाले नाही. गेल्या काही वर्षांमध्ये कुस्तीमध्ये ऑलिम्पिक व जागतिक स्तरावरील स्पर्धामध्ये आशियाई देशांच्या खेळाडूंचे प्राबल्य वाढले आहे. हे यशही काही युरोपियन देशांच्या डोळ्यात खुपत असावे. एखाद्या स्पर्धेपुरते या खेळास वगळले तर साहजिकच पुढच्या ऑलिम्पिकपर्यंत सात-आठ वर्षे निघून जातात. या काळात आपल्या खेळाडूंना आशियाई खेळाडूंची सद्दी मोडण्यासाठी पुरेसा कालावधी मिळतो हादेखील विचार कुस्तीला वगळताना झाला असावा. कुस्तीऐवजी ज्या मॉडर्न पेन्टॅथलॉनला प्राधान्य देण्यात आले आहे, त्या खेळातील नेमबाजी, अश्वारोहण व तलवारबाजी या क्रीडाप्रकारांमध्ये किती जोखीम असते व त्याच्या स्पर्धा घेताना संयोजकांची किती भंबेरी उडणार आहे याचा फारसा विचार झालेला दिसत नाही. केवळ ऑलिम्पिक समितीमधील काही मूठभर सत्ताधिकाऱ्यांना खूश करण्यासाठी कुस्तीला मूठमाती देण्यात आली आहे. त्याविरोधात भारतासारख्या  देशांनी आता आवाज उठवण्याची गरज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assault on sport culture