दिल्लीत येणं-जाणं सुरू झाल्यापासून खूपदा मनात येऊन गेलं होतं की अटलजींच्या बरोबर सावलीसारखे वावरणारे आणि आपल्या गालभर मिशांमुळे नेहमी नजरेत भरणारे अटलजींना समर्पित होऊन वावरलेले कार्यकर्ते शिवकुमार यांच्याशी एकदा गप्पा मारायच्या, जमलं तर त्यांची मुलाखत घ्यायची. म्हाळगी प्रबोधिनीच्या ‘समग्र अटलजी’ प्रकल्पाच्या निमित्ताने झालेल्या भेटीगाठींमधून ही मुलाखत ठरली आणि अटलजींच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक परिचित- अपरिचित पैलू उलगडत गेले.
शिवकुमार या नावाने परिचित असलेले आणि आज सत्तरी ओलांडल्यानंतरही अटलजींची साथ-संगत इमानेइतबारे करणारे त्यांचे हे अंतरंग सहकारी मुळातले शिवशंकर पारीख! १९६५ च्या सुमारास जयपूरला लॉ कॉलेजात शिकताना त्यांनी अ. भा. वि. प.च्या वतीने विद्यार्थी-संघाची निवडणूक लढविली आणि विजयी झाले. विद्यार्थी-संघाच्या उद्घाटनाला त्यांनी अटलजींना बोलावलं आणि तेव्हापासून त्यांचा अटलजींशी उत्तरोत्तर घनिष्ठ संबंध येत गेला. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाळ उपाध्याय या जनसंघाच्या दोन पूर्वाध्यक्षांच्या निर्घृण हत्या झाल्यामुळे चिंतित झालेल्या या युवा कार्यकर्त्यांने आपण होऊनच अटलजींची नित्य पाठराखण करायचं ठरवलं. सुरुवातीची काही र्वष सर्वोच्च न्यायालयात वकिली करत करतच त्यांनी ही जबाबदारी सांभाळली होती, पण १९७१ नंतर मात्र वकिली सोडून त्यांनी पूर्णवेळ अटलजींची साथ-संगत करण्याचे जणू काही व्रतच घेतले. ‘‘मेरे लिए अटलजी सब कुछ है और मैं मजमक में अटलजी को बताता हूँ कि मैं आपका पीर, बवर्ची (स्वैपाकी), बिश्ती (पाणक्या), खर (नोकर).. सब कुछ हूँ।’’ असं सांगणारे शिवकुमार म्हणजे पडद्याआड राहून अटलजींसाठी सतत धडपडणारे नेतृत्व-निष्ठ कार्यकर्ते! डिफेन्स कॉलनीतल्या त्यांच्या घरात दीड-दोन तास झालेल्या गप्पांमधून उलगडलेले अटलजींच्या व्यक्तिमत्त्वाचे हे काही पैलू.
संघटक, पक्षाध्यक्ष, नेता आणि पंतप्रधान या विविध भूमिका यशस्वीपणे निभावलेल्या अटलजींच्या जाणत्या नेतृत्वशैलीबद्दल.
– आजच्या अनेक राजकीय नेत्यांच्या तुलनेत अटलजींचे वैशिष्टय़ म्हणजे ते अतिशय सहिष्णुतेने, चिकाटीने ऐकण्यासाठी प्रसिद्ध आहेत. कार्यकर्त्यांला ते बोलू देतात, नि:संकोचपणे सांगू देतात. ‘आ गया ध्यान में’ असं म्हणून तोडत नाहीत. स्वत:च्या भावनांचं व्यवस्थापन त्यांना नेहमीच चांगलं जमत आलंय. मनातला संताप, नाराजी ते नेहमीच न बोलता, पण खूप प्रभावीपणे व्यक्त करतात. भाषणाची तयारी अशी त्यांना करायला लागत नाही. झाडाला फुलं यावीत तसे त्यांच्या जिभेवर शब्द येतात. प्रवासात कित्येकदा सलग सात-सात तास आम्ही बरोबर असायचो. मी बोलायचो, तेही काही प्रतिसाद द्यायचे; पण सामान्यत: कल सतत चिंतन आणि मनन करण्याकडे. अस्वस्थता आली, मनातून बेचैन झाले की ते कविता करत.
प्रत्येक वाढदिवसाला त्यांनी कविता केली आहे. जाहीर सभेत गेल्यावर आधीचा वक्ता काय काय बोलला आहे ते, ते आवर्जून समजून घेत. आत्मविश्वास ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू! लहानातल्या लहान कार्यकर्त्यांलाही ते सन्मान देतात. मला कधीही चुकूनसुद्धा त्यांनी ‘शिवकुमार’ म्हणून हाक मारली नाही. नेहमी ‘शिवकुमारजी’ असा उल्लेख करणार, तशीच हाक मारणार.
पक्षात आणि पक्षाबाहेरही विविध नेत्यांशी असलेल्या स्नेहाच्या किंवा तणावाच्या संबंधांबद्दल!
आणीबाणीनंतर इंदिराजींचा पराभव झाला आणि अटलजी परराष्ट्रमंत्री झाले. तिसऱ्याच दिवशी अटलजी इंदिरा गांधींना भेटायला गेले. म्हणाले, ‘‘इमर्जन्सीमें ज्यादतीया हुवी, मगर मैं आपको बताने आया हूँ कि हम कभी कोई ज्यादती नहीं करेंगे। आपको किसी तरह का कोई कष्ट हो तो बे-झिझक हमें बताए।’ भेट संपली तेव्हा इंदिराजींच्या डोळ्यात पाणी होतं! १९८४ मध्ये अटलजी बंगलोरला एका निसर्गोपचार आश्रमात राहायला गेले होते. तिथे फोनची सुविधाही नव्हती. त्याच काळात इंदिराजींना ऑपरेशन ब्लू-स्टार संदर्भात अटलजींशी चर्चा करायची होती. शेवटी रातोरात फोनच्या तारा टाकण्यात आल्या आणि इंदिराजी अटलजींशी बोलल्या. आपल्या शालीन आणि विनम्र व्यवहाराने ते परकीय राष्ट्रप्रमुखावरही छाप टाकत. पंतप्रधान असताना अमेरिकन सिनेटसमोर त्यांचे भाषण झाले. त्या वेळी त्यांचा गुडघ्याचा विकार बळावू लागला होता आणि ते लक्षात घेऊन खुद्द क्लिंटन चढता-उतरता, दरवाजे उघडताना त्यांना हात देत, मदत करीत! पक्षातही सर्वाना बरोबर घेऊन जाण्याबाबत त्यांचा आग्रह राही. आमदारांना घेऊन शंकरसिंग वाघेला खजुराहोला गेले हे कळताच अटलजी स्वत: विमानाने खजुराहोत दाखल झाले आणि वाघेलांचे बंड शमविण्यात ते यशस्वी झाले. कल्याण सिंग पक्षातून बाहेर पडून २००४ मध्ये परत आले तेव्हा सगळी कटुता विसरून अटलजींनी त्यांचे मनापासून स्वागत केले. मुळात कल्याण सिंग पक्षाबाहेर जाऊ नयेत यासाठीही अटलजींनी खूप प्रयत्न केले. टाटा, किलरेस्कर, बिर्ला इ. उद्योग घराण्यांच्या नायकांशीही ते आपण होऊन चर्चा करीत. पण सगळ्यात उल्लेखनीय म्हणजे त्यांची आणि अडवाणींची घनिष्ठ मैत्री! दोघांची व्यक्तिमत्त्वे, दोघांची गुणसंपदा एकमेकांना नेहमीच पूरक राहिली!
– विरोधी नेता आणि पंतप्रधान म्हणून त्यांच्या कार्यशैलीबद्दल!
– खूप सांगता येईल, पण एक किस्सा सांगतो. सत्तरच्या दशकात अल्सरच्या त्रासामुळे त्यांच्या पोटाचं ऑपरेशन झालं. खासदाराला वैद्यकीय खर्चाचा परतावा तेव्हाही मिळे, पण त्यासाठी फक्त राम मनोहर लोहिया रुग्णालयातच उपचार घेण्याची मुभा होती. त्या वेळी या रुग्णालयात रुग्ण दगावण्याची प्रकरणे संसदेत व संसदेबाहेरही सर्वत्र गाजली होती. आमचा ऑपरेशन खर्चाचा परतावा नामंजूर झाला तेव्हा त्या वेळच्या आरोग्यमंत्र्यांना, म्हणजे डॉ. करणसिंगांना अटलजींनी अवघ्या एका ओळीचं पत्र पाठविलं. त्यात लिहिलं, ‘‘मंत्रीजी, मुझे अपना इलाज करवाना था, अंतिम संस्कार नहीं!’’ आरोग्यमंत्री समजायचं ते समजले आणि ते बंधन दूर झालं!
उदंड आत्मविश्वास हा अटलजींचा असाधारण गुण! पोखरणची अणू चाचणी गोपनीय राखण्यात त्यांनी जे यश मिळविलं, त्याचं मूळ त्यांच्या अचूक नियोजनात होतं. अमेरिकेने र्निबध लागू केल्याची बातमी आल्यावरही ते विचलित झाले नव्हते. ‘‘कुछ बिगडता नहीं. जरुरी हो तो हम फिर परिक्षण करेंगे,’’ ही त्यांची प्रतिक्रिया होती.
– रा. स्व. संघाच्या नेत्यांशी असलेल्या त्यांच्या संबंधांबाबत!
अलीकडच्या काळात भाऊराव देवरस, राजेंद्रसिंह इ.शी त्यांचे खूप आत्मीय संबंध होते; पण गोळवलकर गुरुजींशी त्यांचे विलक्षण प्रेमाचे, आपुलकीचे संबंध होते. १९७१ मध्ये इंदिरा गांधींनी संघावर र्निबध घालण्याच्या उद्देशाने एक विधेयक मांडायचे ठरविले होते, पण गुरुजींशी चर्चा करून अटलजींनी अशी काही जबरदस्त मांडणी करून संपूर्ण संसद गाजविली की इंदिराजींचा विधेयक सादर करण्याचा बेतच बारगळला.
गप्पा संपविता, संपविता शिवकुमारजी म्हणाले, ‘‘२००४ च्या निवडणुकीत आपण पराभूत होत आहोत हे अटलजींनी खूप आधीच जाणले होते. लखनौमध्ये मतदान करून ते तामिळनाडूत प्रचारासाठी गेले. तिथून रात्री उशिरा फोनवर आमच्या गप्पा झाल्या. शपथविधी कधी करायचा, कसा करायचा याबद्दल तुम्ही काही विचार केला का, असं मी विचारल्यावर अटलजी मोठय़ानं हसले. म्हणाले, ‘‘कौनसी दुनिया में हो शिवकुमारजी.. हमें शपथ-ग्रहण का मौका नहीं मिल रहा. हम हार रहे हैं.’’ ..ते ऐकून मला मोठाच धक्का बसला. आज मागे वळून पाहताना वाटतं की, अटलजींना पुन्हा संधी मिळाली असती तर देशाला खूप लाभ झाला असता. काळा पैसा बाहेर काढण्याबाबत त्यांच्याकडे एक महत्त्वाकांक्षी योजना होती. आता वाटतं की, निदान अटलजींना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य मिळावं. लोकांमध्ये त्यांच्या तब्येतीविषयी तर्क-कुतर्क चालतात. अटलजींना मज्जासंस्थेच्या आजारामुळे नीट बोलता येत नाही आणि आपल्या जुन्या, प्रिय सहकाऱ्याला आपण जे बोलतोय ते कळतच नाही, हे ध्यानात आल्यावर त्यांना पराकोटीची वेदना होते. त्यासाठीच त्यांच्या भेटीगाठींवर बंधनं आहेत.’’
मुलाखत संपविताना शिवकुमारजींच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. सतत ४०-४५ वर्षे सावलीसारख्या वावरणाऱ्या शिवकुमारजींनी प्रवादांना थारा नको म्हणून अटलजींना वगळून ना कोणता जनसंपर्क केला, ना पक्षात वा सरकारात कोणत्या पदाची अपेक्षा बाळगली. वटवृक्षाची सावली बनून नेतृत्वाला आधार देत विचारधारेची सेवा करण्याचे कठीण व्रत त्यांनी आजन्म आचरले, त्याबद्दलची कृतार्थता आणि निर्लिप्तता दोन्हींचे प्रतिबिंब त्यांच्या डोळ्यांत झळकत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा