मॅन बुकर इंटरनॅशनलपारितोषिकाच्या अंतिम स्पर्धेत उरलेल्या सहा पुस्तकांची यंदाची यादी नुकतीच जाहीर झाली. पण त्याआधीची १३ पुस्तकांची यादी ठरवण्यापासून सारी उस्तवारी निवड समितीच करते.. विजेता कोण, हे बहुधा वेगळेपणाया निकषावर ठरतं.. २००५ पासून गेल्या दशकभरात दिसलेल्या बुकर-छटांचा मागोवा..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिक गेकोस्की नावाचा एक पुस्तकवेडा आहे. ‘गार्डियन’ वृत्तपत्रामध्ये त्याच्या असुरी पुस्तक‘लालसे’ला स्पष्ट करणारे एक सदर येते. (दर काही वर्षांनी त्यातील लेखांचे पुस्तक गाजू लागते.) ‘बुकर’ पारितोषिकासाठी पाच जणांच्या निवड समितीचा सदस्य असताना त्याने पूर्वसूरींच्या ‘सर्वातले सर्वच वाचण्याची गरज नाही,’ या सल्ल्याला डावलून सहा-सात महिन्यांमध्ये बुकरसाठी विचारात घेण्यात आलेल्या दीडशे कादंबऱ्या पानन्पान वाचून काढल्या. या सदरामध्ये त्याने त्या वाचनकळेच्या प्रक्रियेवर, त्यातील बऱ्या-बुऱ्या परिणामांवर प्रथमच जगजाहीरपणे चर्चा केली. त्यानंतर गेल्या दहा ते पंधरा वर्षांत ‘बुकर’ पारितोषिकासाठी लांबोडकी अन् लघुयादी तयार करणारे पाच परीक्षकदेखील या पुरस्कारासारखेच दरवर्षी वलयांकित बनू लागले आहेत. विजेता निवडीपर्यंत मुलाखतींसाठी त्यांच्या आगेमागे वृत्तप्रतिनिधींचा गोतावळा बुकर पुरस्कारासंबंधी हाती लागेल ती माहिती शोषण्याची स्पर्धा करीत असतो.

१९६९ पासून इंग्रजी भाषेत सर्वोत्तम कथनसाहित्याला दिला जाणारा हा पुरस्कार लेखकाची हयातभरची सांपत्तिक चिंता मिटवून देतो. पुरस्कार मिळविल्यानंतरच्या काळात लेखकाने फार थोर लिहिले किंवा नाही, तरी उत्पन्नस्रोताचा झरा त्याला विविध मार्गानी उपलब्ध होतो. कॅनडामध्ये ‘गिलर’ आणि नायजेरियामध्ये ‘केन’ हे बुकरसमान पुरस्कार आहेत. अमेरिकेतील ‘नॅशनल बुक अ‍ॅवॉर्ड’ आणि ‘पुलित्झर’ या दोन्ही पुरस्कारांचे विजेते जगभरात बुकर विजेत्यांइतकेच लोकप्रिय होतात. मात्र तरीही जगातील वृत्तप्रक्रियेत बुकरची नोंद ठसठशीत घेण्याच्या शिरस्त्यात आजवर बदल झालेला नाही.

बुकर पुरस्काराच्या रकमेहून अधिक सट्टेबाजी त्याचा विजेता कोण असेल यावर होत असते. त्यामुळे साहित्यिक आवड असलेला आणि नसलेला युरोपमधील बराच मोठा वर्ग सप्टेंबरमध्ये जाहीर झालेल्या लघुयादीनंतर (शॉर्ट लिस्ट) ढवळून निघतो. पूर्वी ब्रिटन, आर्यलड, झिम्बाब्वे आणि राष्ट्रकुल देशांमधील वर्षभरात प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकांना पुरस्कारांसाठी विचारात घेतले जाई. २०१३ सालापासून त्यात अमेरिकी लेखकांचा समावेश झाला आणि आता बऱ्याच अर्थानी हा पुरस्कार जागतिक झाला आहे. कारण इंग्रजी पुस्तकांच्या जागतिक बाजारपेठेवर शतकभरात अमेरिकी प्रभाव आहे. खूपविक्या (बेस्टसेलर) पुस्तक व्यवहाराची यथोचित जाहिरातबाजी करणारी यंत्रणा जगाच्या कानाकोपऱ्यात अमेरिकी पुस्तक पोहोचविते. मायाजालामुळे हा व्यवहार आणखी सुकर झाला. एवढे सारे असतानाही बुकर पुरस्काराच्या लांबोडक्या यादीपासून ब्रिटनचा हा पुरस्कार व्यवहार कथात्म साहित्य अभ्यासकांसाठी महत्त्वाचा असतो.

यंदा पाच जणांच्या निवड समितीमधील प्रत्येकाने गेल्या नऊ महिन्यांपासून १५५ कादंबऱ्यांचे वाचन करून लंब्या यादीसाठी १३ आणि लघुयादीसाठी अंतिम सहा बुकर दावेदारांची निवड केली आहे. आधुनिक संस्कृतीची दखल घेणारे विषय अन् ते विषय हाताळताना अपारंपरिक आणि आजवर अज्ञात गोष्टींचा लेखकांनी घेतलेला शोध या निकषांवर अंतिम सहा कादंबऱ्या निवडण्यात आल्याचे निवड समितीच्या अध्यक्षा अमाण्डा फोरमन यांनी लघुयादी घोषित होतानाच स्पष्ट केले आहे. निवड समिती सदस्य जॉन डे आणि बुक-ब्लॉगर जॉन डॉगडेल यांनी गेल्या नऊ महिन्यांतील पुस्तकवाचनाचा आढावा घेताना वाचनवेदनेवर लक्ष केंद्रित केले आहे.

वाचनाच्या स्नायूवर ताण!

साधारण वाचक १० ते २० वर्षांत जितके कथन साहित्य वाचू शकत नाही, तेवढे (बक्कळ मानधन मिळत असले तरी) केवळ सात ते नऊ महिन्यांत वाचून पाच बुकर सदस्य पुस्तक निवडतात. हे पाच जण गोपनीयरीत्या दरमहा एकत्रित येऊन पुस्तकांचे विच्छेदन करतात. त्यातून कॅनडा, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि युरोप खंडांतील प्रातिनिधिक नव्या-जुन्या लेखकांची नावे याद्यांमध्ये सरकत असतात. यातील निकषांमध्ये ‘वाचनीयता’ असते का, याबाबत अनेक वर्षांमध्ये वाद आहे. हा जसा ऑस्कर मिळविणाऱ्या चित्रपटाच्या आकलनाबाबत सर्वसमावेशकतेचा सापेक्ष मुद्दा असतो, त्याचप्रमाणे इथल्या पुस्तकांबाबतही ठरतो.

१८७४ साली जर्मनीचे मेंदूवैज्ञानिक कार्ल वेर्निक यांनी आपल्या मेंदूतील डाव्या कुंभखंडात (लेफ्ट टेम्पोरल लोब) मध्यसीता (सेंट्रल सल्कस) भागाच्या वर बाँका व हेशलस गायरी भागाच्या मागे कोणत्याही व्यक्तीचा ‘वाचनस्नायू’ असतो याचा शोध लावला. आपल्याला भाषा आणि शब्दाचे बोध या स्नायूद्वारे होत असतो. त्यामुळे हा स्नायू जितका सक्षम तितकी माणसे एकाग्रचित्ताने वाचू शकतात. अर्थातच बुकरच्या परीक्षकांना आपला हा वाचनस्नायू आठ ते नऊ महिने सलग अबाधित ठेवणे अत्यावश्यक असते. ‘फायनान्शियल टाइम्स’च्या फिक्शन एडिटर रोसी ब्लाऊ यांनी २०१० साली बुकर परीक्षक असताना १३८ पुस्तकांच्या वाचनाची गोष्टच एका निबंधातून आपल्या वृत्तपत्रात मांडली आहे. त्यांच्या वडिलांचे आजारपण-मृत्यू आणि मुलीचा जन्म या चक्रामध्ये वाचन व्यवहारातील अडचणींचा डोंगर त्यांनी पार केला. पुस्तकांबाबत सामूहिक निवडीची जटिल प्रक्रियाही त्यांनी नमूद केली आहे. दुसरे एक सदस्य नॅटली हायन्स यांनी एका लेखात पहिल्या तीन महिन्यांत ५० पुस्तके आणि नंतर १०० दिवसांत १०० पुस्तके वाचल्याचे नमूद केले आहे. झोप आणि सारीच सत्रे पुस्तकमय बनल्याने जगण्यातले रोजचे व्यवहार विस्कळीत झाल्याचे अनेक सदस्यांनी जाहीरपणे स्पष्ट केले आहे. १५० पानांपासून ९०० पानांच्या पुस्तकांचा अतिरेकी फडशा पाडण्याच्या अवघड दिनक्रमांतून दरवर्षी जगाच्या अज्ञात प्रदेशातील लेखक  समोर आले आहेत.

बुकर-नकाराची कारणे..

पण या अथक वाचन मेहनतीतून समोर येणारे लेखक आणि जागतिक पुस्तक व्यवहारात वाचकांवर चलती करणारे लेखक यांच्यामध्ये खूप मोठी तफावत पाहायला मिळते. खूपविक्या पुस्तकांचे लेखक हे बहुधा अमेरिकीच असतात आणि बुकरविजेती लंबीचौडी पुस्तके सहज उपलब्ध म्हणून खरेदी करून वाचण्याऐवजी फडताळातील शोभा म्हणून अनेक काळ तशीच राहतात, असा अनेकांचा अनुभव असेल. इथे एक नाव आवर्जून नमूद करावे लागेल ते निक हॉर्नबी या वाचकप्रिय ब्रिटिश लेखकाचे. या लेखकाला कधीही बुकर नामांकन मिळाले नाही, मात्र कोणत्याही बुकरविजेत्या पुस्तकाहून याचे दरएक पुस्तक दुपटी-तिपटीने जास्त विकले जाते. ‘हाय फिडेलिटी’ या त्याच्या पहिल्या कादंबरीवर अमेरिकेत चित्रपट झाला. त्यानंतर त्याच्या येणाऱ्या प्रत्येक कादंबऱ्या बेस्ट सेलर यादीमध्ये सरकत गेल्या. वाचनीयता, रंजकता या निकषांवर या कादंबऱ्या बुकर विजेत्यांहून सरस वाटू शकतील. पण हॉर्नबी आणि त्यासारख्या अनेक वाचकप्रिय लेखकांना खूपविके असल्याच्या गुणधर्मावरून बुकरने बाजूला सारले आहे.

मग या पट्टीचे वाचक असणाऱ्या निवड समितीने अथक मेहनतीतून वाचकाभिमुख किंवा ‘रीडर फ्रेण्डली’ असे काय दिले, असा प्रश्न पडू शकेल. १९६९ पासून ऐतिहासिक विषय असलेल्या कादंबऱ्यांचा वरचष्मा दिसतो. गेल्या वर्षी जमैकाच्या मार्लन जेम्स याच्या ‘ए ब्रीफ हिस्टरी ऑफ सेव्हन किलिंग’ या कथनात्मक इतिहास असलेल्या पुस्तकाला पारितोषिक मिळाले. त्याआधीही ‘द नॅरो रोड टू डीप नॉर्थ’ या रिचर्ड फ्लॅनेगन या ऑस्ट्रेलियाच्या आणि एलेनॉर कॅटन हिच्या ‘द ल्युमिनिअर्स’ या तब्बल आठशे पानांच्या दीड शतकाचा न्यूझीलंडच्या एका विशिष्ट गोष्टीचा इतिहास मांडणाऱ्या कादंबऱ्यांना पारितोषिक मिळाले. दोन वेळा पारितोषिक मिळविणारी हिलरी मेंटेलदेखील इतिहासाशी खेळणारी लेखिका. यादरम्यान, यान मार्टेलची ‘लाइफ ऑफ पाय’, डीबीसी पीएरची ‘व्हर्नन गॉड लिटिल’, हॉवर्ड जेकब्सनची ‘फिंकलर्स क्वेश्चन’, जुलिअन बार्न्‍सची ‘सेन्स ऑफ एंडिंग’ या तद्दन इतिहासबाहय़ कादंबऱ्या निवडल्या गेल्या. १९९७ साली अरुंधती रॉय यांना ‘गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’साठी पुरस्कार मिळाला. त्यानंतर अनिता देसाई, अरविंद अडीगा यांनी त्यावर नावे कोरली. झुंपा लाहिरी, संजीव सहोटा आणि अजून काही (केवळ) भारतीय नावे बुकर अंतिम यादीत असतात.

गेल्या १५ ते २० वर्षांमध्ये ही पारितोषिके मिळविणारी किंवा त्यासाठी स्पर्धेत उरणारी पुस्तके भारतात फार आधीपासून उपलब्ध होत आहेत. बुकरविजेती पुस्तके ‘रस्ता पुस्तक बाजार यंत्रणे’त तातडीने हजर होतात. पुस्तकाच्या एकत्रित निवडीनंतर वेगळेपणाबाबत शंका घेता येणार नाही, असे विजेते दरवर्षी निवड समितीकडून निवडले जातात. या पुस्तकांच्या विजेत्यावर सट्टाबाजार चालतो अन् या सट्टेबाजाराचा परिणामही अंतिम क्षणी पुस्तकविजेत्याच्या नाव घोषणेवर ठरतो. उदा. गेल्या वर्षी हान्या यांगिहारा या अमेरिकी लेखिकेच्या कादंबरीवर सर्वाधिक सट्टा लागला गेला आणि नायजेरियाच्या ‘द फिशरमन’ या चिगोझी ओबिओमा लिखित पहिल्याच कादंबरीचा प्रचंड बोलबाला होता. अ‍ॅन टेलर आणि टॉम मॅकार्थी हे नामांकनात असलेले दिग्गज लेखक होते. युरोपातील स्थलांतराचा प्रश्न टोकावर असताना संजीव सहोटा याची स्थलांतरावरीलच ‘इयर ऑफ द रनअवेज’ ही कादंबरी पारितोषिक मिळवेल असा कयास मांडला जात होता. पण प्रत्यक्षात निवड समितीने मार्लन जेम्स याच्या जराही चर्चेत नसलेल्या पुस्तकाला विजेते घोषित करून चकवा दिला. यंदा डेबोरा लेव्ही वगळता पाच नावे पट्टीच्या वाचकवर्तुळासाठी नवी आहेत. ओटेसा मॉशफेग ही अगदीच नव्या दमाची अमेरिकी कथाकार आयलीन या पहिल्याच कादंबरीद्वारे बुकरपरिघात आली आहे. यंदा वाचनकळा सोसलेली निवड समिती कोणता चकवा देईल, त्यासाठी अद्याप सव्वा महिना शिल्लक आहे.

बुकमार्कमध्ये येत्या काही आठवडय़ांत, यापैकी निवडक पुस्तकांबद्दल सविस्तर लेख!

 

बुकर- २०१६चे सवाई सहा..

  • सेलआऊट : कृष्णवर्णीय पॉल बेट्टी यांची चौथी कादंबरी. पहिल्यांदाच बुकपर्यंत पोहोचलेली. निनावी नायकाला घेऊन वंशभेदाचे अमेरिकी राजकारण विशद करणारी ही कादंबरी निवड समितीच्या पसंतीच्या ऐतिहासिक गटात मोडली जाते.
  • हॉट मिल्क : लेखिका डेबोरा लेव्ही ब्रिटिश असल्याने दुसऱ्यांदा बुकर नामांकन मिळत असल्याने, सट्टेबाजारात सर्वाधिक बोली हे पुस्तक विजेते ठरेल याची आहे. मात्र फार आधीपासून गूढ म्हणून वाचकांनी या पुस्तकाला फारशी पसंती दाखवली नव्हती.
  • हिज ब्लडी प्रोजेक्ट : ग्राएम मक्राए बर्नेट यांची एकोणिसाव्या शतकातील खुनाची गोष्ट या कादंबरीत आहे. कादंबरीत तीन व्यक्तींच्या खुनाचा आरोप असलेल्या व्यक्तीवरील प्रचंड मोठा कालावधी चालणारा खटला आहे.
  • आयलिन : ओटेसा मॉशफेग हे सध्या समांतर अमेरिकी कथाकारांमधील तगडे तरणे नाव. या पुस्तकाची तुलना वाचकप्रिय ‘गॉनगर्ल’शी केली जात आहे. पुस्तकावर सिनेमाही येणार आहे. लेखिका खूपविकी असूनही संभाव्य विजेती म्हणून चर्चेत आहे.
  • ऑल दॅट मॅन इज : डेव्हिड सलाय या कॅनडाच्या लेखकाची कथामालिकायुक्त कादंबरी निवडण्यात आली आहे. ग्रॅण्टा मासिकाच्या ४० वर्षांखालील आजच्या लेखकांमध्ये या लेखकाचा समावेश आहे.
  • डू नॉट से वी हॅव नथिंग : मॅडलाइन टियान या जन्मापासून कॅनडियन असल्या, तरी वांशिकदृष्टय़ा चीनशी नातेसंबंध ठेवून आहेत. या कथालेखिकेचे हे पाचवे पुस्तक असून चीनच्या इतिहासाशी त्याचा विषय संबंधित आहे.

 

– पंकज भोसले       

pankaj.bhosale@gmail.com

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2016 man booker prize