भ्रष्टाचार शून्य पातळीवर आहे, असा देश जगात एकही नाही. पण भारतातला भ्रष्टाचार हा सर्वदूर आहे आणि मुख्य म्हणजे, शासन-प्रशासनाच्या सर्वच अंगांना हा भ्रष्टाचाराचा रोग पसरलेला आहे. आपल्या नेत्या-कार्यकर्त्यांची, राजकीय पक्षांची व्यवस्था- मग ती सत्तेत असो की सत्तेबाहेर- तीही भ्रष्टाचाराला अंगाखाद्यांवर खेळवतच वाढते आहे. हे चित्र जरी निराशाजनक असलं, तरी हा रोग नेमका कुठे कुठे पसरला आहे आणि त्याचे वाहक कोण, याची माहिती तर व्हायलाच हवी. रोगाचे वाहक कसकसे असू शकतात, त्यांचे मार्ग काय काय असतात, ते कुठकुठल्या पातळ्यांपर्यंत पसरलेले आहेत, याची माहिती ती सामान्यपणे सर्वाना असतेच, म्हणून तर काळ्या पैशावर प्रहार होतोय म्हटलं की आपण विश्वास ठेवतो. हे पुस्तक त्यापुढली आणि अधिक सखोल माहिती देतं. भ्रष्टाचार आपल्या व्यवस्थेचाच भाग बनला असताना आपण आपला देश ‘प्रजासत्ताक’ आहे असं कुठल्या तोंडानं म्हणायचं, अशा सच्चा देशप्रेमी प्रश्नांचे तरंग वाचकांच्या मनात रुजवतं.
पुस्तकाचे लेखक जोसी जोसेफ हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांचा अनुभव तर दांडगा आहेच, पण ‘द हिंदू’सारख्या निष्पक्ष मानल्या जाणाऱ्या वृत्तपत्राचे ते ‘राष्ट्रीय सुरक्षा संपादक’ आहेत. पत्रकारांची पुस्तकं अनेकदा जे काही वृत्तपत्रांत छापून आलं त्याचीच गोळाबेरीज असतात, पण हे पुस्तक तसं नसून स्वतंत्रपणे अभ्यास करून आणि देशाविषयीच्या तळमळीनं लिहिलेलं आहे. त्यामुळे उदाहरणार्थ, अदानी उद्योगसमूहाने ५४६८ कोटी रुपये भ्रष्ट मार्गाने (ऊर्जा उपकरणांची अवाच्या सवा बिलं दाखवून) देशाबाहेर पाठवले, असं जोसेफ लिहितात, तेव्हा ‘वीजपारेषण उपकरणांची बिलं ९०४८ कोटी रुपयांची होती. ती चीन आणि दक्षिण कोरियातून आणली, तिथं त्यांची प्रत्यक्ष किंमत ३५८०.८ कोटी रुपये होती. यातल्या फरकाचे ५४६८ कोटी रुपये दुबईमार्गे ‘कर-नंदनवन’ असलेल्या मॉरिशस या देशात, अदानी बंधूंपैकी सर्वात थोरले शांतिलाल यांच्या नावे असलेल्या ‘इलेक्ट्रोजेन इन्फ्रा होल्डिंग्ज’ नामक कंपनीद्वारे वळविण्यात आले,’ ही माहिती देतात, तेव्हा अदानींच्या नथीतून मोदींवर तीर मारण्याचा त्यांचा क्षुद्र हेतू नसतो. पुढल्याच वाक्यात, हा भ्रष्टाचार ५४६८ कोटी रुपयांचा असल्याचे तपास यंत्रणांनी शोधून काढले तेव्हा अदानी यांनी त्याचा इन्कार करताना, आपण मोदीसमर्थक असल्यामुळे आपल्याला (तत्कालीन) काँग्रेस सरकारकडून लक्ष्य बनविले जात आहे, असा प्रत्यारोपही केला होता, याची माहितीदेखील जोसेफ देतात. पुन्हा ‘या प्रकरणाचं काय झालं?’ वगैरे प्रश्न उपस्थित करण्याच्या फंदात जोसेफ पडत नाहीत. जणू काही, कोणत्याच प्रकरणाचं काहीही होणार नसल्याची त्यांनाही आपल्याप्रमाणेच खात्री असावी! मात्र एक गंभीर लेखक या नात्यानं, पुस्तकाच्या हेतूशी जोसेफ प्रामाणिकच राहतात : व्यवस्थेत पसरलेला भ्रष्टाचार हा राजकीय नेत्यांच्या इशाऱ्यांनुसारच दिसतो किंवा दिसेनासा होतो यावर लोकांचा विश्वास बसण्याजोगी स्थिती आहे, हे त्यांनी ‘ओळींच्या मध्ये’ अबोलपणे वाचकाच्याही लक्षात आणून दिलेलं असतंच.
अदानींचं हे उदाहरण अख्ख्या पुस्तकात एका परिच्छेदापुरतं आहे आणि ते प्रकरण आहे अंबानींच्या ‘अँटिलिया’ या निवासस्थानाच्या उभारणीसाठी आपल्या अनेकानेक यंत्रणा कसकशा वाकवल्या-झुकवल्या गेल्या, याबद्दल. ‘अँटिलिया’चा वीजपुरवठा अगदी नेहमीच अबाधित राहावा यासाठी काय काय केलं गेलं, याचे तपशील देताना एरवी देशात वीजपुरवठय़ाच्या नावाखाली काय काय सुरू असतं याचं भानही वाचकाला असावं, एवढय़ापुरतंच हे अदानींचं उदाहरण आहे. ऊर्जाक्षेत्रातला भ्रष्टाचार आणि कोळसा घोटाळा याबद्दलच्या प्रकरणात काँग्रेसचे खासदार आणि ऊर्जा-पोलाद उद्योजक नवीन जिंदाल यांच्या ‘कोळसा घोटाळ्या’शी कसा संबंध होता, याचंही साद्यंत वर्णन आहे. लेखक पक्षांपेक्षा किंवा व्यक्तींपेक्षा, भ्रष्टाचाराच्या ‘मार्गा’कडे निरखून पाहतो आहे, हे पुस्तकातून पानोपानी जाणवतं. सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडरा यांनी कवडीमोलाने जमिनी कशा मिळवल्या, हे सांगण्याआधी अटलबिहारी वाजपेयी यांचे मानलेले जावई आणि वाजपेयींना पंतप्रधानपद मिळेपर्यंत हॉटेल-मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह असलेले रंजन भट्टाचार्य यांना पंतप्रधानांचे स्वीय सचिव हे पद कसं मिळालं, त्याविषयी प्रश्न विचारले असता भट्टाचार्य यांनी कशी उडवाउडवीची उत्तरं दिली, हेही नोंदवण्यातून लेखक कोणाही पक्षाच्या कितीही ज्येष्ठ-श्रेष्ठ नेत्यांच्या निकटवर्तीयांनी (यात दुरान्वयानं क्वात्रोचींनाही लेखक ‘निकटवर्तीय’च मानतो) नेत्याला पद मिळाल्यावर कसकसा लाभ घेतला आहे आणि याबाबत आपणा भारतीयांची ‘सहनशक्ती’ कशी वाढत गेली आहे, याची उदाहरणं मांडतो. मल्यांपासून ‘जीएमआर’पर्यंत सर्वानीच नागरी हवाई वाहतूक क्षेत्राच्या खुलेकरणात रस दाखवताना नियमच आपल्या बाजूनं कसे वाकवून घेतले, याचीही माहिती अन्य एका प्रकरणात आहेच. ‘कुडमुडी भांडवलशाही’ म्हणजे काय, हे या पुस्तकातल्या ‘प्रायव्हेट सेक्टर’बद्दलच्या चार प्रकरणांतून समजतं.
त्याहीपेक्षा अस्वस्थ करणारी आहेत, ती या पुस्तकाची अगदी पहिली दोन प्रकरणं आणि त्याही आधीचा, बिहारच्या हृदयचाक या वीज, संडास, रस्ते.. कशाचीच सोय नसलेल्या खेडय़ाची स्थिती सांगणारा उपोद्घात. ‘आप्पण कामं करून देतो लोकांची’ अशी शेखी मिरवणारा एक दलाल, नेत्याच्या हुकमाचा ताबेदार असलेला – पण पुढे बेनामी पैशावर डिस्टिलरीचा मालक बनलेला- एक टायपिस्ट यांबद्दलची ही दोन प्रकरणं आहेत. ती पुस्तकाच्या सुरुवातीची असल्यानं, या दोघांना लेखक ‘खलनायक’ म्हणून रंगवत नाही, हेही चटकन लक्षात येतं. भ्रष्टाचाराच्या रोगाचे अगदी प्राथमिक पातळ्यांवरचे वाहक ठरलेल्या या दोघांसारखी आणखी लाखो माणसं आपल्या देशात आहेत, हे वाचकालाही माहीतच असतं. ती माणसं कशी ‘पुढे जातात’, त्यांना आपण जे काही करत आहोत, त्यात काही चूक आहे हे लक्षातच कसं काय येत नाही, याचं अगदी सूक्ष्म दर्शन लेखक घडवतो. नेमका हाच साकल्यानं पाहणारा दृष्टिकोन पुस्तकभर आहे, त्यामुळेच आपल्या प्रजासत्ताकाच्या वाटचालीबद्दलची आपली जाण वाढवणारं हे पुस्तक आहे.
- ‘अ फीस्ट ऑफ व्हल्चर्स – द हिडन बिझनेस ऑफ डेमोक्रसी इन इंडिया’
- लेखक : जोसी जोसेफ
- प्रकाशक : हार्पर कॉलिन्स
- पृष्ठे : २३२, किंमत : ५९९ रु.