शाहू पाटोळे
आत्मकथन असले, तरी स्वत:च्या नागा असण्याचे भान सुटू न देता ते लिहिले असल्याने या पुस्तकातून नागा जमातीच्या इतिहास, परंपरा आणि संस्कृतीचे धागे उलगडून दाखविले आहेतच, तसेच वर्तमान वास्तवही परखडपणे अधोरेखित केले आहे..
साखरझोपेत गोड स्वप्न पाहत असलेला पाच वर्षांचा निरागस मुलगा कोलाहलाने झोपेतून खडबडून जागा होतो. डोळे उघडून बघतो, तर स्वत:चे घर आणि गाव ज्वालांनी वेढलेले दिसते. घाइघाईत, जिवाच्या आकांताने सगळा गाव वाट फुटेल तिकडे जंगलात आश्रयाला जातो. त्यात आई-वडील, मोठी भावंडे आणि अन्य नातेवाईकांसह हा मुलगाही जातो आणि या एका आघाताने काही क्षणांत पाच वर्षांच्या व्हीसेएरचे रूपांतर प्रौढ व्यक्तीत होते. त्याचे बालपण गावाला लावलेल्या आगीत कायमचे खाक होते. ‘अ नागा ओडिसी : माय लाँग वे होम’ हे नागा लेखक व्हिसेएर मेयासेत्सू सान्य यांचे आत्मकथन वाचायला सुरुवात केल्याबरोबर हा प्रसंग अंगावर येतो आणि मग पुस्तक वाचून होईपर्यंत हा प्रसंग वाचकांची पाठ सोडत नाही.
नागालँडमधील निसर्गसंपन्न ‘खोनोमा’ हे लेखकाचे गाव. इतर नागा जमातींच्या गावांप्रमाणे डोंगरांच्या उंच कडय़ांवर वसलेल्या या गावात फक्त अंगामी नागांची तीन कुळे राहतात. १८३० साली ब्रिटिशांची इकडे वर्दळ वाढली. त्यातून स्थानिक नागा आणि ब्रिटिशांचे झगडे सुरू झाले. कोहिमानंतर ब्रिटिशांना विरोध करणारे गाव म्हणजे खोनोमा. १८७९ साली ब्रिटिश आणि नागांची लढाई इथेच झाली. त्या लढाईत लेखकाचे आई आणि वडिलांकडचे आजोबा इंग्रजांच्या विरोधात लढले होते. एका आजोबांनी तीन शत्रुसैनिकांची शिरे कापून आणली होती. त्या युद्धानंतर खोनोमाला ब्रिटिशांनी आग लावली होती, अन्नधान्याची कोठारे जाळली होती. तेव्हाही गावकऱ्यांनी जंगलात आश्रय घेतला होता आणि १९५६ साली स्वतंत्र भारतात त्याच घटनेची पुनरावृत्ती घडली होती. आणखी एक योगायोग म्हणजे स्वतंत्र नागालँडचे पुरस्कर्ते ए. झेड. फिजो यांचे गावही हेच!
आपल्याच गावाच्या मालकीच्या झुकू खोऱ्यातील जंगलात दोन वर्षे निर्वासितांचे खडतर जीवनानुभव घेऊन लेखकाचे कुटुंब गावात परतते. वडिलांकडे गावातील चारांपैकी एक ‘कामबुरा/गावबुरा’ (महाराष्ट्रातील पोलीसपाटील आणि कोतवाल यांचे संयुक्त अधिकार असलेला, सरकार आणि गाव यातील मध्यस्थ) हे पद आधीपासून असते. वडील गावात किराणा दुकान सुरू करतात. लेखक अमेरिकी मिशनऱ्यांतर्फे चालविल्या जाणाऱ्या शाळेत जातो तेव्हा तो नागा संस्कृती-परंपरा आणि ख्रिस्ती धर्माच्या परंपरांमुळे गोंधळून जातो. ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या आणि न स्वीकारलेल्या कुटुंबांतील बदल लेखकाने छान टिपले आहेत. लेखकाच्या कुटुंबीयांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला नसल्याने- एकाच गावातील, एकाच कुळातील सांस्कृतिक, पारंपरिक बदल पाहून लेखकाचा विवेक ‘सांस्कृतिक आक्रमणा’च्या दृष्टिकोनाकडे झुकतो. नागा संस्कृती आणि परंपरांमध्ये स्वत:चे ‘अध्यात्म’ असल्याचे लेखकाचे मत पुढे विकास पावत जाते. अमेरिकी मिशनऱ्यांनी नागांच्या अनेक सांस्कृतिक परंपरा, उत्सव, सण, वेशभूषा, ‘मोरुंग’सारखी सामाजिक पद्धत, खाद्यसंस्कृती या धर्मबाह्य़ अथवा असंस्कृत ठरविल्या होत्या. त्यामुळे लेखकाचा याकडे बघण्याचा स्वतंत्र दृष्टिकोन दृढ होत गेल्याचे दिसते. व्हिसेएर नागा जमातींना ‘आदिवासी’ मानत नाहीत, तेव्हा पारंपरिक भारतीय वाचक गोंधळून जाऊ शकतो. व्हिसेएर अशी मांडणी करतात की, ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनी, नागा जमातींचा अभ्यास करणाऱ्या संशोधक-लेखकांनी आणि धर्मप्रसारकांनी त्यांच्या दृष्टिकोनातून नागांना ‘असंस्कृत’ ठरवून टाकले. त्यामुळे ‘मिशन ऑफ सिव्हिलायझेशन’ मोहीम हाती घेण्यात आली. त्यामुळे बाह्य़ जगाला नागा म्हणजे कोणतीही संस्कृती नसलेले मानवी समूह वाटले. नागांचा स्वतंत्र धर्म, देवता, परंपरा, संस्कृती, अध्यात्म, विवाहपद्धती, जन्म-मृत्यूचे विधी, सुफलन विधी, मातृभाषा, सण, खाद्यसंस्कृती, वेशभूषा, इतिहास वगैरे सर्व काही आहे. लेखकाचा नागांच्या भाषांना मातृभाषा म्हणण्याऐवजी ‘बोली’भाषा म्हणण्याला आक्षेप आहे. महत्त्वाचे म्हणजे, नागांच्या प्रदेशातील प्रत्येक गाव हे ‘सार्वभौम’ होते. ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या कुटुंबांवर आदिम परंपरा न पाळण्याची सक्ती होऊ लागली होती. शतकानुशतकांच्या ‘मोरुंग’सारख्या व्यवस्थेवर बंधने लादली गेली. म्यानमारमधल्या नागा गावांमधील विविध संदेशांसाठी वापरले जाणारे, नागांच्या संस्कृतीचे अविभाज्य भाग असलेले भव्य लाकडी ‘ढोल’ स्थानिक सुवार्ताकारांनी तोडायला लावले. याबद्दल व्हिसेएर अस्वस्थ होतात आणि आपल्या म्यानमारच्या मोहिमेत नवे ढोल स्थापित करायला प्रोत्साहित करतात.
लेखक गावातील शाळेतून कोहिमामधील शाळेत दाखल होतो. तिथे त्याला आपल्या मातृभाषेशिवाय अन्य भाषांचा परिचय होतो. तो अस्खलित इंग्रजीला सरावतो. लेखकाची ‘सैनिक शाळे’साठी निवड होते आणि वीस किलोमीटरचा परीघ न सोडलेला हा मुलगा ओडिसात भुवनेश्वरच्या सैनिक शाळेत दाखल होतो. तत्पूर्वी, खोनोमामध्ये ‘व्हिसेएरने भारतीय सैनिक शाळेत जावे की न जावे’ यावर बरीच चर्चा होते. त्यामागची कारणे तशी गंभीर होती. त्यातील प्रमुख म्हणजे, खोनोमा गाव भारतीय सैनिकांनी जाळले होते. कामबुरा असलेल्या लेखकाच्या वडिलांना कित्येक वेळा लष्करी अधिकाऱ्यांनी मारहाण केली होती. एक भाऊ लष्कराच्या तुरुंगात होता, तर दोन भाऊ ‘नागा आर्मी’त भरती होऊन भारताविरुद्ध लढत होते. हे झालं घरातलं. गावातलं आणि भवतालचं वातावरणही यापेक्षा वेगळं नव्हतं. नागांच्या परंपरेनुसार चर्चा होऊन सैनिक शाळेत जाण्याचे ठरते. एक काका चर्चेदरम्यान म्हणतात, ‘‘तो तिकडे प्रशिक्षण घेऊन येईल आणि इकडे आल्यावर त्याची नागा आर्मीत मोठय़ा पदावर निवड होईल!’’
छोटय़ा गावातून, राज्यातून आलेल्या व्हिसेएरला सैनिक शाळेत अनेक क्षेत्रांत संधी मिळत जातात. पूर्वोत्तर राज्यांमधील जाती आणि वर्णविरहित समाजातून आलेल्या लेखकाला आणि त्याच्यासारख्याच इतर विद्यार्थ्यांना सैनिक शाळेत ‘हरिजन’ या शब्दाची ‘ओळख’ होते. अस्पृश्यता म्हणजे काय असते, हे त्यांना प्रत्यक्षात पाहायला मिळते. सैनिक शाळेतील व्हिसेएर आणि इतर नागा विद्यार्थ्यांना ‘तिकडच्या’ कारवायांचा ‘फटका’ भुवनेश्वरमध्ये बसतो. परिणामी, सैनिक शाळेतील शिक्षण अर्ध्यावर सोडून त्यांना खोनोमाला परतावे लागते.
व्हिसेएर मधल्या काळात एसएससी पास होतो आणि दार्जिलिंगच्या महाविद्यालयात प्रवेश घेतो. याच काळात १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धास तोंड फुटते. लाखो बांगला निर्वासितांनी भारतात आश्रय घेतलेला असतो. त्या छावण्यांमध्ये अतिसाराची साथ पसरते. नक्षलवाद्यांनी उत्तरपत्रिका जाळल्याने लेखक अनुत्तीर्ण झालेला असतो. त्याला प्राचार्य-फादर शंभर रुपये पगारावर निर्वासितांच्या छावण्यांमध्ये स्वयंसेवक म्हणून पाठवतात. तिथे स्वयंपाक करणे, मुलांना शिकविणे आणि मृतदेहांची विल्हेवाट लावण्याची कामे तो करतो. सहा महिन्यांनी शिक्षणासाठी परतल्यावर पाचगणीच्या एका शिबिरात राजमोहन गांधींशी त्याची भेट होते. शिक्षण सोडून व्हिसेएर ‘साँग ऑफ एशिया’ या गटात सामील होतो आणि जगभरात फिरतो. आणीबाणीत त्याचे पारपत्र रद्द होते. पुढे तो शिलाँगमध्ये इतिहासात एम.ए., पीएच.डी. करतो आणि नागालँड विद्यापीठात प्राध्यापक होतो. मिझो मुलीशी प्रेमविवाह करतो, तीन मुले होतात. नागालँडमधील स्फोटक परिस्थितीत तो रजा घेऊन पीएच.डी. करण्यासाठी कुटुंबीयांसह ऑस्ट्रेलियात मेलबर्नला जातो. निर्वासित होतो. त्यांना ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व मिळते. तिथेही त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्वासितांसाठी काम करण्याची संधी मिळते.
व्हिसेएर यांचे आत्मकथन निव्वळ वरील कथानकासाठी वाचायला घेणाऱ्यांची निराशा होईल. कारण या पुस्तकात लेखकाचे ‘नागा असण्या’चे भान कुठेच सुटत नाही. यात व्हिसेएर स्वत:बद्दल सांगत असताना नागांचा इतिहास, परंपरा, संस्कृती-सांस्कृतिक मूल्ये, अध्यात्म, भाषा, सामाजिक बदल, धर्मातराचा आणि भारतीय राजकारणाचा नागांच्या वैयक्तिक – कौटुंबिक – सामाजिक – राजकीय – भाषिक जीवनावर झालेले परिणाम यांविषयीही सांगतो. तिथली तरुण पिढी अमली पदार्थाच्या आहारी गेली, एड्ससारख्या रोगाची शिकार झाली किंवा राजकीय विचारसरणीमागे अविवेकी होऊन भरकटत गेली, हे वास्तव लेखकाने मांडले आहेच; परंतु तरुणांच्या या फरफटीमागच्या नेमक्या कारणांचा मागोवाही तो घेतो. ज्यांना भारताच्या पूर्वोत्तर राज्यांमधील जनांच्या मानसिकतेचा परिचय करून घेण्याची ‘उत्सुकता’ असेल, अशांनी हे आत्मकथन जरूर वाचावे. म्हणजे आपण त्यांच्याशी कसे वागावे हे जसे कळेल, तसेच ते ‘तसे’ का वागतात याचा उलगडाही होईल. शिवाय महात्मा गांधीजींच्या खुनानंतर नागांना ‘सच्चा मित्र गमावल्याचे’ दु:ख का झाले होते, हे समजेल. हे पुस्तक तरुण नागा पिढीला त्यांची ‘नेमकी’ ओळख करून देणारे असल्याने त्यांच्यासाठी अधिकच महत्त्वाचे आहे.
स्वत:ला आदिवासी न म्हणवून घेणारे व्हिसेएर आता ऑस्ट्रेलियातून पुन्हा आपल्या मातृभूमीत परतलेत. त्यांची पत्नी त्यांच्या चार वर्षांच्या मुलाला कोहिमाच्या बाजारात घेऊन गेली होती. समोरच्या पायऱ्यांवरून दोन जवान हसत येत होते. त्यांना पाहून मुलाने आईला विचारले, ‘आर द इंडियन्स अलसो ह्य़ुमन?’
‘अ नागा ओडिसी : माय लाँग वे होम’
लेखक : व्हिसेएर मेयासेत्सू सान्य
सहलेखन : रिचर्ड ब्रूम
प्रकाशक : स्पीकिंग टायगर
पृष्ठे : ३१६, किंमत : ४९९ रुपये
shahupatole@gmail.com