हमीद दाभोलकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘गूढ संकल्पनांचा विज्ञानवेध’ हा ‘ए सायंटिफिक लुक : अ‍ॅट द कॉन्सेप्ट ऑफ सोल, रिबर्थ, वर्क अ‍ॅण्ड द लॉ ऑफ कर्मा’ या पुस्तकाचा परिचय करून देणारा लेख २१ मार्चच्या ‘बुकमार्क’मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्यानिमित्ताने या पुस्तकाची वैज्ञानिक चिकित्सा करणारे हे टिपण..

‘गूढ संकल्पनांचा विज्ञानवेध’ या शीर्षकाखाली (‘बुकमार्क’, २१ मार्च) अनिल विष्णू मोहरीर यांच्या ‘ए सायंटिफिक लुक : अ‍ॅट द कॉन्सेप्ट ऑफ सोल, रिबर्थ, वर्क अ‍ॅण्ड द लॉ ऑफ कर्मा’ या पुस्तकाचा परिचय वाचला. विज्ञानाच्या नावाखाली  छद्मविज्ञानाचा जोरदार प्रचार कसा केला जातो, याचे हे उदाहरण आहे. म्हणून याचा सविस्तर ऊहापोह करणे आवश्यक आहे.

पुस्तक आणि त्याच्या परीक्षणाकडे जाण्याआधी ‘छद्मविज्ञान’ म्हणजे काय, ते समजून घेऊ या. छद्मविज्ञानाचे सगळ्यात महत्त्वाचे लक्षण म्हणजे त्यामध्ये विज्ञानाची भाषा, त्यामधील शब्द आणि संकल्पना या मुक्तहस्ताने वापरलेल्या असतात; पण विज्ञानाची जी कार्यपद्धती असते, त्याला मात्र संपूर्ण तिलांजली दिलेली असते! ‘जितका पुरावा तितका विश्वास’ ही विज्ञानाची कार्यपद्धती आहे. विज्ञानाच्या कार्यपद्धतीमध्ये प्रत्येक गोष्टीची सर्वंकष चिकित्सा करणे अभिप्रेत असते. छद्मविज्ञान हे चिकित्सेचा आव आणते, पण प्रत्यक्षात चिकित्सा करणे टाळते. ‘मिडब्रेन अ‍ॅक्टिव्हेशन’ हे सध्या प्रचलित असलेले छद्मविज्ञानाचे उत्तम उदाहरण आहे. यामध्ये असा दावा केला जातो की, ‘ठरावीक पद्धतीचे संगीत ऐकल्याने मेंदूतील ‘मिडब्रेन’ नावाचा भाग जोराने कार्यान्वित होतो आणि त्यामुळे लहान मुले डोळ्यांवर पट्टी बांधून वाचणे किंवा वस्तू ओळखणे अशा गोष्टी करू शकतात.’ आता मिडब्रेन हे विज्ञानातील परिभाषेत वापरले जाणारे नाव आहे.  मेंदूमधील एखादा भाग कार्यान्वित होऊन काही क्रिया घडणे या संकल्पनेलासुद्धा वैज्ञानिक आधार आहे. त्यामुळे ढोबळमानाने विचार करणारे भले भले लोक याला बळी पडतात. आपण  थोडा चिकित्सक विचार आणि अभ्यास केला, तर आपल्या लक्षात येते की, मेंदूविज्ञानानुसार मिडब्रेन या मेंदूच्या भागाचा दिसण्याच्या क्रियेशी काहीही संबंध नाही! दुसरी गोष्ट म्हणजे, डोळ्यांवर पडणारा प्रकाश पूर्ण थांबवला, तर कोणतीही गोष्ट दिसणे अशक्य आहे! अगदी प्राथमिक पातळीवरील चिकित्सेलादेखील हा दावा टिकत नाही; पण विज्ञानाची भाषा वापरली असल्याने भले भले सुशिक्षित लोकदेखील या दाव्याला बळी पडतात.

याच पद्धतीने अनिल मोहरीर यांचे पुस्तक आणि त्याचे ज्योती आफळे यांनी केलेले परीक्षण विज्ञानाची परिभाषा वापरते. विज्ञानाची चिकित्सक पद्धती वापरल्याचा आव आणते; पण प्रत्यक्षात सर्वंकष चिकित्सा टाळते. कसे ते बघू या..

‘आत्मा’ या संकल्पनेचा वैज्ञानिक अभ्यास करून आपण काही निष्कर्ष काढले आहेत, असा या पुस्तकाचा दावा आहे. ‘आत्मा’ या संकल्पनेची वैज्ञानिक चिकित्सा होण्याची गरज असल्याचे लेखक नमूद करतात. आत्मा ही मुळातच अत्यंत विवाद्य संकल्पना आहे, जीस कोणताही वैज्ञानिक आधार नाही. शरीरविज्ञान (अ‍ॅनाटॉमी) आणि शरीर कसे काम करते याचे विज्ञान (फिजिऑलॉजी) या अत्यंत प्रगत ज्ञानशाखा असून त्यांच्या सध्याच्या आकलनात आत्मा या संकल्पनेला कोणतेही स्थान नाही. अशा संकल्पनेची चिकित्सा करायची असेल तर सुरुवात ही आत्मा या संकल्पनेच्याच चिकित्सेपासून करायला पाहिजे. अशी कोणतीही चिकित्सा सदर पुस्तक करीत नाही. लेखक ज्या गोष्टीची चिकित्सा करतात, ती बाब आत्म्याचे स्वरूप काय, हा प्रश्न आहे.

यामध्ये लेखक असे म्हणतात की, त्यांनी स्वत: केलेल्या चिकित्सेप्रमाणे ‘आत्म्याचे स्वरूप हे मानवी शरीराचा एक भाग आहे, हा प्रचलित सिद्धांत चुकीचा आहे’! लेखकाच्या मते, ‘आत्म्याचे स्वरूप हे एका आयन चॅनेलप्रमाणे आहे.’ पुस्तकात हे प्रतिपादन परत परत येत राहते. यामध्ये ‘आत्मा’ नावाची गोष्ट अस्तित्वात आहे, हे गृहीतक धरले जाते, ते मुळात अवैज्ञानिक आहे! आत्मा हा आयन चॅनेलच्या स्वरूपात असतो, एवढे प्रतिपादन करून लेखक थांबत नाहीत, तर पुढे जाऊन ते असाही दावा करतात की- ‘वैश्विक चतन्याशी हा आत्मा जोडलेला असतो’! या सर्व विधानांना जास्तीत जास्त स्वैर कल्पना म्हणता येऊ शकेल. अशा संकल्पना कोणीही मांडू शकतो, पण त्यांना वैज्ञानिक आधार आहे, असा दावा करण्यासाठी त्याविषयीचे प्रयोग करणे अपेक्षित असते. त्या प्रयोगांची सर्वव्यापी चिकित्सा होणे आवश्यक असते. सध्या उपलब्ध वैज्ञानिक ज्ञानाच्या चौकटीत या संकल्पना कशा बसतात, याची पडताळणी करणे आवश्यक असते. विज्ञानाची ही पद्धती आहे. यापैकी कोणतीही गोष्ट न करता केवळ, ‘शरीरातील सर्व पेशींचा मृत्यू एकाच वेळी न होता काही तासांच्या कालावधीमध्ये होतो’ या वैज्ञानिक सत्याचा वापर करून लेखक एक आणखी स्वैर संकल्पना मांडतात. ती अशी की, ‘मानवी शरीरातील पेशी एकाच वेळी मृत्यू पावत नाहीत, म्हणजे त्या टप्प्याटप्प्याने वैश्विक चतन्याशी जोडल्या जात असतात.’ या गोष्टीला आपण जास्तीत जास्त चांगला कल्पनाविलास म्हणू शकतो! कारण त्याला विज्ञानाच्या पद्धतीचा जराही स्पर्श नाही.

शास्त्रीय सत्य हे आहे की, मानवाचा मृत्यू होत असताना त्याच्या शरीरातील पेशींचे टप्प्याटप्प्याने विघटन होते. पेशींची रचनाच विघटित झाली कीत्याचे कार्यदेखील आपोआप थांबते. ज्या घटकांपासून ती मानवी पेशी तयार झालेली असते, त्या घटकांमध्ये ती विघटित होते. याच्यापुढे ती व्यक्ती म्हणून काहीही अस्तित्वात राहत नाही. हे पचवायला कितीही अवघड वाटत असले, तरी हेच आजच्या उपलब्ध ज्ञानानुसार वैज्ञानिक सत्य आहे. आपले व्यक्तिमत्त्व म्हणून ज्या स्मृतींवर आपण अवलंबून असतो, त्या स्मृती या मेंदूच्या विशिष्ट भागात  मर्यादित असतात. मेंदूच्या विशिष्ट प्रकारच्या अपघातात किंवा आजारात या स्मृती नष्ट होतात. जेव्हा पेशीची रचना संपते, तेव्हा तिचे कार्य संपते. ती कोठेही जात नाही किंवा तसेच्या तसे विज्ञानाला तयारही करता येत नाही. या पार्श्वभूमीवर लेखक आत्म्याचे अस्तित्व, त्याचे स्वरूप याविषयी जे मांडतो, ते सर्व विज्ञानापासून खूप दूर असलेला कल्पनाविलास मात्र आहे.

लेखक केवळ या कल्पनाविलासावर थांबत नाहीत. तर या प्रकारे आत्म्याचे अस्तित्व आपण सिद्ध केले आहे, अशा आवेशात ते पुढे ‘पुनर्जन्मा’विषयी लिहितात. पुनर्जन्म ही कल्पनादेखील विज्ञानाच्या कुठल्याही कसोटीवर न टिकलेली आहे. मात्र, जणू काही एक वैश्विक सिद्ध झालेली गोष्ट आहे अशा पद्धतीने लेखक त्याविषयी मांडणी करतात. जसे लेखक आत्मा या संकल्पनेची मूलभूत  चिकित्सा करीत नाहीत, तशीच ते पुनर्जन्म या संकल्पनेचीही थोडीसुद्धा चिकित्सा करीत नाहीत. पुनर्जन्माचे दावे सविस्तर खोडून काढणारी भरपूर ग्रंथसंपदा आता उपलब्ध आहे. पुनर्जन्माचे दावे करणारे लोक सातत्याने पुढे येत असले, तरी त्याची शास्त्रीय चिकित्सा आपल्याला एवढेच सांगते की, पुनर्जन्म ही केवळ एक कल्पना आहे- जीस कोणताही वैज्ञानिक आधार नाही!

लेखक मात्र आपण आत्म्याचे अस्तित्व वैज्ञानिकदृष्टय़ा सिद्ध केले आहे, अशा थाटात त्याच गृहीतकावर पुनर्जन्माचा आणखी एक काल्पनिक मजला बांधतात! ‘आयन चॅनेलच्या माध्यमातून शरीरातून निघून वैश्विक चतन्याशी एकरूप झालेला आत्मा हा विविध मनुष्य आणि प्राणी योनीच्या मधून जाऊन पुनर्जन्म घेतो’ असे प्रतिपादन लेखक करतात. फरक एवढाच की, हुशारीने लेखक त्याला ‘गुणांचा पुनर्जन्म’ असे नाव देतात. नाव कितीही गोंडस असले, तरी मूळ संकल्पनेत काहीही फरक नाही हे आपण समजून घेतले पाहिजे.

तसेच हे सिद्ध करण्यासाठी कोणते प्रयोग, कोणती निरीक्षणे, कसे अनुमान काढले, त्याची कोणी चिकित्सा केली, असे काहीही न मांडता लेखक एकापेक्षा एक मोठे निष्कर्ष आपल्यावर थोपवत जातात. हे विज्ञानाच्या नाही, तर विज्ञानाच्या नावावरील काळ्या बाजाराचे लक्षण आहे. एकदा आत्मा आणि पुनर्जन्म मानायचे ठरवले, की त्या अनुषंगाने जसे कर्म तसे फळ, जन्मोजन्मींच्या पाप-पुण्याचा हिशोब हे सर्व ओघाने येतेच. एका ठिकाणी तर – ‘विष्णू हा वैश्विक चतन्याचा मूळ स्रोत असून कृष्ण आणि बुद्ध हे त्याच्यापासून निर्माण झालेले स्रोत आहेत,’ असेदेखील मांडण्यास लेखक पुढे-मागे पाहत नाहीत!

संपूर्ण पुस्तकात ‘डीएनए मिथिलायझेशन’, ‘ग्रॅव्हिटी’, ‘क्वॉण्टम मेकॅनिक्स’ असे विज्ञानाशी संबंधित शब्द आणि संकल्पना मधूनमधून येत राहतात. गमतीचा भाग म्हणजे, छद्मविज्ञानाचा  कठोर टीकाकार असलेल्या रिचर्ड डॉकिन्सचीदेखील एका ठिकाणी लेखकाने साक्ष काढलेली आहे! आइनस्टाइनपासून ते अनेक शास्त्रज्ञांचे मूळ गाभ्याशी संबंध नसलेले उतारे पुस्तकात अनेक ठिकाणी सापडतात. यामधून हे विज्ञानवादी लेखन असल्याचा उत्तम आभास निर्माण होतो.

मूळ लेखनात आढळणारी सर्व चुकीची गृहीतके परीक्षणालादेखील तंतोतंत लागू होतात. सत्याचा सहज अपलाप होऊ शकणाऱ्या ‘सत्योत्तर’ जगात आपण सध्या जगतो आहोत. अशा पार्श्वभूमीवर विज्ञान आणि छद्मविज्ञान यांमधील सीमारेषा अधिकच पुसट होत आहेत. त्यामुळे विज्ञानाचा दावा करणाऱ्या अशा अशास्त्रीय गोष्टींची कठोर चिकित्सा करणे हे महत्त्वाचे कर्तव्य आहे. असे यानिमित्ताने नमूद करावेसे वाटते.

hamid.dabholkar@gmail.com

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A scientific look about the concept of soul rebirth work and the law of karma book review abn