लेखक हारुकी मुराकामी आणि संगीत वाद्यमेळांचे ‘कंडक्टर’ म्हणून पाश्चात्त्य जगात अधिक परिचित असलेले शेइजी ओझावा हे दोघे, जगभर गाजलेले जपानी. त्या दोघांच्या फक्त संगीतविषयक गप्पांचं हे पुस्तक आपण का वाचायचं? ज्यांना वेस्टर्न क्लासिकल संगीत जराही आवडत नाही किंवा ज्यांनी ते ऐकण्याचा कंटाळाच आजवर केला, त्यांच्यासाठी हे पुस्तक बऱ्यापैकी दिशादर्शक ठरेल.. पण त्याहीपेक्षा,  एकंदर संगीताचा विचार कसा खोलवर केला जाऊ शकतो, हे या पुस्तकातून उमगतं..

संगीतावरील किंवा संगीतकारांवरील पुस्तकांचे वकुबानुरूप मौलिकपण मान्य जरी केले, तरी त्याला भावुकतेचा मुलामा गुंडाळण्याचा शाप लागलेला असतो. या शापाशी कुणाहीपेक्षा अधिक आपण सर्वात परिचित आहोत. आपल्याकडे भावुकतेच्या पवित्र्यातून आजवर संगीतावर आणि संगीतकर्त्यांवर लिहिले वा बोलले जाते. परिणामी ‘दैवी सूर’, ‘अवीट गीते’, ‘अजरामर शब्द’ आणि ‘अद्भुत सुरावटी’, शास्त्रीय संगीत असेल तर ‘स्वरांचा ताजमहाल’ आदी विशेषणांपलीकडे संगीताबद्दल लिहिणाऱ्यांची मजल जात नाही. त्यांच्याकडून झिरपत मग सर्वसामान्यांची संगीत आकलनस्थिती कणभर हळकुंडात भागवून घेते. आपल्याकडे ‘दर्दी रसिक’ संगीतबुद्धीच्या स्वपातळीला विस्तारण्याऐवजी किंवा आपण ऐकत असलेल्या सूरसंचिताचे सूक्ष्मलक्ष्यी आकलन करून घेण्याऐवजी आपापल्या संगीतदैवताच्या एकसुरी दुरभिमानात आयुष्यभर बुडून जातात. यात खरे नुकसान कुणाचे हे ज्याचे-त्याचे कानसेनपण जाणो. पण संगीताकलनाच्या पातळीवर आपल्या देशातील ग्रंथसंपदा (अशोक दा. रानडे, केशवराव भोळे यांच्यासारखे अपवाद वगळता) समृद्ध नाही. संगीत दैवताभोवतीच्या सुरस दंतकथा, चमत्कार आणि मोठेपणाच्या बाता यापलीकडे संगीतचर्चेची उपस्थिती अंमळमात्र दिसून येते. संगीत शरीरात मुरल्याचा छातीठोक दावा करणाऱ्या संगीतोल्हासी खुशाल जीवांना हा मुद्दा झोंबेल किंवा खटकेल. पण तरीही वरील वस्तुस्थिती अमान्य करणाऱ्यांपुढे हारुकी मुराकामी या लेखकाचे ‘अ‍ॅब्सोल्युटली ऑन म्युझिक’ हे संगीतपुस्तक स्वआकलनाच्या मर्यादा मान्य करण्यास चांगला पर्याय ठरेल.

Supriya sule on sunil tingre
Supriya Sule : “पोर्शेप्रकरणी शरद पवारांनी माफी मागावी”, सुप्रिया सुळेंनी ‘ती’ नोटीसच दाखवली, म्हणाल्या…
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Tharala Tar Mag New Promo
ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो
ghanshyam aka chota pudhari meets nikki arbaz
Video : निक्कीला भेटण्यासाठी मुंबईत आला घन:श्याम! अरबाजला चुकून ‘या’ नावाने मारली हाक अन्…; पुढे काय घडलं?
we the documentary maker Dheeraj akolkar
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: आनंददायी दृश्य-व्यायाम

हारुकी मुराकामी हा जपानी लेखक लेखनपल्ल्याबाबत त्याच्या कट्टर वाचकांसाठीही कोडे आहे. जपानी भाषेतून विद्युतवेगाने त्याचे साहित्य इंग्रजीत दाखल होते. जागतिक सेलेब्रिटीपद भूषविणाऱ्या या माणसाने आत्मचरित्राच्या फंदात न पडता आपल्या धावण्याचेच बऱ्यापैकी मोठे चरित्र लिहिले. गंमत म्हणजे त्याच्या कादंबऱ्या आणि कथासंग्रह सगळेच्या सगळे वाचलेल्यांना या ‘धावचरित्रा’त बरेच साहित्यिक आणि वैयक्तिक संदर्भऐवज सापडतात. एका मासिकाच्या कार्यालयातील फेरफटक्यात अडगळीतील अनाहूत पत्र वाचून टोकियो विषारी वायू-हल्ल्यातील पीडितांच्या मुलाखती घेण्यास तो सज्ज झाला. यातून पत्रकारितेच्या किंवा अकथनात्मक साहित्याच्या नियमांना बगल देऊन ‘अण्डरग्राऊंड’ नावाचा रिपोर्ताजवजा ग्रंथ साकार झाला. या पुस्तकामुळे त्याला निव्वळ कथालेखक म्हणावे का, हा प्रश्न निर्माण झाला. त्याची दर एक-दोन वर्षांआड कादंबरी, त्यादरम्यान लांबलचक कथा आणि प्रत्येक घटकात अभिजात साहित्य, मांजर  आणि अभिजात पाश्चात्त्य संगीताचा- वेस्टर्न क्लासिकल म्युझिकचा- अंतर्भाव अढळ आहे. १९७९ साली अपघाती लिहिलेल्या कादंबरीपासून ते आजवर त्याच्या साऱ्या प्रकाशित साहित्यात या घटकांची न चुकता पुनरावृत्ती असली, तरी त्याचा वाचकवर्ग गोठण्याची किंवा आटण्याची चिन्हे नाहीत. उलट नव्याने मुराकामीमय होण्याचे, फडताळांत त्याची पुस्तके हारीने राखणाऱ्यांचे आणि त्याच्या लिखाणाचे चिंतन-रवंथ करणाऱ्यांचे प्रमाण जगभरात सारख्याच प्रमाणात वाढत आहे.

मुराकामीचे ‘अ‍ॅब्सोल्युटली ऑन म्युझिक’ हे शेइजी ओझावा या संगीततज्ज्ञाशी दीर्घकालात केलेल्या चर्चाचे, झालेल्या गप्पांचे कडबोळे आहे. शेइजी ओझावा हे पाश्चिमात्य जगात नाव कमाविणारे पहिले जपानी वेस्टर्न क्लासिकल कण्डक्टर आहेत. १९६० च्या दशकापासून जगभरातील नामांकित ऑर्केस्ट्रा आणि अव्वल संगीतकारांसोबत काम करताना अभिजात सांगीतिक उत्कर्ष आणि अपकर्षांशी परिचित असलेल्या ओझावा यांच्याशी मुराकामी यांनी मारलेल्या गप्पा भाबडय़ा संगीतप्रेमींच्या नाहीत. गुणगानकीर्तीचे पूल बांधण्यात या गप्पांना स्वारस्य नाही. तर ऐकलेल्या, आवडलेल्या प्रत्येक संगीत तुकडय़ातील सौंदर्यतळाचा शोध घेण्याचा हट्टाग्रह त्यातून दिसून येतो.

लुडविग बिथोविन, योहान बाख, योहानिस ब्राह्म्स या दिग्गजांच्या रचनांना वाद्यवृंदासह सादर करणाऱ्या ग्लेन गुल्ड, आणि लिओनार्ड बर्नस्टीन या कलाकारांच्या १९६२ सालातील कन्सर्टपासून या चर्चाना सुरुवात झाली आहे. पुस्तकात गप्पा आहेत. त्यासोबत तीन ते कैक मिनिटे रेकॉर्ड्सवर त्या धून ऐकल्याच्या तपशीलवार नोंदी आहेत. या नोंदींनंतर त्या त्या संगीत तुकडय़ांचे सौंदर्यविच्छेदन आहे. आता हे करताना निव्वळ ऐकू येणाऱ्या संगीताची विशुद्ध भलामण नाही. त्या भागातील वादनाचा वेग, त्यात तालांची चूक असूनही वाजविणाऱ्याची कला त्या तुकडय़ाला कसे तारून नेते हे पाहण्याची सखोल कानजाणीव दिसू लागते. मग पुस्तक केवळ संगीतापुरते उरत नाही, तर कोणत्याही गोष्टीला अंतस्थ जाणून घेण्याच्या कुतूहलाचे समग्र दर्शन घडविण्यासाठी सज्ज होते. येथे मुलाखतकार आणि मुलाखत देणाऱ्या व्यक्तीशी जुळलेले शब्दसूर स्पष्ट व्हायला लागतात. मग जर्मन-युरोपियन आणि कॅनेडियन- अमेरिकी संगीतकार यांच्यातील व्यक्त होण्याचा फरक, जर्मन-युरोपीय संगीतकारांनी रिचविलेला आणि त्यातून बाहेर आणलेला शास्त्रीय संगीताचा दाखला सांगितला जातो. ऑर्केस्ट्रा ‘कण्डक्टर’, ‘कंपोझर’ आणि ‘परफॉर्मर’ यांच्यातील संमीलनाचे महत्त्व विशद केले जाते. आशियाई व पाश्चिमात्य संगीतामधील साधम्र्य-वैधम्र्य यांच्याविषयी अघळ-पघळ गप्पा रंगू लागतात.

या सर्वात दिसतो, तो मुराकामीमधला समंजस संगीतप्रेमी लेखक. एके ठिकाणी मुराकामी म्हणतो की, ‘‘एखाद्या कण्डक्टरसाठी ऑर्केस्ट्रा जितका महत्त्वाचा, तितकाच एखाद्या कादंबरीलेखकासाठी शैली किंवा लेखनाचा घाट महत्त्वाचा असतो. लेखक घोटवून घोटवून जशी शैली आत्मसात करतो, तसेच म्युझिक कण्डक्टर आपल्या रचना घडविण्यासाठी मेहनत घेतो.’’ यात एक प्रकरण रेकॉर्ड्सच्या संग्रहाबद्दल आहे. मुराकामीच्या जवळजवळ प्रत्येक कादंबरीत रेकॉर्ड्सवर संगीत ऐकणारी पात्रे येतात. या पुस्तकात ओझावा हे मुराकामीच्या संगीतज्ञानाबद्दल आणि त्याच्या रेकॉर्ड्स ताफ्याबद्दल ऐकताना चकित होतात. एका ठिकाणी ओझावा यांना जराही माहिती नसलेल्या कलाकारांबद्दल मुराकामी रेकॉर्डसह दाखल होतात. तरीही ओझावा यांना बोलते करण्यासाठी त्यांच्यावर या कानसेनी वृत्तीचे दडपण आणत नाहीत. उलट नम्रपणे, कैक वर्ष संगीत ऐकल्यानंतर त्याबद्दल आत्ता थोडेसे ज्ञान होत असल्याचे कबूल करतात.

वेस्टर्न क्लासिकल संगीताची जुजबी माहिती या पुस्तकाच्या आरंभबिंदूला पार करण्यासाठी आवश्यक आहे. ती माहिती करून घेणे आज सोपे आहे. गेल्या सहा दशकांत म्हणजे १९६० पासूनच्या वेस्टर्न क्लासिकल संगीत सादर करणाऱ्या जगभरातील कलाकारांचा आणि त्यांच्या रचनांची जंत्रावळ या पुस्तकात आहे. पुस्तकाच्या शेवटी, प्रकाशनाच्या संकेतस्थळावर पुस्तकात चर्चा झालेले सर्व संगीततुकडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. (सध्या ते भारतीयांना सहज उपलब्ध नसले, तरी यूटय़ुबवरही सापडतात.) पुस्तक त्या पद्धतीने संगीत ऐकत कित्येक महिने वाचता येऊ शकेल. त्याआधारे अनेकांना पाश्चात्त्य संगीताचा आस्वाद कसा घ्यायचा हे ‘शिकता’सुद्धा येईल. पण मुराकामीच्या पकडून ठेवणाऱ्या अन् मुद्दा ठसविण्याच्या चक्रात या मुलाखती सहज वाचून मग त्यातील संगीत अनुभूती प्रकरणानुरूप घेणे सर्वात चांगला पर्याय आहे. पर्याय कोणताही निवडला तरी, ज्यांना वेस्टर्न क्लासिकल संगीत जराही आवडत नाही किंवा ज्यांनी ते आजवर ढुंकूनही ऐकले नाही, त्यांच्यासाठी हे पुस्तक बऱ्यापैकी दिशादर्शक ठरेल.

इथे ओझावा यांच्याकडून वेस्टर्न म्युझिकचा अर्वाचीन इतिहास विशद झाला आहे. मुराकामीने आपल्या सर्व संगीत संकल्पनांना घासून-पुसून घेत आपल्या चाहत्यांसोबत मांडले आहे. मुराकामीच्या साऱ्या पुस्तकांतील कथानकामध्ये लेखक म्हणून उतरलेल्या त्याच्या संगीतवेडाची ही अधिक ओळख आहे.

‘‘एखादे गाणे आपल्याला जसे त्यातील सुरावटींच्या एकरूपी मिश्रणाने आवडते, त्याप्रमाणे लेखनामध्येही संगीतासारखेच घटक अस्तित्वात असतात. प्रत्येक शब्दरचनेचे, वाक्याचे स्वत:चे ऱ्हिदम असते. ते बिघडले की कुठल्याही परिच्छेदातील लेखन आपल्याला पुढे वाचावेसे वाटत नाही,’’ असा दावा मुराकामी इथल्या गप्पांमध्ये करतो. ओझावा हे संगीताच्या क्षेत्रात जपानमधील मुराकामी आहेत आणि मुराकामी हे साहित्याच्या क्षेत्रात जपानमधील ओझावा आहेत, अशा समसमा संयोगाची साक्ष या संगीत गप्पांमधून सातत्याने येत राहते. पन्नास-साठ वर्षांमधील आशिया, रशिया, युरोप, अमेरिकी खंडातील नाणावलेले परफॉर्मर, कंपोझर आणि ऑर्केस्ट्रा कण्डक्टर्स यांच्या संगीत वैशिष्टय़ांसोबत घडत जाणारी ओझावा यांची संगीतशैली आणि संगीतप्रयोगांतील सखोल ज्ञानासोबत जगभरातील कानसेनांच्या प्रतिक्रियांचीही इथे माहिती मिळते. यात कौतुकासोबत थेटपणे नाकारल्याच्या, हिडीसपणे टीका झाल्याच्या प्रसंगांचीही कबुली आहे. ऑपेरा, ब्लूज, जॅझ प्रकारांविषयीच्या प्रदीर्घ गप्पा आहेत. हे सगळेच सगळ्यांसाठी रसाळ, प्रवाही अथवा मौलिक ठरतील, अशातला भाग नाही. पण संगीतावर बोलताना, लिहिताना दिग्गजांना देव्हाऱ्यात न बसविण्याची काळजी घेऊन या क्षेत्रातील सखोल ज्ञानकण वेचण्याचा इथला प्रकार सर्वाधिक भावतो. संगीतातील काही शास्त्रीय संकल्पनांचा उलगडा या पुस्तकात आपसूक होतो, तालांची आणि विरामांची महत्ताही येथे विशद करण्यात आली आहे. मुलाखतींची पारंपरिक पद्धत धाब्यावर बसवून गरजेला मुराकामीची टिपणेच सादर होतात. ऐकलेल्या संगीतातील एकूणएक धून नावानिशी आणि त्याच्या मिनिटांसह येथे ग्रथित झाली आहे. त्यामुळे ती धून इतर माध्यमांतून मिळविण्याचे वाचकाचे कष्ट कमी होऊ शकतात. यासोबत मुराकामी इतकी प्रचंड ग्रंथसंपदा प्रसवूनदेखील आपल्या लिखाणातील ऱ्हिदम कसे टिकवू शकतो, याची काही अंशी जाणकारी मिळते.

संगीत सगळेच जण ऐकतात, पण ऐकणाऱ्या प्रत्येकाला संगीतात काय शोधावे, याचा वस्तुपाठ मुराकामीने या पुस्तकातून दिला आहे. आपल्याकडे खडा मारावा, तसे संगीततज्ज्ञ सापडणाऱ्या मुरब्बी वातावरणात त्या धडय़ाचे मोल खूप आहे.

ॅब्सोल्यूटली ऑन म्यूझिक

  • लेखक : हारुकी मुराकामी व शेइजी ओझावा अनुवाद (जपानी > इंग्रजी) : जे   रुबिन
  • प्रकाशक : हर्विल सेकर (पेंग्विन)
  • पृष्ठे : ३३२, किंमत : ७९९ रु.

pankaj.bhosale@expressindia.com