विकासाबद्दल विचार करायला भाग पाडणाऱ्या नव्या चित्रकादंबरीची ही ओळख..
सारनाथ बॅनर्जी हा भारतातल्या पहिल्या चित्रकादंबरीकारांपैकी एक. ‘ग्राफिक नॉव्हेल’साठी मराठीत ‘चित्रकादंबरी’ हा शब्द आहे गेली काही र्वष वापरला जातो, हे माहीत असणाऱ्या थोडय़ा बिगरमराठी भाषकांपैकीही तो एक, हे आणखीच विशेष. किंवा त्याची असलीच बिनमहत्त्वाची वैशिष्टय़ं बरीच लांबण लावून सांगता येतील.. म्हणजे, दुबईतल्या बक्कळ रकमेच्या ‘अबराज चित्रकला पारितोषिका’साठी यंदा अखेरच्या पाच स्पर्धकांत त्याची निवड झाली होती (पण ते भलत्यालाच मिळालं), चित्रकलाजगतात मान असणारा आणि मुंबईच्या कलादालनात तीन प्रदर्शनं झालेला सारनाथ ‘मी स्वत:ला चित्रकार समजत नाही.. चित्रकादंबरीकारच समजतो’ असं अधूनमधून म्हणत असतो. त्याची बायको बानी अबिदी हिची विनोदबुद्धीही तिच्या कलाकृतींतून दिसत राहते आणि हे भारतीय-पाकिस्तानी जोडपं गेली चार र्वष बर्लिनमध्ये राहतं.. वगैरे. यातून लक्षात एवढंच येऊ शकतं की सारनाथ बॅनर्जी हे एक प्रस्थ आहे! अशा प्रस्थाला थेट लोकांच्या रोजच्या जगण्यातल्या ‘पाणी’ या विषयावर चित्रकादंबरी रचावीशी वाटली. हा विषय पाण्यापुरता मर्यादित न राहता, सध्या चर्चिल्या जाणाऱ्या अन्य वादांनाही जाऊन भिडवणं त्याला शक्य झालं, हे मात्र नोंद घेण्यासारखं आहे.
या कादंबरीतली ‘दिल्लीतील पाणीयुद्ध’, ‘लघुदृष्टीवाद’ आणि ‘ऑल क्वाएट इन विकासपुरी’ ही दुसरी-तिसरी- चौथी प्रकरणं एकमेकांत मिसळत जातात. एका गोष्टीतून दुसरी गोष्ट सांगतात, कधी विषयांतर करून पुन्हा कथानकाच्या मुख्य धारेत वाचकाला आणून सोडतात.. पहिलं प्रकरण मात्र निराळं आहे. पहिली तीन-चार पानं तर पासपोर्ट ऑफिसच्या रांगेपासून सुरू होतात आणि रांग लावावी लागल्याच्या ‘अपमाना’मुळे पोळलेले आणि रांगेत थकलेले लब्धप्रतिष्ठित ‘खासगीकरण का नाही करून टाकत या प्रक्रियेचं?’ असं म्हणत बाहेर येतात. तेवढय़ात विषय बदलून आपण तांबापूरला जातो- काळदेखील २५/३० र्वष मागे जातो. तांबापूर कॉलनीतलं शांत- सुविहित जीवन कसं होतं, हे सांगण्यात दोन-तीन पानं वेचून बदलत्या तांबापूरकडे आपण येऊ लागतो. निमित्त आहे, तांब्याला जागतिक बाजारात मागणी नसल्याचं, भाव कमी झाल्याचं. त्या वर्षी कामगारांना बोनस मिळत नाही. चिडलेले कामगार संप पुकारतात आणि व्यवस्थापन त्याला अतिकठोर प्रतिसाद देतं. मग, ज्याचं चित्र पाहून अनेक वाचकांना भारताचे पहिलेवहिले निर्गुतवणूक मंत्री अरुण शौरी यांचीच आठवण होईल, अशा चेहऱ्याचा एक माणूस म्हणतो- खासगीकरण! पाश्चात्त्य देशातून तांबापूर विकत घेण्यासाठी देकार आलेत, हे भाग्याचं मानून लगोलग पावलं उचलली जातात. ‘प्लॅटिपस’ या विदेशी कंपनीच्या ताब्यात तांबापूर जातं आणि ‘फ्रेझर अ‍ॅण्ड क्लाइव्ह’ नामक वित्त-कंपनीचा तरुण अधिकारी वरुण भल्ला हा ‘प्लॅटिपस’साठी भांडवल-उभारणी करतो. तांबापूर कॉलनी मात्र उजाड, भकास, ओसाड होते. अखेर, या वसाहतीवर अवलंबून असणाऱ्या दुय्यम कामगारांना जबरीनं इथून हाकललं जातं.
या कामगारांमध्ये असतो गिरीश. हा प्लंबर आहे. हा महत्त्वाचा, कारण इथून पुढल्या गोष्टीचा हाच नायक आहे. वरुण भल्लासुद्धा महत्त्वाचा आहेच, पण त्याचं महत्त्व नंतर उघड होणार आहे.. ते कसं, हे जरा नंतरच पाहू.
मात्र इथून पुढे, एखाद्या अव्वल कादंबरीइतकीच भरपूर पात्रं या कादंबरीत येणार आहेत. गिरीश तांबापूरहून दिल्लीला येतो. प्लंबरचंच काम करू लागतो. पण इथं ‘पाताल जल कन्सल्टन्सी’ चालवणाऱ्या रस्तोगी आणि कैलाश बिश्नोई या दुकलीशी पडते. या दोघांचं म्हणणं असं की, गडप झालेली ‘सरस्वती नदी’ दिल्लीच्याच आसपासच्या क्षेत्रात कुठं तरी जमिनीखाली आहे. खोदून तिच्यापर्यंत गेलं, की मग तिचं पाणी आपलंच! या खोदकामासाठी गिरीशची नेमणूक होते. गिरीशच्या हाती एक खोदयंत्र दिलं जातं. (खोदयंत्राचं डिझाइन सारनाथ बॅनर्जी यांनीच केलेलं असल्यामुळे, ते यंत्र र्अध पुराणातलं/ काहीसं शौर्यकथांच्या कॉमिक्समधल्या शस्त्रांसारखं आणि थोडंफार उपयुक्तही भासणारं असं आहे). गिरीश दररोज जमिनीखाली खोदत-खोदत पाण्याचा शोध घेऊ लागतो. जमिनीखालची दुनियाच त्याच्यासमोर उलगडू लागते..
.. हो दुनियाच! इथं त्याला जमिनीखाली- जणू पाताळातच- राहणारी माणसं भेटतात. यापैकी पहिला, दिल्ली पालिकेच्या पाण्याची चोरून विक्री करणारा. दुसरा, टँकरवाला. तिसरा लष्करातला माजी जवान; पण पाण्याची एकदा चोरी करताना पकडला गेल्यामुळे समाजाच्या आणि स्वत:च्याही नजरेतून पार पडून गेलेला. चौथी एक विदेशी महिला- एका मध्यम युरोपीय देशाच्या राजनैतिक अधिकाऱ्याची पत्नी- जी दिल्लीच्या भर उन्हाळय़ात स्वत:च्या बंगल्यातल्या तरण-तलावाचं प्रत्येक वेळी बदलायला लावते! हे सारे जण पाणीविषयक गुन्हेगार, म्हणून त्यांना जणू या पाताळात राहावं लागतं आहे. अर्थात, वरच्या जमिनीवरली माणसं दररोज ‘बूस्टर पंप’ लावून स्वत:साठी जादा पाणी खेचत असतात ते चालतं, हे आपल्याला लेखकानं या प्रकरणाच्या सुरुवातीलाच सांगितलं आहे. ही सारी माणसं या ना त्या प्रकारे आता, स्वत:वरला कलंक मिटवण्यासाठी ‘सरस्वती’च्या शोधात सहभागी होतात. तोवर वरती- जमिनीवर दिल्लीच्या विविध भागांत पाण्यासाठी हाणामाऱ्याच सुरू झालेल्या असतात. ही लढाई किती घनघोर झाली, याची पान-पानभर चित्रं सारनाथनं केली आहेत. प्रत्येक चित्राच्या वर एकेका इंग्रजी युद्धपटाच्या नावावर कोटी करणारी एकेक ओळ आहे.. म्हणजे ब्रिज ऑन रिव्हर यमुना, खुराणाज लिस्ट, सेव्हिंग प्रायव्हेट अरोरा, द गन्स ऑफ घंटाघर.. वगैरे. अशा वेळी रस्तोगीपर्यंत ती बातमी पोहोचते.. मिळालं! पाणी मिळालं! गिरीश आणि त्याच्या सहकाऱ्यांना ‘सरस्वती’ शोधण्यात यश मिळालं!! आता पाण्याची आबादीआबाद होणार, असं लोकांना सांगून रस्तोगी हे युद्ध मिटवतो. पण पुढे? पुढे या साऱ्या पाण्यावर आपलाच ताबा आहे, असं रस्तोगी जाहीर करतो. ‘पाताल जल’, ‘सरस्वती नदी’ आदी थोतांड रचणारा रस्तोगी हा खरा बिल्डरच असतो आणि त्याच्यासाठी हाणामाऱ्या करणारी गुंडसेना तयार झालेली असते. तो गिरीशचे पुतळे उभारतो, पण त्याला स्वत:कडे कैद करून, अगदी बेडय़ा घालून बांधून ठेवतो. आता पाणी रस्तोगीच्या कंपनीचंच. या साऱ्या प्रकरणात कोणतंही सरकार कुठेच दिसत नाही. दिसतात ते लोकच- फार तर एखादा नवा राजकीय पक्ष वगैरे- जो लोकांना लढय़ासाठी उद्युक्त करतो आहे. इथं ‘मीडिया’ची भूमिका कशी महत्त्वाची ठरते, हे नवीन सायानी नावाच्या रेडिओ उद्घोषक पात्रामार्फत सारनाथनं दाखवलं आहे. मीडियामुळे लोकांचा धीर वाढतो आणि अखेर, पाण्याचं खासगीकरण थांबून ‘जनता जल योजना’ सुरू होते!
‘दिल्लीतल्या ‘आप’च्या राजकीय निर्णयांशी या कथानकाचं साधम्र्य आहे, किंबहुना ‘आप’ची भलामण करण्यासाठीच हे लिहिलं गेलं आहे,’ असा आरोप करण्यापूर्वी जरा थांबा– खासगीकरणाचा मार्ग उलटा फिरवणारी ही कथा निव्वळ कपोलकल्पितच कशी, याचे अनेक पुरावे सारनाथ देतच राहतो- त्यातून जणू ही फॅण्टसीच ठरते. या कल्पित गोष्टीला जरा वेगळं वळण मिळतं, ते वरुण भल्ला या पात्रामुळे.
वरुण भल्ला हाही भांडवलशाहीचा पाईकच, पण तो जरा विचारबिचार करतो.त्यातच, त्याला कॉस्च्युम डिझायनिंगचा छंद! इतिहासाच्या आणि साहित्याच्या विविध कालखंडांतली पात्रं, त्यांचे पोशाख यांचा अभ्यास करणं त्याला आवडतं आणि मग हे पोशाख तो आपल्या नोकराचाकरांना घालायला लावतो. शिवाय, त्याची आवडती ‘स्कॉच’ पिता पिता त्याला पी. साईनाथ यांच्यासारखा, लोकांची बाजू घेणारा एक बुद्धिवंत अधूनमधून भेटत असतो! हे प्रा. पी. सत्यवादी विद्यमान वस्तुस्थितीबद्दलच्या बऱ्याच गोष्टी वरुण भल्लाला सांगतात.. दिल्लीलगतच्या गुडगाँवची टॉवरसंस्कृती टँकर आणि जनरेटर यांवरच तगते आहे, इथपासून ते ओरिसात २००८ साली विकासाच्या नावाखाली लोकांना उखडून काढण्याचा कसा प्रयत्न झाला इथपर्यंत. या संभाषणांतून वरुण भल्लालाही प्रश्न पडतात- खरोखर काय म्हणावं या स्थितीला? ‘शॉर्ट टर्मिझम’ नाही का हा? होय, ‘शॉर्ट टर्मिझम’- लघुदृष्टिवाद! तो ठायी ठायी दिसतो. आपल्या शिक्षणपद्धतीपासून ते नेहमीच्या ग्राहकाला गंडवून ‘गिऱ्हाईक’ करणाऱ्या फळविक्रेत्यापर्यंत, ‘कार लोन मेळे’ भरवून अर्थव्यवस्था फुगवण्यापासून ते ‘जनता माफ नही करेगी’ पद्धतीच्या छप्पन इंची भाषणांपर्यंत, ‘सातच्या आत घरात’सारख्या बंधनाला संस्कृतीच मानण्यापासून ते बेकायदा बांधकामं आणि त्यांना मिळणारी अभयं यांच्यापर्यंत.. सगळीचकडे. आपण आपलाच विचार नीट करत नाही. पण हे इतपत निरीक्षण काही एकटय़ा वरुण भल्लालाच करता येतंय असंही नाही. अनेक सुखवस्तू लोक आपापली बुद्धी चालवून या निरीक्षणाकडे पोहोचताहेत आणि याची कारणं ‘आपल्या’ (म्हणजे त्यांच्या मते आवश्यकपणे, हिंदू-भारतीय) संस्कृतीशी कशी भिडतात हेही यापैकी अनेक जण आपापल्या परीनं सांगताहेत. सारनाथ बॅनर्जी हे सारं वाचकाला सांगतो आणि पुढे, वरुण भल्लाच्या दु:स्वप्नाकडे नेतो. हे दु:स्वप्न अर्थातच लोक देशोधडीला लागण्याबद्दल आहे. यातून वाचकाचं भल्लाविषयीचं मत बदलू शकेल.. वरुण भल्ला हाच ‘तांबापूर’ मोडून काढणाऱ्या कंपनीसाठी भांडवल उभारून देणारा असला, तरी कसा का होईना तो बऱ्यापैकी ‘क्रिएटिव्ह’ आहे, वगैरे वाटू शकेल.
हे असं काही वाटलं, तरच लोक-लढय़ाच्या अशक्य कहाणीतला सारनाथ बॅनर्जीकृत कपोलकल्पित भाग कमालीचा यशस्वी होणार आहे. पाण्यासाठीच्या तुंबळ युद्धात मध्येच लोकांच्या बाजूनं हस्तक्षेप करणारी, विजयाची शक्ती मिळवून देणारी गूढ अतिमानवी पोशाखधारी आकृती कोणाची? विकास भल्लाचीच तर नव्हे, हा प्रश्न वाचकांना पडणं, यात या गोष्टीच्या कल्पितपणाची फलश्रुती आहे.
पण गोष्ट कल्पित की वास्तवात शक्य होणारी, हा प्रश्न महत्त्वाचा न मानता कधी फिल्मी, कधी कॉमिक्सच्या तर कधी रीतसर एखाद्या गंभीर निबंधाच्या वळणांनी ही कादंबरी पुढे जात राहते, हे पुस्तक हातावेगळं केल्यावर अधिक लक्षात राहतं. सारनाथचं जे काही प्रस्थ या क्षेत्रात आहे, ते व्यर्थ नाही याची साक्ष त्याच्या कथनशैलीतून आणि दृश्यमांडणीतून पटते. वाचकाच्या समजेची पातळी आपण वाढवू शकतो, असा आत्मविश्वास असलेल्या लेखकांपैकी सारनाथ आहे, हे कादंबरी का आवडली याचा विचार करताना लक्षात येतं. पण सारनाथला यातून ‘म्हणायचं’ काय आहे? हा प्रश्न उरतोच. त्याचं एक संभाव्य उत्तर असं की, विकासपुरीची लढाई ही केवळ पाण्यासाठी असणार नाही. विकासाच्या यापुढल्या टप्प्यांवर लोकांना पर्यावरणशत्रू आणि लोकशाहीविरोधी विकासाचे धोके ‘कळणं’-आणि धोरणांमधून ही समज ‘वळणं’ यांचा मुकाबला कुठल्याही विकासपुरीत अव्याहत सुरूच राहणार आहे!

अभिजीत ताम्हणे 
abhijit.tamhane@expressindia.com

ऑल क्वाएट इन विकासपुरी
– सारनाथ बॅनर्जी
प्रकाशक : हार्पर कॉलिन्स
पृष्ठे : १४२ (मोठा आकार),
किंमत : ७९९ रु. 

Story img Loader