कथांच्या मालिकेतून उलगडणारी कादंबरी- किंवा ‘कथांबरी’ असा घाट ‘ऑल दॅट मॅन इज’ या कादंबरीने घेतला असला, तरी पुरुषाचा प्रेमशोध ‘पुरुषवादी’ भूमिकेतून मांडणे हे तिचे आंतरिक बलस्थान आहे. ‘बुकर पारितोषिक’ येत्या आठवडय़ात जाहीर होईलच; पण हे पुस्तक यंदाच्या बुकर-लघुयादीतील सर्वात प्रभावी म्हणायला हवे..
स्त्री बंडखोरी हा कादंबरीचा विषय महिला हक्क चळवळीची धुरा वाहिली जाण्याच्या आधीपासून सर्वच साहित्यांत लोकप्रिय होता. स्त्रीवादाची पायाभरणी करण्यास अठराव्या शतकापासून लिहिणाऱ्या लेखक-लेखिकांची विचाररत्ने उपयुक्त ठरली होती. पुढे १९६०च्या चळवळ युगापासून स्त्रीवादाची घुसळण साहित्य, चित्रपट आणि कलेच्या सर्व माध्यमांमध्ये झिरपत गेली. टोकाला गेलेला स्त्रीवाद आजच्या युगात ‘स्त्री माजवाद’ म्हणण्याइतपत ठळक झाला तेव्हा नकळतच सुप्तरूपात ‘पुरुषवादा’च्या संकल्पनेने उचल खाल्ली. हा मुद्दा केवळ वादासाठी नाही. नीट लक्षात घेतले तर स्त्री बंडखोरीच्या गाथा जितक्या जोमाने आल्या तेवढय़ाच तीव्रतेचे पुरुषवादाचा फक्त शिक्का नसलेले (पण तो काठोकाठ असलेले) साहित्य बाहेर पडू लागले. या निकषांवर जे. डी. सालिंजर यांच्या ‘कॅचर इन द राय’पासून सुरुवात केली, तर डेनिस जॉन्सन (जिझस सन), ब्रेट इस्टन एलिस (लेस दॅन झिरो), निक हॉर्नबी (हाय फिडिलिटी), मायकेल छाबोन (मिस्ट्रिज ऑफ पिट्सबर्ग), आयर्विग वेल्श (ट्रेनस्पॉटिंग), चक पाल्हानिक (फाइट क्लब) या लेखकांनी आपल्या कादंबरीत एक प्रकारे स्त्रीवादावर टीका करणारा ‘पुरुषवाद’ झळकवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. गंमत म्हणजे जेनिफर एगान (ए व्हिजिट फ्रॉम द गून स्क्वॉड) आणि एलिझाबेथ गिल्बर्ट या लेखिकांनी मांडलेल्या काही पुरुषकेंद्री कलाकृतींमध्येही याची स्पष्ट झलक दिसेल. (आपल्याकडे नेमाडे, भाऊ पाध्ये, तेंडुलकर यांच्यापासून मकरंद साठे, अवधूत डोंगरे यांच्या कादंबऱ्या का चर्चेत राहिल्यात, याचा नीट विचार केला, तरी अनेक गोष्टी स्पष्ट होतील). ‘साहित्याला कोणत्याही गटा-तटात बसविणारी लेबले लावू नयेत’, हे सर्वच पूर्वसुरींनी नुसते म्हणायचे वाक्य बनवून ठेवले. प्रत्यक्षात स्त्री-वादी साहित्य ही संकल्पना मान्य केली गेलीच. मग यावर ‘पुरुषवादी’ असे साहित्य समोर दिसत असताना त्याला तसे का म्हणू नये, असा सवाल विचारला गेला नाही. साहित्यनिर्मितीच्या प्रेरणेसंदर्भात वरील अनेक घटकांचा विचार डेव्हिड सलॉय यांच्या ‘ऑल दॅट मॅन इज’ या कथामालिकायुक्त कादंबरीतून – किंवा ‘कथांबरी’तून, वाचकाच्या सातत्याने सोबत राहतो. स्त्री-पुरुषांच्या बदललेल्या जगण्याच्या आवर्तनातून तयार झालेली विचित्र परिस्थिती आणि त्यात अडकलेल्या प्रेमकफल्लक पुरुषांच्या गाथाच या भरगच्च पुस्तकात येतात. षड्रिपूंनी बाध्य असलेल्या या प्रेमशोधकांची मांदियाळी येथे नऊ गोळीबंद कथांमधून जमून आली आहे.
डेव्हिड सलॉय आणि त्यांची ‘कथांबरी’ बुकरच्या नामांकनात कॅनडाचे प्रतिनिधित्व करीत असले, तरी ही कथामालिका युरोपमधल्या विविध पर्यटनप्रिय भागांत घडते. यातील घर थकलेली पात्रे काही काळासाठी मूळ शहरापासून दुसऱ्याच ठिकाणी प्रवास, वास्तव्य करून आपल्या दु:खांवर उतारा शोधताना दिसतात. हा प्रवास लेखकाच्या तिरकस नजरेतून गमतीशीर बनला आहे आणि दु:खांचे ऊरबडवे अवडंबर माजविण्याची किंचितही गरज नसलेली पात्रे पाहताना मानवी जगण्याच्या कठिणोत्तमपणाचे अतिसूक्ष्म दर्शन होते.
या पुस्तकामधील कथांना शीर्षके नाहीत. नऊ विभाग आहेत, त्यांचे उपविभागही पाडण्यात आले आहेत. प्रत्येक विभाग विस्तारत जाणाऱ्या वयाच्या स्वतंत्र पात्रांचा, वेगळ्या ठिकाणी घडणारा आणि भिन्न परिस्थिती असणारा आहे. साधारण पन्नासेक पानांमध्ये आटोपणाऱ्या या प्रत्येक लांबोडक्या विभाग-कथानकाचा जीव एखाद्या लघू कादंबरीसारखा भासू शकेल, इतपत आहे.
यातील पहिला विभाग आहे, सायमन आणि फर्डिनांड या सतरा वर्षांच्या परस्परविरोधी स्वभावाच्या लंडनमधील तरुणांकडून प्राग शहरातील तिकडम प्रवासाचा. यातील सायमन खूपच समंजस, साहित्यप्रेमी, दैनंदिनी लिहिणारा आणि प्रवासाकडून अनुभूती संचित गोळा करण्याची अपेक्षा बाळगणारा आहे. फर्डिनांड मात्र द्वाड, मनमौजी आणि सख्याहरीपणाचा कळस गाठणारा आहे. फेसबुकवरून ते कुठल्याशा मित्राला भेटण्याचा प्रयत्न करतात. त्या मित्राच्या बहिणीशी ओळख झाल्यानंतर तिच्या गोतावळ्यात काही काळ घालवितात. त्यानंतर प्राग शहरातील ‘प्रेमळ’ महिलेच्या खानावळीत वास्तव्य करतात. शहरातल्या ऐतिहासिक ठिकाणी समवयस्क तरुणी भेटल्यानंतर उतावळ्या फर्डिनांड आणि मनात आपल्या प्रेमाची आठवणनोंद असलेला सायमन यांच्यात गमतीशीर अडचणींमुळे फारसे काहीच घडत नाही. पुढे खानावळ चालविणाऱ्या प्रेमळ महिलेमुळे या दोघांचा प्रवास अनुभूतीपूर्ण प्रश्नांची व्यवस्था तयार करतो. यातल्या सायमन या कथानायकासारखीच आत्मकेंद्री अवस्था असलेला पुढील विभागाचा नायक बर्नार्ड हा स्त्रीप्रेमामध्ये फर्डिनांडला डावा ठरवितो. शिक्षणात अधोगतीदर्शन दाखवून गावउंडगेपण स्वीकारणाऱ्या या बर्नार्डला त्याच्या मामाने फर्निचरच्या दुकानात साहाय्यक म्हणून कामावर ठेवलेले असते. पण महिन्याचा पगार घेऊन आठवडय़ातच सायप्रसला फिरायला जाण्यासाठी सात दिवसांची रजा मामाकडे मागून तो नवे कुटुंबनाटय़ घडवितो. नोकरीवर पाणी सोडून त्याला सायप्रसला जाण्यासाठी चिथावणाऱ्या मित्राकडे महिन्याच्या पगारासह पोहोचतो. तो मित्र अडचणीची कारणे सांगत त्याला पिटाळतो. मग बर्नार्डचा मौजशोधनासाठी एकटय़ानेच सायप्रस प्रवास सुरू होतो. तेथे एका सुंदर ललनेच्या भेटीने अर्धहळकुंडातली त्याची अवस्था हॉटेलमधील अडचणींकडे दुर्लक्ष करते. पुढे त्या ललनेचे दर्शन दुर्लभ झाल्यामुळे हॉटेलमध्ये उतरलेल्या दोन लठ्ठोत्तम माय-लेकींच्या संपर्कात येतो. या संपर्काचे सुखमयी दु:खात रूपांतर करणाऱ्या परिस्थितीचा बर्नार्ड साक्षीदार बनतो. या विभागातील विनोदाची धार प्रचंड तीव्र आहे. बर्नार्डच्या कुटुंबाचा मातृ-पितृक इतिहास, हॉलीवूडपट पाहून त्याला आलेले अमेरिकीपण, ग्विनेथ पाल्ट्रो या अभिनेत्रीच्या अवयवसंपत्तीवर मित्रासोबत सुरू केलेला वाद, सायप्रसमधील हॉटेलसुविधांची वानवा, त्यावर तोडगे काढणारे अवलिये आणि या सगळ्यात अडकलेली परमोच्च दु:स्थिती अनुभवणारा बर्नार्ड, अशा अनेक गोष्टींनी विचित्र विनोदाचे वलय या विभागाला आले आहे. यातल्या विनोदाचे सहजपण हे सर्वात मोठे वैशिष्टय़ आहे, कारण ही कथा मुळातच विनोदिका नाही.
यापुढील भाग आधीच्या भागाहून अधिक शोकान्त असला, तरी त्यातले वातावरण खूपच गंभीर आहे. यातील नायक आहे, बलाझ नावाचा हंगेरीतून अल्पकाळासाठी लंडनमध्ये आलेला मध्यमवयीन तरुण. जिममधील मित्राच्या सांगण्यावरून तो अल्पकाळाचा सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत आहे. त्याचे काम आहे, या मित्राच्या एमा नावाच्या प्रेयसीचे रक्षण करायचे. या एमाच्या कामाचे स्वरूप असते उच्चभ्रू सेलिब्रेटींना शरीरसुखाची सेवा पुरविण्याचे. आत्यंतिक व्यावसायिक स्वरूपात गुप्तरीत्या चालणाऱ्या या व्यवसायात तिच्या प्रियकराने तिला लोटल्याची आपली जाणीव, थोडय़ाच वेळात घडणाऱ्या घटनांनी बदलून जाते. इथे त्याच्याकडून होणारे एमाचे रक्षण. फावल्या वेळात त्याच्याकडून हॅरी पॉटरच्या अनुवादित आवृत्तीचे वाचन आणि हॉटेलभोवतीच्या परिसरातील भटकंती वारंवार येते. या कथेच्या शेवटातील सौंदर्य या लेखकाची क्षमता दाखवून देणारे आहे.
आणखी एका विभागात, अलेक्झांडर नावाचा वृद्ध उद्योगपती नायक स्वतछला रूपर्ट मरडॉकचा वारसदार म्हणून पाहतो आणि या आत्मप्रेमाची आत्मचरित्रात नोंद व्हावी अशी त्याची इच्छाही आहे. या उद्योगपतीच्या वैयक्तिक दु:खापुढे त्याची थिटी श्रीमंती त्याला उंची जहाजावर आत्महत्याप्रवण मन:स्थितीत घेऊन जाते. एका कहाणीमध्ये ७३ वर्षांचा वृद्ध आपल्या आयुष्याच्या अंत:काळाला स्वीकारण्यासाठी इटलीला जातो. इथे शेवटच्या आणि पहिल्या कथेला जोडणारी साखळी आहे. अर्थात तिचे असणे आणि नसणे या संपूर्ण कलाकृतीत फारसे महत्त्वाचे ठरत नाही. कारण ही ‘कथांबरी’च मुळात आजचा पुरुषवाद स्पष्ट करणारी आहे. स्वाभिमानी, अपमानित, गंडधारी, गर्वहीन, सर्वस्पर्शी, सुखलोलुप, स्त्री-लंपट, स्त्री-प्रेमी आणि किती तरी छटांचा गडद पुरुषी आविष्कार येथे मानसिक आणि लौकिकार्थाने सादर झालेला आहे. या सगळ्या व्यक्तिरेखा आयुष्यात प्रेमाचा अभाव असल्यामुळे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष एकाकी पडल्या आहेत. त्यांची एकसमान प्रेमकफल्लक अवस्था पाहून त्यांच्याविषयी कणव दाटून येते. जर थोडे जरी प्रेम मिळते, तर या अशा अडनिडय़ा आयुष्यवाटेवर येऊन पडल्या नसत्या याची खात्री होते. यातील स्त्रिया जाणीवपूर्वक टोकाच्या एकांगी रंगविण्यात आल्या आहेत. त्या वारांगना अथवा टोकाच्या कामविचारी, फसव्या किंवा हेकट-हट्टी दाखविण्यात आल्या आहेत. हा पुरुषवाद स्पष्ट करण्यासाठीच्या लेखकीय गरजेतून आलेल्या स्त्रीचिंतनाचा भाग असला, तरी सर्वानाच पचेल याची खात्री देता येत नाही.
भिन्नवंशीय, धर्मीय आणि विविध भागांतील व्यक्तींना आणि पॉप्युलर कल्चरचे सर्व समांतर संदर्भ कवेत घेणारी ही कथांबरी बुकरमधील खऱ्याखुऱ्या वजनाने आणि त्यातील आशयाच्या वजनाने समृद्ध आहे. ही समृद्धता समजून घेण्याची आपली मानसिकता कोणत्या वादाचे समर्थन करणारी आहे, त्यावर या पुस्तकातील प्रत्येक प्रसंगाचा आस्वाद अवलंबून आहे. जगासाठी महत्त्वाच्या असलेल्या पर्यटनस्थळांवर घडूनही त्या भूमीच्या वैशिष्टय़ांवर चकार शब्द न बोलता मानवी आयुष्याचे पुरुषवादी पर्यटन करणारी ही यंदाच्या बुकर मानांकनांमधील सशक्त कथांबरी आहे.
कथा-मालिकांच्या स्वरूपात गाजलेल्या कादंबऱ्यांची संख्या कमी असली, तरी त्यांनी मोठे पुरस्कार गाजविल्याची उदाहरणे मोठी आहेत. एलिझाबेथ स्ट्राउट हिची ‘ऑलिव्ह किटरिज’ किंवा जेनिफर एगानची ‘ए व्हिजिट फ्रॉम द गुन स्क्वॉड’ कथांबरी प्रकारात मोडणाऱ्या पुस्तकांनी पुलित्झर पारितोषिकावर मोहर उमटविली होती. ‘ऑल दॅट मॅन इज’ ही कथांबरी यंदा बुकरच्या कादंबऱ्यांना मागे टाकण्याची कामगिरी करील का, हे आगामी आठवडय़ात स्पष्ट होणार आहे.
ऑल दॅट मॅन इज
- लेखक: डेव्हिड सलॉय
- प्रकाशक : जोनाथन केप, लंडन
- पृष्ठे-४३७, किंमत ५९९