माती, दगड, बांबू, लाकूड अशा स्थानिक साहित्यापासूनच न भाजलेल्या विटांची घरे निर्माण करणाऱ्या वास्तुशिल्पकार दीदी कॉन्ट्रॅक्टर यांची सचित्र ओळख करून देणाऱ्या पुस्तकाविषयी..

‘संस्कृतीपासून वास्तुकलेने फारकत घेतलेली सभ्यताच (सिव्हिलायझेशन) असभ्य असते आणि अशा सभ्यतेचे पतन अटळ आहे.’ – फ्रँक लॉइड राइट

आपले ‘स्वदेशी’ आणि ‘संस्कृतिप्रेम’ हे वेचीव, निवडक आणि दिखाऊ असते का? स्थानिकता जपण्याकरिता आपण थोडे तरी झिजतो का? मराठी संस्कृतीच्या मालमत्ता हक्कांवरून झगडण्याच्या स्पर्धेत अहमहमिका करणाऱ्यांपैकी एकालाही ‘आपला वाडा’ नव्याने रचावा असे कधीही वाटत नाही. सर्वानाच ‘काचेच्या घरात’ जाण्याची घाई झाली आहे. ‘आपल्या मातीची पुनभ्रेट घ्यावी’, असे कोणालाही वाटत नाही. विदेशातून भारतात आलेली एक विदुषी ग्रामीण भागात राहून गेली चार तपे अथकपणे मातीच्या घरांना रचत जाते, या अपूर्व कार्याची महती दाखवून देणारे छायाचित्र पुस्तक ‘अ‍ॅन अ‍ॅडोब रिव्हायव्हल- दीदी कॉन्ट्रॅक्टर्स आर्किटेक्चर’ पाहताना आणि वाचताना थक्क होऊन आपल्या करंटेपणाची लाज वाटत राहते.

धोरण व निवड ठरविणाऱ्या वर्गास एके काळी साधेपणा ठसविणाऱ्या कलाकृतींचे मोल वाटत असे. आताशा त्यांना अधिकाधिक खर्चीक ते ते हवेहवेसे वाटते. मध्यमवर्गीयांनीही साधेपणा हा त्यांच्या आयुष्यातून कधीच हद्दपार करून टाकला आहे. त्यामुळे साधेपणातील सौंदर्य व्यक्त करणाऱ्या कलांना बाजारात मागणी नाही. तरीही प्रत्येक काळात साधेपणाकडे नव्याने पाहता येते आणि सौंदर्य निर्माण करता येते, हे कलावंत दाखवून देत असतात. आपल्याला ‘पंचक्रोशीतील साधन-सामग्रीतून घर बनवा’ असे सांगणारे गांधी भाबडे व कालबाह्य़ वाटू शकतात. लॉरी बेकर, दीदी कॉन्ट्रॅक्टर यांच्यासारख्या रचनाकारांना हा विचार काळानुरूप, शाश्वत आणि पर्यावरणस्नेही आहे याची खात्री पटते आणि त्याला कृतीत आणण्यासाठी ते आयुष्यभर झटतात.

अमेरिकी आई आणि जर्मन वडील यांची कन्या डालिया जर्मनी व अमेरिकेत वाढली. १९१९ साली जर्मनीमध्ये वास्तुशिल्पकार वॉल्टर ग्रोपियस यांनी ‘बाउहाऊस आर्ट स्कूल’ स्थापन केले होते. ‘सरंजामशाहीच्या काळातील अभिव्यक्ती नष्ट होऊन लोकशाहीस चालना देण्यासाठी तसेच औद्योगिकीकरण व आधुनिकता रुजवण्यासाठी, कलांचे नवीन आविष्कार पुढे यावेत,’ हा त्या स्कूलचा प्रमुख उद्देश होता. डालिया यांचे आई-वडील दोघेही चित्रकार होते. ते बाउहाऊस चळवळीत सक्रिय असल्यामुळे घरामध्ये चित्रकला आणि वास्तुकलेविषयी सतत चर्चा होत असे. या काळात डालिया यांनी मातीच्या विटांचे घर बनविण्यात आई-वडिलांना मदतही केली होती. वास्तुकलेविषयी फ्रँक लॉइड राइट यांच्या चिंतनाने त्या भारावून गेल्या होत्या. पुढे अमेरिकेत, कोलरॅडो विद्यापीठात कलेचे शिक्षण घेत असताना त्यांची भेट स्थापत्य अभियांत्रिकी शिकणाऱ्या रामजी नारायण यांच्याशी झाली. प्रेमोत्तर विवाहानंतर त्या १९५१ साली भारतात आल्या. बांधकाम करणाऱ्या नारायण यांना लोकांनी ‘कॉन्ट्रॅक्टर’ हे संबोधन लावले, तर डालिया यांचे नामकरण ‘दीदी कॉन्ट्रॅक्टर’ असे झाले! त्या भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञान समजून घेत राहिल्या. त्या आरंभी नाशिक व नंतर मुंबईला आल्या.

जुहूच्या समुद्रकिनाऱ्याजवळ नारळाच्या झाडांना हात न लावता दगड, विटा यांना चुन्याने सांधणारं घर त्यांनी बांधलं. त्याला अनेक नामवंतांची दाद मिळाली, त्यामध्ये त्यांचे शेजारी पृथ्वीराज कपूर हे देखील होते. मग दीदींनी त्यांच्यासाठी एक कुटी व कोठी बांधली, जे कालांतराने ‘पृथ्वी थिएटर’ झाले. १९६१ च्या सुमारास उदयपूरमधील एका सरोवरातील महालाचे तारांकित हॉटेलमध्ये रूपांतर करताना अंतर्गत सजावटीचे काम दीदींना मिळाले. तब्बल १० वर्षे चाललेला हा प्रकल्प करताना दीदींना स्थानिक कला व कारागीरी समजून घेता आली. ‘‘साधेपणा आणि स्थानिक सामग्रीचा वापर या गांधीजींच्या शिकवणुकीचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला,’’ असे त्या म्हणतात.

१९७० च्या सुमारास मुले शिक्षणाकरिता बाहेर निघून गेल्यावर त्यांनी हिमाचल प्रदेशातील ‘अंद्रेता’ या कलाग्रामी स्थायिक होण्याचे ठरवून टाकले. नोरा रिचर्ड्स ही ब्रिटिश महिला १९२० मध्ये कांगडा खोऱ्यातील अंद्रेता गावी आली आणि त्या वातावरणाच्या प्रेमात पडून तिथेच स्थायिक झाली. चित्रकला, नाटक, नृत्य, शिल्पकला व कुंभारी कला या क्षेत्रांतील महनीय कलावंत अंद्रेताला येऊ लागले. नोराबाईंनी नाटय़शाळा चालू केली. त्यानंतर अनेक कलावंत तिथे वास्तव्यास आले आणि अंद्रेता हे कलाग्राम विकसित होत गेले. त्याचे आकर्षण दीदींना होते. तेव्हापासून आजतागायत दीदी हिमाचलातील निसर्गसमृद्ध परिसराशी तादात्म्य पावणाऱ्या वास्तू निर्माण करीत आहेत.

वास्तुविशारद आणि छायाचित्रकार जोगिंदर सिंग यांची ‘अ‍ॅन अ‍ॅडोब रिव्हायव्हल’ या छायाचित्र-पुस्तकातून दीदी कॉन्ट्रॅक्टर यांच्या वास्तुकलेची महती अधोरेखित केली आहे. दीदी कॉन्ट्रॅक्टर यांचे प्रदीर्घ चिंतन अभिव्यक्त करणारी उद्धरणे व छायाचित्रांमुळे पुस्तक प्रसन्न व निखळ आनंद देते.

‘‘तुमच्या पायाखाली जे जे आहे त्यापासून तुमची वास्तुकला निर्माण करा,’’ असे बजावणारे इजिप्तमधील वास्तुशिल्पी हसन फादी, दीदी आणि लॉरी बेकर यांचे जीवन, विचार आणि वास्तुकला यात कमालीचे साम्य आहे. दीदींच्या सर्व रचना या पूर्णपणे स्थानिक सामग्रीतूनच केल्या आहेत. ‘‘स्थानिक वास्तुकला म्हणजे दोन ते तीन हजार वर्षांपासूनचे संशोधन आणि विकास यातून आलेले उत्क्रांत रूप आहे. उपयोगिता व टिकाऊपणा हा त्याचा गाभा आहे. ते सदोष असते तर टिकलेच नसते. स्थानिक वास्तुकला ही मातृभाषेसारखी जिव्हाळा व आत्मीयता व्यक्त करते म्हणून ती ऊब तिथे लाभते,’’ हे त्यांच्या वास्तूमधून प्रतीत होते. ‘‘स्थानिक मातीपासून न भाजता उन्हात वाळवून केलेल्या विटांच्या बांधकामास ‘कच्चे’ म्हणून हिणवले जाते. उलट ती माती पुन:पुन्हा वापरता येते. ‘पक्क्या’ व प्रतिष्ठा लाभलेल्या बांधकामांना विटा भाजणे, वाहतूक यासाठी ऊर्जा अति लागते. कर्ब वायूंचे अतोनात उत्सर्जन होते. निसर्गस्नेही बांधकामांना तुच्छ लेखणारी असंस्कृत वृत्ती हीच प्रदूषणकारी आहे. मातीच्या विटांचे काम करणे हे काही सोपे काम नाही. त्यात कला आणि कुसर दोन्हींचा कस लागतो. मातीत काम करताना कुंभारकामातील बारकावे साधता येतात. कल्पकतेचे अमर्याद स्वातंत्र्य लाभते,’’ हे दीदींनी दाखवून दिले आहे. माती, दगड, बांबू, लाकूड सर्व काही तिथलेच घेऊन त्यांनी केलेल्या या सुंदर वास्तूंमध्ये भूकंपरोधकताही अंगभूत आहे.

‘‘अभिकल्प हा बदलाचा दूत होऊ शकतो आणि ते कलावंताचे कर्तव्य आहे,’’ असे दीदी मानतात. ‘‘आपण प्रत्येक गोष्ट पशात मोजत आहोत. परंतु अस्सल आनंद, सौंदर्य, मत्री, प्रेम व उदारता या जीवनातील उत्कृष्ट व उत्कट बाबी विकत घेता येत नाहीत. व्यापारी मूल्यांवरून बेतलेली आपली जीवनशैली ही टिकाऊ नव्हे.’’

‘निष्ठा’ या रुग्णालयात आयुर्वेद, होमिओपॅथी, निसर्गोपचार आणि वनौषधींनी उपचार केले जातात. हे ‘रुग्णालय’ वाटत नाही. दीदी म्हणतात, ‘‘या वास्तूमधून, समग्र उपचाराचाच विचार व्यक्त व्हावा. रुग्णांच्या हळुवार मानसिकतेची काळजी घेणारे वातावरण निर्माण करणे हाच माझा प्रयत्न होता.’’ गुडघे व मोतीबिंदू यांच्या शस्त्रक्रिया, कर्करोग निवारणाकरिता रसायनोपचार उरकल्यानंतर ८८ वर्षे वयाच्या दीदींनी विधिज्ञ प्रशांत भूषण यांच्याकरिता सार्वजनिक धोरणांचा अभ्यास करण्यासाठी ‘संभावना इन्स्टिटय़ूट’ तर शाश्वत ग्रामीण विकास घडविण्यासाठी कार्य करणाऱ्या ‘धर्मालय इन्स्टिटय़ूट फॉर कम्पॅशनेट लिव्हिंग’ ही वास्तुसंकुले बांधली आहेत.

शेतीसंस्कृतीस साजेशी घररचना कशी असते? घराचा कोपरान् कोपरा तिन्ही मितींतून सुंदर व उपयुक्त कसा असू शकतो? घर हे निसर्गात कसे सहजगत्या सामावू शकते? याचा अप्रतिम नमुना प्रत्येक छायाचित्रातून आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या जुन्या घरांमध्ये होते तसे विविध आकारांचे आकर्षक कोनाडे दिसतात. केवळ स्वयंपाकघरातच नव्हे तर सर्व खोल्यांत ठिकठिकाणी वस्तू टांगता येण्यासाठी खुंटय़ा व कप्पे आहेत. जिने, पायऱ्या, पायवाट हे सर्व तपशील पाहताना दीदींचे वास्तुकलाविषयक चिंतन जाणवते. नाटय़पूर्ण अवकाश, आतील सौहार्दपूर्ण प्रकाश आणि त्यात उजळून निघणारे रंग मनात घर करून बसतात. घराची संकल्पना कशी फुलत जाते हे सांगताना दीदी म्हणतात : ‘‘एखादे रोप उगवते तसे त्या भूप्रदेशात बांधकाम कसे उगवेल, याची मी कल्पना करीत राहते. व्यक्ती पाहून तिचा स्वभाव जाणता येतो, तसेच माझ्या घरांचे बाह्य़ रूप हे अंतर्गत उपयोगितेविषयी भाष्य करते. बाह्य़ बाजू ही गोगलगायीच्या शिंपल्यासारखी असते.’’

वास्तुकलेचे छायाचित्रकार जोगिंदर सिंग हे वास्तुविशारद असून ‘त्यांना उमजलेली वास्तुकला’ वाचकांपर्यंत पोहोचवत असतात. त्यांची ‘ग्लिम्प्सेस ऑफ आर्किटेक्चर इन केरळ’, ‘फोर्ट्स अ‍ॅण्ड पॅलेसेस इन इंडिया’, ‘द आर्ट्स अ‍ॅण्ड इंटिरिअर्स ऑफ राष्ट्रपती भवन’ आणि ‘कॉस्मिक डान्स इन स्टोन’ ही छायाचित्र-पुस्तके म्हणजे दृश्यात्मक संवाद आहे. वास्तूमधून होणारी अभिव्यक्ती, अवकाशाची अर्थपूर्णता, वास्तुशिल्पींनी ‘घेतलेल्या जागा’, सूक्ष्म तपशील या साऱ्यांचे सौंदर्य टिपणारी दृष्टी सिंग यांच्याकडे आहे. त्यांनी विटांच्या निर्मितीपासून घर पूर्ण होतानाचे अनेक टप्पे दाखवले आहेत. त्यामुळे वास्तुकलेतील काव्य व संगीत आपल्याला जाणवते व भिडते. खुद्द दीदी म्हणतात, ‘‘जोगिंदर सिंग यांनी माझ्या वास्तुकलेचे मर्म जाणून घेतले आहे. त्यांच्या छायाचित्रणातून माझी दृष्टी आणि माझे उद्देश, यांचा अचूकपणे वेध घेऊन ते अभिव्यक्त झाले आहेत. इतकेच नाही तर त्यांनी शोधलेल्या चित्रचौकटींमुळे मी चकित झाले आहे.’’

खाद्यपदार्थ टिकवून ठेवणाऱ्या महिला आणि भाषा जपणारा परिसर हेच संस्कृती जतन करीत असतात. त्यांच्यासाठी कला ही जीवनापासून अलग नसून आयुष्याचा एक अविभाज्य भाग असते. संस्कृती मिरवणारे आणि संस्कृतीच्या नावे गळे काढून दुकान चालवणारे आपल्या वाटय़ाला नेहमीच येतात. परंतु मूकपणे संस्कृती जपणारे हे अलक्षित राहतात. अतीव कष्टाने आहे त्या चौकटीत स्वातंत्र्य घेऊन काही कलावंत सर्जनशील निर्मिती करीत राहतात. दीदी या त्यांपैकी एक!

‘अ‍ॅन अ‍ॅडोब रिव्हायव्हल- दीदी कॉन्ट्रॅक्टर्स आर्किटेक्चर’

लेखन व छायाचित्रे : जोगिंदर सिंग

 प्रकाशक :  ईमटेरियल पब्लिकेशन्स

 पृष्ठे : १६०, किंमत : दोन हजार रुपये 

अतुल देऊळगावकर  atul.deulgaonkar@gmail.com  

 

Story img Loader