‘अबे खामोश!’ असा आवाज १९७० वा ८० च्या दशकांतील चित्रपटांमधून ऐकवीत अभिनेता म्हणून लोकप्रिय झालेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी राजकारणातही जगन्मैत्री टिकवण्याचा प्रयत्न केला. ते त्यांना जमले की नाही, याची समीक्षा न करताच हे पुस्तक संपते..
वलयांकित व्यक्तींच्या जीवनाबाबत उत्सुकतेने पाहिले जाते. त्यात जर तो कलाकार असेल तर मग त्याच्या बाबतचे कुतूहल अधिक वाढते. अभिनेता, नेता अशा भूमिकांमध्ये यशस्वीपणे वावरलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांचा चरित्रपट भारती प्रधान यांनी सात वर्षांच्या संशोधनातून पुस्तकरूपाने मांडला आहे. भारदस्त संवादफेकीतून खामोश या एका शब्दामुळे शत्रुघ्न यांची ही ओळखच बनून केली. मात्र ज्या शब्दापासून शत्रुघ्न यांना प्रेरणा मिळाली तो संवाद मुगल-ए-आझम या चित्रपटात पृथ्वीराज यांच्या तोंडी असल्याची आठवण अभिनेते शेखर सुमन यांनी सांगितली आहे. अशा अनेक आठवणींचा पट शत्रुघ्न सिन्हा यांच्या निकटवर्तीयांशी बोलून तसेच राजकीय नेत्यांच्या मुलाखतीतून या पुस्तकातून उलगडला आहे. सोपी भाषा, उत्तम मांडणी याच्या आधारे वाचकाचे कुतूहल वाढवण्यात लेखिकेला यश आले आहे.
जिथे जिथे शत्रुघ्न सिन्हा यांनी पाऊल ठेवले तेथे त्यांनी यश मिळवले हे मान्यच. मात्र एखाद्या टप्प्यावर ते कोठे चुकले काय, याचे मात्र विश्लेषण केलेले नाही. उदाहरण घ्यायचे झाले तर राजकारणात शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिमा एक स्पष्टवक्ता अशी ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. मनाला जे योग्य वाटेल तेच भीडभाड न ठेवता बोलणार असा वारंवार उल्लेख आहे. मात्र एखाद्या राजकीय पक्षाचे तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा सर्वच बाबी मनासारख्या होत नाहीत, हे ध्यानातच घेतलेले नाही. शत्रुघ्न सिन्हा यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले सौहार्दाचे संबंध, लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून राजकीय क्षेत्रात काम करण्याची मिळालेली प्रेरणा तसेच दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी झालेली चर्चा असे शत्रुघ्न यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ‘सर्वव्यापी’ पैलू उघड केले आहेत. इंदिरा गांधी यांची हत्या झाली नसती तर कदाचित शत्रुघ्न यांनी भाजपऐवजी काँग्रेसचा मार्ग स्वीकारला असता इतका इंदिराजींच्या कार्यपद्धतीचा प्रभाव त्यांच्यावर असल्याचे नमूद केले आहे. याखेरीज पुण्यात राष्ट्रीय चित्रवाणी व चित्रपट संस्थेमध्ये (एफटीआयआय) शिकत असताना त्यांचे शेजारी असलेल्या विलासराव देशमुख व सुशीलकुमार शिंदे यांच्याशी झालेली मैत्री असो किंवा अगदी विरोधी गोटातल्या लालूप्रसाद किंवा नितीशकुमार यांचा स्नेह- शत्रुघ्न सिन्हा यांचे व्यक्तिमत्त्व मोकळेढाकळे असल्याचा प्रत्यय या पुस्तकाच्या पानापानांतून येतो.
काँग्रेस खासदार असलेल्या शशी थरूर यांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेतच राजकारणापलीकडे जाऊन मैत्री निभावण्याचा शत्रुघ्न यांचा गुणविशेष सांगितला आहे. केवळ वलयाचा फायदा उठवण्यासाठी राजकीय क्षेत्रात नव्हे तर समाजसेवेचे भान असलेली ही व्यक्ती याचा प्रत्यय येतो . त्यांनी केलेल्या विविध भूमिकांचा सविस्तर आढावा पुस्तकात आहेच. खासदार, केंद्रीय मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या आत्मविश्वासाने पार पाडताना त्यांच्यातील कसलेला राजकारणी दिसून येतो.
पुस्तकाचा उत्तरार्ध शत्रुघ्न सिन्हा यांची राजकीय वाटचाल, कौटुंबिक जीवन व त्यातील ताणतणावावर आहे. तर पूर्वार्ध ज्या सिनेसृष्टीने त्यांना ओळख मिळवून त्यावर बेतलेला आहे. पुण्यात एफटीआयआयला प्रवेश घेताना मनातील घालमेल, आई-वडिलांचा असलेला विरोध या गोष्टी एखाद्या चित्रपटाच्या नेहमीच्या कथानकासारख्या आहेत. पाटणा सोडून शिक्षणाला पुण्यात आल्यावर घरची ओढ कशी होती वगैरे. त्यातच भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळे जवळीक साधू पाहणाऱ्या मुली.. अशातच एकीने लिहिलेले ६४ पानी प्रेमपत्र.. अशा गोष्टींची कबुली शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली आहे. मात्र अभिनयात नावलौकिक मिळवण्याचे ध्येय ठेवल्याने कुठल्याही अशा गोष्टींमध्ये वाहवत गेलो नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले आहे. चित्रपटसृष्टीतील बहुतेक नामवंतांसोबत ते अगदी आताच्या लोकप्रिय कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव असल्याचे सांगतानाच, सुभाष घई, अमिताभ बच्चन यांच्यासोबत मतभेद झाले, मात्र संबंधात कधी कटुता आली नाही हे वैशिष्टय़ही नमूद करतात. गेली चार दशके शत्रुघ्न यांच्यासोबत सावलीसारखे वावरणारे त्यांचे स्वीय सहायक पवन कुमार यांनीही शत्रुघ्न सिन्हा यांचे विविध पैलू उलडले आहेत.
शत्रुघ्न सिन्हा व पूनम हे १९८० मध्ये विवाहबद्ध झाले तरी १९६५ मध्ये एका प्रवासात त्यांची नजरानजर झाली, तेव्हापासूनची त्यांची ओळख! त्याचे वर्णन शत्रुघ्न यांनी छान रंगवले आहे. पडद्यावर रीना रॉय यांच्याशी जोडी जमल्याने बहुतेक त्यांच्याशीच विवाहबद्ध होणार अशी अटकळ बऱ्याच जणांनी बांधली होती. मात्र तो अंदाज खोटा ठरवला तरी विवाहानंतर सुरुवातीला दोघींना सांभाळताना कसरत करावी लागली. त्यात पूनमने खंबीरपणे निभावून नेल्याने आमचा संसार घट्ट टिकला अशी कबुली शत्रुघ्न सिन्हा देऊन जातात. आर्थिक आघाडीवरही ‘पूनमने व्यवहार सांभाळले नसते तर दिवाळखोरीत गेलो असतो,’ हे सांगताना पत्नीच्या व्यवस्थापन कौशल्याला दाद देतात. पूनम यांनी विवाहानंतर कुटुंबाला प्राधान्य देत अभिनयाला रामराम ठोकला. कठीण प्रसंगी पत्नीने आपले कर्तव्य चोख बजावल्याची दाद वेळोवेळी शत्रुघ्न यांनी दिली आहे.
चित्रपटातल्या नायकाप्रमाणे शत्रुघ्न सिन्हांच्या जीवनात वादळे आली. भावांशी झालेला संघर्ष, त्यातून एकदा तर विवाह झाल्यानंतर खुद्द भावानेच बंदुकीचा धाक दाखवून रीना रॉयशी विवाह करण्यासाठी वेठीस धरले. त्यातूनच २००९ च्या निवडणुकीत भावाने विरोधी काँग्रेस उमेदवार असलेल्या शेखर सुमनला केलेली मदत. पुन्हा जुळ्या मुलांपैकी कुशचा विवाह जानेवारी २०१५ मध्ये झाला. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली. त्या वेळी १५ वर्षांनंतर प्रथमच शत्रुघ्न सिन्हांचे तीन भाऊ एकत्र आले. हा त्यांचा सारा प्रवास एखाद्या चित्रपटातील कथानकाला साजेसा असाच आहे. लव-कुश या जुळ्यानंतर पुन्हा कन्या सोनाक्षीच्या जन्माबाबत पती-पत्नीच्या भाव-भावना, मुलांना वाढताना दिलेले सल्ले, किमान पदवी मिळवण्याचा आग्रह अनेक गोष्टींतून लेखिकेने कुटुंबवत्सल शत्रुघ्न सिन्हा खुलवला आहे.
सत्तरच्या दशकाच्या चित्रपटातून अमाप लोकप्रियता मिळवल्याने जागोजागी येणारे अनुभव पुस्तकात आहेत. त्यापैकी एक प्रसंग म्हणजे- एका चित्रीकरणादरम्यान ‘गर्दीच इतकी जमत गेली की, पन्नास हजार चाहत्यांपुढे चित्रीकरण करावे लागले’! ‘शोलेमधील गब्बरची भूमिका वाटय़ाला येणार होती. पण ती अमजद खान यांना कशी मिळाली?’ अशा गोष्टीही या चरित्रातून पुढे येतात. लेखिकेने शेकडो लोकांशी संवाद साधून हा जीवनपट उभा केला आहे. सुरुवातीला एखाद्या क्षेत्रात पाय रोवण्यासाठी संघर्ष करावा लागतो तो शत्रुघ्न यांच्याही वाटय़ाला आला. साधारण: चार-पाच दशकांपूर्वी (१९७० च्या दशकातही) कलाकारांचे मानधन काही हजारांच्याच मागे-पुढे असायचे या बाबीही यानिमित्ताने उघड होतात.
इतरांच्या मुलाखतीही लेखिकेने घेतल्या, त्यातून अमिताभ बच्चन, रजनीकांत, चिरंजीवी ते अगदी कन्नड सिनेसृष्टी गाजवलेले व सध्या मंत्रिपद भूषवणारे अंबरीश यांनी या बिहारी बाबूच्या प्रवासाला दाद दिली आहे. राजकीय क्षेत्रातून दिग्गजांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्या कार्यकर्तृत्वावर मोहोर उमटवली आहे. अगदी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनीही स्तुतिसुमने उधळली आहेत. भाजप विरोधी बाकावर असताना शत्रुघ्न आमच्या पक्षात आले त्यावरून हिंमत दिसून येते, असे उद्गार लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांच्याबद्दल काढले आहेत. अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांनीच शत्रुघ्न सिन्हा यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्याचा निर्णय घेतल्याचे सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले आहे. सध्याच्या परिस्थितीत संयम ठेवण्याचा सल्लाही स्वराज त्यांना देतात.
राजकारणातही शत्रुघ्न यांचे आडाखे बरोबर आल्याचे दाखले पुस्तकात आहेत. केवळ अभिनयातील लोकप्रियतेच्या लाटेवर पदे मिळवलेली नाहीत, तर त्यासाठी जो गृहपाठ लागतो तोही उत्तम पद्धतीने केला आहे. उदा. नवीन पटनायक एक दिवस मुख्यमंत्री हे भाकीत त्यांनी पहिल्यांदा वर्तवले किंवा बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या ताकदीकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला भाजप नेतृत्वाला वेळोवेळी दिल्याचे त्यांनी सांगितले. आता बिहार विधानसभेच्या निकालाने शत्रुघ्न भाजपमध्ये राहणार की नाही अशीच चर्चा आहे. मात्र ते पक्ष सोडणार नाहीत असे भाकीत त्यांचे मित्र व केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी वर्तवले आहे. एकूणच शत्रुघ्न सिन्हा यांच्या तोंडून चित्रपटसृष्टी व राजकारणातील कुरघोडय़ा ऐकून नवनवी माहिती मिळते. माझ्यातही काही दोष आहेत अशी कबुली एका टप्प्यावर ते देतात, मात्र त्यांच्या दोषांची फारशी चर्चा यामध्ये नाही. हा अर्थातच, पुस्तकाचाही ढोबळ दोष ठरतो.
hrishikesh.deshpande@expressindia.com
‘एनीथिंग बट खामोश’ – द शत्रुघ्न सिन्हा बायोग्राफी
भारती एस प्रधान
प्रस्तावना: शशी थरूर
प्रकाशक : ओम बुक्स इंटरनॅशनल
पृष्ठे : २८९, किंमत : ५९५ रु.