साईली पलांडे-दातार sailikdatar@gmail.com

अजिंठा या जागतिक ऐतिहासिक वारसास्थळाचा दीर्घकाळ अभ्यास करून त्याचे विविध पलू शास्त्रीय पद्धतीने नजरेस आणून देणारे ज्येष्ठ कला-इतिहास अभ्यासक डॉ. वॉल्टर स्पिन्क यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्या लेखन-कार्याविषयी..

Loksatta lokrang Birth centenary year of Dr Wankhade pioneer of Dalit literary movement
दलित साहित्य चळवळीचे प्रवर्तक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हस्तक्षेपास एवढा विलंब का झाला?
Mysterious Sanskrit text discovered in Germany
आश्चर्यच !…गूढ हिंदू मजकुराचा कागद जर्मनीच्या फ्ली मार्केटमध्ये!
Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
Gaitonde
कलाकारण: बाजारप्रणीत इतिहासाच्या पलीकडले गायतोंडे

काळाच्या विविध टप्प्यांवर अजिंठा लेणींच्या आयुष्यात अनेक नाटय़मय घडामोडी घडत आल्या आहेत. २८ एप्रिल १८१९ रोजी कॅप्टन जॉन स्मिथ याला फरदापूरच्या छावणीत मुक्कामी असताना शिकारीच्या निमित्ताने अजिंठा लेणी सापडल्या आणि काळाच्या पडद्याआड लपलेला ऐतिहासिक ठेवा जगासमोर आला. विस्मृतीत गेलेल्या अजिंठा लेणींच्या शोधाला या वर्षी २०० वर्षे पूर्ण होत आहेत.. आणि तेव्हाच २३ नोव्हेंबर रोजी, अजिंठाशी गतजन्माचे ऋणानुबंध असलेला एक प्रतिभावंत संशोधक, गुरू आणि रसिक अवलिया प्रा. वॉल्टर स्पिन्क काळाच्या पडद्याआड गेला!

गेली दोन शतके, परदेशी संशोधक भारतात येऊन भारताच्या ऐतिहासिक सत्याचा शोध घेताहेत. त्याच भारतप्रेमाची परंपरा जपत हार्वर्ड विद्यापीठात कला इतिहासाचे शिक्षण घेत असताना डॉ. वॉल्टर स्पिन्क भारतात आले. तेव्हा अजिंठा लेणीवर काम करावे असे त्यांच्या ध्यानीमनी नव्हते; पण शोधनिबंधासाठी लेण्यांच्या अभ्यासात अजिंठाला येणे क्रमप्राप्त होते. अजिंठाभेटीत या जागेने त्यांच्यावर जे काही विलक्षण गारूड केले, ते आयुष्याच्या शेवटपर्यंत राहिले. साधारणत: अभ्यासक किंवा प्रवासी अजिंठय़ाच्या चित्रांकडे अधिक आकृष्ट होतो, पण स्पिन्क यांचे मुख्य प्रेम हे कातळकलेवर होते. लेणी पाहताना त्यांना त्यांच्या काळाबद्दल, निर्मितीबद्दल असंख्य प्रश्न निर्माण झाले आणि त्याचा ठाव घेत त्यांनी कलेच्या अभ्यासाची बैठक बसवली. ‘रसग्रहणासाठी, मनोरंजनासाठी कला’ असा पारंपरिक विचार बहुतांशी समाज करत असताना, ‘इतिहासाचे लहान-मोठे पलू समजून घेण्यासाठी कला’ असा अभिनव पुरातत्त्वीय दृष्टिकोन घेऊन स्पिन्क यांनी कलाइतिहास संशोधनाची इमारत उभी केली आहे. हे करताना त्यांनी विस्मृतीत गेलेला वाकाटक हा गुप्त राजांना समकालीन असलेला राजवंश अजिंठा लेणीनिर्मितीला कसा कारणीभूत ठरला, हे अचूक मांडले.

उणेअधिक एक दिवस किंवा काही तासांत अजिंठा लेणी पाहणाऱ्यांना डॉ. स्पिन्क यांचा १९५४ पासून सुरू असलेला लेण्यांचा अभ्यास खरे तर कोडय़ात टाकणारा ठरेल. दर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात महिनोन् महिने फरदापूर विश्रामगृहात मुक्काम करून डॉ. स्पिन्क यांनी लेण्यांमधील खोदकामाचे बारकावे न्याहाळत, त्यातल्या चुका, बदल, फरक नोंदवत, त्यातून अन्वयार्थ काढत कलाइतिहास अभ्यासाची नवीन भाषा निर्माण केली. हे करताना त्यांनी वाकाटक काळातील- म्हणजे पाचव्या शतकातील सांस्कृतिक पटल उभे करून त्यात अनेक तपशिलांचे रंग भरले. त्यामुळे एकच लेणी, जागेपुरता किंवा राजवंशापुरता या अभ्यासाचा आवाका न राहता, दृश्य पुराव्यांची रेलचेल असलेले पाचव्या शतकातील भारताचे सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक चित्र आपल्यासमोर उभे राहते.

त्यांच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर वेळोवेळी घेतली जात असताना, नेदरलँड येथील ब्रिल या आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थेने त्यांचे संशोधन कार्य सात बृहत खंडांमध्ये प्रसिद्ध केले आहे. (आठवा प्रकाशनाच्या मार्गावर होता.) हे ‘अजंठा : हिस्टरी अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’चे विविध खंड लेण्यांच्या विकास-निर्मितीच्या पलूंवर विस्तृत मांडणी करतात. पहिला खंड- ‘द एण्ड ऑफ द गोल्डन इरा’- आपल्याला पाचव्या शतकातील वाकाटक राजा हरिषेणाच्या राज्यअस्ताची कथा अजिंठाच्या भव्य पटलावर डॉ. स्पिन्क यांच्या मनोरंजक शैलीत आणि प्रभावी शब्दांत वाचायला मिळते. अजिंठा लेणीसारखे शांत व बौद्ध धार्मिक उपासनेच्या निर्मितीमागील अभूतपूर्व राजकीय गदारोळाची नाटय़मय कथा डॉ. स्पिन्क यांनी पहिल्या खंडात एका महाकाव्याप्रमाणे रंगवली आहे. अजिंठा येथे लेणीनिर्मिती झाली दोन टप्प्यांत- त्यातल्या सातवाहनकालीन कालखंडात, वाघूर नदीच्या प्रशस्त नागमोडी वळणावर मध्यभागी काही बौद्ध चत्य आणि विहार इ.स.पूर्व पहिल्या शतकात खोदण्यात आले, यासाठी व्यापारी आणि विविध नागरिकांनी देणग्या दिल्या होत्या.

पुढे तीन शतकांच्या निद्रेनंतर या दरीला जाग आली ती उपेंद्रगुप्त या वाकाटकांच्या मांडलिक आणि ऋषिक समूहाच्या राज्याच्या बौद्ध धर्म प्रेमामुळे! या तीन शतकांत बौद्ध धर्माचे स्वरूप कमालीचे बदलले होते आणि त्यात बौद्ध धर्माचे विविध पंथांमध्ये विकास आणि विभाजन झाले होते, बोधिसत्त्वाचा आदर्श ठेवून धार्मिक कार्यातून पुण्यसंचय हे मुख्य ध्येय बनले होते. त्यातूनच, ऋषिक राजा उपेंद्रगुप्त आणि वाकाटकांचा प्रधानमंत्री वराहदेव यांनी जुन्या लेण्यांच्या बाजूला नवीन राजप्रासादसदृश बौद्ध विहारनिर्मितीचा बृहद् प्रकल्प सुरू केला. त्यात वाकाटकांचे दुसरे मांडलिक अश्मक देशाच्या (औरंगाबाद) अश्मक राजाने एका टोकापासून लेणी खोदण्यास प्रारंभ केला. बरोबरीने मथुरासारखे मोठे व्यापारी आणि धनाढय़ांच्या लेणी खोदण्यास सुरुवात झाली. थोडय़ा उशिराने, मुळात परममाहेश्वर असलेल्या पश्चिम वाकाटक सम्राट हरिषेण याने या बौद्ध लेणी प्रासादनिर्मितीमध्ये उडी घेतली आणि त्यातच, ऋषिक आणि अश्मकांमध्ये बेबनाव होऊन अश्मकांनी उपेंद्रगुप्तच्या राज्यावर चढाई केली. या राजकीय घडामोडींमुळे उपेंद्रगुप्ताने शत्रू राज्याच्या लेण्यांचे काम बंद ठेवले आणि या सत्तासंघर्षांत अजिंठा लेण्यांच्या खोदकामास अडथळे येत गेले. तरीही तीन शतकांच्या खंडामुळे, सुरुवातीला चाचपडणारी कारागीर पिढी नवीन तंत्रज्ञान शिकून लेणीनिर्मितीत त्याचा उपयोग करू लागली. सर्वोत्तम शिल्पकलानिर्मितीची एक चढाओढ सुरू होती.

पाचव्या शतकातील सम्राट हरिषेण हा त्या काळातील बहुधा जगातील सर्वात मोठा सम्राट असावा. पूर्व आणि पश्चिम समुद्रापर्यंत पसरलेल्या राज्याच्या या अधिस्वामीने अनेक छोटय़ा-मोठय़ा राजांना मांडलिक केले होते आणि समुद्री व शुष्कमार्गी व्यापाराद्वारे राज्यात सुबत्ता निर्माण केली होती. त्या काळच्या वैभवाचे, विकासाचे, अभिजात सौंदर्याचे यथार्थ प्रतििबब अजूनही अजिंठा चित्रांमध्ये जिवंत आहे. कातळकोरीव दगडातील लेण्यांमधील राजवाडे, भव्य पर्वत, वनराजी आणि नगर संस्कृतीचे साकारलेले दृश्य या निश्चितच कविकल्पना नाहीत, समकालीन जीवनाचा आरसा आहे. राजाश्रयाने निर्माण झालेले भव्य बौद्ध प्रासाद, शिल्प आणि चित्रकला हे तत्कालीन सुवर्णयुगाचे संकेत कारागिरांनी अजिंठा येथे घडवले होते.

इकडे, अश्मक-ऋषिक संघर्षांत धार्मिक वृत्तीच्या उपेंद्रगुप्तांचा पराभव होऊन त्याच्या लेण्यांचे काम थांबले आणि अश्मकांनी ऋषिकांच्या लेणींचा विध्वंस करत आपल्या लेणीचे काम वेगाने सुरू केले. हे होत असताना, एक भयंकर कट करून अश्मकांनी सम्राट हरिषेणाचा मृत्यू घडवून सत्तापालट करवला आणि हरिषेणाचा मुलगा सर्वसेन या तुलनेने दुर्बल मुलाला राज्यपदी बसवले. अशा धामधुमीत इतर अजिंठा लेणींच्या कामाला मोठी खीळ बसली आणि अश्मक सोडता इतर लेणींचे काम ठप्प झाले. राजाश्रयाने चालू झालेले काम पूर्णत्वास नेण्याची बौद्ध आचार्यानी धडपड केली; पण जनसामान्यांची किरकोळ पुण्यार्थ दाने वगळता अजिंठाचा आश्रय तुटला आणि एखाद् दुसरा अपवाद वगळता अजिंठा लेणी काळाच्या पडद्याआड गेली.

हे सर्व घडले अवघ्या १८ वर्षांत (इ.स. ४६२ ते ४८०), असा क्रांतिकारी सिद्धांत डॉ. स्पिन्क यांनी ‘शॉर्ट क्रोनोलॉजी’मध्ये मांडला. हे ऐकून भारत इतिहास अभ्यास जगतात प्रचंड खळबळ माजली आणि असा चमत्कृतीपूर्ण दावा मानायचा की नाही, याबद्दल अभ्यासकांचे दोन गट पडले. मुख्यत: शिलालेख आणि इतर लिखित साहित्याच्या आधारे अजिंठा अभ्यासणाऱ्यांना हा दावा पटणार नाही. यासाठी ज्या अनेक गृहीतकांच्या आधारे डॉ. स्पिन्क यांनी अजिंठय़ाचा इतिहास उभा केला आहे, त्या कला-स्थापत्य साधनांचा वापर आणि अन्वयार्थ समजून घेणे आवश्यक आहे. विविध अभ्यासकांनी त्यांच्या मांडणीवर घेतलेल्या आक्षेपांचे खंडनमंडन त्यांनी त्यांच्या दुसऱ्या खंडात- ‘आग्र्युमेंट्स अबाऊट अजंठा’ – केले आहे. हे करताना समकालीन लिखित आणि बाघ, घटोत्कच, औरंगाबाद, पितळखोरे, बानोटी अशा संबंधित स्थळांमधील पुराव्यांचा समावेश केला आहे. तसेच हरिषेणाच्या मृत्यूनंतरच्या राजकीय घडामोडी त्यांनी उत्तरकालीन ‘दशकुमार चरित’ या दण्डी लिखित ग्रंथातील घटनांच्या आधारे स्पष्ट केल्या आहेत. हे करताना त्यांनी पठडीतील इतिहास संशोधकापलीकडे जाऊन, एखाद्या सिद्धहस्त कवीप्रमाणे पण सद्धांतिक मूल्यांशी तडजोड न करता प्रतिभा दाखवली आहे! इतकेच नाही, तर अनेक दशके त्यांनी ‘अजंठा साइट सेमिनार’ राबवून त्यांची मांडणी विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधकांपर्यंत पोहोचवली आहे. आज अभ्यासाअंती, देशी

आणि परदेशी संशोधक त्यांचे संशोधन मान्य करत आहेत.

‘द अरायव्हल ऑफ द अनइन्व्हायटेड’ या अजिंठा इतिहासावरील तिसऱ्या खंडात त्यांनी सम्राट हरिषेणाच्या मृत्यूनंतरच्या अजिंठा येथील लेणी विकासावर लिहिले आहे. राजाश्रय तुटल्याने अनेक जनसामान्यांना अजिंठाच्या बौद्ध प्रासादात छोटय़ा-मोठय़ा प्रतिमांसाठी, चित्रांसाठी पुण्य दान करण्याची संधी मिळाली. त्यातून मूळच्या बौद्धप्रासाद आराखडय़ाला छेद देणारी, नवीन धार्मिक कल्पनांना सुसंगत अशी शिल्प आणि चित्रनिर्मिती झाली. लेणींमधील शिस्त मोडून अनाहूत शिल्प आणि चित्रांनी लेणी व्यापल्या. काही काळापुरती बौद्ध पूजाअर्चा सुरू होती, हे डॉ. स्पिन्क यांनी दाखवून दिले आहे. पुढे मात्र राजकीय परिस्थिती चिघळल्यावर कारागीर, दानकत्रे सोडून गेले आणि सर्व काम थांबले. आज अजिंठाची एकही लेणी त्याअर्थी पूर्ण नाही!

चौथ्या खंडात- ‘अजंठा हिस्टरी अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट : इयर बाय इयर’ – डॉ. स्पिन्क यांनी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील लेणी कशा कशा घडल्या, याचा वार्षिक आढावा घेतला आहे. हे करताना डॉ. स्पिन्क यांनी खूप तपशिलात जाऊन कारागिरांची काम करण्याची पद्धत, स्थपती, दानकत्रे व बौद्ध आचार्य यांच्यातील समन्वय, निवडीचे निकष, तंत्रज्ञानांमधील विकास, विविध कला प्रभाव, राजकीय परिस्थितीचे घटनास्थळी पडणारे पडसाद, इतकेच काय तर, होणाऱ्या चुकांचाही इत्थंभूत आढावा घेतला आहे.

पाचवा खंड (‘केव्ह बाय केव्ह’) म्हणजे त्या-त्या लेणीचा चरित्र वृत्तान्त आहे. सर्वोत्कृष्ट आणि सर्वार्थाने राजस असणारे पहिले लेणे हे पूर्णार्थाने सम्राट हरिषेणाचे लेणे कसे आहे, हे डॉ. स्पिन्क सिद्ध करतात. विविध नकाशे, आरेखन आणि छायाचित्रांद्वारे अजिंठाचे स्थळमाहात्म्य आपल्यासमोर उभे राहते. त्यात, स्तुपावर विशिष्ट काळात सूर्यकिरण पडावे म्हणून लेणीच्या अभिमुखता बदलण्याचे प्रयोग वाचणे अतिशय रोचक आहे.

सहाव्या खंडात (‘डिफायनिंग फीचर्स’) डॉ. स्पिन्क आपल्यासमोर त्यांच्या खेळातले पत्ते उघड करतात. वर सांगितल्याप्रमाणे, कला-स्थापत्त्य संशोधनाची भाषा त्यांनी वाकाटक काळासाठी निश्चित केली आहे. स्तंभ, द्वारशाखा, चंद्राशीला, बुद्धाच्या मूर्तीमधले बदल, स्तंभशीर्ष, खिडक्या, दरवाजाच्या चौकटी, रंगकामातील बारकावे.. अशा अनेक स्थापत्य घटकांना मुळाक्षरे मानून त्यातील बदल स्थल-कालाच्या पटावर नीट मांडून सुसंगती लावली आहे. ही सुसंगती आणि अन्वयार्थ लावण्याची विलक्षण संशोधन पद्धत त्यांनी शोधली आहे. आज फक्त अजिंठाच नाही, तर इतर अनेक खोदीव लेणी अभ्यासात या ‘नव-पुरातत्त्व’ पद्धतीचा उपयोग होऊ शकतो.

सातव्या खंडात (बाघ, दण्डीन्, सेल्स अ‍ॅण्ड सेल डोअरवेज्’) मध्य प्रदेशातील बाघ लेणी आणि अजिंठा यांची सोदाहरण तुलना करून अजिंठावरील बाघ लेणीमधील तंत्रज्ञानाचा प्रभाव विशद केला आहे.

अलीकडे डॉ. स्पिन्क हे आठव्या खंडावर काम करीत होते. त्यात वाकाटकोत्तर इतिहासाला मिळणारी कलाटणी आणि कलचुरी राजवटीचा उदय हे ते ‘दशकुमार चरिता’च्या आधारे स्पष्ट करणार होते. तसेच अजिंठा लेणींचे उत्तरकालीन कलचुरी आणि इतर लेणींवरील प्रभाव दृश्य स्वरूपात प्रस्थापित करण्याचा त्यांचा मानस होता.

या पुस्तकांव्यतिरिक्त त्यांनी ‘अजंठा टु एलोरा’ हा ग्रंथ लिहून पश्चिम भारतातील लेणी निर्मिती परंपरेवर सद्धांतिक विवेचन केले आहे. तसेच ‘अजंठा : ए ब्रीफ हिस्टरी अ‍ॅण्ड गाइड’ या छोटेखानी पुस्तकातून त्यांनी हा विषय पर्यटकांना सोप्या भाषेत समजेल अशी सचित्र मांडणी केली आहे.

डॉ. स्पिन्क यांनी अजिंठा या जागतिक ऐतिहासिक वारसास्थळाचा दीर्घकाळ अभ्यास करून त्याचे विविध पलू शास्त्रीय पद्धतीने भारतीयांच्या नजरेस आणून दिले. या असामान्य कार्यामुळे ते अजिंठा लेणींच्या इतिहास-संस्कृतीचे खऱ्या अर्थाने आश्रयदाते ठरतात!

(लेखिका इतिहास व पुरातत्त्व संशोधक आहेत.)