पंकज भोसले

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एखाद्या पट्टीच्या वाचकाने ठरविले तरी त्याला निवडक उत्तम कथा वाचण्यासाठी वेळ पुरणार नाही, इतक्या संख्येने ब्रिटिश, अमेरिकी नियतकालिके कथा प्रकाशित करीत आहेत. अन् आश्चर्य म्हणजे गेल्या काही महिन्यांत ‘करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर..’चा टाहो त्यात दबक्या सुरातही कुठे व्यक्त झालेला दिसत नाही. सालाबादप्रमाणे यंदाही थाटात प्रकाशित झालेल्या नियतकालिकांच्या ‘समर फिक्शन’ विशेषांकासह तेथील कथाव्यवहाराविषयी..

‘ग्रेट मराठी कादंबरी’ लिहिण्याच्या नादात आपल्याकडे साठोत्तरी काळात कथाप्रकार गौण ठरविला गेला. दोन हजारोत्तर काळापर्यंत अभिप्रेत असलेली ‘ग्रेट मराठी कादंबरी’ काही बनली नाही, पण साठोत्तरीपासून आटत जाणाऱ्या आणि ‘महान’पंथी संपादक-वाचकांच्या अपसमजांतून ‘कथा वाचतो कोण आता?’ म्हणण्याची टूम इथल्या साहित्य व्यवहार नावाच्या धूसर प्रदेशात रूढ झाली. नव्या-जुन्या लेखकांच्या चांगल्या प्रयोगक्षम मराठी कथा वाचण्यासाठी दिवाळी अंकांची वाट पाहावी लागते. पण त्यातल्या मोजक्या कथांचीही चर्चा, समीक्षा अथवा चर्वण कुठल्याही व्यासपीठावरून घडत नाही. ‘व्हॉट्सअ‍ॅप’-‘फेसबुक’वर नॉस्टाल्जिया कुरवाळण्यासाठी थाटलेली कथित ‘बुकक्लबें’ व ‘पुस्तकप्रेमीं’च्या वाचनवृद्ध धुरिणींनाही ते अजून जमलेले नाही. त्यामुळे कित्येक दखलपात्र कथालेखकांची पुस्तके येऊनही कायम दुर्लक्षित राहतात.

नवे वाचण्याची, आकलनाची क्षमता हरवून बसलेल्या बुजुर्ग वाचकांची पिढी जेव्हा बहुसंख्य होते, तेव्हा त्यापुढची पिढी अर्थातच वाचनज्ञानाबाबत निकृष्टच निपजते. नव्वदोत्तरीनंतर आटत गेलेली मराठी कथा-कादंबऱ्यांची वाचकसंख्या हे त्याचे ढळढळीत उदाहरण आहे.

एका हाताची बोटे पूर्ण मोजता येणार नाहीत इतक्या संख्येने प्रकाशित होणाऱ्या मराठीतील दर्जेदार साहित्यिक मासिकांनी गेल्या काही वर्षांत कथेची जागा कमी केली. वैचारिक लेखनाच्या नावावर संपादकीय धारणांचा मत-धबधबा अधिक प्रमाणात वाचकांसमोर उभा केला. याचा परिणाम ती नियतकालिके एकामागोमाग बाद होण्यात झाला. अर्थात सतत चांगल्या मराठी वाचण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या वाचकांसाठी इथले वास्तव भयावह असले, तरी आंतरराष्ट्रीय साहित्य व्यवहारात किमान मराठीप्रमाणे स्थिती नाही.

अमेरिका आणि जगातील विचारवंत, पत्रकारांच्या गेल्या पाच-सहा पिढय़ा घडविणाऱ्या ‘न्यू यॉर्कर’ साप्ताहिकाला दर आठवडय़ाला छापला जाणारा कथाप्रकार अद्यापतरी गौण वाटलेला नाही. अमेरिकेतील विद्यापीठांच्या ताब्यात असलेली ‘व्हर्जिनिया क्वार्टरली रिव्ह्य़ू’ ,‘प्लोशेअर’ (इमर्सन कॉलेज, बोस्टन) ही मासिके दरमहा जगभरातील उत्कृष्ट कथालेखकांना प्रचंड मानधन देऊन लिहिते करतात. ‘प्लेबॉय’, ‘हार्पर्स’ या मासिकांमध्येही बंडखोर कथासाहित्याचे दर अंकात स्वागत असते. फ्रान्सिस फोर्ड कोपोला हे नाव हॉलीवूडमधील प्रख्यात दिग्दर्शक म्हणून आपल्याला माहिती असते. पण त्याच्या मालकीचे ‘झोइट्रोप : ऑलस्टोरी’ हे मासिक गेली दोन दशके ब्रिटिश-अमेरिकी कथालेखकांच्या भरभराटीसाठी ‘गॉडफादर’ची भूमिका बजावत आहे, याची जराही कल्पना नसते. ‘पॅरिस रिव्ह्य़ू’, ‘अ‍ॅटलांटिक’, ‘नॅरेटिव्ह’, रेमण्ड काव्‍‌र्हर या कथाकाराच्या प्रेरणेतून निघालेले ‘काव्‍‌र्ह’, जगभरातील विविध देश-प्रांत निवडून तिथल्या कथांवर विशेषांक काढणारे ‘वर्ल्ड विदाउट बॉर्डर्स’ ही लोकप्रिय आहेत. याशिवाय नित्यनेमाने निघणाऱ्या लिटिल मॅगझिन्समधून नव्या-चांगल्या कथाकारांची उमेदवारी घडत आहे. ‘पिथहेड चॅपेल’, ‘जॉयलॅण्ड’, ‘स्टोरीसाऊथ’ ही त्यातली मोफत वाचण्यासाठी असलेली काही उत्तम उदाहरणे.

दरवर्षी ‘बेस्ट अमेरिकन शॉर्ट स्टोरीज्’चे खंड निघतात. त्यातल्या २० कथा निवडण्यासाठी अमेरिका व कॅनडामधील शंभर महत्त्वाच्या मासिकांमधील किमान पाचशे ते आठशे कथांमध्ये चुरस असते. या खंडाला अनुसरूनच ‘बेस्ट ब्रिटिश शॉर्ट स्टोरीज्’ आणि ‘बेस्ट ऑस्ट्रेलियन शॉर्ट स्टोरीज्’ही दरवर्षी निघतात. (१९७०-८० च्या काळात ‘सर्वोत्कृष्ट मराठी कथा’चे खंड निघत होते. राम कोलारकर यांच्या संपादनाखाली तयार झालेल्या १४ व्या खंडात त्यांनी मराठीतील १७६ नियतकालिकांमधील सुमारे सव्वाचार हजार कथांमधून १६ कथा निवडल्याची नोंद केली आहे!) विशेष म्हणजे त्यांना निवडीसाठी चांगल्या कथांची कमतरता नसते. एखाद्या कडव्या कथाप्रेमी वाचकाने ठरविले तरी त्याला वर्षभरात प्रसिद्ध होणाऱ्या निवडक उत्तम कथा वाचण्यासाठी वेळ पुरणार नाही, इतक्या संख्येने त्यांचे प्रकाशन होत असल्याची स्थिती सध्या अमेरिकी आणि ब्रिटिश साहित्यप्रदेशात आहे. अन् गंमत म्हणजे ‘करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर..’चा टाहो त्यात कुठे दबक्या सुरातही व्यक्त झालेला दिसत नाही.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात अमेरिकेत जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवंशीयाच्या हत्येचे तीव्र पडसाद उमटले. ‘न्यू यॉर्कर’ त्याविषयी सर्वोत्तम रिपोर्ताज आणि लेखांची मालिका देणार, हे साप्ताहिकभक्तांना अपेक्षितच होते. पण दरवर्षी ‘न्यू यॉर्कर’चा जून महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ाचा जोडकथा विशेषांक प्रसिद्ध केला जातो. जगात सर्वाधिक गाजत असलेले लेखक ‘न्यू यॉर्कर’साठी कथा लिहितात. अमेरिकेतील तत्कालीन ऐतिहासिक वृत्तघटनेचे विश्लेषण दोन आठवडय़ांनंतर प्रकाशित करण्याचा निर्णय घेत आपली कथाविशेषांकाची परंपरा ‘न्यू यॉर्कर’ने पाळली. एमा क्लाइन या ताज्या कथालेखिकेसह जपानी कादंबरीकार हारुकी मुराकामी आणि गतशतकातील अर्नेस्ट हेमिंग्वे (मृत्यू- २ जुलै १९६१) या रांगडय़ा लेखकाची एक अप्रकाशित कथा ‘न्यू यॉर्कर’ने दोन आठवडय़ांपूर्वी प्रसिद्ध केली.

हारुकी मुराकामी हा वयाच्या आधारावर बुजुर्ग म्हणता येईल, पण लेखनाच्या वकुबानुसार तरुण राहिलेला लेखक आहे (तारुण्यात बंडखोर, मध्यमवयात कौटुंबिक आणि उतारवयात आध्यात्मिक लेखनाची परंपरा जगात बहुधा मराठी लेखकांनीच तयार केली आहे. इतरत्र ती नाहीच). तो बहुधा वर्षांतून दोनेक कथा ‘न्यू यॉर्कर’साठीच लिहितो. २००६ सालच्या ‘न्यू यॉर्कर’च्या अंकात ‘शिनागावा मंकी’ ही महिलांचे नाव चोरणाऱ्या शिनागावा प्रांतातील माकडाविषयीची कथा त्याने लिहिली होती. ही नाव चोरण्याची संकल्पना हास्यास्पद वाटू शकेल. पण माणसासारखे बोलणारे माकड जिचे नाव चोरते; तिला आपल्या नावाचे अस्तित्व संपल्याची जाणीव होऊ लागते. त्या नामस्मृतिभंश झालेल्या महिलेच्या आयुष्यातील घटनांसह रहस्यकथेच्या वळणांनी रंजक बनत जाते. मुराकामीच्या कथेत जादुई वास्तववाद पुरेपूर असला, तरी ती रूपक-संदेश-प्रचार या पातळीवर शून्य कामगिरी करू इच्छिते. त्याच्या कथेचा अर्थ त्याने वाचकांच्या वकुबावर सोडलेला असतो. पण कथा सांगण्याची हातोटी त्या लेखनात प्रचंड गुंतविणारी असते. तब्बल १४ वर्षांनी मुराकामीने ‘कन्फेशन ऑफ शिनागावा मंकी’ ही कथा लिहून आधीच्या कथेतील माकडाच्या गुन्ह्य़ाचे विस्तृत स्पष्टीकरण दिले आहे. एका गजबजत्या शहरातील आडबाजूच्या मुर्दाड विश्रामगृहात निवेदकाला वृद्ध झालेले माकड सापडते. निवेदकासोबत बीयर पिताना संगीत आणि प्रेमावर तत्त्वज्ञाच्या थाटात माकडाची चर्चा चालते आणि ती नुसतीच माकडकथा राहात नाही. कथेच्या ओघात मांजर आडवे आणण्याची हौस असलेल्या मुराकामीने याही कथेत एक मांजर निवडले आहे. त्या मांजराच्या नाकाची रचना विचित्र असल्यामुळे त्याच्या भीषण घोरण्याचे वर्णन त्याने केले आहे. ही संपूर्ण कथाच एखाद्या स्वप्नाचा वृत्तान्त वाटू शकतो. पण मुराकामीच्या लेखणीने त्या स्वप्नाला रंगत आणली आहे.

अर्नेस्ट हेमिंग्वे हा लेखक मराठीतील थोरा-मोठय़ांनी परिचित करून ठेवला आहे. त्याच्या ‘द ओल्ड मॅन अ‍ॅण्ड द सी’ या सर्वोत्तम कलाकृतीची वर्षअखेर कितवीशी आवृत्ती निघणार आहे. त्या आवृत्तीचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे ती अलीकडे सापडलेली हेमिंग्वेची ‘पस्र्यूट अ‍ॅज हॅपीनेस’ ही कथाही त्या पुस्तकात छापण्यात येणार आहे. बोस्टनमधील जॉन एफ. केनडी ग्रंथालयात जतनावस्थेत असलेल्या हेमिंग्वेच्या हस्तलिखितांमध्ये अभ्यासकांना ही अप्रकाशित कथा सापडली. हेमिंग्वेच्या नातवाने शोध घेतलेल्या तपशिलांत तिचा लेखनकाळ हा १९३३ ते दुसऱ्या महायुद्धापर्यंत (म्हणजेच ‘द ओल्ड मॅन अ‍ॅण्ड द सी’च्या आधीचा) असल्याचे स्पष्ट झाले. ‘द ओल्ड मॅन..’च्या कथानकासारखेच येथे कथानक घडते. नायक-निवेदक क्युबामध्ये अनिता नावाच्या बोटीवर मासेमारी करतो. एक आवाढव्य मासा हाताला लागण्याचे अन् त्याचे निसटण्याचे वर्णन असलेली ही कथा ‘न्यू यार्कर’च्या यंदाच्या समर फिक्शन विशेषांकाचे खास आकर्षण आहे. पण एमा क्लाइन या लेखिकेची अवाढव्य आकाराची कथा त्याहून आकर्षक विषयावर केंद्रित आहे. हार्वे वाइनस्टाइनच्या कुकर्मामुळे अमेरिकेतून ‘#मीटू’ मोहिमेची ज्वाळा जगभर पसरली. एमा क्लाइनच्या ‘व्हाइट नॉइज’ या कथेत हार्वे वाइनस्टाइनला शिक्षा सुनावली जाण्याच्या आदल्या दिवसातील प्रसंगांची मालिका आहे. अर्थात काल्पनिक असलेल्या या कथेत हार्वे भारतातील ऋषी-मुनींकडे पापक्षालनसाठी येतो, अशा काल्पनिक  प्रसंगाचा गमतीशीर उल्लेख आहे. ही पूर्ण गोष्ट समांतर इतिहासाला कथामाध्यमाच्या आधारे बदलून रंजक कसे करता येऊ शकते, हे उत्तमरीत्या दाखविते.

‘व्हर्जिनिया क्वार्टरली रिव्ह्य़ू’ने आपल्या कथाविशेषांकात दहा कथा दिल्या आहेत. त्यात भारतातील जयंत कायकिणी यांच्या १९८० च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या कन्नड कथेचा ‘दगडू परबस् वेडिंग हॉर्स’ अनुवाद हा मासिकाच्या संपादक मंडळाचा उत्तम शोध आहे. कायकिणींच्या कथा अलीकडेच इंग्रजीत अनुवाद झाल्यानंतर जगभरात गाजल्या. त्यांच्या अनेक कथांना मुंबई/ठाण्यातील परिसरांचा आणि चाळीतील मराठी व्यक्तिरेखांचा संदर्भ आहे. ‘व्हीक्यूआर’मधील कथा मुलुंड आणि ठाण्यात घडते. मुलुंड रेल्वे स्थानकापासून ते ठाण्याच्या नौपाडय़ाचे चार दशकांपूर्वीचे वर्णन कायकिणींनी दगडू परबच्या लग्नादरम्यान उधळलेल्या घोडय़ाच्या गोष्टीद्वारे केले आहे. ए. इगोनी बॅरेट या नायजेरियन लेखकासह अनेक ज्ञात-अज्ञात साहित्यिकांच्या कथा या अंकात आहेत.

‘एस्क्वायर’च्या ब्रिटिश आवृत्तीत दर महिन्याला एक कथा छापून येते. ताजा अंक १२ कथांनी भरलेला असून विल सेल्फ, ओटेशा मॉशफेग यांच्यासह अनेक लक्षवेधी कथालेखकांचा त्यात सहभाग आहे. ‘ग्रॅण्टा’ने सर्वात आधी कथाविशेषांक काढला असून हारुकी मुराकामी यांच्या ताज्या कथेसह ११ कसदार लेखकांच्या कथा त्यात आहेत. ‘बिग इश्यू’ या ऑस्ट्रेलियातील मासिकाने भरगच्च १४ कथांचा अंक दिला आहे.

‘करोना’ने आयुष्य बदललेले असले, तरी अमेरिकी-ब्रिटिश कथाव्यवहार आधीच्याच वेगाने पुढे जात आहे. वाचणारे आहेत म्हणून आणि कथामाध्यमाची रंजन क्षमता ज्ञात असल्यामुळे चांगल्या लेखनाचा आणि प्रकाशनाचा व्याप तिथे सुरू आहे. मराठीत या साहित्य प्रकाराला गौण ठरवून कथाअवर्षणाचा महाप्रदेश बनला असताना जगभरातील कथास्थिती सुखावह असल्याचा आनंद मानण्याशिवाय दुसरा पर्याय सध्या तरी नाही.

pankaj.bhosale@expressindia.com

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on british american magazine summer fictions special issue in corona period abn