आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंकज भोसले

पुस्तक न वाचताच त्याबद्दल समाजमाध्यमांतून मतप्रदर्शन करणारा संप्रदाय जगभरात पसरतो आहे. मराठी वाचन आणि महाराष्ट्रही त्याला अपवाद नाहीच, पण यंदा प्रतिष्ठित ‘बुकर पारितोषिका’च्या अंतिम लघुयादीतील पुस्तकेदेखील या संप्रदायापासून ‘वाचलेली’ नाहीत.. या यादीतील सर्व पुस्तकांची दखल घेणाऱ्या नैमित्तिक सदराच्या पाचव्या वर्षांतला हा पहिला लेख यादीच्या धावत्या परिचयाचा..

लिआ प्राइस नावाच्या अमेरिकी ग्रंथइतिहासकार आहेत. त्यांचा अभ्यासविषय प्रामुख्याने ब्रिटिश कादंबरी आणि बदलत्या डिजिटल विश्वातील साहित्य वाचनसवयींवर आधारलेला आहे. ‘गेल्या शंभर वर्षांत वाचनाचे सुवर्णयुग कधीच नव्हते,’ हा त्यांनी केलेला दावा बराच गाजला. अन् त्या समर्थनार्थ शेकडो दाखल्यांसह त्यांनी ‘व्हॉट वी टॉक अबाऊट, व्हेन वी टॉक अबाऊट बुक्स – द हिस्ट्री अ‍ॅण्ड फ्यूचर ऑफ रीडिंग’ नावाचा ग्रंथही गेल्या वर्षी प्रकाशित केला. साधारणत: ९०च्या दशकात ध्वनिचित्र प्रसारण (भारतीय संज्ञावलीत केबल टीव्ही), संगणक यांच्या अतिक्रमणाने ग्रंथवाचनावर परिणाम होत असल्याकडे लक्ष वेधले गेले. मोबाइल, समाज माध्यमांच्या आरंभकाळात अमेरिकेत विविध संस्था-ग्रंथालये यांच्या राष्ट्रीय पाहणीतून १९९२ ते २००४ या काळात वाचनाची पातळी देशस्तरावर १४ टक्क्यांनी घटल्याचे समोर आले. पुस्तकांची एकटीदुकटी दुकाने बंद होऊन त्याजागी ‘स्टारबक्स’ ही कॉफीगृहे उभारली गेली. २००८ ते १० या काळात मुद्रित माध्यमांचे भवितव्य हा चर्चेचा विषय बनला. वाचन व्यवहाराचे संक्रमण पुस्तकाकडून ई-बुककडे झाले. २०११ साली (किंडल आता आहे, त्या अद्ययावत अवस्थेत तयार झाले त्या वर्षी) ई-बुक्सची विक्री ही पुठ्ठा-बांधणीच्या ग्रंथांहून अधिक झाली. पण २०१६ पर्यंत चित्र पालटले. ‘ग्रंथ वाचनाचे महत्त्व’, ‘प्रत्यक्ष पुस्तक वाचनाचे फायदे’, ‘पुस्तक वेडय़ांवरची पुस्तके’ आदींचा समाजमाध्यमे, माध्यमे आणि तारांकित व्यक्तींच्या प्रचारातून मारा झाल्यावर ई-बुक्सशी फारकत घेऊन पुन्हा ग्रंथखरेदी आणि वाचनाचा कल वाढला. प्रामाणिक वाचकांसारखे ‘शहाणे पुस्तकवेड’ पांघरण्याच्या अनेकांच्या नव्या सवयीमुळेही २०१८ साली ग्रंथखरेदीचा आलेख उंचावला.

हा तपशील यासाठी की लिआ प्राईस यांच्या हाताशी ब्रिटन, अमेरिकेत शतकभरात केल्या गेलेल्या कित्येक सर्वेक्षणांची अचूकतेच्या जवळपास जाणारी आकडेवारी आहे. त्यातून येणारे निष्कर्ष आणि स्वत:चे निरीक्षण या बळावर दोन खंडांमधील बदलत्या वाचनस्थितीबाबत ठामपणे बोलणे त्यांना शक्य आहे. प्राईस यांच्या नजरेतून भारताच्या आणि विशेषत: महाराष्ट्राच्या वाचन व्यवहाराकडे पाहायचे झाल्यास १९९० ते २०२० या कालावधीत व्यक्तींच्या वाचनक्रियेवर ब्रिटन- अमेरिकेतील नागरिकांसारखेच आक्रमण झाले. आपल्याकडेही केबल, संगणक आणि मोबाइल आल्यानंतर मनोरंजनाच्या सोप्या पर्यायाला कवटाळणारा वर्ग वाढायला लागला. त्यानंतर खासगी वाचनालये, छोटय़ा प्रकाशन संस्था, डझनांवर मासिके, साप्ताहिके, बालसाहित्याची पुस्तके आणि नियतकालिके बंद पडू लागल्यावर उच्चरवात वाचनसंस्कृती विघटनाबाबत ओरडा सुरू झाला. माध्यमांपासून-समाजमाध्यमांवर वाचनाचे महत्त्व बिंबविण्याचा प्रयत्न झाला, पुस्तकांचे वेड मांडणारी ग्रंथसंपदा उत्पन्न झाली.. तरीही आपला ग्रंथव्यवहार तुलनेने म्हणावा तितका उभारी घेऊ शकला नाही. आपली वाचनस्थिती आकडेबद्ध नसली, तरी ती भूषणावह नाही हे उघड आहे. व्यसनासम कालावधी समाजमाध्यमांवर व्यापल्यानंतर उरणाऱ्या वेळेत साहित्य वाचनाची भूक व्यक्तींमध्ये शिल्लकच राहत नाही. साहित्य वाचनाची गरजच हरवत चाललेला व्यक्तिसमूह समाजात गेल्या २० वर्षांच्या कालावधीत फोफावत चालला आहे. त्यामुळे मराठी पुस्तकाची आवृत्ती हजारावरून तीनशे-पाचशे अशीही छापली जाऊ लागली. अन् प्रामाणिक ग्रंथप्रेमीवगळता ‘शहाणे पुस्तकवेड’ पांघरलेला इथला वाचकवर्ग समाजमाध्यमांवर आपल्या वाचनाची जाहिरात करण्यापुरता किंवा मराठीतील यच्चयावत गाजलेल्या पुस्तकांच्या ‘पीडीएफ’ पसरविण्यात धन्यता मानू लागला. संगणकात, मोबाइलमध्ये पुस्तकाची ‘पीडीएफ’ संग्रहित करण्याला वाचन समजू लागला. ‘पुस्तक न वाचताच नाचणारा’ संप्रदाय समाज माध्यमांतून प्रगट होण्याच्या सुलभतेमुळे जगभरात पसरत असला, तरी आपल्याकडेही दुर्दैवाने त्याचे प्रमाण वाढत चालले आहे.

गेल्या काही वर्षांत बुकरची दीर्घयादी जाहीर झाल्यापासून लघुयादी ठरेपर्यंत ग्रंथ वाचण्याऐवजी ‘नाचणाऱ्या संप्रदाया’चे यूटय़ूब माध्यमाद्वारे दर्शन सर्वाधिक ठळक होत आहे. दीर्घ यादीतील डझनावारी पुस्तकांचे गठ्ठे घेऊन (त्यातील एकही वाचले नसताना) समीक्षकांच्या वरताण वैयक्तिक मतांचा आणि संभाव्य लघुयादी, विजेते ठरविण्याचा गमतीशीर प्रकार त्यांच्याकडून केला जातो. साधारणत: गार्डियन पत्राच्या ऑनलाइन आवृत्तीवर पहिल्यांदा बुकरची लघुयादी झळकते. या आठवडय़ात ती जाहीर झाल्यानंतरच्या काही तासांमध्ये यूटय़ूबवर ‘साहित्य शिरोमणीं’चा उच्छाद सुरू झाला. मुखपृष्ठांपासून शीर्षकापर्यंत यादीतील पुस्तकांवर बेछूट मतांचा पाऊस पाडला गेला. अन् तासांमध्ये या कलाकार समीक्षकांना काही हजारांवर दर्शकही उपलब्ध झाले. गंमत म्हणजे याच दिवशी १६२ पुस्तके वाचून अंतिम सहा पुस्तके ठरविणाऱ्या निवड समितीची यंदाच्या पुस्तकांवरची खरीखुरी मते असलेला अधिकृत व्हिडीओही यूटय़ूबवर दाखल झाला. त्याला २४ तास उलटून गेल्यानंतर जेमतेम ७०० जणांनी पाहिल्याची नोंद उपलब्ध होती. (मंगळवार ते शुक्रवार या चार दिवसांतही त्यात फार भर पडली नाही.) एकुणातच साहित्य वाचनाला गांभीर्याने घेणारी जमात जगात किती विखुरलेली आणि विरळ आहे, हे यातून स्पष्ट होते.

अमेरिकी पुस्तकांचा समावेश झाल्यापासून या दशकात बुकर पुरस्कार खऱ्या अर्थाने जागतिक झाले. वर्षांतील सर्वोत्तम साहित्य कोणते वाचावे, याबाबत अनेक निकषांवर घासूनपुसून तोलण्यात आलेली जागतिक स्तरावरची ग्रंथनिर्मिती या पुरस्काराच्या दीर्घ आणि लघुयादीतून वाचकांसमोर उपलब्ध होते म्हणून या पुरस्काराचे महत्त्व अधिक. या वर्षी ज्या महासाथीच्या कारणाने जगभरात अनेक गोष्टींची परिपूर्ती झाली नाही, तिच्यावर मात करीत परीक्षकांकडून शेकडो पुस्तके पीडीएफ स्वरूपात वाचून यंदा बुकरच्या दीर्घ आणि लघुयादीची निवड झाली, म्हणून त्यांचे कष्टही दखलपात्र ठरतात.

आरंभी उल्लेख केलेल्या लिआ प्राईस यांच्या पुस्तकामध्ये विविध मानसिक आजारांवर ग्रंथांचा उपचार कसा होतो, यावर चर्चा आहे. वैद्यक शाखेला समांतररीत्या विकसित होत असलेल्या ग्रंथचिकित्सेची माहिती आहे. ग्रंथांमुळे हिंसाचार आणि घटस्फोटांच्या प्रमाणात किती घट झाली, याचे सामाजिक पाहणीद्वारे काढलेले तपशील आहेत. ‘ग्रंथ हेच गुरू’ वगैरे उक्तीचा अर्थ शालेय पातळीपासूनच विसरलेल्या आपल्या समाजासाठी हे सारे अवघड वाटत असले, तरी खरे आहे.

परीक्षक मंडळाचे वाचन..

पहिल्या ब्रिटिश-आफ्रिकी प्रकाशक आणि संपादक म्हणून कित्येक दशके ओळख असलेल्या मार्गारेट बस्बी यांच्या अध्यक्षतेखाली यंदाचे परीक्षक मंडळ गेले वर्षभर ग्रंथवाचनात गुंतले होते. आत्तापर्यंत फक्त रहस्यरंजक कथा लिहिणाऱ्या ली चाइल्ड यांचा परीक्षक मंडळावर सहभाग ही यंदाची सर्वात आश्चर्यचकित करणारी गोष्ट होती. कारण जी लोकप्रिय आणि खूपविकी पुस्तके ली चाइल्ड यांनी लिहिली आहेत, त्यांना बुकरची पुस्तके वाचणाऱ्या साहित्य जगताने फारशी मान्यता दिलेली नाही. ग्रीक साहित्याच्या अभ्यासक आणि लेखिका एमिली विल्सन यांच्या नावावर अवघड विषयांना सोपे करून सांगणारी ग्रंथनिर्मिती आहे. परीक्षक मंडळातील लेम सिसे हे ब्रिटिश-आफ्रिकी साहित्यिक ब्रिटनच्या कवीकुळातील गेल्या चार दशकांतील महत्त्वाचे नाव आहे. तर समीर रहीम हे ब्रिटिश साहित्य पत्रकार प्रॉस्पेक्ट मासिकाचे प्रतिनिधी आहेत. लंडन रिव्ह्य़ू ऑफ बुक्स ते टेलिग्राफमध्ये त्यांनी साहित्यिक मुलाखती आणि समीक्षांमधून ओळख तयार केली आहे.

लंडन शहरात भेटून महिन्याभरात वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा करण्याचा बुकर परीक्षक मंडळाचा दरवर्षीचा शिरस्ता यंदा महासाथीने मोडला! सुरुवातीला ई-मेल्स आणि नंतर ‘झूम’ या दूरचित्र संवादाच्या माध्यमातून या परीक्षक मंडळाच्या बैठकी घडू लागल्या. ली चाईल्ड आणि एमिली विल्सन या अमेरिकेतून तर इतर तिघे ब्रिटनमधून १६२ पुस्तकांच्या पीडीएफ वाचनाचा आढावा घेत एकमेकांच्या मतांची चाचपणी करीत होते. यंदा लघुयादी प्रकाशित करण्यापूर्वी प्रत्येक पुस्तकाचे पुनर्वाचन करून त्यावर सार्वमत घेण्यात आल्याचे पारितोषिक समन्वयक गॅबी वूड यांनी जाहीर केले. प्रत्यक्ष पुस्तकाऐवजी संगणक, मोबाइल आणि लॅपटॉपवर कादंबरी वाचनाचा आणि पुनर्वाचनाचा या परीक्षकांचा दिनक्रम नुकताच न्यूयॉर्क टाइम्सने प्रसिद्ध केला आहे.

यादीचे वैशिष्टय़..

यंदाच्या लघुयादीचे वैशिष्टय़ म्हणजे सहापैकी चार जण पहिल्याच कादंबरीसाठी निवडले गेलेत. हिलरी मँटेल आणि अ‍ॅन टेलर या दीर्घयादीत झळकलेल्या बुजुर्ग आणि दिग्गज लेखिकांना त्यात स्थान नाही. तसेच बहुधा पहिल्यांदाच ब्रिटनमधील एकाही लेखकाचा लघुयादीत समावेश नाही. ‘ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर’ या अमेरिकेतून प्रसारित झालेल्या चळवळीच्या आधीपासून या पुस्तकांची निवडप्रक्रिया सुरू झाली होती. दोन परीक्षक कृष्णवंशीय असण्याचा संबंध, सहापैकी तीन कृष्णवंशीय लेखकांच्या कादंबऱ्या अंतिम यादीत येण्याशी नाही. जगभरातील सांस्कृतिक बदलांचे प्रतिबिंब असलेल्या कादंबऱ्यांची यंदा निवड झाली. भाषिक गुणवत्ता, कथनाची धार आणि जागतिक पातळीवर या कथनाचा टिकणारा वाचनकस याचा विचार प्रत्येक निवडीमागे करण्यात आल्याचे मार्गारेट बस्बी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. बडय़ा प्रकाशनांनी या वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यांत देशोदेशीच्या टाळेबंदी ध्यानात घेता हाती असलेली लेखकांची पुस्तके प्रकाशित केली नाहीत. त्याच्या परिणामी, आकाराने आणि आर्थिक उलाढालीने लहान असलेल्या प्रकाशकांच्या पुस्तकांना यंदा यादीत स्थान मिळाले. अमेरिकेत जन्मलेल्या, ब्रिटनमध्ये शिकलेल्या, दुबईमध्ये राहणाऱ्या आणि भारतीय नाव असणाऱ्या लेखिकेच्या कादंबरीचे आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यातील कथानक पुण्यात घडते.

शगी बेन

डग्लस स्टुअर्ट यांनी ग्लासगो शहराने दिलेल्या जीवनाच्या अवघड धडय़ांना या कादंबरीतून शब्दबद्ध केले आहे. अमेरिकेत राहणाऱ्या या लेखकाची कादंबरी फेब्रुवारीत प्रकाशित झाल्यापासून गाजतेय. लघुयादी जाहीर होण्याच्या आदल्याच आठवडय़ात न्यू यॉर्कर साप्ताहिकाने त्यांची ‘फाऊंड वॉण्टिंग’ ही कथा प्रसिद्ध करून ते यंदा पुरस्काराचे तगडे स्पर्धक असल्याचे सूचित केले.

बण्र्ट शुगर

अवनी दोशी यांच्या कादंबरीचे भारतात प्रकाशित झालेले नाव ‘गर्ल इन व्हाइट कॉटन’ आहे. दोशी यांनी आपले कथानक पुण्याच्या उच्चभ्रू वस्तीत घडवले आहे. पेठा आणि नळस्टॉप- डेक्कनच्या वातावरणाचा अंशही त्यात नाही. पण एका जगविख्यात आश्रमातील व्यवहार कथेच्या आधारे समोर आणला आहे. ही कादंबरी माय-लेकींतील विचित्र संघर्षांची गोष्ट सांगते.

न्यू विल्डरनेस

डाएन कुक यांची नजीकच्या कल्पित भविष्यात घडणारी ही कादंबरीदेखील माय-लेकींचीच गोष्ट आहे. मात्र यातील कथानकाचे स्वरूप भिन्न आहे. प्रदूषण आणि हानीकारक वायूंनी वेढलेल्या शहरामध्ये जगण्यास अनुकूल परिस्थिती नसल्याने या मायलेकींना जंगलात संरक्षित भागांत स्थलांतरित व्हावे लागते. जंगली श्वापद आणि निसर्ग संकटांतून बचावाची लढाई या कादंबरीत आली आहे.

द श्ॉडो किंग

लेखिका माझा मेंगिस्टे यांचा जन्म इथिओपियाचा. बालपण नायजेरिया-केनियातले आणि शिक्षण अमेरिका-इटलीमधले. पस्तिशीत त्रिखंडांचे अनुभव गाठीशी असलेल्या मेंगिस्टे यांची ही दुसरी कादंबरी. इटलीने इथिओपिया अंकित केलेला काळ ती कथाबद्ध करते. या इतिहासाचे अज्ञात पान ‘द श्ॉडो किंग’मधून वाचायला मिळते. यादीतील ही एकमेव ऐतिहासिक कादंबरी आहे.

रिअल लाइफ

ब्रॅण्डन टेलर या आफ्रो-अमेरिकी वैज्ञानिकाची ही कादंबरी एका अमेरिकी विद्यापीठाच्या संकुलात घडते. श्वेतवर्णीयांचा कृष्णवर्णीयांबद्दलचा आकस या ढोबळ संकल्पनेवर आधारलेली ही कादंबरी वाटत असली, तरी त्यातील व्यक्तिरेखेची फरपट एका समूहाचे दु:ख मांडणारी आहे. ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ चळवळी सर्वदूर पसरल्यानंतर कादंबरीला वाचनकारण लाभले.

धिस मोर्नेबल बॉडी

सिट्सी डंगारम्गा या इंग्रजीत प्रकाशित झालेल्या झिम्बाब्वेमधील पहिल्या लेखिका आहेत. ‘नव्‍‌र्हस कंडिशन’ (१९८८), ‘द बुक ऑफ नॉट’ (२००८) या दोन कादंबऱ्यांचा पुढला भाग त्यांनी नव्या पुस्तकात मांडला. दैन्यावस्थेपासून शिक्षण घेत पुढे जाणाऱ्या मुलीची गोष्ट डंगारम्गा यांनी कादंबऱ्यांतून मांडली. ही लेखिका प्रखर सामाजिक कार्यकर्ती म्हणूनही सध्या गाजते आहे.

(लघुयादी घोषणेचा अधिकृत यू-टय़ूब दुवा :

pankaj.bhosale@expressindia.com

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on introduction to the booker prizes final shortlist abn