वैभव भाकरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इ. स. तेराव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकापर्यंतच्या दिल्लीच्या इतिहासाचा हा धांडोळा लढायाकेंद्री असला, तरी आजच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तो दिशादर्शक ठरावा..

मागील चुकांची पुनरावृत्ती होऊ द्यायची नसेल, तर इतिहासाची जाण असायलाच हवी. विशेषत: हजारो वर्षांचा गुंतागुंतीचा इतिहास लाभलेल्या भारतासारख्या देशाबाबत तर हे अधिक खरे ठरते. गेल्या पाच हजार वर्षांपासून भारतीय संस्कृतीचा दृढ प्रभाव दक्षिण आणि पूर्व आशियावर आहे. मध्य आणि पूर्व आशियासह युरोपवरही या संस्कृतीने काही प्रमाणात प्रभाव टाकला आहे. इथल्या संपन्नतेने परकीय सत्तांना आकर्षित केले. त्यांच्या आक्रमणांनी इथली आर्थिक, सामाजिक आणि राजकीय स्थिती त्या त्या वेळी बदलली. या बदलत्या स्थितीचे केंद्र गेल्या सातशे वर्षांपासून तरी दिल्ली हेच राहिले आहे. आधुनिक भारताची राजधानी असलेले हे शहर गेल्या काही शतकांपासून सत्तेचे प्रतीक बनले आहे. भारताच्या राजकीय इतिहासाचा सारांश म्हणजे दिल्ली, असे या शहराचे वर्णन केले जाते. दिल्लीवर अधिराज्य गाजवणाऱ्यांकडे देशाची सूत्रे येतात. जेव्हा भारत हे एकात्म राष्ट्र नव्हते, तेव्हाही दिल्लीचे हे स्थान अबाधित होते आणि आताही! राजीव कटय़ाल यांच्या ‘बॅटल्स फॉर दिल्ली : दिल्ली करीब अस्त’ या पुस्तकात वरील मुद्दा विस्ताराने अधोरेखित करण्यात आला आहे आणि अनुषंगाने भारताचा गेल्या सातशे वर्षांचा इतिहासही सूत्रबद्धपणे मांडला आहे.

तेराव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकापर्यंत दिल्ली काबीज करण्यासाठी झालेल्या युद्धांचा मागोवा हे पुस्तक घेते. भारतावर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी दिल्लीची गादी मिळवण्याची खटपट अनेकांनी केली. केवळ परदेशातूनच नाही, तर देशांतर्गत अनेक गटांनीही दिल्लीवर चाल केली. सत्तेसाठी प्रसंगी परकीयांशी हातमिळवणीही करण्यात आली. दिल्लीवर ही आक्रमणे का झाली किंवा दिल्ली काबीज केली जाऊ शकते हे परकीयांनी कसे हेरले, याची उत्तरे देण्याचा प्रयत्न हे पुस्तक करते.

चंद्रगुप्त ते सम्राट अशोक या मौर्य सम्राटांच्या काळात उत्तर भारतातील ‘पाटलीपुत्र’ म्हणजे आताचे पाटणा हे शहर राजधानी म्हणून भरभराटीस आले. मात्र, सत्तेचे केंद्र पुढील काही शतकांमध्ये पश्चिमेकडे सरकू लागले. पश्चिमेकडून होणाऱ्या आक्रमणांनी दिल्लीला राजकीयदृष्टय़ा महत्त्व प्राप्त करून दिले. काबूल आणि लाहोरकडून होणाऱ्या हल्ल्यांना दिल्लीतून प्रभावीपणे उत्तर देता येते, हे ध्यानात आल्यावर दिल्ली आणि आग्रा या दोन्ही शहरांना प्राधान्य मिळाले. तेव्हापासून देशाची राजकीय सूत्रे हलवणारे दिल्ली हे शहर भारतीय राजकारणाचे केंद्रस्थान झाले आहे.

दिल्लीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी लेखकाने पौराणिक कथांतील संदर्भाचा आधार घेतला आहे. महाभारताचे युद्ध हे ज्या ‘इंद्रप्रस्थ’ नावाच्या एका शहरासाठी झाले, ते सध्याच्या दिल्लीतील पुराणा किल्ला जिथे आहे त्या परिसरात होते, असे मानण्यात येते. हे ठिकाण स्थानिकांच्या आदराचे असल्याचे कळले, तेव्हा हुमायूनने सोळाव्या शतकात येथे ‘दिन पनाह’ नावाचे शहर उभारले. आताच्या दिल्लीचा संबंध हा या पौराणिक ‘इंद्रप्रस्थ’ नावाच्या शहराशी जोडला जातो तो असा! या शहराला पूर्वी ‘योगिनीपूर’, तर महाभारताच्या काळात ‘इंद्रप्रस्थ’ नावाने ओळखले जात होते. दिल्लीवर तोमर वंशाचे (इ. स. नववे ते बारावे शतक) राज्य असताना या शहराला ‘दिहिलिका’ म्हणून ओळखले जायचे.

दिल्ली हे भारतीय सत्तेचे केंद्रस्थान म्हणून आकाराला आल्यानंतरचा सातशे वर्षांचा इतिहास हे पुस्तक सांगते. त्यासाठी लेखकाने विचार केला आहे तो या शहरासाठी झालेल्या लढायांचा! बाराव्या शतकाच्या उत्तरार्धातील तरावडीच्या लढाईपासून १८५७ च्या ब्रिटिशविरोधी उठावापर्यंतच्या एकूण १३ लढायांचा वेध लेखकाने या पुस्तकात सविस्तर घेतला आहे. पुस्तकाचे वैशिष्टय़ हे की, या लढायांचे विश्लेषण लेखकाने सध्याच्या राजकीय-लष्करी-सामरिक घडामोडींना विचारात घेऊन केले आहे. एक प्रकारे या लढायांचा इतिहास म्हणजे भारताचा एक राष्ट्र म्हणून घडण्याच्या संघर्षांचा इतिहास आहे. जेव्हा केंद्रात सक्षम सत्ता आली तेव्हाच भारतात एकता, समृद्धी आणि शांतता प्रस्थापित झाली, असा निष्कर्ष लेखकाच्या मांडणीतून काढता येतो. मौर्यानी ग्रीकांचा केलेला पराभव, स्कंदगुप्ताचे हूणांना थोपवणे, वारंवार आक्रमण करणाऱ्या अरबांविरोधात राजपुतांनी दिलेला लढा, मंगोल आक्रमणाला तोंड देणारा खिलजी आणि महादजी शिंदे, हैदरअली यांनी केलेला इंग्रजांचा पराभव.. याचे वर्णन या पुस्तकात तपशीलवार येते.

लक्ष्य सत्ता मिळवण्याचे असले, तरी या लढायांची कारणे अनेक होती. राजकीय हव्यासापोटी मुघलांकडून केली जाणारी स्वकीयांची कत्तल असो किंवा दौलत खान आणि आलम खान यांचे इब्राहिम लोधीची सत्ता खालसा करण्यासाठी काबूलच्या बाबरला भारतात बोलावणे असो; राजकीय षड्यंत्र, अपमान, संपत्ती, ईर्षां अशा कारणांनी या लढाया प्रेरित होत्या. भारताच्या अमाप संपत्तीची लूट करण्यासाठी गझनीचा महमूद १७ वेळा भारतावर चालून आला. मात्र, भारतात सत्ता स्थापन करण्याची त्याची महत्त्वाकांक्षा नव्हती, तर घोरी भारतात आले ते सत्ता स्थापन करण्यासाठीच. गझनीने केलेल्या स्वाऱ्यांमुळे भारतावर चाल करून जाणे शक्य असल्याचे घोरींनी हेरले. बाराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून तुर्की, अफगाण, मंगोल, मुघल, पर्शियन अशा परकीय सत्तांनी भारताला वारंवार लक्ष्य केले.

लढाया जिंकलेल्यांच्या हाती सत्ता आली. ते देश चालवू लागले; पण म्हणून हे परकीय भारतीय झाले का? तत्कालीन सक्षम भारतीय राज्यकर्त्यांनी परकीयांचे हल्ले परतवून लावले, मात्र यात भारतीय कोण आणि परकीय कोण? मंगोलांना थोपवणारा खिलजी भारतीय म्हणावा का, की लोधी साम्राज्य खालसा करणाऱ्या मुघलांना भारतीय म्हणावे? म्हणजे देशासाठी लढणारे देशाचे रक्षणकर्ते होते की सत्तापिपासू? असे अनेक प्रश्न उपस्थित करत लेखक त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.

दिल्लीसाठी झालेल्या आणि भारतीय इतिहासाला वेगळे वळण देणाऱ्या महत्त्वपूर्ण लढायांमुळे दिल्लीच्या राजकारणावर मोठा प्रभाव पडला, तर कधी सत्तापालटच झाला. बाराव्या आणि तेराव्या शतकांत आशिया आणि युरोपपर्यंत धडकलेल्या मंगोलांना अल्लाउद्दीन खिलजीने भारतात येण्यापासून कसे रोखले, याचे पुस्तकातील वर्णन विशेष आहे. युद्ध-लढायांचे धोरण, तत्कालीन लष्करी डावपेच रेखाटनांच्या स्वरूपात सादर केले आहेत; परंतु या लढायांत भौगोलिक परिस्थितीचा कितपत प्रभाव होता, यावर फारसे काही लिहिलेले नाही. पानिपतच्या तिन्ही युद्धांवर आणि युद्धनीतीवर विश्लेषक मीमांसा करण्यात आली आहे.

इतिहासात काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या घटकांना लेखकाने पुढे आणले आहे. त्यातील एक होता- ‘हेमू’ म्हणजेच सोळाव्या शतकातला हेमचंद्र विक्रमादित्य! हा सुरी वंशाच्या आदिलशाह सुरीचा मुख्यमंत्री. मीठ विक्रेत्यापासून राज्याची सूत्रे सांभाळण्यापर्यंतचा हेमूचा प्रवास येथे वाचायला मिळतो. भारताच्या सत्तेसाठी मुघल काबूलमधून हल्ल्याच्या संधीची वाट पाहत होते, तर सुरी घराण्यात सत्तेसाठी अंतर्युद्ध सुरू होते. दक्षिणेकडच्या विजयनगर साम्राज्याला उत्तरेकडे येण्याची काही विशेष महत्त्वाकांक्षा नव्हती. अशा वेळी हेमू हा हिंदू राजा दिल्लीच्या गादीवर बसला. पानिपतच्या दुसऱ्या युद्धात त्याचा अकबराकडून पराभव झाला.

सतराव्या आणि अठराव्या शतकातील सामूगढ, जाजाऊ आणि लाहोर येथील लढायांतून मुघल राज्यकर्त्यांची मानसिकता ध्यानात येते. या लढायांमुळे पानिपतच्या युद्धासारखे मोठे परिणाम झाले नाहीत; परंतु मुघलांच्या पतनास त्या कारणीभूत ठरल्या. यामुळे भारताची सत्ता युरोपियांच्या हाती जाण्यास मार्ग सुकर झाला.

परकीयांविरोधात वेळीच एकत्रित न येणे, ही तत्कालीन भारतीय राज्यकर्त्यांची मोठी चूक होती आणि याची वेळोवेळी पुनरावृत्ती झाली. सतत होणाऱ्या अंतर्युद्धांनीही केंद्रातील सत्तेला पोखरले. वायव्येकडून येणारे ग्रीक, पर्शियन, अरब, तुर्क, अफगाण, हूण असोत वा समुद्री मार्गाने येणारे इंग्रज असोत, भारताला शत्रूंची कधीच वानवा नव्हती. आताही वायव्य आणि उत्तरेकडे पाकिस्तान आणि चीन यांचे आव्हान भारतासमोर आहे. त्याचप्रमाणे दहशतवाद, नक्षलवाद यामुळे देशांतर्गत सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या बाह्य़ आणि अंतर्गत आव्हानांना तोंड देताना हे पुस्तक देऊ करत असलेले इतिहासाचे भान महत्त्वाचे ठरेल.

‘बॅटल्स फॉर दिल्ली : दिल्ली करीब अस्त’

लेखक : राजीव कटय़ाल

प्रकाशक : इंडस सोर्स बुक्स

पृष्ठे : २२०, किंमत : ५९५ रुपये

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Battles for delhi dilli kareeb ast by rajeev katyal