बहराचा काळ ओसरल्यावरही जी नियतकालिके तगून आहेत, ती कशी आणि कशामुळे, हा प्रश्न उपस्थित करण्यासाठी एकेकाळी तडाखेबंद खपणाऱ्या इंग्रजी नियतकालिकांच्या ताज्या स्थितीकडे पाहणारा लेख..

लेख वाचण्यापूर्वी मध्यमवर्गीय मराठी घराघरांत राहणाऱ्या सगळ्यांनीच साप्ताहिक- मासिकांच्या वाचनाशिवाय आपले कितपत अडते, याचा विचार करावा. शतकभरापूर्वीदेखील मराठीत ‘केरळ कोकिळ’, ‘मनोरंजन’, ‘प्रभात’ ही मासिके अल्प वाचकबळावर फायदारहित निघत होती. या काळात स्वातंत्र्यलढय़ात उतरून देशाची सेवा करणारी आणि पुढे (शतकभरानंतरही) स्वातंत्र्यसैनिकांसाठीचे लाभ वगैरे घेणारी पिढी मासिकांतील जाज्वल्य विचारांनी प्रेरित होत होती का, हे कळावयास मार्ग नाही. कारण मराठीतील दरएक चांगले मासिक हे जाहिरात व वाचकसंख्या घटल्यानंतरचा आर्थिक तोटाभार न पेलवल्याने बंद पडले. वैचारिक दिवाळखोरीच्या कारणाने मासिक बंद पडल्याचे उदाहरण मराठीसह जगात कोणत्याही भाषेत नसावे. मराठीत मासिके, साप्ताहिके निघत आहेत. त्यांच्याकडून उत्तमोत्तम लेखन शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. अपवाद वगळता मासिकांच्या तगण्यासाठीच्या लढाईला ना पोषकसंख्येच्या वर्गणीदारांची साथ आहे, ना निश्चित साहित्यिक-वैचारिक घुसळणीची. परिणामी शंभर वर्षांपूर्वीसारख्याच अडचणी घेऊन ती निसर्गनियमनाच्या वाटेवर कालक्रमणा करीत आहेत. ही स्थिती आपल्याकडे जास्त गडद असली, तरी सगळ्याच देशांमध्ये थोडय़ा-बहुत प्रमाणात सारखी भासायला लागली आहे. वैचारिक, गंभीर नियतकालिकांचा खप कमी होतो आहे, ही स्थिती इंग्रजीतही आहे.. मात्र गांभीर्यानेच प्रकाशित होणारी, पण नैसर्गिक मानवी कामभावनेला आवाहन करणारी मासिकेसुद्धा याला अपवाद नाहीत, हे इंग्रजीतही दिसू लागले..

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी

मनोरंजन, ज्ञान आणि प्रबोधन या नियतकालिकनिर्मितीतल्या आद्य हेतूंना ‘काम’ या मानवी सहजप्रवृत्तीच्या गाळणीतून गाळणाऱ्या ‘प्लेबॉय’ या अमेरिकी मासिकाने जगभरात कोटींच्या जवळपास खपाची राशी उभारली. वाचक आणि दर्शक यांच्यातील सीमारेषा झुगारत या मासिकाने नग्ननारी आणि मोकळ्याढाकळ्या विचारांनी सर्व जगावर साम्राज्य प्रस्थापित केले. दोन वर्षांपूर्वी या मासिकाने आपल्या पृष्ठांवरून नग्नतेला हद्दपार करून कौटुंबिक, सोज्वळतेचा पुढाकार घेतला होता. आता या महिन्यापासून पुन्हा ‘प्लेबॉय मूळ स्वरूपात’ पाहायला (अन् वाटल्यास वाचायला) मिळणार आहे. या मासिकाने ‘इंटरनेटवर एका क्लिकद्वारे पोर्न आणि नग्नता उपलब्ध असल्याने आपल्या मासिकातून ‘उरोजनिक’ स्त्रियांची उत्तानचित्रे बंद करीत असल्याचे जाहीर केले होते.’ त्यांच्या यंदाच्या मार्च-एप्रिल जोडअंकात ‘नेकेड इज नॉर्मल’चे तत्त्वज्ञान ‘प्लेबॉय’चे नवे प्रमुख कुपर हेफनर याने आपल्या ओळखसंपादकीयातून मांडले आहे अन् इंटरनेटवर एकेका क्लिकद्वारे दिगंबर ललनादर्शनाच्या जागतिक शिरस्त्यात काडीचा बदल झालेला नसताना नग्नसहज लतिकांची ताज्या अंकात पूर्वीसारखी मोट बांधली आहे. ‘प्लेबॉय’चा दोनच वर्षांत बदललेला नग्नतावादाबाबतचा विचार मासिकांची सध्याची जगण्याबाबतची लढाई स्पष्ट करणारा आहे.

नियतकालिक काढून दिवाळखोरी गाठणारी ९९ टक्के उदाहरणे सार्वकालिक असली, तरी उरलेल्या एक टक्क्यामध्ये ‘प्लेबॉय’, ‘पेण्टाहाऊस’, ‘हस्लर’ ही सचित्र नग्नता आणि उग्र कामुक साहित्य पुरवणारी मासिके आहेत. त्यात पीपल (ऑस्ट्रेलियातून प्रसिद्ध होणारे), पिक्चर्स या मजकुराधिक मासिकांचीही भर पडली आहे. पैकी ‘प्लेबॉय’ हे नग्नता दाखवताना किंवा मजकुरातल्या बंडखोरीतही ‘खानदानी’पणा विसरत नाही. परिणामी इतर मासिकांबाबत नैतिक मूल्यांची चाळणी लावायची झाली तर सौंदर्याच्या, कलात्मकतेच्या नावाखाली उद्दीपनार्थ स्त्रीदेहाचे प्रदर्शन इतकेच त्यांचे स्वरूप आहे. जगात मासिक काढून श्रीमंत झालेल्या आणि उंची मॅन्शन उभारणाऱ्या व्यक्तींमध्ये प्लेबॉयकर्त्यां ह्य़ू हेफनर आणि हस्लरकर्त्यां लॅरी फ्लिन्टचे नाव घ्यावे लागेल. या मासिकांचा सचित्र नग्नता पुरवठा शिखरावर असताना अमेरिकेत स्त्रीहक्क चळवळ आणि स्त्रीवादाचा जोमाने पुरस्कार होत होता. त्यातून डग्लस लॅम्बर्ट या अवलियाने ‘प्लेबॉय’च्या पुरुषीपणाला आव्हान म्हणून ‘प्लेगर्ल’ हे महिला मासिक सुरू केले. या मासिकांच्या मुखपृष्ठावर दिगंबर अथवा अर्धदिगंबर प्रसिद्ध पुरुष झळकू लागले. महिलांसाठी बंडखोरीयुक्त मुक्तसल्ले आणि आतमधील पुरुषनग्नता यामुळे हे मासिकही खपाच्या नवनव्या पायऱ्या चढू लागले. सामाजिक विषय, महिला हक्क, तृतीयपंथीय तसेच वैकल्पिक लैंगिक वर्तनवाल्यांचा कैवार यामुळे समाजाच्या उच्चभ्रू वर्गाने नाकारले, वादाचे विषय झाले, तरीही हे मासिक इंटरनेट युगापर्यंत तगून राहिले. (याचा ब्रॅड पिटचे मुखपृष्ठ असलेला अंक ‘दुर्मीळ’ म्हणून अमेझॉनवर विक्रीस आहे.) एक वर्ष ऑनलाइन करूनही ते तोटय़ात राहिले. सध्या या मासिकाचा अधिकृत वर्गणीदार अवघा तीन हजार इतका घसरला आहे आणि विविध देशांतील आणि भाषेतील त्याचा अर्थव्यापार थांबला आहे. ‘हस्लर’ मासिक निव्वळ पोर्नपाठपुरावा करीत आपला आंबटशौकीन वाचक/दर्शकवर्ग टिकवून आहे. पूर्वी त्यात रिपोर्ताज आणि वैचारिक लेख आव आणल्यासारखे तरी असत; पण भीषण नग्नतेसोबत ‘इराकमधील युद्धाचा प्रश्न’ असल्या टोकाच्या तफावतीत ती वैचारिकता विरघळून गेल्याच्या परिणामी आता ‘हस्लर’ विचारांमध्ये वेळ दवडत नाही. ऑस्ट्रेलियातून निर्माण होणारी ‘पिक्चर’ आणि ‘पीपल’ ही मासिके ‘मियाँ मूठभर आणि दाढी हातभर’ ही मराठी म्हण जणू प्रमाण मानूनच मजकूर आणि नग्न छायाचित्रे यांचे प्रमाण ठरवतात. नव्वदोत्तरी काळात ‘नव्‍‌र्ह’ हे ऑनलाइन मासिक आले. त्यात अतिबंडखोर लेखनासोबत नग्न छायाचित्रेही अतिकलात्मकतेने सादर केली जातात.

मुलाखती, वैचारिक व राजकीय लेख, रिपोर्ताज, हास्यमजकूर यांच्यात नग्नता खपविणारे ‘पेण्टाहाऊस’ हे नव्वदीच्या दशकात उभरलेले मासिक. त्याच्या अधिकृत वर्गणीदारांची संख्या लाखांच्या घरात आहे; तरीही ऑनलाइन डाऊनलोडिंगमुळे ‘प्लेबॉय’सह या साऱ्या मासिकांची विक्री हळूहळू घटू लागली आहे. इंटरनेट या मासिकांसाठी सापाच्या विषासारखे हळूहळू भिनणारे ठरत आहे. परिणामी आपल्या मासिकातील लिखित वा छायाचित्रित ‘ऐवज’ हा इतरांहून अधिक चाकोरीबाह्य़ असेल, यासाठी झगडण्याखेरीज या मासिकांना पर्यायच उरलेला नाही.

वैचारिक मासिकांची स्थिती

‘न्यूयॉर्कर’, ‘टाइम’, ‘हार्पर्स’, ‘अटलांटिक’ ही नियतकालिके जगातील समकालीन घटकांची वृत्तधुणी धूत असल्याने आर्थिकदृष्टय़ा तगून आहेत. ‘इकॉनॉमिस्ट’ हे बातमीमागची बातमी आम्हीच सांगतो, म्हणत तगून आहे आणि आक्रमक इंटरनेट-प्रचारामुळेच वाढतेही आहे. मध्यंतरी ‘टाइम’ फक्त इंटरनेटवरच प्रकाशित करण्याचे घाटत होते, ते गळाठले. ‘प्लेबॉय’ने जी फॅशनक्रांती राबविली, त्यापलीकडे जाऊन ‘जीक्यू’ (इंटरनॅशनल) आणि ‘एस्क्वायर’सोबतची खंडीभर मेन्स मॅगेझिन पेहराव, आचार-शिष्टाचार यांवर बोलत आहेत. ‘ट्रॅव्हलर्स’, ‘आऊटसाइड’सारखी मासिके श्रीमंत भटक्यांचे आणि उच्चभ्रूंचे दिवाणखाने सजवत आहेत. अतिरेकी सकारात्मक लेखनाचे भांडार ‘रीडर्स डायजेस्ट’ आजही नवउत्साही इंग्रजी वाचकांना उपलब्ध करून देत आहे. संपूर्णपणे चित्रपटांवर, टीव्ही मालिकांवर (एंटरटेन्मेण्ट वीकली) मजकूर देणाऱ्या मासिक, साप्ताहिकांना कायम मागणी चढीच आहे. या धर्तीवर १०० ते २०० छोटी-मोठी साहित्यिक मासिके अमेरिकेत आजही हौस आणि वाचन-लेखनाची गरज म्हणून सुरू आहेत. ‘कॉलेजिस्ट’, ‘जॉयलॅण्ड’, ‘पिथहेड चॅपल’, ‘लिटररी ममा’, ‘प्लोशेअर’, ‘इलेक्ट्रिक लिटरेचर’, ‘व्हाइस’, ‘टिनहाऊस’, ‘बिलिव्हर’, ‘व्हर्जिनिया क्वार्टर्ली रिव्ह्य़ू’ आणि विविध विद्यापीठांची उत्तमोत्तम साहित्यविचार प्रसवणारी मासिके नुसती पाहिली तरी त्यांच्या साहित्यव्यवहाराबाबत असूया दाटून येऊ शकते. जाहिरातींच्या कमतरतेवर आणि अल्पांशी असलेल्या वर्गणीदाराच्या अडचणींवर मात करून ती चांगल्या मजकुराचा पाठपुरावा करीत आहेत अन् त्यांच्या असण्यामुळे साहित्याची योग्यरीत्या घुसळण होत आहे. प्रस्थापित मासिकांना न चालणारे नवीन लेखक आणि लेखन या मासिकांतून आपले कौशल्य धारदार करीत आहेत.

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आर्थिक ग्रहणकाळातील मासिकोद्योगात आपल्या भवतालातील लिखित-वाचन व्यवहाराची दखल घ्यावीशी वाटल्यास, त्यावरून आज आपल्या मराठी नियतकालिकांची जी काही आहे, ती बरी-वाईट स्थिती आहे तिच्याहीबद्दल काही आडाखे बांधता येतील.  पुढील काळातील त्यातील बदल हा सर्वस्वी ‘आपल्या’- वाचकांच्या-  वाचनगरजेवर अवलंबून राहणार आहे. एक मात्र नक्की की, छापील नियतकालिकांच्या उफाडय़ाचा काळ आता ओसरलेला आहे.

 ‘प्लेबॉय’ : पुनरागमन कशाकशाचे?

मुलाखती, लघुकथा यांसाठीही आधीपासूनच प्रख्यात असलेल्या ‘प्लेबॉय’चे सोज्वळ अंक दोन वर्षांपासून उघडरीत्या बुकस्टॉलवर मिळायला लागले. त्यानंतर त्याचे स्वरूपही बदलले. एकपानी लेख आणि दीडपानी छायाचित्र हे लेआऊटधार्जिणे रूप जास्त दिसू लागले. प्रदीर्घ इंटरव्ह्य़ू असले तरी एखाद्या मोठय़ा लेखकाला एक किंवा दोन पानांत लिहायला लावायचे प्रमाण वाढले. उठावदार नसलेली, एकाच पानात संपणारी काही सदरे सुरू झाली आणि फिक्शननिवडीबाबत संपादकीय विभाग काहीसे ढिले पडू लागले. अ‍ॅलिस के. टर्नर या फिक्शन एडिटरचा मृत्यू झाल्यामुळे असेल, पण २०१६ सालात ‘प्लेबॉय’ने ‘कॉलेज फिक्शन’ स्पर्धाच घेण्याचे टाळले. गेल्या तीसेक वर्षांत यातून समोर आलेले बहुतांश लेखक आज अमेरिकी कथासाहित्यात मानाचे स्थान पटकावून आहेत. लेखकाला प्रचंड मानधन ओतून, मनसोक्त लिहू देणाऱ्या या मासिकातील मुख्य ऐवज हा केवळ छायाचित्रांपुरता कधीच नव्हता. गेल्या दोन वर्षांत छायाचित्र नाही आणि वर मजकूरही पूर्वीइतका अत्याकर्षक नसणाऱ्या या मासिकाबाबत उघड टीका होत होती. गेल्या वर्षी संस्थापक ह्य़ूू हेफनर यांनी या मासिकाची धुरा आपल्या पंचवीस वर्षीय मुलावर सोपविली, तेव्हा त्याने मासिकावर होणाऱ्या टीकेला गांभीर्याने घेतले. मासिकाच्या २०१६च्या आकडेवारीनुसार अधिकृत वर्गणीदारांची संख्या आठ लाखांच्या आसपास आहे. ऑनलाइन मोफत डाऊनलोडिंग त्याच्या चारपटींनी अधिक आहे. मासिकाने सोज्वळतेचा पुरस्कार केला, तेव्हा त्याच्या खपात वाढ झाली. तरीही खप आणि गुणवत्ता यांच्यात तफावत होतीच. ‘या मासिकाची जी ओळख होती, त्या स्वरूपातच ते या अंकापासून रुजू होईल’ असे कुपर हेफनर याने संपादकीयात म्हटले आहे. इतर मासिकांप्रमाणे ‘प्लेबॉय’ मासिक हे नुसत्या त्याच्या विक्रीवर अवलंबून नाही. ‘प्लेबॉय’च्या इतर उत्पादनांनी, क्लब्जमध्ये होणाऱ्या आर्थिक उलाढालींनी होणारा फायदा हा मासिक उद्योगापेक्षा मोठा आहे. तरीही गेल्या काही महिन्यांमध्ये ‘प्लेबॉय’चे दोन महिन्यांचे जोडअंक काढण्याचे प्रमाण वाढले आहे. आर्थिकदृष्टय़ा कमी खर्चात अधिक नफा मिळविण्यासाठी तेही धडपडताना दिसत आहे. यंदाच्या अंकात स्कार्लेट बर्न या ‘हॅरी पॉर्टर’ मालिकेतून बालभूमिकेत झळकलेल्या अभिनेत्रीचे शारीररहस्य उलगडले आहे. सोबत छायाचित्रे मोजताना आकडेवारी चुकावी इतक्या संख्येने दिगंबरसौंदर्य उभारले आहे. दोन वेचक कथा आणि पानपुरक्यांचा चुरचुरीत मजकूर अंकात समाविष्ट आहे. स्कार्लेट जोहान्सन या हॉलीवूड अभिनेत्रीची बंडखोर मुलाखत आणि ओळख असलेल्या ‘प्लेबॉय’च्या जुन्या धाटणीचा नवा मजकूर यांनी ‘प्लेबॉय’ पुन्हा कुटुंबाकडून व्यक्तिवादी विचारसरणीकडे परतला आहे.

 

पंकज भोसले

pankaj.bhosale@expressindia.com