‘‘मोठी बातमीयै… पीएचडी करणारा तरुण दहशतवादी गिरफ्तार! अल काइदाशी होता संपर्कात! प्रशिक्षण पुस्तिकेसह रंगेहात पकडण्याची पोलिसांनी केली कारवाई! पाहात राहा…’’ – असं काहीबाही २००८ साली रिझवान साबीरबद्दल ब्रिटिश चित्रवाणी वाहिन्यांवरून बोललं गेलं नसेलही; पण असल्या फाजील उत्साहाला साजेशीच प्रतिक्रिया ब्रिटनमध्ये त्या वेळी उमटली होती. ‘पीएच.डी. च्या अभ्यासासाठी मी अल काइदाची पुस्तिका डाउनलोड केली’ असं सांगणारा हा तरुण केवळ निर्दोष सुटला असं नाही, तर दोन वर्षांनी त्याला २० हजार ब्रिटिश पौंडांची भरपाई देण्याचंही पोलिसांनी कबूल केलं. हा वंशवादच आहे, हेही पुरतं चव्हाट्यावर आलं.  या रिझवान साबीर यांचं पुस्तक मार्चमध्ये येत आहे, त्याबद्दलची ही बुकबातमी. हे पुस्तक कदाचित भारतात सहज उपलब्ध असणारही नाही. पण तेवढ्यामुळे पुस्तकाचं वेगळेपण कमी होत नाही. रिझवान साबीर हे आता लिव्हरपूल येथील विद्यापीठात गुन्हेअभ्यास शास्त्राचे अध्यापक आहेत.  हे पुस्तक ‘दहशतवादाविरुद्ध व्यापक उपाययोजनां’चा संकुचित चेहरा अभ्यासूपणे उघडा पाडणारं ठरेल, असा तज्ज्ञांचा होरा आहे.

Story img Loader