गौरव सोमवंशी gauravsomwanshi@gmail.com

जी दशा इंटरनेटची नव्वदच्या दशकात होती, तशीच परिस्थिती आता ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाबद्दल आहे. मात्र, तरीही काहीशा अनिश्चित व अजाण तांत्रिक गुंत्यातून मार्ग काढत हे पुस्तक या नव्या तंत्रज्ञानाबद्दल सकारात्मक भाकितं वर्तवते..

स्टीफन विलिअम्स यांच्या ‘ब्लॉकचेन : द नेक्स्ट एव्हरीथिंग’ या पुस्तकाबद्दल लिहायचे म्हटले, तर एक उदाहरण घेऊन सोपे जाईल. समजा, हे २०१९ नसून १९९० साल सुरू आहे. ‘इंटरनेट’ हे नाव नुकतेच ऐकण्यात आले आहे आणि ज्यांनी हे नाव ऐकले आहे, ते त्याबद्दल तोंड दुखेपर्यंत उदोउदो करत आहेत. अशा वेळेस- म्हणजे जेव्हा इंटरनेटचा तांत्रिक जन्म तर एका अर्थाने झाला होता, पण त्याने अजून विश्वाला व्यापून टाकले नव्हते, तेव्हा कोणी इंटरनेटच्या भविष्यावर पुस्तक लिहिले असते तर ते कसे दिसले असते? त्या पुस्तकात जी विविध प्रकारची भविष्यवाणी केली गेली असती, त्यापैकी तुम्ही कसे ठरवले असते कीकोणती शक्यता खरी आहे अन् कोणती शक्यता नुसती हास्यास्पद कल्पना?

स्टीफन विलिअम्स यांचे ‘ब्लॉकचेन : द नेक्स्ट एव्हरीथिंग’ हे पुस्तक अशाच एका अनिश्चित आणि अजाण जंगलातून काही मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतेय. जी दशा इंटरनेटची नव्वदच्या दशकात होती, तशीच परिस्थिती आता ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाबद्दल आहे. पुस्तकात ब्लॉकचेन समजावताना तांत्रिक गोष्टींपेक्षा त्यामागील संकल्पनेवर भर दिला आहे; त्यामुळे वाचकाला संगणकशास्त्राबद्दल काहीच माहीत नसेल, तरी हे पुस्तक फार काही गूगल न करताही एका शांत सुट्टीच्या दिवशी वाचून होऊ शकते. स्टीफन हॉकिंग हे जेव्हा त्यांचे ‘द ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम’ हे अजरामर पुस्तक लिहीत होते, तेव्हा त्यांना अशी सूचना देण्यात आली होती, की पुस्तकात येणाऱ्या प्रत्येक समीकरणामुळे पुस्तकाचा खप हा अर्धा होईल. त्यामुळे हॉकिंग यांनी विज्ञानावर आधारित त्या सबंध पुस्तकात फक्त एकच समीकरण येऊ  दिले (आइन्स्टाइन यांचे E = MC2)! त्याप्रमाणेच स्टीफन विलिअम्स यांच्या पुस्तकातही कोडिंग वा गुंतागुंतीचे अल्गोरिदम दिसून येणार नाही. याचे कारण हे पुस्तक एका नवीन तंत्रज्ञानावर आधारित असले, तरी लेखकाचा पुस्तक लिहिण्यामागील उद्देश वेगळा आहे?

काय आहे या पुस्तकाचा उद्देश?

पुस्तकात जितका भर ब्लॉकचेन काय आहे आणि त्याला कसे पाहावे, हे सांगण्यावर दिला आहे तितकाच भर ब्लॉकचेन काय नाही आणि त्याला कसे पाहू नये, यावरही आहे. वरवर पाहता ब्लॉकचेन हा केवळ एक वेगळ्या प्रकारचा डेटाबेस आहे. फक्त सगळा डेटा मी एका ठिकाणी न ठेवता अनेक ठिकाणी ठेवला आणि या डेटाबेसवरून कोणा एका व्यक्ती वा संघटनेचे नियंत्रण न ठेवता त्याला ‘लोकशाही’प्रमाणे चालवले तर? अशी काही स्वायत्त यंत्रणा चालू शकते का, जिच्यावर सगळ्यांचे समान नियंत्रण असेल, ज्यात सगळे जण भाग घेऊ  शकतात? आणि व्यक्तिगत/ खासगी माहितीची गोपनीयता ढळू न देता एकमेकांमधील व्यवहारांबद्दल पूर्ण पारदर्शकता आणता येऊ  शकते का? बिटकॉइन तसेच तर काम करते! बिटकॉइन हे असे एक चलन आहे, ज्याचे नाणे किंवा नोटा छापण्यासाठी कोणतीच केंद्रीय संस्था नाही. पण जे काम डॉलर किंवा रुपया करतो, तेच काम बिटकॉइनदेखील करू शकतेच. उलट २००७-०८ साली जी अर्थव्यवस्था इतकी भयानक बुडाली होती, त्यामागे काही केंद्रित संस्थांचा (उदा. अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्ह आणि मोठमोठय़ा बँका) भाग होता. यांच्यावर विश्वास ठेवणे सामान्य जनतेला काही परवडले नाही आणि याच वादळात एका अद्याप अनोळखी व्यक्तीने (किंवा समूहाने) बिटकॉइन समोर आणले. ज्या भरवशासाठी आपण या संस्थांवर विश्वास ठेवतो, तोच विश्वास आता आपण गणिताकडून संपादित करू शकतो आणि कोणत्याही मध्यस्थ संस्थेविना जगभरात कुठेही असलेल्या व्यक्तींमध्ये पारदर्शक व्यवहार घडवून आणू शकतो, असे बिटकॉइनने जगाला दाखवून दिले. बिटकॉइनला हे जमले, कारण त्यामागील तंत्रज्ञान हे ब्लॉकचेनद्वारे जन्मास आले होते.

मग पुढे असा विचार आला की, हेच ब्लॉकचेन आपण नुसते चलन बनवण्यासाठी न वापरता इतर सगळीकडे वापरून पाहिले तर? आज ब्लॉकचेनला आपण इंटरनेटइतके मोठे मानले, तर बिटकॉइन फक्त त्या इंटरनेटवरील एका संकेतस्थळाप्रमाणे असेल. ब्लॉकचेन या तंत्रज्ञानाचा आवाका इतका व्यापक आहे. ब्लॉकचेनमुळे पहिल्यांदा असे झाले आहे, की तंत्रज्ञान हे ते राबविणाऱ्यांपेक्षा मोठे बनले आहे किंवा मोठे बनू शकते. इतके मोठे, की त्यासमोर सगळेच नागरिक वा त्याचे उपभोक्ता समान असतील. कोणत्याही तिसऱ्या व्यक्ती/ संस्थेच्या मदतीविना ब्लॉकचेन एकदम बरोबर सांगू शकते, की अमुक अमुक व्यवहार (ट्रान्जॅक्शन) हा खरा आहे की नाही. यात तिसऱ्या व्यक्ती/संस्थेला मधे पडायची गरज नाहीच. म्हणून बिटकॉइन हे कोणत्याही मध्यवर्ती बँकेशिवायही मस्त चालते. त्याचा उपयोग हा बऱ्या-वाईट दोन्ही कामांसाठी होत असेल, पण एक यंत्रणा म्हणून ते अचूक आहे.

याच बाबी समजावत पुस्तकाची सुरुवात होते. पुस्तकातील लेखनशैली सुलभ आणि सुटसुटीत असल्याने आवश्यक तांत्रिक संकल्पना समजून घेणे सहजगत्या घडत जाते. ‘वितरित’ आणि ‘विकेंद्रित’ यांत काय फरक आहे आणि तो फरक जाणून घेणे का महत्त्वाचे आहे? ‘ब्लॉक’ नक्की कशाला म्हणावे? सार्वजनिक/सामुदायिक आणि खासगी ब्लॉकचेन यांच्यामधील फरक आणि साम्यं काय आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे विलिअम्स सोप्या शब्दांत देतात. परंतु असे करताना विलिअम्स यांनी एक दक्षता मात्र पाळली आहे (आइन्स्टाइननेही ती एकदा सुचवली होती : गोष्टी जमेल तितक्या सोप्या असाव्यात, पण त्यापेक्षा अधिक सोप्या झाल्या की आपण चुकतो), की अवघड संकल्पना समजावून सांगताना त्यांच्या मूळ तत्त्वात काही तडजोड होऊ  दिलेली नाही.

पण तरीही ब्लॉकचेन समजावून सांगणे हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश मुळीच नाही. मग काय आहे? तर लेखक न्यू यॉर्क शहरातील आपले काही अनुभव सहजतेने आणि गमतीशीर पद्धतीने सांगत ब्लॉकचेनच्या वादळामुळे आत्तापासूनच जग किती बदलले आहे, हे ध्यानात आणून देतात. ब्लॉकचेन आणि त्या संबंधित वितरित व्यवस्था (डिस्ट्रिब्युटेड सिस्टीम) यांच्या प्रसारामुळे काही तांत्रिक बदल होणार आहेतच, पण आपली समाजरचना व अर्थव्यवस्था आणि त्यावरून कळत-नकळतपणे निर्माण होणारी आपली सांस्कृतिक आणि वैचारिक चौकट हे सारेच हळूहळू पुढील दशकात कसे बदलणार आहे, याची प्रचीती विलिअम्स यांच्या अनुभववर्णनातून येते. जसे की, ब्लॉकचेनबाबतच्या एका कार्यक्रमात ते गेले होते, तर तिथे ब्लॉकचेनमुळे पितृसत्ताक जीवनपद्धतीलाही कसा तडा जाणार आहे यावर काही स्त्रीवादी आपले मत मांडत होते! तसेच अमेरिकेतील अटलांटामध्ये ब्लॅक चळवळ ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा उपयोग स्वत:च्या उद्धारासाठी कसा करीत आहे, तेही सांगितले आहे. ब्लॉकचेनमुळे आजच्या बलाढय़ आणि प्रस्थापित कंपन्या (उदा. फेसबुक, उबर, ओला वगैरे) लवकरच कालबाह्य़ कशा होऊ  शकतात, हेही विलिअम्स सांगतात. उदाहरणार्थ, ब्लॉकचेनमुळे अनेक अनोळखी वा विखुरलेल्या व्यक्ती, समूह किंवा व्यवस्था यांच्यात विश्वास निर्माण केला जाऊ  शकतो आणि प्रक्रियेत पारदर्शकता येऊ शकते. त्यामुळे मध्यस्थ मंडळींची शक्ती आणि नियंत्रण कमी होणार. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत हस्तांतरित केल्यास त्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळू शकेल आणि ही केवळ शक्यता नसून लवकरच एक वास्तविकताही होणार आहे.

पुस्तकात ठिकठिकाणी निरनिराळी आणि एकमेकांशी काहीच संबंध नसलेल्या क्षेत्रांची उदाहरणे देऊन त्यामध्ये ब्लॉकचेनमुळे होऊ शकणारे परिवर्तन समजावून सांगितले आहे. त्यामुळे वाचकाला या नवीन वादळाचा अंदाज लावण्यास मदत होते. पण असे करताना विलिअम्स यांनी वेगवेगळ्या व्यवस्थांमधल्या मर्यादांबद्दलही सांगितले आहे. जसे की, बिटकॉइन हे आता एक तांत्रिक प्रयोग म्हणून १०० टक्के यशस्वी असले, तरी अनेक कारणांमुळे याला आपण आदर्श समजू शकत नाही. उदाहरणार्थ, बिटकॉइन मायनिंग करताना लागणारी ऊर्जा. एका दिवसात बिटकॉइन यंत्रणा जितकी ऊर्जा खाते, तितक्याच ऊर्जेत एक लहान देशसुद्धा चालून जाईल. त्यामुळे याला दीर्घकाळ चालायचे असेल, तर कोणते आणि कसे बदल करावे लागतील, याची चर्चा पुस्तकात आहे. ब्लॉकचेनमुळे आपण पर्यावरणाला कसे राखू शकतो, याचीही काही भन्नाट उदाहरणे पुस्तकात आहेत. जसे की, आपण ब्लॉकचेन वापरून एका जंगलाला स्वायत्त करू शकतो. ते जंगल सेन्सर व ब्लॉकचेनमधील स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट यांनी जोडले गेले, की ते जंगलच स्वत:चे संरक्षण आणि वाढ करेल.

अर्थात, इतके मोठे बदल होत असताना आजूबाजूच्या संबंधित नियम, कायदे आणि धोरणांनी या बदलांना साथ न दिल्यास हे तंत्रज्ञान पुढे जाऊ शकणार नाही, हेही विलिअम्स नमूद करतात. पण अख्ख्या पुस्तकात कोणतेच वाक्य नकारार्थी लिहिलेले नाहीये. विलिअम्स यांचा आशावाद हा काही ठिकाणी गरजेपेक्षा जास्त वाटला, तरी अयोग्य मुळीच वाटत नाही. जवळपास प्रत्येक पानावर एक वेगळे भाकीत दिसेल; पण लेखकाच्या मते, आपले काम नुसते भाकीत किती खोटे वा खरे ठरेल हे मागील रांगेत उभे राहून पाहणे, हे नसून आपण यात सक्रिय सहभाग नोंदवून बदलाचे वारे आपल्या बाजूने वळवणे हे आहे.

आणि भाकीत करणे हे काही साधे काम नाही. पुस्तकातीलच एक उदाहरण आहे रॉबर्ट मेटकाफ यांचे. ते ‘इथरनेट’चे जनक आहेत. ‘मेटकाफ लॉ’ हा नेटवर्क थिअरीतील महत्त्वाचा सिद्धांत त्यांनी मांडला. या मेटकाफ यांना भाकीत करत सुटायची एक वाईट सवय आहे. सर्वात गाजलेले भाकीत त्यांनी १९९५ मध्ये केले. इंटरनेट हे एका वर्षांत नष्ट होईल, असे भाकीत तेव्हा त्यांनी केले आणि हेही म्हणाले की, असे न झाल्यास मी माझेच शब्द खाईन (इंग्रजीत तसा वाक्प्रचार आहे). पण नेमके १९९६ मध्ये इंटरनेटने खरी भरारी घेतली. मग १९९७ च्या इंटरनेटवर आधारित एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात त्यांना बोलावले गेले आणि त्यांच्या भविष्यवाणीची आठवण करून देण्यात आली. मेटकाफ यांनी सांगितले होते की, ‘माझे शब्द चुकले तर मी त्यांना खाऊन टाकीन.’ दिलेला शब्द पाळायची बांधिलकी म्हणून त्यांनी आपले शब्द एका मोठय़ा केकवर लिहिले आणि तो केक खाल्ला. पण लोक तरीही असंतुष्ट होते. हे पाहून मेटकाफनी आपले शब्द एका कागदावर छापले, तो कागद मिक्सरमध्ये पाण्यासोबत टाकला आणि त्या कागदाचा रस सर्वासमोर प्यायले! नंतर त्यांचे ‘ओपन सोर्स सॉफ्टवेअर’बाबतचे भाकीतही चुकले. पण त्यांचे भाग्य असे की, तेव्हा त्यांना कोणी हे करण्यास परावृत्त केले नाही!

ब्लॉकचेनबद्दल अनेक आशा व सकारात्मक शक्यता आहेत. त्याबद्दल बऱ्याच प्रमाणात खात्रीही वाटते. परंतु स्वत:चे शब्द अक्षरश: खाऊन टाकावे इतकी खात्री अद्याप तरी नाहीच. कदाचित काही महिन्यांनी तशी घोषणा करणे (‘ब्लॉकचेन जर अपयशी झाले तर मी माझे शब्द अक्षरश: खाऊन टाकेन!’) काही वावगे ठरणार नाही!

‘ब्लॉकचेन : द नेक्स्ट एव्हरीथिंग’

लेखक : स्टीफन विलिअम्स

प्रकाशक : सायमन अ‍ॅण्ड शुस्टर

पृष्ठे: २०८, किंमत : ६९९ रुपये

लेखक हे ब्लॉकचेन क्षेत्राशी संबंधित असून ‘आफ्रिकन ब्लॉकचेन अलायन्स’चे सदस्य आहेत.

 

Story img Loader