‘बुकबातमी’ हे सदर ‘बुकमार्क’मध्ये प्रसिद्ध होते ते नव्या पुस्तकांशी संबंधित काही सांगण्यासाठीच! कधी ते एखाद्या पुस्तकाच्या प्रकाशनाची बातमी घेऊन येते, तर कधी त्यानिमित्ताने प्रकाशनपूर्व आणि प्रकाशनोत्तर झडलेल्या चर्चाची नोंद घेते. पुस्तकांच्या जगात रमणाऱ्यांसाठी प्रत्यक्ष पुस्तकाची प्रत जितकी आस्थेची, तितकाच त्यासंदर्भात चालू असलेला साहित्य-व्यवहारही! या ‘साहित्य-व्यवहारा’त जे जे काही येते, त्याची दखल नेहमीप्रमाणे प्रसंगोपात्त ‘बुकबातमी’मध्ये यंदाही घेतली जाईलच..

नव्या वर्षांची सुरुवात म्हणजे आदल्या वर्षीच्या वाचनयादीचा भार सांभाळत नव्या पुस्तकांकडे वळण्याची संधी. कथात्म आणि ललितेतर पुस्तकांच्या विविध प्रकाशनसंस्थांच्या यंदाच्या संभाव्य ग्रंथ-प्रकाशन याद्या प्रसिद्ध झाल्या आहेतच; त्यांच्याकडे कटाक्ष टाकल्यास अनेकांना आपल्या चालू वाचनयादीत किती भर पडणार आहे, याचा अदमास येईल!

दर वर्षीप्रमाणेच ‘पेंग्विन’ने प्रसिद्ध केलेली पहिली सहामाही यादी विविध विषयांवरील पुस्तकांनी भरगच्च आहे. त्यात नववर्षांच्या पहिल्याच महिन्यात महत्त्वाच्या विषयांवरील वैचारिक शोधग्रंथ प्रसिद्ध होत आहेत. पहिला विषय आहे- ‘ब्रेग्झिट’चा! अर्थशास्त्राचे आयरीश अभ्यासक केविन ओ’रॉर्की यांचे पुस्तक जानेवारीत प्रसिद्ध होत आहे. आर्थिक इतिहास हा ओ’रॉर्की यांचा अभ्यासाचा विषय. त्यांचे ब्रेग्झिटपूर्व-ब्रेग्झिटोत्तर युरोपचा वेध घेणारे ‘अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ ब्रेग्झिट’ हे पुस्तक ‘ब्रेग्झिट’संबंधित घडामोडींवर लक्ष ठेवून असणाऱ्यांच्या वाचनयादीत स्थान पटकावून असेल. याच महिन्यात प्रकाशित होत असलेले ‘चेर्नोबील’ हे इतिहासकार सेऱ्ही प्लॉखी यांचे पुस्तक सोव्हिएत युनियनमध्ये घडलेल्या प्रलयी घटनेचा ऐतिहासिक वेध घेणारे आहे. २५-२६ एप्रिल १९८६ ला घडलेल्या या घटनेसंबंधीचे दस्तावेज खुले झाल्यानंतर येणाऱ्या या पुस्तकात नव्या माहितीचा उपयोग करण्यात आला आहे.

या शोधग्रंथांनंतर अनेकांना उत्सुकता असलेल्या कादंबरीकार अ‍ॅली स्मिथच्या नव्या कादंबरीविषयीची नोंद या यादीत आहे! २०१७ साली ‘मॅन बुकर’च्या लघुयादीत स्थान पटकावलेली ‘ऑटम्न’ आणि त्यानंतरच्या ‘विन्टर’ या कादंबरीनंतर अ‍ॅली स्मिथची ‘स्प्रिंग’ ही कादंबरी मार्चमध्ये प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे अ‍ॅली स्मिथच्या चाहत्यांसाठी वाचनवसंत नक्कीच फुलणार आहे! याच यादीत लक्ष वेधून घेणारे आणखी एक पुस्तक आहे, ते म्हणजे- ‘व्हॉट अ‍ॅम आय डुइंग विथ माय लाइफ?’! केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेसकडून प्रसिद्ध होणाऱ्या ‘थिंक’ या तत्त्वज्ञान विषयाला वाहिलेल्या नियतकालिकाचे संपादक स्टीफन लॉ हे त्याचे लेखक. तत्त्वज्ञान आणि दैनंदिन मानवी जीवन यांचा सांधा कुठे आणि कसा जुळतो, याचा शोध घेण्याचा प्रयत्न लॉ आपल्या पुस्तकांतून करतात. डझनभर पुस्तके लिहिली आहेत त्यांनी, हेच सूत्र पकडून! लॉ यांचे हे  ताजे पुस्तक मात्र अस्तित्ववादाशी झुंजणारे आहे.

‘पेंग्विन’च्या यादीशिवाय आणखीही याद्या आणि ग्रंथघोषणा वाचकांना खुणावणाऱ्या आहेत. त्यातील एक म्हणजे ब्रिटिश पत्रकार कॅरोलिन क्रायडो पेरेझ हिचे ‘इन्व्हिजिबल वुमेन : एक्स्पोजिंग अ डाटा बायस इन अ वर्ल्ड डिझाइन्ड फॉर मेन’ हे पुस्तक! समाजमाध्यमांवरील लिंगभावाधारित भेदावर आवाज उठवणाऱ्या पेरेझची ओळख आता बंडखोर म्हणून झाली असली, तरी तिने उपस्थित केलेले प्रश्न महत्त्वाचे आहेत. पेरेझच्या आजवरच्या या अभिव्यक्तीची सुसूत्र गुंफण या पुस्तकात आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून ज्या चरित्राविषयी उत्सुकता आहे, असे एक चरित्र यंदाच्या मार्चमध्ये प्रसिद्ध होत आहे. ब्रिटिश कलासमीक्षक आणि चरित्रकार फियोना मॅकार्थी लिखित ‘वॉल्टर ग्रुपियस : व्हिजनरी फाऊन्डर ऑफ द बाऊहाऊस’ हे ते चरित्र! पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीत ‘बाऊहाऊस’द्वारे कला आणि हस्तकला यांचा संयोग करत वस्तुनिर्मितीच्या संकल्पनेत आमूलाग्र बदल करणाऱ्या वॉल्टर ग्रुपियसविषयी एका जाणत्या कलासमीक्षकाने लिहिलेले हे पुस्तक कलाअभ्यासकांसाठी तर महत्त्वाचे आहेच, पण मॅकार्थी यांनी लिहिलेल्या आजवरच्या चरित्रग्रंथांच्या अनुभवांवरून हेही चरित्र आदर्श ठरेल, अशी आशा करण्यास हरकत नसावी..

यंदाच्या पहिल्या सहामाहीत प्रसिद्ध होणाऱ्या काही पुस्तकांची ही धावती नोंद. ती त्रोटकच असली, तरी वर्षभर अशा पुस्तक-नोंदी ‘बुकबातमी’त वाचायला मिळतीलच!