जेन गुडाल म्हटलं की टांझानियातले चिम्पान्झीदेखील आठवतातच, या चिम्पान्झींच्या सहवासात बराच काळ राहून, त्यांच्या निरीक्षणावर आधारित पुस्तक त्यांनी लिहिलं नि या कामाची मजल पुढे, प्राण्यांना कशा प्रकारच्या मदतीची गरज आहे याचा अभ्यास करणाऱ्या ‘जेन गुडाल इन्टिट्यूट’ची स्थापना आणि जगभर ही संस्था नावाजली जाणं इथपर्यंत गेली.
संगीता अय्यर यांची तुलना जेन गुडाल यांच्याशी करता येणार नाही. त्यांचं काम निराळं. मर्कटवर्गीय वन्य प्राण्यांऐवजी, ‘माणसाळू शकणाऱ्या’ हत्तींसोबतचं. शिवाय गुडाल मुद्दाम जंगलात गेल्या, तर संगीता अय्यर केरळ राज्यातच वाढल्या, हत्ती पाहात! पुढे लग्नानंतर कॅनडात स्थायिक झाल्यावर संगीता यांनी पत्रकारितेची पदवी घेतली, काही काळ वृत्तनिवेदन केल्यावर निसर्ग व पर्यावरण या विषयावर व्हीडिओ-मुक्तपत्रकार म्हणून त्या काम करू लागल्या. हा प्रवास हत्तींकडे जाणारा आहे, याची कल्पना त्यांना होतीच. केरळचे- विशेषत: देवस्थानांकडचे- हत्ती ‘माणसाळावेत’ म्हणून त्यांचे काय हाल केले जातात, जंगली हत्तींना कसं ‘फसवलं’ जातं, हे सारं त्यांच्या आठवणींचा भाग होतं पण आता त्याचा अभ्यासू मागोवा त्यांनी घेतला. त्यातून २०१६ साली ‘गॉड्स इन शॅकल्स’ हा लघुपट तयार झाला! काही चित्रपटोत्सवांत त्याला बक्षिसं मिळालीच पण केरळच्या विधानसभेतही तो मुद्दाम दाखवला गेला. आता याच नावाचं संगीता अय्यर यांचं पुस्तक, ८ फेब्रुवारी २०२२ रोजी येतंय. हा कॅमेरा ते लेखणी असा जरा उलटा प्रवास…
… आणि हो, या पुस्तकाला प्रस्तावना आहे खुद्द जेन गुडाल यांची!