राहुल बनसोडे rahulbaba@gmail.com
‘सेपीयन्स’ आणि ‘होमो डय़ुउस’ – माणसाच्या इतिहास आणि भविष्यावर भाष्य करणाऱ्या या दोन पुस्तकांनंतरचे हरारी यांचे हे तिसरे पुस्तक..
उदारमतवादी लोकशाहीची कास धरून राष्ट्रांनी परस्परसहकार्यातून गेली ५० वर्षे मानवजातीच्या इतिहासात प्रथमच इतकी देदीप्यमान प्रगती केली, त्या लोकशाहीचे खांब एक एक करून कोसळू लागले आहेत. सत्ता ताब्यात घेण्यापुरताच लोकशाहीचा उपयोग असतो, या समजुतीत राजकारणी लोक वागत आहेत. तर लोकशाहीच्या मूलभूत नियमांशी प्रतारणा करत तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनेक कंपन्या नवनवे सामाजिक प्रयोग करत आहेत. देशोदेशींच्या लोकशाही व्यवस्थांची अवस्था काळजी करावी इतपत नाजूक आहे, जागतिक तापमानवाढीने (ग्लोबल वॉर्मिग) निर्माण झालेल्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत व तंत्रज्ञानाने लावलेले कितीतरी शोध जीवनाच्या ज्ञात व्याख्यांना आव्हाने निर्माण करत आहेत. वेगाने बदलणाऱ्या या जागतिक परिस्थितीत समस्यांकडे साधारण कुठल्या नजरेने पाहावे आणि आपल्या सभोवताली प्रश्नांचा इतका डोंगर साचलेला असताना त्यातले सर्वात महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत, हे शोधण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न ‘२१ लेसन्स फॉर द ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी’ या युवाल नोह हरारी यांच्या पुस्तकात केला गेला आहे.
एक जागतिक दर्जाचा विचारवंत म्हणून युवाल नोह हरारी यांची ओळख जगाला त्यांच्या ‘सेपीयन्स’ या पुस्तकामुळे झाली. ‘सेपीयन्स’ हे माणसाचा इतिहास सांगते, तर त्यानंतर आलेले त्यांचे ‘होमो डय़ुउस’ हे पुस्तक माणसाच्या भविष्यावर भाष्य करते. भूत-भविष्याच्या या दोन ध्रुवांदरम्यान असलेल्या आजच्या वर्तमान आणि नजीकच्या भविष्यकाळावर सटीक विश्लेषण ‘२१ लेसन्स फॉर द ट्वेंटी-फर्स्ट सेंच्युरी’मध्ये करण्यात आले आहे.
मार्क झकरबर्ग, बिल गेट्स, बराक ओबामा या दिग्गजांनी ‘सेपीयन्स’ची माध्यमांतून प्रशंसा सुरू केली आणि सिलिकॉन व्हॅलीतल्या अनेक महत्त्वांच्या लोकांशी हरारी यांचा संपर्क होऊ लागला. तंत्रज्ञानात पराकोटीचे संशोधन करून माणूसपणाची थेट व्याख्याच बदलू पाहणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांशी झालेल्या चर्चाचा परिणाम आणि परिपाक म्हणून ‘होमो डय़ुउस’ची निर्मिती झाली. तंत्रविश्वात सध्या सुरू असलेल्या संशोधनांचा धुमाकूळ चुकीच्या मार्गाने गेल्यास तो भयंकर उत्पात घडवून आणू शकतो, अशी स्पष्ट चेतावणी त्यात देऊनही सिलिकॉन व्हॅलीतली हरारी यांची लोकप्रियता कमी होण्याऐवजी वाढतेच आहे. तंत्रक्षेत्रात होणारी संशोधने आणि त्यांचे तत्त्वज्ञान, बदलत्या सामाजिक परिस्थितीचे आकलन, संकुचित राष्ट्रवादाचे विश्लेषण आणि या सार्वत्रिक निराशाजनक परिस्थितीत मानसिक स्थैर्य कसे सांभाळावे याबद्दलचे मार्गदर्शन- या विषयांना धरून ‘२१ लेसन्स..’ची निर्मिती झाली आहे.
वर्तमान जगासंदर्भात भाष्य करताना त्यासंबंधी पराकोटीची निराशा व्यक्त करून ‘हे जग लवकरच संपणार आहे’ अशा छातीठोक निष्कर्षांपर्यंत येऊन पोहचलेल्यांना जगबुडीवाले लोक, प्रलयघंटावादी किंवा कमालीचे निराशावादी लोक अशा विशेषणांना सामोरे जावे लागते. सुदैवाने हरारी ‘हे जग आता बुडूनच जाणार आहे’ या निष्कर्षांपर्यंत अद्याप आलेले नाहीत. त्यांच्या मते, जगबुडीची थेट भीती व्यक्त करणारा घाबरटपणा हा माहितीच्या गर्विष्ठपणातून येतो. जग अधोगतीकडेच चालले आहे आणि त्यामुळे आता त्याचा अंत निश्चित आहे असे ठोक विधान करणे हा एक प्रकारचा गर्विष्ठपणा आहे. आपल्या सभोवतालचे वातावरण जगबुडीचे नसून विलक्षण संभ्रमाचे आहे, असे हरारी म्हणतात. सभोवतालची परिस्थिती संभ्रमित अथवा बुचकळ्यात टाकणारी आहे, असे म्हटल्यास निदान ती परिस्थिती जास्त नम्रतेने समजावून घेता येते आणि उलटसुलट विचारविनिमयांतून प्रश्नांची उत्तरे शोधली जाऊ शकतात, असे हरारींना वाटते.
‘२१ लेसन्स..’चे पाच मुख्य भाग करण्यात आलेले असून पहिल्या भागात प्रगत तंत्रज्ञानामुळे उद्भवणाऱ्या आव्हानांचा मागोवा घेण्यात आला आहे. यात उपयोजित काही मुद्दे हे ‘होमो डय़ुउस’मध्येही आले आहेत, असे काहींचे म्हणणे आहे; परंतु तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग हा ‘होमो डय़ुउस’साठी दीर्घकालीन वा सार्वकालिक आहे, तर ‘२१ लेसन्स..’मध्ये तो तातडीच्या प्रश्नांवरती आहे. हे तातडीचे प्रश्न उदारमतवादी लोकशाहीच्या पीछेहाटीमुळे कसे उद्भवले आहेत, हे हरारींनी सोदाहरण पटवून दिले आहे. स्वयंचलन तंत्रामुळे (ऑटोमेशन) भविष्यात होणाऱ्या निश्चित रोजगारहानीशी दोन हात करण्यासाठी आजच्या काळात नेमके काय करता येऊ शकेल, या संदर्भात भाष्य करण्यात आले आहे. शिवाय ‘बिग डेटा’च्या वापरातून सत्ता आणि कंपन्यांनी माणसांवर पाळत ठेवण्यासाठी अवलंबलेल्या मार्गाचे आणि बिग डेटाच्या स्वार्थी महत्त्वाकांक्षेतून होऊ शकणाऱ्या संभाव्य सामाजिक समस्यांचे अतिशय बारीक विवेचन हरारींनी या भागात केले आहे.
पुस्तकाचा दुसरा भाग हा वर्तमानात राजकारणात उद्भवलेल्या आव्हानांकडे लक्ष वेधतो. ऑनलाइन जगात माणसांच्या समूहांची नव्याने व्याख्या काय असावी आणि राजकीय मत बनवताना लोकांच्या भावनिक निर्णयांत ढवळाढवळ करून तंत्रज्ञान लोकशाही समाजव्यवस्थांचे कसे नुकसान करू शकते, यावर हरारींनी प्रकाश टाकला आहे. राष्ट्रीय अस्मितांमुळे उद्भवलेली व्यापारयुद्धे आणि स्वयंसिद्ध होण्यासाठी राष्ट्रा-राष्ट्रांचा चाललेला आटापिटा व्यर्थ असून- या ‘बहुसांस्कृतिक कलह’ म्हणून भासणाऱ्या परिस्थितीकडे पाहताना एकूण जगाचा आणि मानवाचा इतिहास एकच आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ‘राष्ट्र’ ही फक्त संकल्पना आहे हे हरारींनी यापूर्वीच जगाला पटवून दिले आहे. ‘२१ लेसन्स..’मध्ये जागतिक प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्र-संकल्पना कुचकामी असल्याचा पुनरुच्चार हरारींनी केला आहे. आज विविध राष्ट्रांच्या सीमांवर वा कॅम्प्स्मध्ये असलेल्या स्थलांतरितांचा प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे कसा समजावून घेता येईल, यावर हरारींनी उलटसुलट तर्क मांडले आहेत. त्यांचे हे तर्क या समस्येवर पूर्णत: समाधानकारक उत्तरे देत नसले, तरी स्थलांतराच्या प्रश्नाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन देतात.
पुस्तकाचा तिसरा भाग हा आजूबाजूच्या सार्वत्रिक निराशेसंदर्भात आणि अशा वातावरणात आशावादी राहण्यासाठी मार्गदर्शन करतो. डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर लहरी रागातून हे महाशय जगातल्या एखाद्या भागात अणुबॉम्ब टाकतील की काय, अशी भीती काहींना सतत वाटत असते. शिवाय आपल्या कट्टर राष्ट्रभक्तीसाठी प्रसिद्ध असलेले परस्परविरोधी शेजारी राष्ट्रे एकमेकांवर अणुहल्ला करतील, अशी भीतीही अनेकांना वाटत असते. या संभाव्य भीतीला उद्देशून हरारी यांनी जमिनीवर उद्भवणाऱ्या युद्धांचा हा काळ नसून युद्धाचे स्वरूप आणि त्याची दृश्यता कशी बदलली आहे, याविषयी नवे आकलन मांडले आहे. सतत दहशतवादी हल्ल्यांच्या भीतीत वावरणाऱ्यांसाठी या भागातला सुरुवातीचा पाठ प्रचंड आश्वासक आहे. मात्र याच भागातल्या पुढच्या पाठात युद्धखोर माणसांच्या अमर्यादित मूर्खपणाकडेही दुर्लक्ष करून चालणारे नाही, हेही हरारी स्पष्ट करतात. राष्ट्रवादातून उद्भवणाऱ्या संभाव्य तणावातून मार्ग काढण्यासाठी हरारी हे जगभरातल्या माणसांनी कसे विनयशील असावे, याविषयी ऊहापोह करतात. हरारींच्या टीकाकारांना हा शहाजोगपणा वाटतो, तर काहींना या वळणावर हरारी हे ‘बाबागिरी’ करणारे वाटतात. ‘शेतीचा शोध ही इतिहासातली सर्वात मोठी फसवणूक आहे’ आणि ‘वर्तमानात निरुपयोगी माणसांच्या झुंडी तयार होत असून येत्या काळात या लोकांचा कुणालाही काहीही उपयोग असणार नाही’ ही दोन अत्यंत महत्त्वाची आणि खळबळजनक विधाने केल्यानंतर हरारींचे तिसरे विधान ‘परमेश्वराला वेठीस बांधू नका’ हे असू शकेल! नीतिमत्ता आणि परमेश्वरी संकल्पनेची सांगड घालताना परमेश्वरावर श्रद्धा ठेवणाऱ्या अनेकांना अतिशय योग्य सल्ला हरारींनी इथे दिला आहे. शिवाय आजच्या काळात ‘सेक्युलॅरिझम’ची नेमकी व्याख्या आणि स्वत:ला ‘सेक्युलर’ म्हणून सिद्ध करायचे असल्यास आपल्या गतकाळातल्या चुकांकडे रीतसर डोळेझाक करणे लोकांनी बंद करून आपल्या तत्त्वज्ञानाच्या इतिहासातल्या सर्व काळिमा फासणाऱ्या गोष्टींची स्पष्टपणे कबुली द्यायला हवी, असे हरारींना वाटते. नैतिकता, आचार, सहभावना, धैर्य, स्वातंत्र्य आणि जबाबदारी या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर भाष्य करून पुस्तकाचा हा तिसरा भाग संपतो.
पुस्तकाचा चौथा भाग हा ‘सत्य’ या विषयाला वाहिलेला आहे. मुळात ‘सत्य म्हणजे नेमके काय?’ असा प्रश्न निर्माण व्हावा, इतपत आजूबाजूचे वातावरण विस्कळीत आहे. अशा वेळी सत्याच्या अनुषंगाने केलेले लिखाण हे बरेचदा केवळ आध्यात्मिक वा वैचारिक पातळीवर जाऊ शकते. या दोन शक्यतांपेक्षा हरारी हे सत्याचा अतिशय वस्तुनिष्ठपणे विचार करताना दिसतात. ‘मी फार हुशार आहे आणि मला सर्व काही माहिती आहे’ अशा आत्मविश्वासात आज अनेक लोक जगत असले, तरी मानवी मनाला आणि त्याच्या विचारशक्तीला नेहमीच मर्यादा राहत आली आहे. त्यामुळे स्वत:ला सर्वज्ञानी म्हणवून घेण्याच्या खटाटोपापेक्षा आपली मर्यादा मान्य करून आणि त्या मर्यादित परिप्रेक्ष्यात प्रश्नांकडे पाहून सत्य अधिक चांगल्या प्रकारे समजावून घेता येईल, असे हरारींना वाटते. ‘न्याय’ ही संकल्पना सार्वत्रिक पातळीवर पाहताना तिची बाह्य़कक्षा विस्तृत अवकाशात कशी मोजावी, यासंबंधी हरारींनी सटीक उदाहरणे दिली आहेत. न्यायाची त्यांची व्याख्या ही इतकी नेमकी आहे, की त्या व्याख्येचा विचार केल्यास सबंध मानवजातच आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करता येईल. अर्थात, मानवावर प्रत्यक्ष थेट आरोप हरारींनी कधी केलेले नाहीत; पण त्यांची पुस्तके वाचताना काहींना आपल्या माणूस असल्याबद्दलची एक अपराधीपणाची भावना येते, ती येथे पुन्हा आल्याशिवाय राहत नाही.
जगभर उदारमतवादी लोकशाहीची पडझड झाल्यानंतर सत्तेत आलेल्या संकुचितवाद्यांवर इतिहासाची मोडतोड करण्याचे आणि खोटी माहिती पसरवण्याचे आरोप जबाबदार माध्यमांतल्या अनेकांनी केले आहेत. ज्या वेगाने आणि ज्या धिटाईने हे लोक सतत खोटे बोलत असतात, ते पाहून तत्त्ववेत्त्यांनी या काळाची ‘सत्योत्तर (पोस्ट ट्रथ) युग’ अशी व्याख्या केली आहे. हरारी ही सत्योत्तरता सहज मान्य करत नाहीत. माणूस हा नेहमीच सत्याशी फारकत घेऊन निरनिराळ्या संकल्पनांतून आपल्या जीवनाची आणि समाजाची रचना करत आला आहे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या ‘फेक न्यूज’मुळे तुम्ही व्यथित झाला असाल, तर इतिहासातले ‘फेक न्यूज’चे स्थान शोधले पाहिजे. हा शोध घेताना सर्व धर्म हे ‘फेक न्यूज’च आहेत हे आपल्या ध्यानात येईल. धर्मसंकल्पना या हजारो वर्षे जुन्या आहेत आणि ‘आपण सांगतो तेच खरे’ अशा विश्वासाने त्या आजपर्यंत तगून आहेत. त्यामुळे माणूस खूप मोठय़ा काळापासून सत्योत्तर अवस्थेतच जगतो आहे, हे हरारींनी स्पष्ट केले आहे. असे असले तरी, ‘फेक न्यूज’च्या वर्तमान उपद्रवांकडे ते दुर्लक्ष करत नाहीत; किंबहुना कुठलाही पैसा न घेता खोटय़ा बातम्या दाखवून बुद्धिभेद करणाऱ्या माध्यमांपेक्षा सत्य जास्त तत्परतेने मांडणाऱ्या माध्यमांना पैसे देण्याची तयारी लोकांनी ठेवली पाहिजे, असे हरारी म्हणतात.
वर्तमान संभ्रमित अवस्थेत मानसिक शांतता कशी साधता येईल आणि टिकवून ठेवता येईल, याविषयीचे ‘मार्गदर्शन’ हरारींनी पुस्तकाच्या शेवटच्या भागात केले आहे. या भागात ते आयुष्याचा अर्थ आणि निरनिराळ्या धर्मानी त्याबद्दल केलेले विवेचन आणि आधुनिक काळात या प्रश्नाचे स्वरूप यावर विचार करतात. त्यानंतर वाचकांना ‘ध्यान’ (मेडिटेशन) करण्याचा सल्ला देतात. मात्र त्यांचा हा सल्ला त्यांच्या काही चाहत्यांना तितकासा पटलेला नाही. हरारी यांच्याशी झालेल्या अलीकडच्या एका प्रत्यक्ष भेटीत मी- ‘‘अगोदरच्या दोन्ही पुस्तकांत तुम्ही व्यवस्थित बोलत होतात, हे तिसरे पुस्तक आले आणि त्यात तुम्ही उगाच मेडिटेशनचा विषय काढला. याची खरंच गरज होती का? एखाद्या नास्तिकाला ‘ध्यान’ करण्यासाठी कसे पटवावे?’’ असे त्यांना विचारले. त्यावर त्यांनी- ‘‘माणसांना एखाद्या गोष्टीसाठी ‘कन्व्हिन्स’ करणे सोपे नाही आणि अशा कन्व्हिन्सिंगचा दीर्घकालीन उपयोगही होत नाही’’ असे सरळ उत्तर दिले. ‘‘ध्यान करणे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. ते चांगले की वाईट, हे ठरवण्याआधी एकदा ध्यान करायला हवे आणि त्यानंतर आपली उत्तरे आपणच ठरवायला हवीत’’ असेही ते म्हणाले.
‘२१ लेसन्स..’ या पुस्तकाचा समग्र विचार केल्यास त्यात मांडले गेलेले प्रश्न, तर्क आणि चिंता या अतिशय गुंतागुंतीच्या आणि थकवून टाकणाऱ्या आहेत. या पुस्तकाच्या वाचनादरम्यान होणारी जाणीव आणि त्यातील मांडलेल्या तथ्यांमुळे एकाच वेळी काही समस्यांचे आकलन होते, तर काही समस्या वाटतात त्याहून जास्त गंभीर आहेत हे कळून येते. सबंध मानवजातीला पुढची वाटचाल करणे सुलभ व्हावे यासाठी ‘२१ लेसन्स..’ वाचणे गरजेचे आहे आणि ते वाचून झाल्यावर किमान येता श्वास आणि जाता श्वास यांवर लक्ष केंद्रित करून रोज काही मिनिटे का होईना, पण प्रत्येकाने ध्यान करणे गरजेचे आहे!
‘२१ लेसन्स फॉर द ट्वेंटी-फर्स्ट सेंच्युरी’
लेखक : युवाल नोह हरारी
प्रकाशक : व्हिन्टेज पब्लिशिंग
पृष्ठे : ३६८, किंमत : ७९९ रुपये