प्रियांका तुपे priyanka.tupe@expressindia.com

नातेसंबंध, कुटुंबव्यवस्था, मूल्यव्यवस्था यांच्या व्याख्या बदलत चाललेल्या आजच्या काळात माणूस म्हणून वाढ होण्यासाठी मुक्तावकाश कसा मिळवायचा, याच्या कल्पनाही बदलत जाणार आहेत. त्याकडे उत्फुल्ल, नव्या दृष्टीनं पाहायला हवं, हे सांगणाऱ्या कादंबरीविषयी..

मध्यमवर्गीय माणसाचं आयुष्य कुटुंब या संकल्पनेभोवती इतकं आखीव-रेखीवपणे बांधलेलं असतं, की त्यातूनच कुटुंबाबाबतच्या ठरावीक धारणा तयार होतात. कुटुंबांमध्ये दुहीची वा फुटीची शक्यता दिसली, की एकत्र कुटुंबाच्या मध्यमवर्गीय धारणांना हादरे बसतात. त्याचंच प्रतििबब मग कौटुंबिक जिव्हाळ्यांच्या सिनेमा, नाटकांतून, साहित्यातून उमटतं. त्यात काही गैरही नाही. मात्र, ‘आदर्श कुटुंब कसं असावं’ याबाबतचं चित्र रंगवणाऱ्या अशा कलाकृतींतून जणू असं काही बिंबवलं जातं की, माणसं मानवी नातेसंबंधांपेक्षा शरीरानं एका छताखाली ‘एकत्र’ राहण्याला प्राधान्य देतात. आपल्याकडील अशा एकंदर सांस्कृतिक-सामाजिक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर, ‘ए पॅचवर्क फॅमिली’ ही मुक्ता साठे यांची कादंबरी कुटुंबसंस्थेच्या मध्यमवर्गीय धारणांना छेद देणारी ठरते. कादंबरीत एकीकडे रक्ताच्या नात्यातली दुभंगलेली मनं आहेत, चिरफाळलेले नातेसंबंध आहेत, त्याचबरोबर रक्ताचं नातं नसलेल्या एखाद्या व्यक्तीसोबतचं तितकंच जिवंत, रसरशीत, निखळ नातं आहे, नात्यांचे तुकडे आहेत. विविधरंगी तुकडय़ांना एकत्र सांधताना होणारी दमछाक आहे, बंडखोरी आहे नि आपण हे बंड कशासाठी करत आहोत, याची पुरेशी स्पष्टताही यातल्या तरुण नायिकेला आहे आणि त्याच बरोबरीनं तीन पिढय़ांमधला मूल्यभानाचा टोकदार संघर्षही या कादंबरीतून तीव्रपणे समोर येतो.

जानकी ही या कादंबरीची नायिका एकाच पातळीवर अनेक गुंते सोडवताना स्वत:च्या कुटुंबाला पारखी होते. लहानपणापासून मितभाषी असलेल्या जानकीचा स्व-अवकाश मिळवण्यापर्यंतचा प्रवास रंजक आणि उद्बोधक आहे. तत्त्वांसाठी आपल्याच कुटुंबाशी करावा लागणारा झगडा, त्यातून एका बाजूला नाती गमावण्याची असलेली शक्यता आणि दुसऱ्या बाजूला मत्रिणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येविरोधात न्यायासाठी उभं राहणं – या दोन्हींपैकी एक गोष्ट निवडण्याची परिस्थिती असताना मत्रिणीच्या न्यायासाठी ती उभी राहते आणि अर्थात या बंडखोरीची किंमत तिला चुकवावी लागते. विशी-पंचविशीतली जानकी आपल्या मूल्यांवर ठाम विश्वास असलेली आहे. मुर्दाड व्यवस्थेशी झगडा करताना आशेचा दीप हातात घेऊन अखंड चालत राहणारी आहे. तिला जाणीव आहे आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबाची, त्यांच्या विचारांची. त्यामुळेच ती मध्यमवर्गीय सुखवस्तू माणसाच्या ‘आपल्याला काय त्याचं’ या वृत्तीचा कधी समाचार घेते, तर कधी त्यांना आपल्या स्वत:च्याच कोशात गुरफटलेल्या सुरक्षित जगण्याचा आरसा दाखवते. जानकीचा आणि तिच्या कुटुंबीयांचा संवाद सर्वसाधारण पांढरपेशा माणसाच्या सामाजिक हस्तक्षेपाबाबतच्या धारणांचं प्रतीक आहे, असं कादंबरी वाचताना वाटत राहतं.

कादंबरीत अनेक उपकथानकं येतात. जानकीच्या भावाचा मित्र -जो त्यांच्या कुटुंबाचाही मित्र आहे- त्यानं शाळेतल्या शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर जानकी व्यथित होते. आपल्या भावाला त्या धक्क्यातून सावरण्यास मदत करते. शिक्षणव्यवस्थेतल्या फोलपणावर हतबल होणं, जवळच्याच व्यक्तीचा बळी गेल्याचं दु:ख आणि पुन्हा भावाला सावरण्यासाठी मन घट्ट करणं.. हा प्रसंग तिला मानसिकरीत्या एका सुरक्षित कोशातल्या जगण्यातून बाहेर काढतो. असे अनेक टक्केटोणपे पुढे येणार असतात, ज्यांस सामोरं कसं जावं याची चर्चाही अनेकदा सुखवस्तू कुटुंबांत होत नाही किंवा अगदी स्वत:ला त्याची झळ बसेपर्यंत त्याची तीव्रता कळत नाही. उपकथानकांमधल्या अनेक बारीकसारीक तपशिलांतून, संवादांतून लेखिका मध्यमवर्गीय घरांची सामाजिक- राजकीय घडण, संरचना सांगते, सूचित करत राहते.

जानकी आपलं शिक्षण पूर्ण करून वकील बनते. दरम्यानच्या काळात मैत्रिणीच्या न्यायासाठी लढत असताना, तिच्या आरोपींनी हरतऱ्हेने दहशत निर्माण केली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून खटल्यात न्यायालयासमोर जबाब देण्यापासून परावृत्त करताना जानकीला अनेकदा आरोपींनी धमक्या दिल्या आणि दबावतंत्र, दहशतीचा भाग म्हणून संधी साधून तिच्या आईची हत्याही केली. तरीही न डगमगलेली जानकी न्यायप्रक्रियेतल्या फटी, त्या फटींतून निसटणारे आरोपी पाहून अडखळते; लढण्याचा निश्चय ठाम असला तरीही न्याय मिळवण्यासाठी तेवढं पुरेसं नसतं, हे ती वकील असल्यानं तिला ‘थिअरी’ म्हणून माहीत असतंच; पण स्वत: त्या घटिताचा भाग असणं हे मानसिकरीत्या किती दमछाक करणारं असतं, याचा प्रत्यय तिला आणि तिच्या रूपानं वाचक म्हणून आपल्याला येतोच. पुराव्यांच्या अभावामुळे तिच्या मैत्रिणीचे आरोपी मुक्तपणे वावरत आहेत, त्यातीलच एकानं तिच्या आईची हत्या करून, त्याबद्दलच हिणवणीच्या सुरातली कबुलीही जानकी आणि तिच्या भावाला वाटेत गाठून दिली. रागाच्या भरात जानकीच्या भावानं त्या आरोपीचा खून केल्यानंतर त्याला अटक झाली, पुरावे मिळाले. आपण वकील असलो तरी आपल्या भावानं गुन्हा केला आहे, हे माहीत असल्यानं- त्याचं पुढे काय होईल याचा विचार न करता, तिला पुन्हा एकदा ‘न्याय की नातं’ यातल्या एकाची निवड करावी लागते आणि अर्थातच ती पोलिसांना सत्य सांगणारा जबाब देते. मैत्रिणीच्या बलात्कार आणि खून खटल्यात एकाच वेळी मैत्रीण आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार या भूमिकेत असलेली नायिका, तिच्या भावाच्या खटल्यातही साक्षीदार आणि वकील अशा दोन्ही भूमिकांत आहे. अशा वेळी आपलं माणूस गजाआड असलेलं पाहायचं की न्यायासाठी, तत्त्वांसाठी झगडा करायचा, हे द्वंद्व तिची परीक्षा पाहणारं आहे. तिच्या आईच्या आकस्मिक आणि संशयास्पद मृत्यूच्या तपासाची फाइल तर उघडण्याआधीच बंद होते. बलात्कारपीडितेला न्याय मिळवून देताना केवळ ती पीडिताच नव्हे, तर संबंधित खटल्यातील साक्षीदार, वकील यांच्यावर किती मोठय़ा प्रमाणात दहशत असते, याची उदाहरणं हल्ली दररोजच वृत्तपत्रांतून वाचायला मिळतात. न्यायव्यवस्थेचा भाग असलेल्या व्यक्तीला वैयक्तिक आकांक्षा बाजूला ठेवून, व्यवस्थात्मक पातळीवरच्या व्यापक लढाईसाठी सज्ज असावं लागतं, तरीही यश मिळण्याची शाश्वती नाही हे आणखी ठळकपणे जाणवतं.

नायिकेचा मूल्यांसाठी झगडण्याचा अट्टहास, न्यायासाठी असलेली चाड याबद्दल ती स्वत:ला तपासून पाहते. आपण अन्यायाविरोधात लढतो ते आपल्याला कुणावरही अन्याय होऊ नये असं वाटत म्हणून, की डोळ्यांसमोर काही घडत असताना आपण भूमिका घेतली नाही यामुळे भविष्यात येऊ शकणाऱ्या अपराधगंडापासून स्वत:ला वाचवण्यासाठी, हा प्रश्न जानकी स्वत:ला विचारते. स्वत:च्या भावाला तुरुंगात भेटायला गेल्यानंतर त्याच्याशी झालेल्या संवादात तिला हा प्रश्न पडलेला आहे. याचं उत्तर मिळवताना ती स्वत:शी प्रामाणिक आहे. अनेकदा आपण अपराधगंड येऊ नये यासाठी भूमिका घेतल्याचं ती मान्य करते.

कादंबरीचा पूर्वार्ध थोडा अधिक रेंगाळलेला आणि पसरट झालेला आहे; मात्र कथानकाच्या मध्यावर आल्यावर अचानक अनपेक्षित कथासूत्रं त्यात येतात. पुढच्या नाटय़मय, थरारक घडामोडी पचवण्यासाठी वाचकाला जागरूक करण्याकरता धक्कातंत्राचा वापर उत्तमरीत्या लेखिकेनं केला आहे. त्यामुळे कादंबरीच्या मध्यावर आल्यापासून अखेपर्यंतचा भाग एखाद्या चित्रपटासारखा खिळवून ठेवतो.

तत्त्वं, मूल्य, समाजव्यवस्थेशी एखादी व्यक्ती टक्कर घेत असताना त्याच वेळी कौटुंबिक पातळीवर – ‘लष्कराच्या भाकरी भाजायची हौस..’ असा सूर आळवला जातो. याचा अर्थ, आपले आप्त आपल्याशी शत्रुअभावी पद्धतीनं वागत आहेत असं नव्हे, तर त्यांचाही वर्तनव्यवहार समजून घेणं आवश्यक असतं. मात्र त्यांच्या धारणा, श्रद्धा समजून घेतल्या तरीही विचारांतलं अंतर वाढतच गेलं, ते सांधता येणार नाही हे लक्षात आलं, की वेगळं व्हावं; कोणत्याही अपराधगंडाशिवाय इतर सामाजिक नात्यांत रमावं, हे अतिशय सहजपणे सांगण्याचा प्रयत्न लेखिका करते. रक्ताच्या नात्यापलीकडली अशी काही नाती असू शकतात, ज्यांना कधी कधी नाव देता येणार नाही, ज्यांची व्याख्या करता येणार नाही, मात्र ते नातेसंबंधही उत्कट असू शकतात. जीवनातल्या संघर्षांत सोबत करू शकतात. अनेकदा माणूस नवी नाती जोडतो ती प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि मानवी गरजांच्या जाणवणाऱ्या पोकळीमुळे. या गरजा आपली रक्ताची नाती पूर्ण करू शकतीलच असं नाही आणि आदर्श कुटुंबांच्या ‘परफेक्ट फोटोफ्रेमसारखं’ मानवी आयुष्य सरळ-सोपं नाही. मानवी नात्यांमध्ये विश्वास, जिव्हाळा, ओल लागते तशीच अधिमान्यता ही सुद्धा एक मुख्य मानसिक गरज असते. माणूस म्हणून वाढ होण्यासाठी मुक्तावकाश लागतो, तो केवळ वयानं आणि अनुभवानं मोठी असलेली ‘आपलीच’ माणसं देऊ शकतात असं नाही, तो अवकाश जानकीला तिच्या आजोबांच्या मित्राच्या मुक्त स्वभावामुळे, समजूतदारपणे मिळाला. नातेसंबंधांच्या, कुटुंबव्यवस्थेच्या, मूल्यव्यवस्थेच्या आजच्या काळातल्या बदलत चाललेल्या व्याख्यांमध्ये हा अवकाशही बदलत जाणारा आहे. त्याकडेही उत्फुल्ल, नव्या दृष्टीनं पाहायला हवं, हे या कादंबरीचं सांगणं!

‘ए पॅचवर्क फॅमिली’

लेखिका : मुक्ता साठे

प्रकाशक : स्पीकिंग टायगर

पृष्ठे: १९३, किंमत : २९९ रुपये

Story img Loader