संकल्प गुर्जर sankalp.gurjar@gmail.com
फॅसिझमच्या इतिहासाचीच नव्हे, तर त्याच्या वर्तमान लक्षणांची आणि लोकशाहीतही तो उद्भवतो कसा, याची चर्चा आवश्यक आहे. तशी चर्चा करणाऱ्या आणि मुख्य म्हणजे त्यावर उपाय सुचवणाऱ्या दोन पुस्तकांबद्दलचे हे लेख..
शंभर वर्षांपूर्वी- ११ नोव्हेंबर १९१८ रोजी जर्मनीने पहिल्या महायुद्धात शरणागती पत्करली होती आणि त्या पराभवाच्या छायेतूनच हिटलरचा उदय झाला. जर्मनीला तिचा सन्मान मिळवून देण्याची, बलाढय़ करण्याची भाषा करत हिटलरने साऱ्या जगाला विनाशाच्या दिशेने लोटले. आजच्या जगाकडे पाहताना आपण पुन्हा त्याच दिशेने चाललो आहोत का, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळेच आजच्या अस्वस्थ काळात त्या इतिहासाचे स्मरण करतानाच फॅसिस्ट प्रवृत्तींचा उदय का होतो, ‘फॅसिझम’ म्हणजे नेमके काय, त्याची मुख्य लक्षणे कोणती आणि फॅसिस्ट प्रवृत्ती देशाला कशा चुकीच्या दिशेने नेतात, याचा अभ्यास होणे आवश्यक आहे. त्यासाठीच ‘फॅसिझम : अ वॉर्निग’ हे मॅडेलीन अल्ब्राइट यांनी लिहिलेले नवे पुस्तक वाचायला हवे.
मध्य युरोपातील चेकोस्लोव्हाकियामध्ये जन्मलेल्या अल्ब्राइट यांचे वडील परराष्ट्र सेवेत होते. या देशावर १९३९ मध्ये आधी हिटलरच्या जर्मनीने आणि नंतर १९४८ मध्ये स्टालिनच्या सोव्हिएत रशियाने पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले. या दोन्ही वेळेस देशात हुकूमशाही राजवट आल्यामुळे देश सोडावा लागलेल्या, आधी ब्रिटन आणि नंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या मॅडेलीन अल्ब्राइट त्यांच्या वडिलांप्रमाणेच पूर्व युरोपच्या तज्ज्ञ म्हणून नावारूपाला आल्या. बिल क्लिंटन राष्ट्राध्यक्ष असताना त्या अमेरिकेच्या इतिहासातल्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री (१९९६ ते २०००) झाल्या. फॅसिझम अतिशय जवळून अनुभवलेल्या, दुसरे महायुद्ध ते अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प निवडून येणे इतका व्यापक पट डोळ्यांसमोर असलेल्या, लोकशाहीवर प्रगाढ निष्ठा असलेल्या आणि मोजकेच लिहिणाऱ्या अल्ब्राइट जेव्हा ‘फॅसिझम’वर अतिशय वाचनीय व कालसुसंगत पुस्तक लिहितात, तेव्हा त्याची दखल घेणे क्रमप्राप्तच ठरते.
पुस्तकात दोन प्रमुख विभाग स्पष्टपणे दिसतात. पहिल्या भागात (पाच प्रकरणे) त्या १९३० च्या दशकातील फॅसिझमविषयी लिहितात; तर दुसऱ्या भागात (आठ प्रकरणे) सध्याच्या काळात तो कसा वेगवेगळ्या देशांत पुन्हा उदयाला आला आहे, हे त्या उदाहरणांसहित दाखवतात. या दोन्ही विभागांतील विवेचनाची कारणमीमांसा करणारी, फॅसिझमच्या उदयाचे परिणाम उलगडून दाखवणारी आणि ते रोखण्यासाठी काय करायला हवे हे सांगणारी चार प्रकरणे पुस्तकात आहेत. या लेखात विविध देशांतील परिस्थिती लेखिकेने कशा रीतीने स्पष्ट करून दाखवली आहे, हे विस्ताराने सांगण्यापेक्षा मुद्दामच सध्या जोर पकडलेल्या फॅसिस्ट प्रवृत्तींची सर्वसाधारण लक्षणे-कार्यप्रणाली स्पष्ट करणे आणि काही साम्य-भेद दाखवून देणे यावर भर दिलेला आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूला फॅसिस्ट प्रवृत्ती दिसतात का आणि त्यापासून आपण सावध का राहायला हवे, याचा शोध घेता येईल.
अल्ब्राइट पुस्तकात १९२० च्या दशकापासून सत्तेत आलेल्या जगातल्या प्रमुख फॅसिस्ट राजवटींचा (उदा. इटलीतील मुसोलिनी, जर्मनीतील हिटलर, स्पेनमधील जनरल फ्रँको) आढावा घेतात. त्या लिहितात की, जरी जर्मनी व इटलीचा दुसऱ्या महायुद्धात पराभव झाला आणि जगात लोकशाहीचा क्रमाने प्रसार होत गेला असला, तरीही जगातील हुकूमशाहीवादी प्रवृत्ती पूर्णत: संपल्या नाहीत. सोव्हिएत रशिया, चीन आणि पूर्व युरोपात साम्यवादी राजवटी सत्तेत होत्या. या राजवटी फॅसिझमला आपला शत्रू मानत असल्या, तरीही त्या दोघांमध्ये आश्चर्यकारक वाटावीत अशी साम्यस्थळे आहेत. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपात जी सामाजिक आणि वैचारिक घुसळण झाली होती, तिच्यामुळे फॅसिझम व साम्यवाद या दोन्ही विचारधारांचा प्रसार झाला. दोन्हीकडे भावनेला आवाहन केले जात होते आणि तथाकथित ‘नवा माणूस’ घडवण्याच्या वल्गना केल्या जात असत. दोन्ही विचारधारांना हिंसेचे अजिबातच वावडे नव्हते. उलट, लोकशाही शासनप्रणाली, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, खुली चर्चा, स्वतंत्र न्यायसंस्था, विरोधी मतांचा आदर आदींविषयी द्वेषभावनाच होती.
अशा या साम्यवादी राजवटींना १९९१ मध्ये घरघर लागली. मात्र, त्यानंतरच्या दहा वर्षांतच जगात हळूहळू पुन्हा नव्याने फॅसिझमचा उदय व्हायला लागला. या काळात उदयाला आलेल्या काही प्रमुख राजवटींचा आढावा घेताना त्यामध्ये रशियातील पुतिन, तुर्कीमधील एर्दोगान, सर्बियातील मिलोसेविच, व्हेनेझुएलामधील ह्य़ुगो चावेझ यांचा समावेश केलेला आहे. तसेच उत्तर कोरियातील साम्यवादी राजवट आणि हंगेरी-पोलंड-जर्मनी-फ्रान्स अशा युरोपीय देशांत गेल्या काही वर्षांत वेगाने वाढणाऱ्या फॅसिस्ट प्रवृत्ती यांचीही दखल घेतलेली आहे. अर्थात, अल्ब्राइट यांनी पुस्तकात सतत लोकशाहीचे नाव घेत पूर्णत: फॅसिस्ट प्रवृत्तीनेच सत्ता राबवणाऱ्या इतर अनेक देशांतील- विशेषत: आशिया खंडातील- सत्ताधीशांचा समावेश का केलेला नाही, असा प्रश्न ही यादी पाहून पडू शकतो.
परंतु खरा महत्त्वाचा प्रश्न हा आहे, की जर अशा फॅसिस्ट प्रवृत्ती आपल्या आजूबाजूला सातत्याने वावरत आहेत आणि त्यांचा प्रभाव आता वाढताना दिसत आहे, तर त्यांना ओळखावे कसे? त्या लिहितात की, फॅसिझमचा संबंध कोणत्याही एका विशिष्ट ध्येय-धोरणाशी नसतो. सत्ता मिळवणे आणि ‘काहीही करून’ ती टिकवणे हेच फॅसिस्टांचे खरे उद्दिष्ट असते. लोकशाही राजवटीत जन्माला येणारे सगळे फॅसिस्ट नेते कोणत्या ना कोणत्या मार्गानी झुंडीशी भावनिक नाते तयार करतात आणि समूहमनात खोलवर रुजलेल्या द्वेषाला, असुरक्षित भावनांना वाट काढून देतात. देशाचा युद्धात पराभव होणे, देशासाठी लाजिरवाणी घटना घडणे किंवा देशाचा ‘ऱ्हास’ होत आहे असे वाटणे अशा कारणांमुळे अस्वस्थ झालेल्या वर्गाचा ते पाठिंबा मिळवतात. ही तथाकथित ऱ्हासाची, पराभवाची, शरमेची भावना जितकी खोल तितके फॅसिस्ट नेत्यांचे काम सोपे होते. इतिहासात हे यापूर्वीही झाले आहे आणि आताही अनेक देशांत तेच होताना दिसत आहे. उदा. आर्थिक व राजकीय संकट आल्याने तुर्की आणि व्हेनेझुएलामध्ये, तर शीतयुद्ध संपल्यानंतर उसळलेल्या आक्रमक राष्ट्रवादाच्या लाटेत रशिया आणि सर्बियामध्ये फॅसिस्ट प्रवृत्तींनी सत्ता मिळवली. सध्याच्या युरोपात स्थलांतरितांच्या संकटामुळे फॅसिझमचा जोर वाढत आहे.
अल्ब्राइट लिहितात की, फॅसिस्ट नेते राष्ट्रीय स्तरावर योग्य संधी येईपर्यंत वाट पाहतात आणि एकदा अशी संधी निर्माण झाली, की तिचा फायदा घ्यायला ते नेहमीच तयार असतात. सत्तेत आल्यानंतर फॅसिस्ट नेते टप्प्याटप्प्याने, छोटय़ा छोटय़ा स्वरूपाच्या पावलांद्वारे आपले पूर्ण वर्चस्व निर्माण करतात. त्यातूनच सत्ता टिकवण्याचा मार्ग मोकळा होतो. उदा. एकदा एका वृत्तपत्राचा आवाज बंद पाडला, की मग नंतर दुसऱ्याचा आवाज बंद पाडणे सोपे होते किंवा एका अल्पसंख्य गटाचे हक्क हिरावून घेतले, की मग दुसऱ्या गटाचेही हक्क हिरावून घेताना विरोध होत नाही. पुतिन, एर्दोगान, चावेझ, इतर देशांतील फॅसिस्ट राजवटी यांच्या सर्वाच्या कार्यपद्धतीत अशी साम्यस्थळे अगदी सहजपणे दिसतात. आक्रमक परराष्ट्र धोरण, उदारमतवादाचा तिरस्कार, लष्कराचे विनाकारण गौरवीकरण, विरोधकांचे खच्चीकरण, संस्थात्मक स्वातंत्र्य नष्ट करणे यांसारखी समान सूत्रे त्यांच्या वर्तनात सापडतात. माहितीचे नियंत्रण हा सगळ्या फॅसिस्ट नेत्यांचा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम असतो. फॅसिस्ट नेते आणि त्यांच्या संघटना नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून जाणीवपूर्वक दिशाभूल करण्यात, चुकीचा इतिहास लिहिण्यात, धर्म व वंश याविषयी अडाणी स्वरूपाची मते प्रसारित करण्यात अगदी आघाडीवर असतात. सतत जाणीवपूर्वक खोटे बोलून त्यालाच खरे वाटायला लावण्यात फॅसिस्ट नेत्यांचा हात कुणीच धरू शकत नाही.
अल्ब्राइट यांनी सांगितलेल्या फॅसिझमविषयक अनेक गोष्टी खरे तर आपल्याला माहीत आहेत. याआधीही आपण त्यांच्याविषयी वाचले आहे. मग आताच त्यांच्याविषयी काळजी करण्याचे कारण काय? अल्ब्राइट यांच्या मते, अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्याने खऱ्या अर्थाने पहिल्यांदाच त्या देशात पूर्णत: लोकशाहीविरोधी नेता लोकशाही मार्गाने सत्तेत आला आहे. समजा, परिस्थिती सर्वसाधारणच असती आणि ट्रम्प यांच्यासारखा रेटून खोटे बोलणारा, हुकूमशहांचे आकर्षण वाटणारा, उदारमतवादाला विरोध करणारा नेता निवडून आला असता, तर त्यामुळे फारसे नुकसान झाले नसते. मात्र, सध्या अनेक देशांत, एकाच वेळेस अशाच प्रवृत्तीचे नेते सत्तेत आहेत. हे सगळे जण स्वत:ला ‘स्ट्राँग मॅन’ मानतात. ‘जनता’ नावाच्या एका संदिग्ध समूहाच्या हिताची भाषा बोलतात. आपल्याशिवाय देशाला कसा पर्याय नाही, असा प्रचार करतात. आंतरराष्ट्रीय राजकारणात एकमेकांचे अनुकरण करण्याची प्रवृत्ती फार प्रबळ असते. अगदी प्रसारमाध्यमांचा विस्फोट झाला नव्हता त्याही काळात हिटलरने मुसोलिनीच्या कार्यप्रणालीचे काही बाबतीत अनुकरण केलेच होते. तेच आताही होताना दिसते. त्यामुळेच लोकशाही देशांमध्येच जर स्वातंत्र्य, उदारमतवाद, अमर्याद सत्तेवर नियंत्रण अशा लोकशाही मूल्यव्यवस्थेलाच तुच्छ लेखणारे नेते सत्तेत असतील, तर लोकशाहीचे आशास्थान म्हणून कोणाकडे पाहायचे?
अल्ब्राइट लिहितात की, जागतिकीकरणाने आपला फायदा झाला नाही, उदारमतवादी लोकशाही आपल्याला हवे त्या प्रकारचे राहणीमान देऊ शकत नाही, विविध देशांतील स्थलांतरित आपल्या वाटय़ाची साधनसंपत्ती आणि नोकऱ्या हिरावून घेत आहेत असे अनेकांना वाटते. त्यातूनच फॅसिस्ट प्रवृत्तींचे, तथाकथित ‘सामर्थ्यवान’ नेत्यांचे आकर्षण वाढत चालले आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सोपी उत्तरे नाहीत आणि लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या नेत्यांनी आपल्या कार्यप्रणालीत त्यासाठी बदल करायला हवेत, असे त्या सांगतात. ओबामांनी त्यांच्या कार्यकाळात यातून मार्ग काढण्यासाठी आवश्यक अशी काही धोरणे (उदा. ‘ओबामाकेअर’) राबवली होती. पुस्तकाच्या शेवटी त्या सूचित करतात की, सध्याच्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी अब्राहम लिंकन वा नेल्सन मंडेला यांच्यासारख्या द्रष्टय़ा, विभाजनवादी राजकारण न करता देशाला एकत्र आणणाऱ्या नेत्यांची गरज आहे.
हे पुस्तक काहींना ‘मनात उगाच भीती पेरणारे’ या स्वरूपाचे वाटेल; परंतु आज लोकशाही मूल्यांवर, उदारमतवादावर जगभरात सातत्याने हल्ले होत आहेत हे दिसत असताना आपण सावध असलेले कधीही चांगलेच, असे लेखिकेला वाटते. स्वत: काहीही न करता हे वाईट दिवस सरण्याची वाट पाहावी अशी इच्छा अनेकांना होऊ शकते; परंतु स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपल्याला नेहमी लढा द्यावाच लागतो हा आजवरच्या इतिहासाचा दाखला आहे. ते करायची आपली तयारी आहे काय?
‘फॅसिझम : अ वॉर्निग’
लेखिका : मॅडेलीन अल्ब्राइट
प्रकाशक : विल्यम कॉलिन्स
पृष्ठे : २८८, किंमत : ६९९ रुपये