उम्बतरे इको यांच्या सातही कादंबऱ्यांची भाषांतरं झाली आहेत. सातवी- ‘न्युमेरो झीरो’ नावाची कादंबरी  गेल्या वर्षी इटालियन भाषेत आली आणि त्याचवर्षी (नोव्हेंबर २०१५) इंग्रजीतही. ती शेवटची कादंबरी- कुणी जाणकार म्हणेल ‘नेम ऑफ द रोज’ किंवा ‘फुकोज् पेन्डय़ुलम’ इतकी खास नाहिये- पण त्याहीकडे दुर्लक्ष करून वाचावी, अशी नक्कीच आहे. ती का? अथपासून इतीपर्यंत वाचल्यानंतर मिळणारी उत्तरं खूप आहेत : विविध आणि विस्तृतही. म्हणजे लेखनशैली, त्यातून जाणवणारे लेखकाचे प्राधान्यक्रम, लिखाणाचा प्रचंड ऐवज असूनही कथानकाचा धागा न सोडणं, रहस्य कायम ठेवूनही केवळ ‘रहस्यकथा’ न होऊ देणं, अशी अनेक वैशिष्टय़ं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पण यापेक्षा मोठं वैशिष्टय़ म्हणजे, इतिहासाच्या पुनर्लेखनाची उम्बतरे इको यांची धडाडी! कशी, ते नंतर पाहू. आधी, कादंबरी मुळातून वाचताना कायकाय जाणवेल याचा धावता आढावा घेऊ. ‘नळ गळतच नाही.. त्यातून पाण्याचा टप-टप असा आवाज येतंच नाही.. असं झालंच कसं?’ या म्हटलं तर फालतू प्रश्नाला  एखाद्या रहस्यमय संशयाचं रूप देऊन कादंबरी सुरू होते. पहिलं अख्खं प्रकरण इटालिक टायपात. ते वाचताना खात्री पटते की, खरोखरच कुणीतरी याच्या मागावर आहे. ते कुणीतरी त्याच्या घरात शिरून निघून गेलंय, त्यांनीच बहुतेक नळाची मुख्य कळ फिरवून गळतीचा आवाज थांबवलाय! घरात येऊ शकतात ते.. म्हणजे आता त्याचं काही खरं नाही.. का पण? का असं? गोष्ट मोठी आहे.

जरा दमानं वाचावी लागेल ही गोष्ट. ‘एका भाषांतरकाराला, एका वृत्तपत्राचा संपादक ‘घोस्ट रायटिंग’चं काम देतो आणि हा भाषांतरकार पत्रकार म्हणून वावरू लागतो’ असं जे काही अमेझॉनवर वगैरे वाचायला मिळतं, ते अर्धसत्यच आहे. गोष्ट अशी की, या वृत्तपत्राचा पहिला अंक वर्षभरानं निघेल या बोलीवर सध्या फक्त चाचणी अंकांचं काम सुरू आहे. शून्यातून सुरुवात. पण ही सुरुवात करून देणाऱ्या संपादकालाच मुळात, हे वृत्तपत्र सुरू व्हावं असं वाटत नाहिये! का? त्याचा मालक मिलान शहरातला माफिया आहे.. काळे धंदे भरपूर आणि धर्मादाय संस्थाही भरपूर असा अगदी अट्टल माफिया. पण या मालकाला आता जरा वरच्या- जरा दर्जेदार मंडळींत जायचंय म्हणून तो वृत्तपत्र सुरू करून पाहणार आहे. पहिल्या बारा चाचणी अंकांतच आपण अशा बातम्या देऊ की ही ‘वरच्या दर्जाची मंडळी’ हलून जातील आणि बोलती बंद करण्यासाठी मालकालाच म्हणतील, आम्ही शेअर देतो तुला पण पेपर नको काढू.. ही योजना सिमेई नावाच्या त्या संपादकाची की मालकाचीच? ते असो, पण असल्या भन्नाट ‘हलवून टाकणाऱ्या’ बातम्या आणण्यासाठी या वृत्तपत्रात पहिल्यांदा घेण्यात आलेल्या सहा जणांची धावपळ सुरू आहे. त्यापैकी माइया ही एकमेव तरुणी (वय ३० वर्षे)  यापूर्वी फॅशन मासिकात, ‘सेलेब्रिटी गॉसिप’ लिहिण्याचं काम करीत असल्यामुळे, तिला डोकं नाही असं संपादकानं परस्पर ठरवून टाकलं. म्हणजे उरले पाच. त्यापैकी एक लुसिडी हा बहुधा ‘सरकारी हेर’ आहे, असा संपादकाचाच संशय आहे, म्हणून उरले चौघे. त्यापैकी दोघे वार्ताहर नाहीत, त्यामुळे दोघेच. यापैकी कॅम्ब्रिया जरा सांगकाम्या आणि बडबडय़ा. उरला एक.

हा रोमानो ब्रगादोचिओ. हा कादंबरीचा नायक नाही. म्हटलं तर उपनायकच. माइयाच्या दृष्टीनं तर खलनायकच. कारण तिचं कोलोनाशी काही दिवसांतच छान जुळलंय. हा कोलोना मात्र आपला नायक. तोच तो, जर्मन ते इटालियन भाषांतरं करून कसाबसा जगणारा आणि आता खुद्द संपादकाचा- सिमेई यांचा-  ‘घोस्ट रायटर’ म्हणून इथं आलेला. कोलोनाचं खरं काम आहे ते सिमेईचं ‘माफिया मालकाच्या वृत्तपत्रातले माझे (निर्भीड) दिवस’ असं आत्मपर पुस्तक लिहून सिमेईचं प्रस्थ वाढवणं, हे. पण सिमेई काय करतो आहे हे त्याला पाहाता यावं म्हणून, कोलोना हे आपले सहायक संपादक  आहेत असं सिमेई बाकीच्या सहाजणांना सांगतो. साहजिकच, ब्रगादोचिओ  हा या कोलोनावर चटकन विश्वास ठेवतो आणि स्वत ज्या भन्नाट बातमीच्या मागावर आहे, तिची माहिती कोलोनाला खासगीपणे का होईना, पण देत राहातो!

ही माहिती खरोखरच भन्नाट. झोप उडवणारी. इटलीचा मुसोलिनी हा फॅसिस्ट हुकूमशहा २८ एप्रिल१९४५ रोजी मारला गेला होता.. तो मुसोलिनी खरा नव्हताच, असा ‘शोध’ ब्रगादोचिओ १९९२ सालात लावतो आहे. ब्रगादोचिओ हे सारं अत्यंत गांभीर्यानं करतो आहे. त्याचे आजोबा फॅसिस्ट होते. त्यांचा खून झाला. त्याचे वडीलसुद्धा मुसोलिनीच्या काळात सरकारी नोकर होते आणि फॅसिस्टांच्या पाडावानंतर नोकरी गेल्यावर, दारुडे. स्वत ब्रगादोचिओ याला कुठलीही राजकीय मतं नाहीत. तो अफाट माहिती मात्र जमा करतो आहे आणि मुख्य म्हणजे, जिथं प्रश्न पडायला हवेत तिथं त्याला ते पडतात, म्हणून त्यानं जमवलेली माहिती महत्त्वाचीसुद्धा आहे. पण अखेर, ही माहिती म्हणजे इतिहासाचेच धागे-दोरे पुन्हा जुळवून पाहणं, एवढंच आहे. ‘मुसोलिनी मेलाच नाही- तो अर्जेटिनात अगदी १९७८ पर्यंत जिवंत राहिला’ अशी कुजबूज एरवीही काहीजण करीत. पण याचा शोध ब्रगादोचिओला घ्यायचा आहे. तो शोध थोडा अलीकडे- पलीकडे जाऊन मुसोलिनीनंतरही ‘फॅसिस्ट पद्धत’ कायम ठेवणाऱ्या दोन संघटनांपर्यंत जाऊन पोहोचतो!  या दोन्ही संघटना स्वतच कुरापत करतात आणि डाव्यांवर आळ घेतात.  याच दोन संघटना राष्ट्रप्रेम वगैरे बोलबच्चन करून जनमत आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतात.. आणि यापैकी एक आंतरराष्ट्रीय आहे! अगदी अमेरिकेचा पैसा तिला मिळत असून ती युरोपात सक्रिय आहे!

या स्फोटक माहितीचे धागेदोरे जुळवून तयार असतानाच ब्रगादोचिओ मरतो. खूनच. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्र बंद करण्याचा निर्णय झालेला असतो. मालकाला बहुधा, दुसऱ्या माफिया टोळीशी वैर नको असतं. पण ब्रगादोचिओनं जे-जे शोधलं, ते-ते सारं कोलोनाला माहीत आहे. त्यामुळे हे काम ‘त्या’ दोनपैकी एखाद्या संघटनेचंच आहे.. आणि मग ते आपलाही खातमा करणार, असा धसका कोलोना घेतो. एव्हाना पन्नाशीतल्या कोलोनाची तिशीच्या माइयासह संसार थाटायची तयारी झालेली आहे. त्याला मरायचं नाहिये.

त्याच रात्री, नळ गळायचा थांबतो!

कोलोना भेदरतोच. पण माइया त्याला साथ देऊन, मिलान शहरापासून ८० किलोमीटरवरल्या ओर्ता तलावाशेजारच्या झोपडीवजा घरात त्याला नेते. हे घर मूळचं तिच्या आजोबांचं. इथेच काही महिन्यांपूर्वी माइया-कोलोनाचा पहिला  प्रणय झाला होता. वेडाच ठरणार, इतकी धास्ती कोलोनानं घेतलीय. माइया त्याला सांभाळतेय. पण तेवढय़ात, ब्रगादोचिओ यानं जमवलेल्या माहितीचंच जणू लघुपट-रूपांतर असावं अशी एक चित्रफीत एका चित्रवाणी-वाहिनीवर ते पाहातात! सुष्टांचा विजयच की नाही हा?

उम्बतरे इको म्हणतोय, नाही! का? ते मात्र कादंबरीतच वाचा.

या कथानकात इकोनं पत्रकारितेचं  ‘कु’रूप सिमेई या भित्रट-तरीही- प्रसिद्धीलोलुप संपादकातून दाखवलं आहे. सिमेईचा जणू उजवा हात म्हणून कोलोनाही पत्रकारितेत जे जे ‘चालतं’ आहे ते आपण करायचं, असं सतत सांगत असतो, त्यातून पत्रकारांना आरसाच दिसेल.

आणि इतिहासाचं पुनर्लेखन?

ते तर बिनबोभाट झालंय. ब्रगादोचिओ  हा  जी माहिती जमवतो आहे आणि शब्दन्शब्द कोलोनाला सांगतो आहे, ती जगभरच्या वाचकांनाही अगदी कंटाळा येईपर्यंत वाचायला मिळतेच आहे ना! कंटाळा भारतीय वाचकाला येतो. इटालियन वाचकांना नसेल आला. व्हॅटिकनची धर्मसत्ताही मुसोलिनीच्याच मागे होती आणि मुसोलिनीला व्हॅटिकनमध्ये आश्रय सहजच मिळाला असता, हे मात्र उम्बतरे इको सहजपणे जगभरच्या वाचकांच्या गळी उतरवतो. तेही २०१५ मध्ये.

धर्मसत्ता आणि फॅसिस्ट सत्तापद्धती यांचा समसमा संयोग ही अजिबात आश्चर्य वाटण्याजोगी गोष्ट नव्हे. उलट या दोहोंनी एकत्र येणंच स्वाभाविक, हे तर भारतीय वाचकांनाही अगदी सहज पटेल. खरा प्रश्न मात्र पुढेच पडणार आहे. सर्वगुणसंपन्न  ललित ‘लेखना’चा आधार घेऊन उम्बतरे इकोनं तथ्यांच्या फेरमांडणीखेरीज आणखी काहीतरी केलंय. त्यानं ‘सत्य फसवंच राहणार’ हे सांगितलं आहे. सत्याच्या फसवेपणाचा दोष सत्याचा नसून लोकांचाच आहे, हेही छानपैकी गळी उतरवलं आहे. इथून पुढे आपण- म्हणजे कोणत्याही देशांतले लोक आणि इकोचे वाचक- आपापल्या देशांत आपल्याला दिसणाऱ्या ‘सत्या’चा विचार कसकसा करणार, हा तो प्रश्न!

या प्रश्नाचा दिवा एखादा तत्त्वज्ञच लावू शकतो. इको हेच काम सहजपणे करून जातो. म्हणून तो मोठा.

न्युमेरो झीरो

लेखक :  उम्बतरे इको

प्रकाशक : पेंग्विन रँडम हाउस

पृष्ठे :  १९२ किंमत : ५९५ रु

abhijit.tamhane@expressindia.com