विबुधप्रिया दास
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारत आणि शोध म्हटलं की नेहरूंचं ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ अनेकांना आजही आठवेल! यापैकी काहींनी, त्या पुस्तकावर आधारलेली ‘दूरदर्शन’ मालिका (यूटय़ूबवर तरी) पाहिलेली असेल. भारताला एकसंध इतिहास नसला, एकच एक संस्कृती नसली, तरी अनेकपरींच्या संस्कृती एकाच वेळी किंवा एकापाठोपाठ या देशात नांदत होत्या, हे छान वेल्हाळपणे सांगणारं ते पुस्तक आहे. नेहरूंचं ते पुस्तक इतिहासाविषयी काही अनुमानं मांडतं आणि तात्पर्य म्हणून काँग्रेसी अजेंडा सांगतं, अशी टीका आज होईल. नेहरू इतिहासकार नव्हतेच, यावरही बोट ठेवलं जाईल. पण नेहरूंपेक्षा कितीतरी अधिक डोळसपणानं, अभ्यासूपणानं, पक्षीय अजेंडा अजिबात न ठेवता एखाद्या इतिहासकारानं जर भारताचा पुनशरेध घेतला तर?
तर तो वाचावाच लागेल. रोमिला थापर यांनी ‘इंडियन कल्चर्स अॅज हेरिटेज’ या पुस्तकात तसा शोध घेतला आहे. पुस्तकाच्या नावापासून थापर यांचा स्वतंत्र बाणा दिसू लागतो. ‘कल्चर्स’! भारतात निरनिराळ्या संस्कृती होत्याच, पण त्या साऱ्या गतसंस्कृतींनाच जर आज ‘वारसा’ मानता येईल का? समजा या साऱ्याच संस्कृतींचा वारसा आज सांगायचा, तर त्यात कुठेकुठे खाचखळगे लागतील? उदाहरणार्थ, आपल्या (सर्वच) संस्कृतींमध्ये स्त्रियांना मान होता असं गृहीत धरलं; तर बौद्ध भिक्खुणींना आदर होता, ब्राह्मण गृहपत्नींना होता, अगदी गणिकांनाही काही प्रमाणात मान मिळत होताच असं दिसेल. पण मग वेश्या किंवा ‘रूपजीवी’ (गणिकांपेक्षा खालच्या) स्त्रियांना, गृहपत्नींच्या घरांत राबणाऱ्या ‘दासी’ स्त्रियांना, अवर्ण किंवा अस्पृश्य मानले गेलेल्या समाजांतील स्त्रियांना किती मान होता? बरे, ‘मान असणे’ किंवा ‘आदर केला जाणे’ ही संकल्पनाच पुरुषकेंद्री नाही का? मग आज स्त्रियांना स्वतंत्र व्यक्तित्व असल्याचं आपण सारे भारतीय जेव्हा मान्य करतो, तेव्हाही त्या पुरुषकेंद्री वारशाला शरण जायचं का? नाही म्हणायला राजस्थानची मीराबाई, काश्मीरची लल्लेश्वरी किंवा लालदेड, त्यांच्याही आधी दक्षिणेतल्या अंदल आणि महादेवीअक्का.. नंतरही लोकांनी संतत्व बहाल केलेल्या भक्ती-कवयित्री या साऱ्यांनी आपापल्या परमतत्त्वाशी लीन होण्याच्या प्रक्रियेत जगाला न जुमानता, आपापलं व्यक्तित्वच जपलं आहे. पण या अशा संतकवयित्रींचा वारसा आपल्या धर्मानं कितपत स्वीकारला, किती टिकवला, मूल्य म्हणून त्यांचं व्यक्तित्व किती मान्य केलं? – असे अनेक प्रश्न, एकेक प्रकरण वाचताना सुज्ञांना पडू शकतात.
पण हे जे प्रश्न पडतात, ते वाचकाला. पुस्तकात सात प्रकरणं आहेत. ती सारीच प्रकरणं, व्याख्यानांसारखी ओघवती आहेत. त्यातही पहिली तीन प्रकरणं संकल्पनांची चर्चा करणारी आहेत : संस्कृती आणि वारसा हे पहिलं प्रकरण, दुसऱ्या प्रकरणात वारसा म्हणजे ‘समकालीन भूतकाळ’ या संकल्पनेचं स्पष्टीकरण, तिसऱ्यात काल-संकल्पना आणि इतिहासलेखन याविषयी भारतीय संदर्भाचा धांडोळा. तर पुढली चार प्रकरणं अनुक्रमे विज्ञान, महिला, सामाजिक भेदभाव, ज्ञानाची उतरंड आणि ज्ञानविषयक कल्पना यांची चर्चा करतात. ओघ मात्र सर्व प्रकरणांत कायम. उदाहरणार्थ, काळाची आपली संकल्पना ‘आवर्ती’ आहे, हे समजावून सांगताना पुनर्जन्म/ मोक्ष संकल्पनांपासून ते युग-कल्प या परिमाणांपर्यंत सारी माहिती रोमिला थापर देतात. अशी काल-संकल्पना असल्यामुळे आपल्याकडे ‘इतिहास म्हणजे विशिष्ट कालखंडातील घटनांचे अद्वितीयत्व मांडणे व त्यामागील कार्यकारणभाव शोधणे’ ही संकल्पनासुद्धा नव्हती, हेही त्या सांगतात.
आपण वाचत जातो, माहिती मिळत जाते; पण निव्वळ माहिती देण्यासाठी हे पुस्तक लिहिलेलं नाही, हेही जाणवतं.. त्यामुळे वाचक म्हणून आपल्याला, आपल्याच संस्कृतीबद्दल प्रश्न पडतात. शेवटी उपोद्घातात तर, ‘राष्ट्राला एकच संस्कृती हवी असा आग्रह कामाचा नाही. राष्ट्राची संस्कृती कुणा एका संस्कृतीपेक्षा निराळी असू शकते’ आणि ‘जुन्या संस्कृतीतलं त्याज्य काय हे जाणलं पाहिजे’ असाही सूर त्या लावतात. एवढय़ावरून, ‘‘हे पुस्तक म्हणजे प्राचीन भारताची बदनामी,’’ असा काहीबाही आरोप कुणी केला तर तो खोटाच ठरेल. पुस्तकात पदोपदी आधार घेतलेले आहेत. पुस्तकाचा सूर समजून घेण्याचा आणि चिंतन करण्याचा आहे. स्वातंत्र्योत्तर भारतातला, राज्यघटनेनुसार चालणारा समाज कोणत्या संस्कृतीचा वारसा सांगणारा असला पाहिजे, याविषयीचं हे आत्मचिंतन आहे.
‘इंडियन कल्चर्स अॅज हेरिटेज- कन्टेम्पररी पास्ट्स’
लेखिका : रोमिला थापर
प्रकाशक : अलेफ बुक कंपनी
पृष्ठे : २२२, किंमत : ५९९ रुपये