गोविंद डेगवेकर govind.degvekar@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रांतिकारक भगत सिंग यांच्यातील बुद्धिवादी, विचक्षण आणि संवेदनशील तरुणाचे दर्शन त्यांच्याच लेखनातून घडवणाऱ्या पुस्तकाची ही ओळख..

भगत सिंग यांच्या नावासमोर ‘शहीद’ हा शब्द नसेल तर त्यांची ओळख पूर्ण होत नाही. इतके हे अभिधान त्यांच्या नावाशी निगडित आहे. ब्रिटिश सत्तेशी टक्कर घेत (२३ मार्च १९३१ रोजी) त्यांनी पत्करलेल्या हौतात्म्याचा  प्रकाश अखिल भारतीयांच्या मनावर इतका लख्ख पडलेला होता, आजही पडलेला आहे, की ते केवळ एक क्रांतिकारक होते आणि ऊठसूट शस्त्राचीच भाषा त्यांनी केली, असे कल्पित अनेकांकडून मांडले जाते. क्रांतिकारक म्हणून त्यांचे शस्त्रधार्जिणे चित्र अनेक जण आपल्या डोळ्यांसमोरून हटवायला तयार नसतात. याला अनेक कारणे असू शकतात. त्यातील एक इथे प्रकर्षांने मांडता येईल. ते म्हणजे इंग्रज दफ्तरातील कागद. ब्रिटिश साम्राज्याविरोधात जो कोणी आवाज उठवील, त्याचे विपर्यस्त चित्र उभे करण्याचा खटाटोप ब्रिटिशांनी केला आणि ब्रिटिश म्हणताहेत तेच खरे आहे, असे मानून बहुतांश जणांनी भगत सिंग यांची तशी प्रतिमा उराशी बाळगली ती आजवर कायम आहे.

मात्र, भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील कीर्तिमान क्रांतिकारक ठरलेल्या भगत सिंग यांचे व्यक्तिमत्त्व त्याहूनही भव्य होते. ते परखड विचार मांडण्याची क्षमता असलेले विचक्षण आणि संवेदनशील राष्ट्रवादी तरुण होते. खरे तर हे त्यांचे रूप त्यांच्या हौतात्म्याच्या छायेखाली आजवर दुर्लक्षितच राहिले. परंतु त्यांच्यातील विचारवंताने ब्रिटिशांच्या विरोधात लेखणीची धारही परजली होती. त्याच वेळी पारतंत्र्याच्या बेडय़ा तोडून स्वतंत्र भारत उभा करताना त्याचा पाया धर्मनिरपेक्षता, समाजवाद व समानतेवर घातला गेला पाहिजे, हेही त्यांनी मांडले.

भगत सिंग यांचे हौतात्म्य दीपवून टाकणारे आहे. परंतु त्यामुळे भारावलेल्या अवस्थेत आपण हे विसरतो, की भगत सिंग यांच्या बुद्धितेजाने भारताचे सामाजिक आणि राजकीय क्षितिज उजळून निघाले होते. आजच्या राजकीय वातावरणात त्यांचे हे खरे रूप उलगडून दाखविणे तितकेच गरजेचे आहे. या पाश्र्वभूमीवर, ख्यातनाम इतिहासकार एस. इरफान हबीब यांनी संपादित केलेले ‘इन्किलाब : भगत सिंग ऑन रिलिजन अ‍ॅण्ड रिव्होल्यूशन’ हे पुस्तक महत्त्वाचे ठरावे. या पुस्तकात भगत सिंग यांचे इतस्तत: विखुरलेले विचार, दीर्घ लेख संपादित केले असून हे लेखन पाच भागांत मांडले आहे.

पहिल्या भागात सामाजिक आणि राजकीय मुद्दय़ांवरील भगत सिंग यांनी मांडलेली परखड मते येतात. १९२४ ते १९२८ या कालखंडातील हे लेखन आहे. पहिला लेख विश्वबंधुत्व या विषयावर आहे. त्यात ते म्हणतात : ‘‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना म्हणजे समता; दुसरे काही नाही. आपण सारे एक आहोत आणि त्यात ‘अन्य’ असा कोणी नाही. हा उदात्त विचार जेव्हा प्रत्यक्षात येईल तेव्हा आकारास आलेले जग हे मानवकल्याणाचे शिखर असेल!’ हे सांगून- ‘त्या जगात भाकरीसाठी कुणाला आक्रंदावे लागणार नाही. व्यापारी मिषाने चौखूर सुटलेल्या फ्रान्स आणि जर्मनीवर युद्ध करायची वेळ येणार नाही, की अमेरिका वा जपान विस्तारवादी बनणार नाहीत’ असा आशावादही मांडतात आणि तरुणांना असे जग निर्मिण्यास सज्ज होण्याचे आवाहनही करतात.

‘धर्म आणि आमचा स्वातंत्र्यलढा’ या लेखात- ‘समाजजीवनातून धर्मउच्छेद केल्यावाचून संपूर्ण स्वातंत्र्य प्राप्त करता येणार नाही’ असे भगत सिंग निक्षून सांगतात. या विधानाच्या समर्थनार्थ त्यांनी एक प्रसंग उद्धृत केला आहे. अमृतसर येथे १९२८ च्या ११ ते १३ एप्रिल दरम्यान पंजाब राजकीय परिषद भरली होती. तिथे युवक परिषदही भरवली होती. या परिषदेत तीन महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा झाली. त्यात अतिशय कळीचा आणि विवादांनी भरलेला धर्माचा मुद्दा अग्रस्थानी होता. यावेळी एक ठराव समोर ठेवण्यात आला. त्यात असे नमूद करण्यात आले होते, की पंथभेद मांडणाऱ्या आणि त्याआधारे धर्माचा स्वत:च्या स्वार्थासाठी वापर करणाऱ्यांना सार्वजनिक कार्यात स्थान देण्यात येऊ नये. तिथे प्रांतीय समितीच्या बैठकीत मौलाना जफर अली यांनी ‘खुदा-खुदा’ हे शब्द पाच-सहा वेळा उच्चारले. पं. जवाहरलाल नेहरू तिथे होते. नेहरूंनी मौलानांना सुचविले, की सार्वजनिक मंचावरून असे बोलू नका. ते मौलानांना असेही म्हणाले की, ‘तुम्ही धर्मोपदेशक असाल, तर मी निधर्मीवादाचा उपदेशक आहे.’  त्यानंतर ‘नवजवान भारत सभे’च्या बैठकीतही याच मुद्दय़ावर चर्चा झाली. त्यात कोणी धर्माच्या बाजूने मते मांडली, तर कोणी हा मुद्दा मांडल्यामुळे केवळ वादालाच खतपाणी मिळेल असे सूचित केले. अमरसिंग झाबल यांनी तर ‘धर्माचा विषय अस्पर्शित राहिलेलाच बरा’ असे मत मांडले. भगत सिंग म्हणतात, ‘झाबल यांचा सल्ला चांगला होता. कारण जर धर्म ही प्रत्येकाची व्यक्तिगत बाब असेल आणि तिची सार्वजनिक जीवनात ढवळाढवळ नसेल, तर त्याविरोधात कुणाला काही बोलायची गरजच काय? पण गतकाळातील अनुभवातून वरील प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते. काँग्रेसच्या मंचावरून वेदमंत्र आणि कुराणातील आयत पठण करण्याची मुभा होती. धर्म ही संकल्पना कशी चांगली आहे, हे सांगण्याची तर अहमहमिकाच लागली होती. त्याची परिणती मूलतत्त्ववाद फोफावण्यातच झाली. त्याचे सैतानी परिणाम साऱ्यांसमोर आहेत व त्यामुळेच साऱ्यांना धर्म हा अडथळाच असल्याचे जाणवते आहे. तर मग या अडथळ्यापासून आपण दूर का राहू नये?’

१९२२ साली असहकार चळवळ मागे घेण्यात आली आणि पुढे काही वर्षे देशभर जातीय दंगली उसळल्या. या साऱ्या हताश स्थितीत धर्मवेडय़ांना खडे बोल सुनावण्यासाठी १९२८ साली ‘किर्ती’ मासिकाच्या जूनच्या अंकात भगत सिंग यांनी लेख लिहिला. त्या लेखात- धर्माला नृशंस हत्याकांडाचे एक साधन म्हणूनच अनेकांनी कसे वापरले, त्यामुळे कत्तलीमागून कत्तलीच घडविण्यात धर्माचे समर्थक कसे आघाडीवर आहेत, याविषयी भगत सिंग यांनी अतिशय कठोर शब्दांत हल्ला चढवला. ते म्हणतात- ‘दंगलींमुळे भारतभूची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. एक धर्मानुयायी दुसऱ्या धर्माच्या अनुयायांशी तलवारीचीच भाषा करीत इथे जगत आहे. एका धर्माचा अनुयायी म्हणजे दुसऱ्या धर्माच्या अनुयायाचा शत्रू अशीच भावना इथे रुजली आहे. या माझ्या मताशी कोणी सहमत होणार नसेल, तर लाहोरमधील दंगलीचेच उदाहरण देता येईल. निष्पाप शीख आणि हिंदूंच्या मानेवर मुस्लिमांनी इथे कशा काय तलवारी चालवल्या? आणि त्याबदल्यात तितक्याच त्वेषाने मुस्लिमांचे शिरकाण करण्यात शीख आणि हिंदूंनीही जरासुद्धा कसूर ठेवली नाही. मानवतेला काळिमा फासणारी ही सारी कृत्ये समोरचा अपराधी आहे म्हणून करण्यात आलेली नव्हती, तर तो हिंदू आहे, शीख आहे वा मुस्लीम आहे म्हणून त्याची हत्या करण्यात आलेली होती. हे सारे का घडले? तर धर्म नावाच्या गोष्टीमुळे.’

जिथे जिथे अन्याय, विषमता आणि शोषणाची विषवल्ली वाढली, तिथे भगत सिंगांनी अशाप्रकारे आपल्या धारदार शब्दांनी त्यावर प्रहार केले. त्यातून त्यांचा प्रखर बुद्धिवाद दिसून येतो. आपल्या तर्ककठोर शैलीने त्यांनी धर्माधतेवर टीका केली, तसे जात्युच्छेदनासाठी वेळोवेळी भारतीय रूढी-परंपरांवरही हल्ला चढवला. ‘किर्ती’च्या त्याच अंकात त्यांनी ‘विद्रोही’ या टोपणनावाने लिहिलेल्या ‘अस्पृश्यतेची समस्या’ या लेखातून उच्चवर्णीयांच्या दांभिकतेवर कडाडून टीका केली होती. त्यात ते म्हणतात, ‘देशातील ३० कोटींमधील सहा कोटी अस्पृश्यांना आम्ही आमच्या विहिरीतील पाणी त्यांच्या भांडय़ात घेण्यास नाकारतो. का? तर, त्यांच्या भांडय़ाच्या वा हस्तस्पर्शाने ती विहीरच अशुद्ध होईल. उच्चवर्णीयांना अस्पृश्य जवळही नको वाटतात. अस्पृश्यांची सावलीही त्यांना बाटवणारी वाटते. सामाजिक जीवनातील ही अशी भारतीयांची दशा. मग त्या गोऱ्या सोजिरांनी आम्हाला तुच्छ लेखून बाजूला सारले तर कुठे बिघडले? मग ब्रिटिशांनी आम्हाला आमचे राजकीय हक्क द्यावेत, असे म्हणण्याचा अधिकार कुणालाच उरत नाही.’

‘किर्ती’च्या पुढच्याच अंकात भगत सिंगांनी विद्यार्थ्यांच्या राजकीय सहभागावर एक लेख लिहिला. त्याला संदर्भ होता तो पंजाबचे तत्कालीन शिक्षणमंत्री मनोहर लाल यांनी शाळा आणि महाविद्यालयांना पाठवलेल्या एका पत्रकाचा. विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडून दुसरे काही करता कामा नये. म्हणजे विद्यार्थ्यांनी सक्रिय राजकारणात पडता नये, असे त्या पत्रकाचे सांगणे. त्याबद्दल भगत सिंग लिहितात, ‘शाळाच शिकायची, महाविद्यालयात जायचे ते फक्त पुस्तकांची ओझी वाहण्यासाठी? देशात काय चालले आहे, ब्रिटिशांनी त्याची काय दुर्दशा करून ठेवली आहे, हे समजून त्याविरोधात कसे उभे ठाकायचे आणि प्रगती कशी साधायची, हा शिक्षणाचा भाग असू शकत नाही का? शिक्षणासाठी राजकारण सोडा, असं कसं म्हणता येईल. ब्रिटनमधील कोवळ्या तरुणांनी राजकारण ओळखून जर्मनीविरोधात लढण्यासाठी शाळा-महाविद्यालये सोडली आणि ते रणांगणात शत्रूविरोधात उभे ठाकले. जर का तिथे आपले शिक्षक असते, तर त्यांनी त्यांना शाळेत जाण्यास सांगितले असते, नाही का?’

१९२८ च्या एप्रिलमध्ये लाहोरात नवजवान भारत सभेची परिषद भरविण्यात आली. या सभेचा जाहीरनामा भगत सिंग आणि भगवतीचरण व्होरा या दोघांनी लिहिला. जाहिरनाम्यातील प्रमुख विषय हा राष्ट्रवादाच्या पुनर्उभारणीचा होता. जाहिरनाम्याच्या सुरुवातीलाच देशातील अभूतपूर्व गोंधळाविषयी भगत सिंग भाष्य करतात : ‘गोंधळ म्हणजे खरं तर अंधारी अवस्था. पण तरीही त्यात काहीतरी दिसत असतं. गोंधळ काहीतरी घडवत असतो. राष्ट्रउभारणीच्या प्रक्रियेत अशी अवस्था येतेच. यात माणसं कळतात. कारण या गोंधळातच त्यांची कसोटी लागते. चळवळीतील कार्यकर्त्यांच्या प्रामाणिकपणाचा कस इथेच लागतो. त्यांचे व्यक्तिमत्त्व या काळातच घडते. कार्यक्रम-धोरणांना आकार येतो. नव्या श्रद्धा आणि उत्साहाला जन्म मिळतो. कार्याला आरंभ होतो.’ याच जाहिरनाम्यात ‘स्वराज्य’ आणि ‘सुराज्य’ यांतील भेद उलगडून दाखवताना त्यांनी भारतातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा तळ खरवडून नेणाऱ्या ब्रिटिशांनी भारताला गरीब बनवल्याचे दाखले दिले आहेत.

एका लेखात त्यांनी जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस या दोन नेत्यांविषयी लिहिले आहे. त्यात ते लिहितात, ‘हे दोन नेते देशाचे नेतृत्व हाती घेण्यास सज्ज आहेत. दोघांनाही भारतीय भूमीला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करायचे आहे. दोघांमध्ये कमालीचे राजकीय मतभेद आहेत. ते त्यांनी वेळोवेळी राजकीय मंचावरून जाहीररीत्या मांडलेही आहेत. संपूर्ण स्वातंत्र्यासाठी दोघांनी पत्करलेला मार्ग वेगवेगळा असला, तरी ते शेवटी यशाकडेच नेणारे आहेत. त्यामुळे सुज्ञांनी कोणत्या नेत्याच्या मागे जायचे, हे स्वमतीच्या जोरावरच ठरवायचे आहे.’ मात्र, या लेखाच्या अखेरीस पंजाबच्या तरुणांना उद्देशून ते लिहितात, ‘पंजाब हा भावनाशील प्रांत आहे. इथला तरुण उत्साही आहे. क्रांतीने भारलेला आहे. पण सद्य:स्थितीत त्याला वैचारिक खाद्याची गरज आहे, त्याच्या मनाची मशागत होण्याची गरज आहे. आणि ते केवळ नेहरूच करू शकतात. याचा अर्थ त्यांची अंधभक्ती करणे असे नव्हे. पण क्रांतीचा खरा अर्थ जाणून घ्यायचा तर नेहरूंच्या मागे जा!’

भगत सिंग यांच्या क्रांतिकार्यातील विचारदिशेचे दर्शन पुस्तकातील तिसऱ्या भागातील लेखांतून होते. त्यातल्या पहिल्या लेखात ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलचे त्यांचे विचार येतात. लाला लजपतराय यांनी सुरू केलेल्या ‘द पीपल’ या दैनिकात ते २७ सप्टेंबर १९३१ रोजी छापून आले होते. मात्र, भगत सिंग यांनी तुरुंगात असताना लिहिलेल्या या लेखाविषयी फारशी कुणाला माहितीच नव्हती. ऐंशीच्या दशकात इतिहास अभ्यासक बिपिन चंद्र यांनी तो प्रसिद्ध केल्यावर तो नव्याने वाचकांसमोर आला. पुढे मराठीतही ‘मी नास्तिक का आहे?’ या शीर्षकाने तो प्रसिद्ध झाला. त्यात भगत सिंग म्हणतात, ‘देवाच्या अस्तित्वाविषयी जितके म्हणून पुरावे ठेवावे, ते पुरावे तर्काच्या प्रहाराखाली टिकत नाहीत. त्यामुळे देव आहे, या श्रद्धेवर मी विश्वास ठेवू शकत नाही.’ याच भागात हिंसा, क्रांती यांविषयीचे भगत सिंग यांचे विचारलेख वाचायला मिळतात. तसेच सत्र आणि उच्च न्यायालयातील त्यांचे कबुलीजबाब, सुखदेव यांना आत्महत्येपासून परावृत्त करणारे पत्रही या भागात समाविष्ट केले आहे.

पुस्तकाच्या चौथ्या भागात अराजकतावादाबद्दल भगत सिंग यांनी लिहिलेले विस्तृत टिपणलेख वाचायला मिळतात. तर अखेरच्या भागात भगत सिंग यांची तुरुंगातील नोंदवहीच दिली आहे. एका क्रांतिकारी विचारांच्या बुद्धिमान तरुणाच्या मनाची घडण कशी होती, हे त्या नोंदींतून ध्यानात येते. एकुणात, भावी भारताच्या उभारणीसाठी कृतिशील असलेल्या क्रांतिकारकाच्या विचारांचे दर्शन हे पुस्तक घडवण्यात यशस्वी झाले आहे.

‘इन्किलाब : भगत सिंग ऑन रिलिजन अ‍ॅण्ड रिव्होल्यूशन’

संपादन : एस. इरफान हबीब

प्रकाशक : सेज

पृष्ठे: १९२, किंमत : २९५ रुपये