सुकुमार शिदोरे sukumarshidore@gmail.com

इंद्रा नूयी यांचं हे आत्मकथन रंजक शैलीत लिहिलं गेलं आहेच, पण त्यांचं कर्तृत्व लिखाणात नव्हे, तर व्यावसायिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या स्वीकारून त्या पार पाडण्यात दिसून येतं..

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

चेन्नईच्या एका मध्यमवर्गीय सुशिक्षित कुटुंबात १९५५ मध्ये जन्मलेल्या इंद्रा कृष्णमूर्ती नूयी शिक्षण-प्राप्तीच्या व नंतर नोकऱ्यांच्या क्षेत्रांत मजल-दर-मजल करीत १९९४ साली पेप्सिको या अमेरिकतल्या  कंपनीत दाखल झाल्या आणि २०१८ साली निवृत्त होण्याआधी तब्बल बारा वर्षे त्या कम्पनीच्या सर्वोच्च कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष या पदावर कार्यरत होत्या. कॉर्पोरेट विश्वांत एका महिलेने एवढी बाजी मारणे अघटित होते. अमेरिकेच्या त्या नागरिक झाल्या पण भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ बहाल केले. अशा या ख्यातीप्राप्त इंद्रा नूयींचे हे आत्मकथन. 

आश्वासक आरंभ 

इंद्रा यांचे औपचारिक शिक्षण चेन्नईचे  होली एन्जल्स कॉन्व्हेन्ट, मद्रास ख्रिश्चन कॉलेज,  कोलकत्याची भारतीय व्यवस्थापनशास्त्र संस्था (आयआयएम)  व अमेरिकेतील येल विद्यापीठाच्या व्यवस्थापन विभागात झाले. अमेरिकेत जायच्या आधी इंद्रांनी दोन नोकऱ्या केल्या – पहिली चेन्नईच्या मेत्तूर बेअर्डसेलमध्ये  तर दुसरी जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनमध्ये. यापैकी जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनमध्ये असताना कंपनीचे नवे सॅनिटरी नॅपकिन भारतीय नारीसाठी सोयीस्कर असल्याबद्दलचा आढावा त्या काही स्त्रियांकडून स्वत: शोधलेल्या उपायांनी घेण्याचा यत्न करीत होत्या. अशा पदोपदीच्या प्रसंगांमधून इंद्रांचे तल्लख व्यक्तिमत्त्व सतत उलगडत जाते. कॉर्पोरेट जगतात त्यांना भारतामध्ये उज्ज्वल भवितव्य होते. तथापि, बुद्धिमान युवक- युवतींचा ओघ अमेरिकेकडे वळत असताना इंद्राही १९७८ साली अमेरिकेतील येल विद्यापीठात प्रवेश करत्या  झाल्या. ‘समर- जॉब’ करीत असताना राज नूयीची ओळख झाली, (राज- अभियंता- वेगळय़ा कंपन्यांत नोकरी. पुढील आयुष्यात त्याचेही कार्यक्षेत्र विस्तारित गेले. नूयी हे मंगलोरनजीकचे एक गाव.)  दोन्ही कुटुंबांच्या सहभागाने लग्न अमेरिकेतच पार पडले. इंद्रांची अमेरिकेतील पहिली मोठी नोकरी ‘बॉस्टन कन्सलटिंग ग्रुप’ मध्ये. तेथे अशिलांच्या सामरिक  समस्या हाताळण्याचा त्यांना  चतुरस्र अनुभव मिळाला .भारतात त्यांच्या वडिलांचे गंभीर आजारपण आणि मृत्यू, पहिल्या मुलीचा जन्म व इंद्रांचा कार- अपघात या घटना याच काळातल्या. सहा वर्षांनंतर सततचे प्रवास टळावेत म्हणून इंद्रांनी ‘मोटरोला’  कंपनीत नोकरी पत्करली.  इथे, ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक विभागाच्या फेररचनेचे काम इंद्रांनी पार पाडले. १९८८ साली इंद्रांना मोटरोलाचे व्हाइस-प्रेसिडेंट करण्यात आले. १९८९ मध्ये ‘ब्राऊन बॉव्हरी’ कंपनीत प्रवेश केला. त्याच कंपनीचे उच्चाधिकारी म्हणून इंद्रांचे ‘मोटरोला’ मधील आधीचे वरिष्ठाधिकारी जेरहार्ड यांनी नुकतीच सूत्रे सांभाळली होती. १९९३ मध्ये जेरहार्ड यांनी ‘ब्राऊन बॉव्हरी’ कंपनी सोडली. त्यांच्या जागी आलेले नवे अधिकारी इंद्रांना उचित सन्मान न देता ‘हनी’ या नावाने संबोधू लागले. यापूर्वीच्या काळात अनेक वेळा पुरुष-अधिकाऱ्यांकडून  इंद्रांना ‘बेब’, ‘स्वीटी’, ‘हनी’ अशा आक्षेपार्ह नावांनी  संबोधले जाई; पण इंद्रा त्याकडे  दुर्लक्ष करीत. मात्र एव्हाना त्यांनी कामात प्रतिष्ठा कमावली होते. तेव्हा अशी अवहेलना सहन करीत राहण्यापेक्षा ‘ब्राऊन बॉव्हरी ’ सोडण्याचा तडाखेबाज  निर्णय त्यांनी घेतला. ‘जी ई ‘ व ‘पेप्सिको’ या दोन बडय़ा कंपन्यांच्या त्यांना ऑफर्स होत्या . राजशी (व दोन्ही मुलींशी !) विचारविनिमय करून  त्यांनी पेप्सिको निवडली आणि मार्च १९९४ मध्ये पेप्सिकोच्या ‘वरिष्ठ उपाध्यक्ष झ्र् कॉर्पोरेट व्यूहरचना व नियोजन’ या पदाचा कार्यभार सांभाळण्यासाठी इंद्रांनी पेप्सिकोच्या प्रांगणात प्रवेश केला. 

पेप्सिकोतील दमदार वाटचाल 

पेप्सिकोतले पहिले आव्हान, कंपनीचा घसरता उपाहारगृह-उद्योग सावरण्याचे होते. त्या कामात विभागीय-प्रमुख रॉजर एनरीको यांना इंद्रांनी मोलाची मदत केली. विषयाचा अभ्यास करण्यावर नेहमी त्यांचा भर असे.  विविध क्षेत्रांचा  आढावा घेणाऱ्या त्रमासिक बैठकांत आपल्या स्वतंत्र व वस्तुदर्शी विश्लेषणांमुळे इंद्रा संबंधित विभागीय प्रमुखांचा वेळोवेळी रोष ओढवून घेत, पण आपल्या सूचनांवर त्या ठाम असत. कंपनीच्या नफा-नुकसानीत त्यांच्या विभागाचे महत्त्व धिमेपणे वाढत  होते. परिणामत: २००० साली आर्थिक विभागाच्या प्रमुखपदाचा (सीएफओ) अतिरिक्त कार्यभार त्यांनाच  देण्यात आला. काही काळानंतर पेप्सिकोने खाद्य-पदार्थ व पेये बनवणारी क्वेकर ओट्स कंपनी विकत घेण्याचे ठरवले. त्या समग्र निर्णय-प्रक्रियेतील तीन  अधिकाऱ्यांच्या गटामध्ये इंद्रांचा समावेश होता. या एकत्रीकरणाला  अमेरिकन शासनाच्या फेडरल ट्रेड कमिशनची (एफटीए) मंजुरी आवश्यक होती. ती मिळवण्यासाठी अनेक स्पष्टीकरणे द्यावी लागली. युक्तिवाद सादर करावे लागले. निकराच्या प्रयत्नानंतर मंजुरी अखेरीस मिळाली. कंपनीच्या उत्पन्नाची कमान अर्थातच सतत वाढती राहिली. यानंतरची ठळक घटना म्हणजे कंपनीच्या उच्चतम व्यवस्थापकीय स्तरावरील फेररचनेत इंद्रांना कंपनीच्या प्रेसिडेंट म्हणून नेमण्यात आले; आणि सर्वात  कळस म्हणजे २००६च्या अखेरीस पेप्सिकोच्या संचालक मंडळाने इंद्रा नूयींची कंपनीच्या सर्वोच्च कार्यकारी अधिकारी (सीईओ) या पदावर नेमणूक केली. भारतातून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या या कृष्णवर्णीय महिलेने केवळ अमाप कष्ट व बुद्धिचातुर्य यांच्या बळावर अमेरिकेच्या पुरुषप्रधान कॉर्पोरेट जगतात हा बहुमान मिळवला होता.

जंकपेये !

आता इंद्रांना कंपनीला यशाच्या नव्या उंचीवर न्यायचे होते, कंपनीच्या कार्यप्रणालीत फेरबदल करायचे होते. कंपनीच्या आर्थिक प्रगतीचा वेग अबाधित राहिला, पण लगेचच उपेक्षित अशा जनआरोग्य- विषयक पैलूने इंद्रांना ग्रासले.

पेप्सिकोची उत्पादने आरोग्याला हानिकारक आहेत, या सर्वविदित तथ्याची दखल इंद्रांनी पुरेपूर गांभीर्याने घेतली . या संदर्भात ‘परफॉर्मन्स विथ पर्पज’ (पीओपी) ही संकल्पना त्यांनी मांडली. कंपनीच्या उत्पादनांमधील दोष कमी करून कंपनीला समाजहिताशी जोडण्याचा हा एक चतुर मार्ग होता. पेप्सिको उत्पादनांमधील साखर, चरबी आणि मीठ यांचे वर्चस्व आम लोकांमध्ये लठ्ठपणा, मानसिक ताणतणाव व मधुमेह अशा अनेक व्याधींना पोषक ठरते. शीत-पेयांसाठी पाण्याचाही अपव्यय होत होता. रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या कचरा वाढवीत होत्या. पर्यावरणाच्या जबाबदारीमध्येही पेप्सीचा सहभाग आवश्यक होता. कंपनीच्या जुन्या संशोधन आणि  विकास केंद्रांजवळ  ना पुरेसे बळ होते ना दूरदृष्टी. या आव्हानांचा  मुकाबला आपल्या मार्गानी करण्याचे इंद्रांनी ठरवले. एका जपानी औषधी संस्थेतील तज्ज्ञ मेहमूद खान यांना इंद्रा यांनी पेप्सिकोत प्रमुख वैज्ञानिक अधिकारी म्हणून येण्यास राजी केले. मेहमूद यांनी  नवा चमू व नव्या उपकरणांनिशी कामाला सुरुवात केली. त्याचे परिणाम धीमेपणे दिसू लागले. आजमितीस पेप्सिकोच्या उत्पादनांमध्ये चांगले बदल घडले आहेत असे इंद्रा म्हणतात. ‘पीओपी’ चा पुरस्कार करण्यासाठी इंद्रांनी महत्त्वाच्या संमेलनांमध्ये भाषणे देणे सुरू केले. खुद्द पेप्सिकोच्या कर्मचाऱ्यांना, गुंतवणूकदारांना व इतर शंकाखोरांना नवी योजना पटवून दिली. या मोहिमेला जणू काही इंद्रांनी स्वत:ला वाहून घेतले ! अर्थात इतर कामाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. जनस्वास्थ्याची जपणूक करण्याची जबाबदारी इंद्रांच्या नेतृत्वाखाली पेप्सिकोने उघडपणे मानली, हेही नसे थोडके !

कुटुंबाची काळजी

इंद्रांना आपल्या दोन मुलींची देखभाल करतांना अनेकदा तारेवरची कसरत करावी लागली. नवरा राज याचे अनमोल साहाय्य त्यांना मिळाले. कुटुंबाने जमेल तेवढी मदत केली. त्याचे तपशील पुस्तकातूनच वाचले पाहिजेत. अमेरिकेत पाहिजे तसे घर मिळवण्यात अडचणी आल्या. नूयी कुटुंब भारतीय असल्याने त्यांना गौरवर्णीय मालकाने घर भाडय़ाने देण्याचे नाकारले, असेही घडले आहे. एकदा धाकटय़ा मुलीला शाळेत ती ‘कृष्णवर्णीय’ (प्रत्यक्षात, सावळी) असल्याने दिवसेंदिवस रॅगिंग व्हायचे. या अपप्रकाराकडे गोरे शिक्षकही जाणूनबुजून दुर्लक्ष करीत होते. राज-इंद्रांना बऱ्याच उशिरा जेव्हा हे कळले तेव्हा त्यांना अक्षरश: रडू कोसळले व तात्काळ त्यांनी मुलीची शाळा बदलून तिला  एका कॉन्व्हेन्ट शाळेत घातले. दोन्ही मुली त्या एकाच शाळेत शिकल्या.

थोडक्यात, अमेरिकेतील आयुष्य आरामशीर नव्हते. कंपनीच्या व कुटुंबाच्या जबाबदाऱ्या एकाच वेळी पार पाडणे पोरखेळ नव्हता. कार्यालयात कामाच्या ओघात क्वचित प्रसंगी प्रमाणाबाहेर ताणतणाव झाल्यास बाथरूममध्ये जाऊन इंद्रा अश्रूंना वाट करून द्यायच्या, व काही वेळाने जरासे प्रसाधन करून बाहेर यायच्या. अमेरिकेत लग्नानंतर सासरेबुवांनी इंद्रांना सांगितले होते : ‘तू नोकरी कधीही सोडू नकोस झ्र् तुझे शिक्षण तू वापरले पाहिजेस. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत.’ पण अखेरीस राज-इंद्रा यांचे संसार-शकट मूलत: त्या दोघांनीच चालवले.

स्त्रिया सतत गौण?

कोणालाही कामावर ठेवताना त्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबाच्या हितासाठी कंपनीने जबाबदार राहिले पाहिजे असे इंद्रांचे मत आहे. व्यक्तीच्या प्रगतीत कुटुंबाच्या मदतीला त्या प्रचंड महत्त्व देतात.  तथापि  अमेरिकेतदेखील स्त्रियांना सापत्न वर्तणूक  मिळते, त्यांना समान कामांकरिता पुरुषांहून कमी वेतन मिळते, त्यांच्या कौटुंबिक कर्तव्यांना कमी लेखले जाते, अशा प्रकारच्या अन्याय्य परिपाठांना इंद्रांचा विरोध आहे. स्त्रियांच्या समस्यांचा  त्यांनी विस्तृत ऊहापोह केला आहे. नोकरी चालू ठेवीत स्त्रियांना कुटुंबाकडे लक्ष देणे सुलभ करण्यासाठी त्यांनी उपाय सुचवले आहेत.

पुस्तकात इंद्रांनी स्वत:च्या कर्तृत्वावर सतत भर दिलेला असला तरी आत्मप्रौढीचा दर्प येऊ न देता आपले कथन वाचकांना प्रांजळ भासावे याची पुरेपूर खबरदारी घेण्यात आली आहे. पुस्तक लिहून संपादित करण्यासाठी इंद्रांनी लिसा कसेनार या लेखिकेला नेमले होते. बहुधा त्यामुळेच या आत्मकथनाची शैली एखाद्या मनोरंजक कादंबरीप्रमाणे रसाळ वठली आहे. 

इंद्रा नूयींची ही यशोगाथा युवा पिढीला प्रेरित करू शकेल. त्यांनी अलौकिक क्षमतेने सर्व जबाबदाऱ्या सांभाळल्या व नाव कमावले. मात्र पेप्सिकोची सर्वविदित उत्पादने वंचितांसाठी अन्याय्यकारक ठरलेल्या जागतिक उदारीकरणाची प्रतीके आहेत. त्यांना कितपत किमत द्यायची हे ज्याने त्याने ठरवायचे आहे. 

माय लाइफ इन फुल – वर्क, फॅमिली अ‍ॅण्ड अवर फ्यूचर

लेखिका : इंद्रा  के.  नूयी (सहलेखिका लिसा कसेनार)

प्रकाशक :  हॅचेट इंडिया प्रा. लि.

पृष्ठे :३१३+ १३+१६ (छायाचित्रांची पाने) किंमत : ६९९ रुपये

Story img Loader