ब्रिटिशांनी पाश्चात्त्य खेळ आपल्याकडे कसे रुजवले? मोहन बागान आणि बंगाल्यांना मारलेला टोमणा यांचा काय संबंध? स्टेडियमवाले ब्रेबॉर्न कोण? या साऱ्यांत कुस्ती किंवा अन्य देशी क्रीडा प्रकारांसाठी कोणी काही केलं का? अशा अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरं देणारं पुस्तक आहे हे.. म्हटलं तर इतिहास; पण आजच्या नजरेतून पाहिल्यास ‘क्रीडा संस्कृती’चा हा विस्तृत पट वाचनीय झाला आहे.. अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरं देणारं पुस्तक आहे हे.. म्हटलं तर इतिहास; पण आजच्या नजरेतून पाहिल्यास ‘क्रीडा संस्कृती’चा हा विस्तृत पट वाचनीय झाला आहे..
खेळ म्हणजे चुरस, थरार, रोमांच उभा करणारा, तर इतिहास म्हणजे सनावळ्या, नावांची जंत्री आणि कंटाळवाणा. मनात आणि मेंदूत परस्परभिन्न प्रतिक्रिया उमटवणाऱ्या दोन गोष्टींचा सुरेख मिलाफ म्हणजे ‘नेशन अॅट प्ले’ हे पुस्तक. खेळ म्हणजे जिंकणं, स्पर्धा, जेतेपदं यांच्या पल्याड जाऊन त्याच्याशी संलग्न सामाजिक रचनातसेच राजकीय, आर्थिक पैलूंमुळे खेळांचं बदललेलं परिमाण टिपण्याचा प्रयत्न लेखक, पत्रकार आणि संशोधक रोनोजॉय सेन यांनी केला आहे. अनादी काळातील खेळांपासून अगदी आतापर्यंतच्या देशभरातल्या खेळांमधील फ्रँचाइज आधारित लीग असा ३६० अंशी धांडोळा घेण्याचा हा प्रयास कंटाळवाणा होत नाही. प्रत्येक प्रकरणागणिक आपल्या पोतडीत भर पडत जाते. भारतात खेळांच्या प्रसार आणि प्रचारासाठी अमूल्य योगदान देणाऱ्या अज्ञात व्यक्ती आणि संस्था यांचा परिचय होत जातो. तीनशे सोळा पानं आणि तब्बल चाळीस पानी संदर्भ सूची हातावेगळी केल्यानंतर सकस आणि समृद्ध करणारं काही तरी वाचल्याची भावना मनात दाटते.
क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीकरिता खेळाडूंना अर्जुन, तर प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवण्यात येते. आधुनिक काळात ज्यांच्या नावाने हे पुरस्कार दिले जातात तो महान योद्धा आणि त्याचे गुरू यांचा संदर्भ देत पौराणिक काळातील खेळ संकल्पनेपासून पुस्तकाला सुरुवात होते. मल्लपुराणातील ऋचांच्या संलग्नतेने येणारा कुस्तीचा उल्लेख, या कालखंडापासून मुघल साम्राज्यातील खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विशद करण्यात आला आहे. भारत अशी संकल्पना रुजण्याआधीपासून ब्रिटिशांच्या आगमनापर्यंत कुस्ती, विविध प्राण्यांची शिकार, पोलो यावर असलेला भर लक्षात येतो. पोस्ट, रेल्वे यांचे जाळे विणणाऱ्या ब्रिटिशांनी आपल्याबरोबर खेळही आणले. मायदेशातील वातावरणाशी विभिन्न अशा संस्कृतीत रुळताना ब्रिटिशांना सुरुवातीला माणसं जोडण्यासाठी आणि नंतर एकी तोडण्यासाठी खेळांचा केलेल्या वापराचा प्रवास अफलातून असा आहे.
वर्षांनुवर्षे क्रीडा संघटनांचे प्रमुखपद मिरवणारे राजकारणी, उत्तीर्ण होण्याच्या शर्यतीत २५ गुणांची खिरापत वाटण्यापुरते मर्यादित शिक्षण आणि क्रीडा विभागाचा वाटा या आताच्या पाश्र्वभूमीवर ब्रिटिश राजकर्ते, शिक्षक यांनी केलेले प्रयत्न अचंबित करतात. वसाहतींसाठी विशिष्ट क्रीडा धोरण नसतानाही मायदेशातील खेळांना प्रोत्साहन देणाऱ्या शाळांच्या धर्तीवर शाळा भारतात ब्रिटिशांनी उभ्या केल्या. लहान वयातच खेळण्याचे संस्कार रुजवण्याचे हे प्रारूप आदर्श असल्याचा निर्वाळा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा प्रणेता पिअर डी कुर्बिटनने दिला आहे. राजकोट येथील राजकुमार महाविद्यालय, अजमेरचं मेयो महाविद्यालय यांच्यासह मुर्शिदाबाद, लखनौ, रायपूर आणि हैदराबाद येथील शाळा यामध्ये खेळ हा अभ्यासक्रमाचा नियमित घटक होता, आजही या वास्तूंद्वारे अव्वल क्रीडापटू तयार होत आहेत. ज्यांच्या आदराप्रति देशातल्या सर्वोच्च स्थानिक स्पर्धेला रणजी हे नाव मिळाले त्या रणजीतसिंहाना राजकुमार महाविद्यालयाचे प्राचार्य चेस्टर मॅक्नाघटेन यांनी खेळांची ओळख करून दिली. काश्मीर प्रांतात खेळाची रुजवात करणारे सेसिल एर्ले तायंडेल बिस्क्यू आणि कर्मठ समाजाविरुद्ध त्यांनी दिलेला लढा समजून घेणं आवश्यक आहे. ब्रिटिश राजकर्त्यांना नुसती खेळाची आवड नव्हती, तर ते स्वत: अनेक खेळ खेळत असत याचा प्रत्यय वारंवार येतो. ब्रिटिश आणि स्थानिक पारसी मंडळी यांच्यात खेळाचे सामने व्हावेत यासाठी पुढाकार घेणारे, पारसी, हिंदू आणि मुस्लीम समाजातील खेळाडूंना जागा मिळवून देणारे तत्कालीन बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर लॉड हॅरिस यांचा उल्लेख सातत्याने येतो. त्यांच्या योगदानासाठीच मुंबईतल्या सर्वोत्तम शालेय क्रिकेट स्पर्धेला ‘हॅरिस शिल्ड’ नाव देण्यात आलं. १८९५ मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा आजही मुंबई क्रिकेटचा गाभा आहे. क्रिकेट क्लब ऑफ इंडियासाठी मुंबईत समुद्रानजीक नाममात्र दरात जागा उपलब्ध करून देणारे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्न आणि त्यांचे द्रष्टेपण लक्षात येतं. प्रशासकाच्या माध्यमातून खेळासारख्या मूलभूत गरजेव्यतिरिक्त विषयावर काम करणे आवश्यक आहे, हा धडा ब्रिटिशांनी घालून दिला. आर्थिक सुबत्ता असणारे आणि संसाधनांची उपलब्धता असणाऱ्या संस्थानिकांच्या सुरस कहाण्या वाचायला मिळतात. पतियाळात आजच्या घडीला ‘राष्ट्रीय क्रीडा संस्था’ कार्यरत आहे. ही संस्कृती कोणी रुजवली याचे उत्तर मिळते. पिढय़ान्पिढय़ा खेळाची जोपासना करणाऱ्या पटियाळा राजघराण्यातील मंडळींचे कार्य विलक्षण आहे. ३०च्या दशकात स्वत:च्या मालकीचे स्टेडियम बांधण्यासाठी ४५ एकर जागा विकत घेऊन एक कोटी रुपये खर्चणाऱ्या जगाद्रिनारायण महाराजांची कहाणी अनोखी आहे. १९३२ मध्ये भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याचे प्रायोजकत्व घेण्यावरून पटियाळा घराणं आणि विझीनगरमचे राजे महाराजकुमार यांच्यात झालेला वाद दोघांच्याही सधनतेची कल्पना देणारा आहे. मुघलांची देणगी असलेला पोलो या खेळाने ब्रिटिश आणि संस्थानिक यांची नाळ कशी जुळली हे लक्षात येतं. मात्र चांगल्या दर्जाच्या घोडय़ांची पैदास, देखभालीपेक्षा क्रिकेट खेळायला माणसं तयार करणं सोपं असल्यानं पोलो मागे राहिलं. क्रिकेटच्या विकासाची बीजं पोलोच्या ऱ्हासात आहेत हे सोदाहरण स्पष्ट होत जातं.
मोहन बागान क्लब म्हणजे बंगालची शान. १८९९ पासून कार्यरत या क्लबची स्थापना लॉर्ड मेकॉले आणि तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या बंगाली लोकांना उद्देशून कृश आणि तोळामासा प्रकृतीवरील टोमण्यातून झाली आहे हे समजतं. १९११ मध्ये मोहन बागानने अनवाणी खेळाडूंसह प्रतिष्ठेच्या इंडियन फुटबॉल असोसिएशन स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. या स्पर्धेचं जेतेपद पटकावणारा हा पहिलाच भारतीय संघ होता. ब्रिटिशांविरुद्ध राष्ट्रवादी भावनेला चालना देणारा विजय आणि वातावरणाच्या लिखाणातून तो काळ जिवंत होतो. बुद्धिजीवी मुस्लिमांच्या प्रेरणेतून जन्माला आलेल्या मोहमेडन स्पोर्टिग क्लबच्या कहाणीचा प्रवास अनोखा आहे. देशभरातील प्रतिभावान मुस्लीम खेळाडूंना संघात समाविष्ट करण्याची शक्कल आणि बूट घालून खेळण्याचे डावपेच यातून मोहमेडनच्या यशाचं रहस्य उलगडतं. १९३६ मध्ये स्कॉटलंडच्या प्रसिद्ध सेल्टिक क्लबतर्फे खेळण्याचा मान मिळवणारा मोहम्मद सलीम मोहमेडन संघाचा. हिंदू, मुसलमान, पारसी, युरोपियन आणि इतर अशा पाच धर्माधिष्ठित संघांमध्ये होणारी बॉम्बे पेन्टॅग्युलर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. मात्र ब्रिटिशांची ‘फोडा आणि राज्य करा’ नीती लक्षात घेऊन महात्मा गांधींनी या स्पर्धेला विरोध केला होता. मात्र हा विरोध झुगारून ही स्पर्धा १९४६ पर्यंत सुरूच राहिली. यानिमित्ताने ‘गांधी आणि खेळ’ हा परिच्छेद उद्बोधक आहे. दंतकथा सदरात मोडणाऱ्या हॉकीपटू ध्यानचंद यांचा प्रवास आणि ऑलिम्पिक पदकाची भरारी हा प्रवास तीन प्रकरणांमध्ये उलगडण्यात आला आहे. शतकोत्तर व्यापकता असलेल्या या मांडणीत समस्त महाराष्ट्रवासीयांना अभिमान वाटेल अशा अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा उल्लेख. अंबादासपंत वैद्य यांनी १९१३ मध्ये या मंडळाची स्थापना केली. योग, मल्लखांब, कुस्ती अर्थात आपल्या मातीतल्या खेळांचा प्रसार हे या मंडळाचे कार्य. जागतिक क्रीडा शारीरिक शिक्षण अधिवेशनात सादरीकरणासाठी या मंडळाची निवड झाली. १९३६ साली बर्लिन ऑलिम्पिकदरम्यान क. स. काणे यांच्या नेतृत्वाखालील २४ सदस्यीय चमूने आपल्या संस्कृतीतील खेळांचे दिमाखदार सादरीकरण करत दुसरा क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे सर्वोत्तम सादरीकरणासाठीच्या हिटलर पुरस्कारासाठी हनुमान मंडळाची निवड झाली होती.
अशिक्षित मुस्लीम कुटुंबात जन्मलेल्या कुस्तीवीर गामाची कहाणी आणि कुस्तीसारखा आडदांड खेळ जोपासताना शास्त्रीय संगीतात निष्णात बंगाली कुस्तीपटू गोबर गुहाची वाटचाल रंजक आहे. देशात स्वातंत्र्यलढय़ाची तीव्रता वाढत असताना, दळणवळणाची साधनं मर्यादित असताना या दोघांनी जगभरातल्या अव्वल कुस्तीपटूंना चीतपट केलं. भीमकाय शरीर, बकासुरी आहार आणि अफाट ताकदकौशल्य अशी त्रिसूत्री अंगीकारणाऱ्या या दोघांचं परदेशात झालेलं स्वागत वाचताना गंमत वाटते. क्रीडाविश्वातल्या सर्वोच्च ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिलंवहिलं वैयक्तिक पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधवांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची कहाणी चटका लावणारी आहे. हेलसिंकीवारीसाठी भारतीय ऑलिम्पिक संघटना, राज्य सरकार किंवा अन्य कोणाकडूनच मदत उपलब्ध होऊ शकली नाही. राजाराम महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य जाधव यांनी स्वत:चे घर गहाण टाकून खाशाबा यांचा खर्च उचलला. या मदतीला जागत खाशाबांनी पदकाची कमाई केली. मात्र या ऐतिहासिक यशाची भारतातल्या इंग्रजी माध्यमांनी जेमतेम दखल घेतली. मायदेशी परतल्यावरदेखील त्यांचं स्वागतसुद्धा झालं नाही. मग कराडमध्ये त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. कोणताही आर्थिक पुरस्कार त्यांना मिळाला नाही तसंच पुढची २२ वर्षांच्या पोलीस सेवेत असताना, निवृत्तीला सहा महिने असताना बढती देण्यात आली. हॉकीपटूंच्या सांघिक यशाच्या तुलनेत परिस्थितीशी टक्कर देत जिद्दीने ऑलिम्पिक पदकाची कमाई करणाऱ्या या वीराचा २००१ मध्ये मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खेळांचे आश्रयदाते बदलले. संस्थानिकांची जागा कॉर्पोरेट्सनी घ्यायला सुरुवात झाली. या संक्रमणात प्राधान्यक्रम हॉकीकडून क्रिकेट आणि फुटबॉलकडे संक्रमित झाला. १९२० मध्ये ऑलिम्पिकवारी करणाऱ्या खेळाडूंचा खर्च वैयक्तिकपणे उचलणारे सर दोराबजी टाटा यांच्यापासून खेळाडूंना विविध कंपन्यांमध्ये सामावून घेणे आणि खेळाडूंना साहाय्यकारी ठरतील अशा क्रीडा केंद्रांची उभारणी, प्रायोजकत्व अशा विविधांगी पद्धतीने टाटांचं क्रीडा क्षेत्राला योगदान अधोरेखित होत जातं.
१९७१ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने तत्कालीन मातब्बर वेस्ट इंडिज आणि इंग्लंड संघांवर मात केली. याच मालिकेमधून सुनील गावस्कर या ताऱ्याचा उदय झाला. अन्य खेळांना बाजूला सारत क्रिकेटची कोटीच्या कोटी उड्डाणे कशी होत गेली याचे विवेचन वाचनीय आहे. रेडिओ आणि टेलिव्हिजनने क्रिकेटच्या सर्वदूर प्रचारात बजावलेली भूमिका समजून घेणे क्रीडा आणि माध्यम अभ्यासकांसाठी उपयुक्त आहे. प्रक्षेपण हक्कांचे अचंबित करणारे आकडे, राजकारण्यांनी क्रिकेट संघटनांवर ठोकलेली मांड, जागतिक पटलावर संघटनात्मक पातळीवर भारताने मिळवलेली पकड हे सगळं किती झपाटय़ाने होत गेलं आणि क्रिकेट मोठं होत असताना बाकी खेळांची उपेक्षितता वाढतच कशी राहिली, हा पुस्तकाचा टप्पा अंतर्मुख करायला लावणारा आहे. व्यावसायिक समीकरणं खेळाचा आत्मा बदलू शकतात याचा प्रत्यय घडतो.
रूढार्थाने हा सगळ्या खेळांचा, तत्कालीन घडामोडींचा सर्वसमावेशक इतिहास नाही. विस्तीर्ण अशा परिघाचा आढावा घेताना लेखकाने ठरावीकच खेळांवर लक्ष केंद्रित केले आहे. अब्जावधी लोकसंख्या असूनही ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यावर पदकं दिसत नाहीत, अशी खंत व्यक्त करताना ‘क्रीडा संस्कृतीचा अभाव’ हे उत्तर दिलं जातं. अशी संस्कृती का निर्माण होऊ शकली नाही याची उत्तरं हे पुस्तक वाचताना मिळतात, हे या पुस्तकाचं यश आहे. याआधी रामचंद्र गुहा यांनी खेळ आणि इतिहास यांची सुरेख सांगड घालणारे लिखाण केलं आहे. तोच धागा घट्ट पकडून रोनोजॉय यांनी खेळांचा खंडप्राय पट चितारला आहे. पुठ्ठाबांधणी अधिक नेटकी आणि पुस्तकाच्या अक्षरटंकाचा (फाँट) आकार थोडा मोठा असता तर हा वाचनानंद द्विगुणित होऊ शकला असता.
नेशन अॅट प्ले- ए हिस्टरी ऑफ स्पोर्ट इन इंडिया
लेखक : रोनोजॉय सेन
प्रकाशक : पेंग्विन इंडिया
पृष्ठे : ३१६; किंमत : ५९९ रुपये
sukumarshidore@gmail.com