विनायक परब vinayak.parab@expressindia.com
‘यापूर्वी कुणीच, कधीच अनुभवली नाही अशी अभूतपूर्व परिस्थिती’ असे कोविडकाळाचे वर्णन ही भयावह परिस्थिती अतिशय जवळून अनुभवलेल्या प्रत्येकानेच केले. यात उपचार करणाऱ्या डॉक्टरांपासून ते पत्रकारांपर्यंत आणि आर्थिक कोंडीत सापडलेल्या उद्योजकापासून ते समाजातील अखेरच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या आशा कार्यकत्र्यांपर्यंत प्रत्येकाचा समावेश होतो. कोविडकाळ प्रत्यक्ष रस्त्यावर, समाजात कार्यरत होते, त्यांच्या कहाण्या अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत. हा काळ संपेल, सरेलही, पण मागे राहणाऱ्या कहाण्या या आपल्याला बरेच काही शिकवणाऱ्या तर असतीलच, पण भविष्यातील धोरणात्मक निर्णयांसाठी पुंजीही ठरतील, शिवाय त्यांचे दस्तावेजीकरण होणे हेही समाज म्हणून आपल्यासाठी तेवढेच महत्त्वाचे आहे.
वेगवेगळय़ा क्षेत्राशी संबंधित नऊ लेखकांनी कोविडकाळातील त्यांचे अनुभव रिपोर्ताज म्हणून लिहिले आहेत. त्यातील काहींमध्ये विश्लेषणही आहे. थेट व्यवस्थेवर टीका करणारी टोकदार विधानेही आहेत. पत्रकारांसाठी रिपोर्ताज हा प्रकार काही तसा नवीन नाही, त्यामुळे त्या सर्वाच्याच लेखनामध्ये अनेक बारीकसारीक महत्त्वाच्या नोंदी आढळतात.
पत्रकार नम्रता भंडारे यांच्या रिपोर्ताजने या पुस्तकाची सुरुवात होते आणि हा सर्वात उत्तम उतरलेला आहे. यात महिलांना भोगाव्या लागलेल्या कोविडवेदना प्रकर्षांने समोर येतात. मध्यंतरीच्या काळात सर्वच स्तरांवरून त्यातही खासकरून स्वयंसेवी संस्थांच्या पातळीवरून शिक्षणादी क्षेत्रांमध्ये जोरदार, सातत्यपूर्ण प्रयत्न झाले आणि शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या वाढली. या यशाला पुन्हा काही काळ मागे नेण्याचेच काम कोविडकाळाने केले. कोविडकाळात वाढलेल्या बालविवाहांच्या घटनांमागची कारणमीमांसा हा रिपोर्ताज करतो आणि कमावते हात कमी झाल्याने बालकामगारांचे प्रमाणही २८० टक्के वाढल्याचे अधोरेखित करतो. ग्रामीणच नव्हे तर शहरी महिलांसाठीही हा कोविड काळच ठरला तेही यात सविस्तर येते. महत्त्वाचे म्हणजे ज्या आशा कार्यकत्र्यांमुळे आरोग्य व्यवस्था घरोघर पोहोचली त्यांनाच तीन- चार महिने तुटपुंजा असलेला मेहेनतानाही न मिळणे, कोविड झाल्यानंतर त्यांचीच परवड होणे ही सरकारी दुर्लक्षाची लक्तरे वेशीवर टांगणारी आहे.
अनू भुयान यांनी आरोग्य व्यवस्थेविषयक वार्ताकन करताना आलेले सरकारी नियंत्रणशाहीचे अनुभव, प्रसारमाध्यमांमधील पत्रकारांवर झालेला परिणाम आणि माध्यमांच्या संपादकीय जोडपानांवरचा देखावा हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कोविडकाळात केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे सातत्याने पत्रकार परिषदा पार पडल्या, मात्र माहिती देण्याऐवजी ती दडपण्यासाठीच त्या घेण्यात आल्या असे थेट विधान करता येईल, अशी उदाहरणेच त्यांनी दिली आहेत. हीच सरकारी नियंत्रणशाही कोविडगुंता वाढवत गेली. एक वेगळा कोन या लेखाला आहे तो संपादकीय जोडपानांवर लेखन करणाऱ्या बहुतांश सुखवस्तू आणि प्रसिद्ध पत्रकारांबाबतचा. त्यांच्या लेखनात सातत्याने कोविडोत्तर नव्या जगाचा उल्लेख आला. मात्र प्रत्यक्ष ते वास्तवापासून कित्येक योजने दूरच भासमान जगात वावरत होते, अशी टिप्पणी या लेखात आहे, ती अपवादात्मक मानायला हवी.
इंदूरच्या डॉ. रवी दोशी यांनी तब्बल २३ हजार कोविड रुग्ण या काळात तपासले, त्यांचा अनुभव सोतिक विस्वास यांनी शब्दबद्ध केला आहे. सलग तीन महिने केवळ रुग्णालयात व्यतीत करणे, केवळ चार तासांची झोप आणि समोर हजारो रुग्ण हा अनुभव अंगावर शहारा आणणारा आहे. डॉ. दोशी हे फुप्फुसांच्या विकारांचे तज्ज्ञ आहेत. आपल्याकडे श्वसनाशी संबंधित या विकारांकडे आधीपासूनच कसे दुर्लक्ष झाले आणि तेच कोविडकाळात कसे अंगाशी आले ते त्यांच्या नोंदींमधून उलगडत जाते. कोविडच्या विषाणूने फुप्फुसे निकामी केली म्हणजे नेमके काय केले ते शास्त्रीय मात्र सामान्यांना सहज कळेल, अशी नोंदींतून उलडत जाते. आठ तास कोविडोपचार करताना मध्येच तहान लागल्यानंतर पीपीई किट उतरवून पाणी पिणेही कसे अंगाशी आले ते वाचताना वैद्यकीय व्यावसायिकांनी भोगलेले हाल नजरेसमोर येतात. त्याच वेळेस वैद्यकीय क्षेत्र कोविडोत्तर कसे बदललेले असेल त्याची चुणूकही याच लेखात मिळते.
आमीर पीरजादा यांचा लेख कोविडपूर्व काळाचा मागोवा घेणारा आहे. भाजपा सरकारने २०१९च्या ऑगस्ट महिन्यात अनुच्छेद ३७० रद्दबातल ठरविल्यानंतरच्या कालखंडातील हे वर्णन आहे. हे का, असा प्रश्न वाचताना पडतो. मात्र कोविडकाळात पुन्हा टाळेबंदी आली त्यावेळेस ती काश्मिरींसाठी फारशी नवीन नव्हती. फक्त या खेपेस कारण राजकीय नव्हते इतकेच हे लेखातील विधान पूर्वी पडलेल्या प्रश्नाच्या उत्तराप्रत नेते. मात्र कोविडपूर्व टाळेबंदीसदृश परिस्थितीचे वर्णन हेही संवादमाध्यमे बंद राहिल्याने परिस्थिती किती भयानक होती ते पुरते स्पष्ट करणारे आहे.
ईशान्य दिल्लीतील आंदोलन – दंगल या पार्श्वभूमीवर आलेल्या कोविडची चर्चा सबा नक्वी यांच्या लेखात आहे. हा रिपोर्ताजही आहे आणि सामाजिक- राजकीय लेखनही. यात स्थलांतरितांच्या वेदना शब्दबद्ध करतानाच त्यांनी कोविडकाळाचा राजकीय गैरवापर धार्मिक विद्वेष पसरवण्यासाठी कसा करण्यात आला, याचीही चर्चा केली आहे.
नवउद्योजक पूजा धिंग्रा हिचा लेख कोविडकाळात सारे काही स्तब्ध झाल्यानंतरची निराशा आणि नवोन्वेषणाच्या माध्यमातून त्यावर केलेली मात असा आशादायी आहे. कोविडगुंत्यावर मात करायची तर नवोन्वेषणाला पर्याय नाही हेच यातून स्पष्ट होते. रेस्टॉरंट बंद करण्याची वेळ आल्यानंतर शोधलेले ऑनलाइन पर्याय आणि नवीन उत्पादनानिशी बाजारात उतरणे हा वेगळा विचार तिच्यासाठी तारक ठरला, त्याची ही प्रेरणादायी गोष्ट आहे.
ओमकार गोस्वामी यांनी अर्थव्यवस्थेचा लेखाजोखा आकडेवारीनिशी विश्लेषण करत मांडला आहे. कोविडकाळाने आर्थिक मंदी आणली नाही तर त्या आधीच्या आठ महिन्यांतच तिची लक्षणे पुरेशी स्पष्ट झाली होती. कोविडकाळाने बुडत्यावर केवळ एक काडी ठेवण्याचेच काम केले असे त्यांना आकडेवारीचा आधार देत मांडले आहे. एका महत्त्वाच्या प्रश्नाची त्यांनी सविस्तर चर्चा केली आहे ती म्हणजे टाळेबंदीने काय साधले. आकडेवारी असे सांगते की, टाळेबंदीकरून काहीच फारसे साध्य झाले नाही. उलटपक्षी रोजगार गेल्याने गरिबांची सर्वाधिक कोंडी झाली त्यामुळे परिस्थिती अधिक वाईट झाली. भारतातील लघुउद्योगांची वाईट अवस्थाही त्यांनी नेमक्या शब्दांत मांडली आहे. लसीकरण सर्वदूर होणे हेच अर्थव्यवस्थेसाठी मोठे उत्प्रेरक असेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. लेख जून- जुलैमध्ये लिहिलेला असून त्यात लसीकरण व्यवस्थित पार पडले नाही तर डिसेंबरअखेरीस तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली आहे, हे महत्त्वाचे संपूर्ण देशात केरळची आरोग्यव्यवस्था सर्वोत्तम आहे, असे मानले जाते. त्यांनी पहिली लाट व्यवस्थित नियंत्रणात आणून तसा आदर्शही घालून दिला. देशभरात त्याची चर्चा झाली. मात्र आपण त्यांचे कौतुक करण्यात काहीशी घाईच केली का, हा प्रश्न दुसऱ्या लाटेच्या वेळेस पडला, त्याचीच चर्चा एम. जी राधाकृष्णन यांनी त्यांच्या लेखात केली आहे. कल्पना स्वामिनाथन आणि ईशरत सैय्यद यांनी कल्पिश रत्ना या नावाने लेखन केले असून त्यांचा लेख जगातली पहिली लस केव्हा, कशी अस्तित्वात आली इथपासून ते लशींबद्दलच्या कथा- दंतकथा सांगत विद्यमान कोविडकाळातील लशींची चर्चा करणारा आहे. कोविडकाळात सर्वात भीषण परिस्थितीला भारतालाच का सामोरे जावे लागले याची मीमांसा करणारा हा लेख महत्त्वाचा आहे.
रिपोर्ताज चांगले असले तरीही त्यात विविध कोन धुंडाळत, एकसूत्रता राखत, रिपोर्ताजच्याही पलीकडे जाण्याची संधी लेखकांना होती. मात्र अर्थव्यवस्थेवरचा अपवादात्मक लेखवगळता तसा प्रयत्न झालेला दिसला नाही. शिवाय या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर तीन ऑक्सिजन सिलेंडर्सचे चित्र आहे. ऑक्सिजनची गळती आणि कमतरता हे दुसऱ्या लाटेतील भयाण वास्तव होते. मात्र ते या लेखांमधून तेवढय़ा तीव्रतेने समोर आलेले नाही हे प्रकर्षांने जाणवते. लेखांचे संपादन चिराग ठक्कर यांनी केले आहे. ‘फाळणीनंतरचे सर्वात मोठे स्थलांतर कोविडकाळाने पाहिले’ असे विधान करतानाच ते स्थलांतर म्हणजे देशपातळीवरील नियोजनाचे कल्पनादारिद्र्यच होते असे म्हणत वर्मावरच बोट ठेवले आहे. कोविडने काय केले तर आधीच अपुऱ्या असलेल्या आरोग्य व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली, हाच या सर्व लेखांचा मथितार्थ आहे.
‘ द डार्क अवर — इंडिया अंडर लॉकडाउन्स’
संपादन : चिराग ठक्कर
प्रकाशक : रूपा पब्लिकेशन
पृष्ठे :२१६ ;
किंमत : ३९५ रुपये