पंकज भोसले pankaj.bhosale@expressindia.com

२०१५ साली ‘बुकर’च्या लघुयादीत स्थान पटकाविलेल्या ‘द फिशरमेन’ या कादंबरीतून नायजेरियातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक पटलाला विस्तृतपणे चित्रित करणाऱ्या चिगोझी ओबिओमा या नायजेरियन लेखकाची ‘अ‍ॅन ऑर्केस्ट्रा ऑफ मायनॉरिटिज्’ ही नवी कादंबरीही यंदाच्या ‘बुकर’ लघुयादीत झळकली आहे. ‘बुकर’ लघुयादीतील पुस्तकांचा परिचय करून देणाऱ्या ‘बुकरायण’ या नैमित्तिक लेख-लघुमालिकेतील आजचा लेख.. ओबिओमा यांच्या ताज्या ‘देशीवादी’ कादंबरीबद्दल!

आफ्रिकी साहित्य गेल्या दोन दशकांमध्ये आफ्रिकेतर देशांमध्ये लोकप्रिय होण्याची जी कारणे आहेत, त्यात ‘दु:ख सांगण्याची कला’ येथील लेखकांच्या नव्या पिढीने आत्मसात केल्याची बाब सर्वात महत्त्वाची मानावी लागेल. जगाला आफ्रिकेतील रानवट आणि कथित मागास संस्कृतीमधील जगण्याची आवर्तने वोल सोयंका, नगिब मेहेफूज, चिन्वा अचेबे, बेन ओकरी या लेखकांच्या पहिल्या पिढीने दाखवून दिली. निर्वसाहतीकरणानंतर आफ्रिकी जगण्यातील कित्येक बदलांना कवेत घेताना पारंपरिक श्रद्धा-अंधश्रद्धांनी जखडलेले आयुष्य, विविध टोळ्यांचा इतरांवर वर्चस्व मिळविण्यासाठी चालणारा संघर्ष, पाश्चिमात्य संस्कृतीचे आक्रमण आणि गुलामगिरीमुळे देशोदेशी विखुरलेल्या खुणांचा शोध घेताना सापडलेल्या जाणिवांचे प्रतिबिंब आफ्रिकी साहित्यामध्ये पहिल्यांदा उमटायला लागले. आधुनिक आफ्रिकी पिढीला आत्मविकासासाठी देशाटनाच्या संधी आणि सुविधा यांची मुबलक मात्रा मिळाल्यानंतर तयार झालेल्या लेखकांनी सर्वात आधी आपला जागतिक वाचक ओळखला. मग त्यांनी इथल्या जगण्यातील अतिविलक्षण बाबींना साहित्यामधून जगभर पोहोचविण्यास सुरुवात केली. या प्रारूपाचे चटकन कळणारे उदाहरण घ्यायचे झाले, तर मराठी साहित्यामध्ये ग्रामीण जीवनाचे, दलित आत्मजाणिवांचे रसरशीत वगैरे प्रतिबिंब लेखकांकडून आले, ते त्या साहित्याच्या नागरी वाचकांना आकर्षित करण्यासाठी होते. तसेच आफ्रिकी भूमीवरच्या प्रथा-परंपरा-श्रद्धा-अंधश्रद्धांमध्ये सरमिसळ झालेल्या आधुनिक संस्कृतीचे ताणेबाणे हे इतर आंतरराष्ट्रीय वाचकपेठेसाठी अगदीच नवे असल्यामुळे इथून तयार होणाऱ्या साहित्यकृतींकडे जगभराचे तात्काळ लक्ष वेधले जाते. ई. सी. ओसोंडू यांचा ‘व्हॉइस ऑफ अमेरिका’ हा कथासंग्रह, नो व्हायोलेट बुलावायो या तरुण लेखिकेची २०१३ च्या बुकरच्या लघुयादीत समाविष्ट झालेली ‘वी नीड न्यू नेम्स’ ही कादंबरी, दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय ग्रंथ प्रकाशन संस्थेशी आवाढव्य रकमेचा करार करणाऱ्या अक्वेकी इमाझी यांची ‘फ्रेशवॉटर’ ही कादंबरी या लक्षवेधी कलाकृतींमध्ये आजच्या आफ्रिकेचे आपल्याला दिसणाऱ्या वृत्तमाध्यमांपलीकडचे जग दिसते.

आपल्या साहित्याच्या बळावर अमेरिका-ब्रिटनमध्ये कायमचे वास्तव्य करून आफ्रिकी स्पंदने टिपणाऱ्या नव्या पिढीच्या लेखकांमध्ये चिगोझी ओबिओमा या नायजेरियन लेखकाचे नाव आता बऱ्यापैकी ओळखीचे झाले आहे. नायजेरियात सर्वाधिक व्यापलेल्या इग्बो जमातीच्या धारणांवर आधारलेल्या दोनच कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. विशेष म्हणजे, त्या दोन्ही कादंबऱ्यांना बुकरच्या लघुयादीमध्ये स्थान मिळाले आहे! २०१५ साली आलेल्या त्यांच्या ‘द फिशरमेन’ या कुटुंब आणि सूड कथा असलेल्या कादंबरीमध्ये नायजेरियातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक पटलाला विस्तृतपणे रंगविण्यात आले होते. इग्बो जमातीमधील श्रद्घा, मिथके यांना घेऊन ग्रीक शोकांतिकांसारखी बृहद् कादंबरी रचण्यात ओबिओमा यांनी हातोटी मिळविली आहे. इंग्रजी, इग्बो, येरूबा आणि टर्की भाषा आत्मसात असलेले ओबिओमा अमेरिकेतील विद्यापीठात इंग्रजी शिकवितात. अन् यंदा नशीब फळफळले, तर ‘अ‍ॅन ऑर्केस्ट्रा ऑफ मायनॉरिटिज्’साठी बुकरचे विजेतेही ठरू शकतात.

आंतरराष्ट्रीय वाचकपेठेत अस्सल आफ्रिकी अनुभूती विकणाऱ्या ताज्या लेखकांमध्ये ओबिओमा यांची कादंबरी वाचण्यास सर्वात अवघड आहे. कारण त्यात इग्बो संकल्पनांचा वारंवार जोरकस वापर आहे. हिंदू विश्वउत्पत्तीशास्त्रामध्ये सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि (आपण सध्या जगत आहोत ते) कलीयुग मानले जातात. जन्म-मृत्यू-पुनर्जन्माच्या फेऱ्याबाबत आध्यात्मिक संकल्पना मानल्या जातात. इग्बो समाजाच्या त्याहून अधिक जटिल अशा विश्वउत्पत्तीच्या धारणा आहेत. व्यक्तीच्या आयुष्याचे चक्र जन्म, शैशव, पौगंडावस्था, तारुण्य, वार्धक्य, मृत्यू, दफनविधी, आत्मा, अवतार, पहिला पुनर्जन्म, दुसरा ते आठवा पुनर्जन्म या फेऱ्यांतून सुरू राहते, असे या समाजात मानले जाते. त्याचबरोबर पृथ्वीवर व्यक्तीवर नियंत्रण ठेवणारे, त्याच्या हातून भले किंवा बुरे कृत्य करवून घेणारे निदर्शक आत्मतत्त्व (गार्डियन स्पिरिट) समांतररीत्या शरीराबाहेर कार्य करीत असते, हा या जमातीचा विश्वास आहे.

या धारणा-संकल्पनांना टाळून कादंबरीचे आकलन अवघड आहे. कारण कादंबरीचा निवेदक हाच एक निदर्शक आत्मा आहे, जो नायकाची- म्हणजे तो ज्याला सर्व कार्य करण्यास प्रवृत्त करतो, त्याची- कहाणी सांगताना दिसतो. अनेक जन्म-मृत्यूची चक्रे पाहिलेला हा जगावेगळा निवेदक ओबिओमा यांनी खासच तयार केला आहे. अन् तो समजावा यासाठी कादंबरीच्या सुरुवातीला इग्बो जमातीमधील धारणांचे चक्र, आकृत्या आणि स्पष्टीकरण दिले आहे.

आपल्या कलियुगाला समांतर असलेल्या इग्बो काळात कादंबरीचा निवेदक नायजेरियामध्ये कोंबडय़ा विकून उदरनिर्वाह करणाऱ्या चिनोन्सोची गोष्ट सांगतो. नऊ महिन्यांपूर्वी त्याचे वडील वारल्यामुळे जगात त्याचे कुणीही आप्त उरलेले नसतात. आईचा आधीच झालेला मृत्यू, वृद्धाचा हात धरून पळून गेलेली बहीण यांच्या पाशातून केव्हाच बाहेर आलेला चिनोन्सो आपल्या कोंबडय़ांच्या जगात स्वत:ला रमवत असतो. आपल्या कोंबडय़ांच्या फौजेला ‘कॉम्रेड्स’ म्हणून संबोधणाऱ्या चिनोन्सोची संध्याकाळ ऑलिव्हर डीकॉक या गायकाच्या गाण्यांची कॅसेट ऐकण्यामध्ये जात असते. समाजात आर्थिकदृष्टय़ा अत्यंत खालच्या स्थितीतला, शिक्षण अर्ध्यावर सुटल्याने जगाचे मर्यादित भान असलेला हा नायक आहे. शरीराची नितांत गरज भागविण्याची वेळ आली असल्याची जाणीव झाल्यानंतर तो वारांगनेच्या दारात उभा राहतो. कॉलेजांजवळून जाणाऱ्या रस्त्यांवरील तरण्याताठय़ा पोरींच्या शरीर रचनांचा स्व-अभ्यास करणे हा त्याचा नैसर्गिक छंद बनलेला असतो.

एके दिवशी त्याच्या आयुष्यात प्रचंड मोठा बदल घडविणारा प्रसंग घडतो. घाऊक बाजारातून कोंबडय़ांचा अत्यंत महागडा सौदा करून तो आपल्या व्हॅनमधून घरी परतत असताना, नदीच्या पुलावर उभी राहून एक तरुणी आत्महत्येस सरसावल्याचे त्याला लक्षात येते. आत्महत्येपासून त्या तरुणीला परावृत्त करण्यासाठी तो नुसती याचनाच करीत नाही, तर खाली वाहत असलेल्या अफाट नदीप्रवाहात आपल्या सर्वात महागडय़ा कोंबडय़ा फेकून देतो. नदीत उडी मारल्यास काय घडू शकते, याचे प्रात्यक्षिक कोंबडय़ांच्या रूपात पाहिल्यामुळे ही तरुणी आत्महत्येचा निर्णय मागे घेते. नदली नावाची ही तरुणी हळूहळू हिंदी चित्रपटांतल्या नायिकेच्या थाटात चिनोन्सोच्या प्रेमात पडते. प्रियकराने सोडून दिलेली नदली श्रीमंत घरातील आणि रसायनशास्त्रात पदवीधर होऊ घातलेली असते. निरक्षर कोंबडीविक्या चिनोन्सोवर ती जीव ओवाळून टाकायला तयार असते. मात्र, तिचे कुटुंब या प्रेमाला आणि त्यांच्या लग्नाला नुसता विरोधच करीत नाहीत, तर हिंदी चित्रपटात शोभेलशा प्रसंगासारखा चिनोन्सोचा त्याच्या भणंग आणि अडाणीपणावरून अपमानही करतात.

अपमानदग्ध चिनोन्सो मग आपल्या प्रेमाला सन्मानाने मिळविण्यासाठी शिक्षण घेण्याचा निर्धार करतो. आपली सारी मिळकत, संपत्ती विकून पैसा उभारून तो एका मध्यस्थाद्वारे सायप्रसमध्ये पोहोचतो. तेथील विद्यापीठात शिक्षण घेण्याची त्याची महत्त्वाकांक्षा तिथे पोहोचल्यावर उद्ध्वस्त होते. मध्यस्थाकडून फसवणूक झाल्याचे त्याला लक्षात येईस्तोवर आपल्या हाती काहीच शिल्लक राहिलेले नसल्याच्या प्रखर जाणिवेने तो होरपळून निघतो. सायप्रसमधील वंशविद्वेशाचा सामना करीत तिथे जगण्यासाठी चाललेला आटापिटा त्याचे आयुष्य आणखी खोलात नेण्यास कारणीभूत ठरते.

शिक्षणासाठी सायप्रसला असलेल्या वास्तव्यात नायजेरियातून शिक्षणाच्या नावावर मध्यस्थांकडून केली जाणारी तरुणांची प्रचंड मोठी आर्थिक फसवणूक जवळून अनुभवली असल्याचा उल्लेख ओबिओमा यांनी मुलाखतींमधून केला आहे. चिनोन्सोच्या आयुष्याची फरफट स्व-अनुभवांमुळेच अत्यंत भीषण तपशिलांसह कादंबरीमध्ये आली आहे.

कादंबरीमध्ये छोटी-छोटी प्रकरणे भरपूर आहेत. चिनोन्सोच्या आयुष्याशी जोडल्या गेलेल्या अनेक व्यक्तींच्या उपकहाण्या आहेत. इथला चिनोन्सो आपल्या प्रेयसीला ‘मॉमी’ हाक मारताना दिसतो. मात्र त्याची विचारसरणी पूर्णपणे पुरुषवादी, मत्सरी, अहंकारी आणि संशयी असल्याचे जागोजागी प्रतीत होते.

कादंबरीच्या सुरुवातीला असलेल्या इग्बो संकल्पनांचा अवघड टप्पा पार करेस्तोवर इथले वाचन सुकर होऊ शकत नाही. दुय्यम पात्रांची विचित्र आणि लक्षात न राहणारी नावे कथानकावर लक्ष केंद्रित होण्यासाठी आणखी एक दिव्य आहे. या लेखकाची आधीची ‘द फिशरमेन’ ही कादंबरी आवडली असल्यास आणि वाचनानंदासाठी कष्ट घेण्याची तयारी असल्यासच या कादंबरीची वाट धरावी.

यंदाच्या बुकरसाठी स्पर्धेत असलेल्या आणि येथे आढावा घेण्यात आलेल्या आत्तापर्यंतच्या प्रत्येक कादंबरीमध्ये स्थलांतर हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. ‘अ‍ॅन ऑर्केस्ट्रा ऑफ मायनॉरिटिज्’मधल्या स्थलांतराला आजच्या युरोपातील भीषण सामाजिक प्रश्नांचा संदर्भ असल्याने ही कादंबरी स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी आपले सारे काही हरवून बसणाऱ्या आजच्या नायजेरियन तरुणाईची शोकांतिका मांडते. कोंबडीविक्याच्या प्रेमगाथेचा हा आत्यंतिक देशीवादी भूमिकेतून घेतलेला वेध आहे.

‘अ‍ॅन ऑर्केस्ट्रा ऑफ  मायनॉरिटिज्’

लेखक : चिगोझी ओबिओमा

प्रकाशक :  लिटिल ब्राऊन अ‍ॅण्ड कं.

पृष्ठे: ५२८, किंमत : २,७७३ रुपये

 

Story img Loader