रवींद्र कुलकर्णी
पुलवामा हल्ल्याविषयीचे हे पुस्तक जम्मू-काश्मीर राज्य पोलीस तसेच अन्य तपास यंत्रणांबद्दलही माहिती देते. संसदेवरील २००१च्या हल्ल्याचे उपकथानक त्याच ओघाने येथे येते. मुक्त पत्रकाराने लिहिलेले हे पुस्तक रंजकही आहे, हे विशेष..

शोपिआन, अनंतनाग, कुलगाम आणि  पुलवामा हे जम्मू-काश्मीरमधील काश्मीर खोऱ्याच्या दक्षिण भागातले चार जिल्हे गेले १० ते १२ वर्षे अशांत आहेत. दगडफेकीच्या नवीन अस्त्राचा वापर करणे याच ठिकाणी सुरू झाले. बुऱ्हाण वाणी २०१६ मध्ये लष्कराकडून मारला गेल्यावर स्थानिक जनतेत अभूतपूर्व असंतोष निर्माण झाला व हिंसक घटना वेगाने वाढल्या. या अतिरेक्यांना स्थानिक जनतेचा सक्रिय पाठिंबा मिळतो हेही चित्रवाणी वृत्तवाहिन्यांवरून दिसले. तरीही काश्मीरच्या संघर्षांत आत्मघाती हल्ल्यांचे प्रमाण नगण्य आहे. सर्वसाधारणपणे, अतिरेकी आपण मारले जाऊ याची कल्पना असतानादेखील हल्ला करतात, लष्कराकडून एखाद्या परिसरात घेरले जातात आणि नंतर मारले जातात. पण या आंदोलनाच्या संपूर्ण इतिहासात स्वत:च्या शरीरावर किंवा वाहनात स्फोटके लावून ती उडवून देण्याच्या घटना केवळ दोन आहेत. ‘काश्मिरी लोकांचा तो स्वभाव नाही’ असे लष्कराचे निरीक्षण आहे. या आधी २००० साली अफक अहमद शहा या तरुणाने लष्कराच्या तळावर अशा हल्ल्याचा प्रयत्न केला होता. दुसरी घटना म्हणजे १४ फेब्रुवारी १९१९ ला आदिल अहमद दार या स्थानिक तरुणाने पुलवामा जिल्ह्यातल्या आवन्तिपुराजवळ केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) काफिल्यावर केलेला हल्ला.. ज्यात ४० जवान मारले गेले. सीमेपलीकडून दहशतवादाला मिळणारे समर्थन सिद्ध करण्यासाठी या हल्ल्याचे संपूर्ण धागेदोरे शोधणे महत्त्वाचे होते. भारताच्या संरक्षण खात्यातल्या विविध संस्थांनी ते कसे तडीस नेले याची कहाणी राहुल पंडिता या अशांत भागातून वृत्तांकन करणाऱ्या काश्मिरी (गेली अनेक वर्षे दिल्ली-स्थित) पत्रकाराने लिहिलेले ‘द लव्हर बॉय ऑफ बहावलपूर’ हे या विषयावरील पुस्तक एका बैठकीत वाचून संपवता येते.

Nitrate-rich groundwater in Wardha district
धक्कादायक! वर्धा जिल्ह्यातील भूगर्भात नायट्रेटयुक्त पाणी, कर्करोगासह विविध आजार…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Supriya Sule and Saif Ali Khan
Attack on Saif Ali Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाल्या…
How to invest in mutual fund SIPs the right way
म्युच्युअल फंडामध्ये योग्य पद्धतीने गुंतवणूक कशी करावी? जाणून घ्या, SIP कशी सुरू करावी?
nana patole loksatta news
Nana Patole : “बीड, परभणीच्या घटना सरकार प्रायोजित”, नाना पटोलेंनी सांगितले घटनांमागील…
terrorist cases are investigated with caste bias
प्रत्येक दहशतवादी प्रकरणाचा तपास जातीय पूर्वग्रहातून, दोषसिद्ध आरोपींचा उच्च न्यायालयातील अपिलात आरोप
TCS , quarterly results , Infosys, Wipro,
ससा कासवाची गोष्ट : ‘टीसीएस’ला फळले… इन्फोसिस, विप्रोच्या तिमाही निकालांचे काय ?
mumbai police chief vivek phansalkar news in marathi
मुंबईतील वित्तीय, गुंतवणूक संस्थांची माहिती गोळा करा; मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचे आदेश

याच अनुषंगाने राहुल पंडिता यांनी, संसद भवनावर २००१ साली झालेल्या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार गाझीबाबा व इतर काही अतिरेक्यांना कसे संपवण्यात आले तेही सांगितले आहे. काश्मिरात भारतीय लष्कर व निमलष्कराची विविध दले कशी काम करतात यावरही या पुस्तकातून प्रकाश पडतो. एनआयए, सेन्ट्रल फोरेन्सिक लॅबोरेटरी यांचा महत्त्वाचा वाटा या तपासांचा गुंता उलगडण्यात कसा असतो, याचाही तपशील लेखकाने वेळोवेळी दिलेला आहे.

पुलावामा येथे सीआरपीएफच्या तांडय़ाजवळच झालेल्या स्फोटानंतर अर्थातच स्फोटकांनी भरलेली कार कोणाची होती व ती चालवत कोण होते याचा छडा लावणे महत्त्वाचे होते. वाहन आणि चालक यांचा या स्फोटात पार चुराडा झाल्याने हे शोधण्याचे काम सोपे नव्हते. हा स्फोट घडवल्यावर जैश-ए-मोहम्मद या संघटनेने १५ मिनिटांतच ध्वनिचित्रसंदेश प्रसारित करून त्याची जबाबदारी घेताना, आदिल दार याला त्याबद्दल बोलताना त्यात दाखवले होते. पण त्याच्या ओठांच्या हालचाली त्याच्या शब्दाबरोबर होत नव्हत्या म्हणून ‘एनआयए’ला या व्हिडीओच्या सत्यतेबद्दल शंका होती. तपास केल्यावर तो २०१८ पासूनच घरात नसल्याचे समजले. तसेच ती वापरली गेलेली कार कोणाची होती हादेखील तपास महत्त्वाचा होता. चुराडा झाला असला तरी या मोटारीचा काही भाग व इंजिनाचा काही भाग शाबूत होता, पण त्यावर कोरलेले नंबर बहुधा आधीच खोडून टाकले गेले होते. येथे तपास अडकून पडला होता. पुढच्या शोधासाठी मारुती कंपनीच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली गेली. त्यांनी अखेर त्या कारच्या क्रँक शाफ्टच्या मदतीने त्या कारचा पूर्ण इतिहास शोधण्यात अधिकाऱ्यांना यश आले. शोधाअंती ती कार सहा लोकांना विकली गेल्याचे पुढे आले. २० फेब्रुवारीला एनआयएच्या तपास पथकातील १०० जण व केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (‘सीआरपीएफ’चे) ४०० जवान यांनी स्फोटाच्या ठिकाणी शोध सुरू केला. तेव्हा एनआयएचे अधीक्षक राकेश बलवाल यांना स्फोटाच्या ठिकाणापासून काही अंतरावर एक किल्ली व हाताच्या अंगठय़ाच्या हाडाचा तुकडा मिळाला, ज्याने तपास काही अंतर वेगाने पुढे गेला! हे सारे एखाद्या डिटेक्टिव्ह कादंबरीतल्या सारखे रंजकपणे, राहुल पंडिता यांनी मांडले आहे.

बालाकोटमध्ये किती मारले?

पुलवामा हल्ल्याची प्रतिक्रिया देण्यासाठी बालाकोट हे ठिकाण कसे निवडण्यात आले याबद्दलही लेखकाने माहिती दिली आहे, पण ती अपुरी आहे. भारतातल्या मोक्याच्या ठिकाणाचा शोध पाकिस्तानमध्ये इंटरनेटवरून किती वेळा होतो याकडे सरकारचे लक्ष असते. एखाद्या ठिकाणचा शोध खूप वाढला तर तिथे काही गडबड होण्याची शक्यता गृहीत धरली जाते. अर्थात याचा उपयोग चकवा देण्यासाठीसुद्धा केला जातो. बालाकोटच्या हल्ल्यात किती पाकिस्तानी अतिरेकी मारले गेले वा जखमी झाले असावेत याचा आकडा लेखकाने दिलेला नाही.

या पुस्तकाच्या निमित्ताने वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर लेखक राहुल पंडितांच्या मुलाखती झाल्या आहेत. त्यात त्यांनी, सुरक्षा बलाचे यश किती अतिरेकी मारले गेले यावर मोजण्यात येते याबद्दल खंत व्यक्त केली आहे. मुळात अतिरेकी निर्माणच होऊ नयेत अशी काही व्यवस्था निर्माण करणे म्हणजे काश्मीर प्रश्न सोडवण्यासारखेच आहे.

जे पोलिसांसाठी व लष्करासाठी खबरे म्हणून काम करतात त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवता येईल अशी परिस्थिती नाही (पुस्तकात ‘पुलवामा हल्ल्यातील अतिरेक्यांची ने-आण’ केल्याच्या संशयावरून पकडले गेलेले जम्मू-काश्मीरचे माजी पोलीस उपअधीक्षक दविंदर सिंग यांचा थेट उल्लेख नाही, लेखक खबऱ्यांबद्दल मात्र सविस्तर लिहितो). नूर मोहम्मद तंत्री यांच्यावरचे प्रकरण यादृष्टीने वाचनीय आहे. ही व्यक्ती केवळ चार फुटांची होती. शिवाय चालताना लंगडत चाले. त्याच्याविषयी कोणालाही संशय येणे अवघड होते. पण संसद भवनावरल्या हल्ल्याचा सूत्रधार गाझीबाबा याला स्थिरस्थावर करण्यात त्याचा हात होता. दिल्लीच्या फळबाजारात तो पकडला गेला. नंतर १२ वर्षे त्याने तुरुंगात काढली. त्याने लष्कराला मदत करण्याचे मान्य केले. ‘आय सी ८१४’ विमान अपहरणामधल्या दोघांची नावे या तंत्रीनेच सांगितली. या गोष्टी करत असताना तो सतत त्याच्या पाकिस्तानी मुखियांशी संपर्कात असे. नंतर तो उघडपणे जैशला सामील झाल्यावर लष्कराची पंचाईत झाली. त्यामुळे खबऱ्या लोकांवर पूर्ण अवलंबून राहणे धोक्याचे असते. पण तो धोका पत्करावा लागतो व त्याची फळेही मिळतात. एक सुतार, ज्याने लष्कराच्या तळावर मंदिर बांधण्याचे काम केलेले होते, त्यानेच नंतर गाझीबाबाचा शोध लावायला मदत केली होती, ती कशी याचे उपकथानकही या पुस्तकात येते.

आयपीएस असलेले राकेश बलवाल यांना पुलवामा हल्ल्याचा तपास पूर्णत: उलगडण्याचे श्रेय लेखकाने दिले आहे. पुलवामाचा हल्ला आदिल दार याने केला एवढय़ावरच तपास थांबलेला असताना आणि त्याचे नियोजन कोणाचे व कसे होते याचा कुठलाही पुरावा नसताना, राकेश बलवाल यांनी पुलवामानंतर झालेली प्रत्येक चकमक तपासण्याचे ठरवले. या शोधादरम्यान त्यांना, चकमकींत ठार झालेल्या दोन मृत आतंकवाद्यांचे खराब झालेले मोबाइल फोन मिळाले. ते उघडण्याचा काश्मीर पोलिसांच्या सायबर सेलचा प्रयत्न अयशस्वी ठरला; पण राकेश बलवाल यांनी थोडय़ा प्रयत्नाने ते फोन दिल्लीतील इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमकडे सोपवले. या तज्ज्ञ पथकाने दोन्ही फोन ‘क्रॅक’ केल्यानंतर, घटनेचे धागेदोरे शेवटी पाकिस्तानातल्या मसूद अझपर्यंत पोहोचले!

या प्रकरणातला – चकमकीत आधीच ठार झालेला- बहावलपूरचा ‘लव्हर बॉय’ कोण? तो त्याचा मोबाइल आज्ञा असतानादेखील का नष्ट करत नाही? हे पुस्तकात वाचणेच योग्य!

द लव्हर बॉय ऑफ बहावलपूर

लेखक : राहुल पंडिता

प्रकाशक : जगरनॉट बुक्स

पृष्ठे : २१२, किंमत : ३९७ रु.

Story img Loader