याशिका दत्त यांचं ‘कमिंग आउट अॅज अ दलित’ हे पुस्तक २० फेब्रुवारीला, म्हणजे आंबेडकर जयंतीच्या सुमारे दोन महिने आधीच प्रकाशित झालं. या दोन महिन्यांत पुस्तकाला भरपूर प्रसिद्धी मिळालेली आहे. गांभीर्यानं भारतीय पुस्तकांकडे पाहणाऱ्या जवळपास साऱ्याच इंग्रजी वृत्तपत्रांनी, काही वृत्त-वाहिन्यांनी आणि वृत्त-संस्थळांनी या पुस्तकाची सकारात्मक दखल घेतली आहे. मात्र ‘दलित असल्याचं सांगायला एवढा उशीर? का बरं?’ अशी प्रतिक्रियाही उमटते आहे.. ‘प्रसारमाध्यमांचं तोंड नेहमी एकाच बाजूला असतं आणि म्हणून त्यांना या प्रतिक्रिया दिसतच नाहीत,’ हे समजा मान्य केलं तरी या प्रतिक्रियांचा प्रतिवाद आवश्यक होता. तसा तो होताना दिसत नाही. कदाचित ‘माझं पुस्तक आणि माझं कामच टीकेला उत्तर देईल’ असं म्हणून याशिका दत्त विषय संपवू शकतात. खरोखरच आहे का काम तसं? पुस्तकातल्या १२ पैकी आठ लेख आत्मपर आहेत, त्यात स्वत: वा कुटुंबीयांबद्दल तटस्थपणा दिसून येतो. नंतरचे तीन लेख हे दलित चळवळीबद्दल, दलितत्वाबद्दल आणि अखेरचा लेख ‘दलित-बिगरदलित’ अशा दुहीच्या तोटय़ांबद्दल आहे.
लेखिका शिक्षणाच्या संधी मिळवत, दिल्लीच्या ‘सेंट स्टीफन्स कॉलेज’मध्ये असतानापासून फॅशनविषयक लिखाण करून, पुढे कोलंबिया विद्यापीठात पत्रकारिता कशी शिकली आणि या सर्व काळात दलितांविषयी उच्चवर्णीयांची मतं काय आहेत हे दिसत असूनही दलितत्व तिनं कसं लपवलं, याविषयीचं हे आत्मकथन. रोहित वेमुला प्रकरणानंतर, २१ जानेवारी २०१६ रोजी तिनं ‘होय, मी दलित आहे’ असा लेख लिहिला. कथित ‘समरसतावादा’ची जबाबदारी दलितांवरच का ढकलली जाते, हा प्रश्न हे पुस्तक वाचणाऱ्यांना पडेल. लेखिकेचं काम (सर्व) तरुणांमध्ये जाणीवजागृतीचं आहे आणि एका पुस्तकापुरतं ते मर्यादित न ठेवता, ‘डॉक्युमेंट्स ऑफ दलित डिस्क्रिमिनेशन’ या ब्लॉगद्वारे तिनं ते सुरू ठेवलं आहे.